समर्थ रामदास स्वामी | Ramdas Swami

समर्थ रामदास स्वामी (Ramdas Swami ) यांच्या जीवनाचा व्याप फार मोठा होता. त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते. समर्थ रामदास स्वामी हे त्यांना पडलेले नाव आहे. संन्यास घेतल्यावर हिंदू धर्मामध्ये नाव बदलतात. परंतु समर्थ रामदास स्वामी नाव ठेवण्यामागेही काही संदर्भ आहेत. त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये मी रामाचा दास आहे असे अनेक ठिकाणी लिहिलेले आहे. त्यामुळे त्यांना लोक रामदास म्हणू लागले.

तसेच त्यांनी वेळोवेळी आपले सामर्थ्य दाखवून ते आपले कार्य करत असत. तसेच त्यांनी हतबल झालेल्या समाजाला शक्ती आणि सामर्थ्य यांचे महत्त्व पटवून दिले. म्हणून त्यांना समर्थ रामदास म्हटले जाऊ लागले. तसेच ते रामदासी पंथाचे प्रमुख असल्याने पुढे स्वामी जोडले गेले.म्हणून त्यांना समर्थ रामदास स्वामी असे नाव पडले असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामींचा जन्म इ.स. 1608 मध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. संत तुकाराम महाराजांचा जन्मही याच साली झाला होता. तर रामदास स्वामींचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1681 साली झाला. त्यांना एकूण 72 वर्षांचे आयुष्य मिळाले.

त्यांचे जन्मगाव जाम जिल्हा जालना असून ते महाराष्ट्रातील मराठवाड्यात आहे. त्यांची जन्म तिथी चैत्र नवमी म्हणजे श्रीराम जन्मोत्सव ही आहे.त्यांचे पूर्वज आणि त्यांच्या 23 पिढ्यांची वंशावळ आजही उपलब्ध आहे. त्यांचे कर्नाटक मधील बेदर हे मूळ गाव होते. भारतात फार मोठा दुष्काळ पडल्यामुळे खूप वर्षापूर्वी ते महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जाते. प्रथम ते बीड या जिल्ह्याच्या ठिकाणी आले व नंतर जाम या गावी स्थलांतरित झाले. त्यांच्या घरात परंपरेने सूर्यउपासना व रामउपासना चालत आलेली होती.

म्हणून त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार हे लहानपणापासूनच झाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी तर आईचे नाव राणूबाई होते. रामदासांना एक मोठा भाऊ होता त्याचे नाव गंगाधर होते. त्यांचे वडील अनेकांना गुरु मंत्र द्यायचे. पुढे त्यांनी आपला मुलगा गंगाधर यालाही गुरुमंत्र दिला होता. परंतु नारायणाला मात्र ते गुरुमंत्र देत नाहीत.म्हणून त्यांनी आपला भाऊ गंगाधराला गुरुमंत्र द्यायचा आग्रह केला. परंतु इतक्या लहान वयात नको म्हणून वडील आणि भाऊ दोघेही त्यांना गुरु मंत्र देत नसत. अशावेळी त्यांनी ध्यास घेतला आणि या ध्यासापोटी साक्षात प्रभूरामानी त्यांना गुरु मंत्र दिल्याचे एका दंतकथेत सांगितलेले आहे.

परंतु समर्थ रामदास स्वामींचे चरित्रकार नरपाठक म्हणतात की, त्याकाळी त्यांच्या घरात कुलकर्णी पद होते. तेथे निजामांची राजवट होती त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होते. अशा अवस्थेत कुठल्यातरी कारणास्तव त्यांच्या वडिलांवर फार मोठे संकट आले असावे. वडील घरी नाहीत म्हणून त्यांच्या मुलाला शासकीय अधिकारी घेऊन गेले  असावेत आणि मुलाजवळ तो कागद दिला. या कागदामध्ये काहीतरी शासकीय संदेश असावा त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या धक्क्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पुढे नंतर त्यांच्या मोठ्या भावाने हे कुलकर्णी पद सोडून दिल्याचे कळते. आणि या सर्व गोष्टींचा घटनांचा नारायणाच्या मनावर फार मोठा परिणाम होऊन त्यांनी संन्यास घेतल्याचे सांगितले जाते.

ही गुरुमंत्राची घटना नारायण यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी घडली. त्यानंतर त्यांनी तब्बल दोन वर्षे मौन पाळले.नंतर ज्यावेळी ते बोलायला लागले तेव्हा त्यांच्या आईला व भाऊ गंगाधराला वाटले की आता नारायण रुळला  आपण आता याचे लग्न करून टाकू. आणि त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी नारायणाच्या लग्नाचा बेत आखला. आणि त्यांचा विवाह करत असतानाची घटना आपणा सर्वांना माहीतच आहे. भटजी जेव्हा मंगलाष्टके म्हणतात त्यावेळी सावधान म्हटल्यावर ते पळून गेले ते परत आलेच नाहीत. त्यावेळी ते पळून नाशिक या तीर्थक्षेत्त्री गेले होते.

पुढे त्यांनी नाशिक जवळील टाकळी नावाच्या एका खेड्यात जाऊन बारा वर्षे कडक तपचर्या केली. त्याकाळी त्यांची दिनचर्या भल्या पहाटे उठून गोदावरीच्या पाण्यात उभे राहून नाम नामाचा जप करायचा. दुपार टळेपर्यंत ते राम नामाचा जप करायचे. त्याकाळी त्यांनी 13 कोटी रामनामाचा जप केल्याचे सांगितले जाते. दुपारी जप संपल्यानंतर कुठल्यातरी घरी जाऊन भिक्षा मागून जेवण करणे व नंतर ग्रंथ वाचन करत असायचे. व नंतर नाशिकला जाऊन कीर्तने व प्रवचने ऐकायची असे  नित्यनेमाने त्यांनी  बारा वर्ष केले.

याच काळात त्यांनी काही संस्कृत ग्रंथाचा अभ्यासही पूर्ण केला. त्यांच्या साहित्त्यावरून त्यांनी वेद पुराणाचा अभ्यासही केल्याचे समजते. एकूणच त्यांच्या साहित्याचा विचार केला असता त्यांच्या अनुभवाचा आणि निरीक्षणाचा प्रभाव आपणास पहावयास मिळतो. कदाचित याच काळात करून काव्यांची निर्मिती झाली असण्याची शक्यता आहे. कारण याच काळात त्यांनी करून काव्य लिहिली असावीत असा अंदाज वर्तवण्यात येतो.

 पुढे त्यांनी भारत भ्रमण केले. त्यांची भारत भ्रमण यात्रा सन 1632 ते 1644 मध्ये झाली. 1608 साली जन्मलेल्या समर्थांनी बारा वर्षे गावाकडे काढली. म्हणजे या ठिकाणी ते 1620 पर्यंत राहिले. त्यानंतर 1620 ते 1632 पर्यंत जिथे त्यांनी साधना केली ते गाव म्हणजे टाकळीला ते राहिले. त्यानंतर वयाच्या 24 ते 36 वर्षापर्यंत त्यांनी भारत भ्रमण केले. त्यांच्या या  भ्रमणाच्या काळात भारत देशात दुर्ष्काळ पडला होता. या दुष्काळाचे वर्णन आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या अभंगात ही पाहावयास  मिळते. त्यावेळी परकीय आक्रमणाने देश वेढलेला होता. देव देवळे ओस पडलेली  होती. लोकांनी देवाच्या मुर्त्या पाण्यात बुडवून ठेवल्या होत्या. या सर्व परिस्थितीचे वर्णन रामदास स्वामींनी आपल्या कवितेत केलेले आहे. आणि या दुष्काळाचे वर्णनही त्यांच्या अभंगात पाहावयास मिळते.

तसेच त्याकाळी झालेली समाजाची व शेतकऱ्यांची परिस्थितीही त्यांनी त्यांच्या अभंगातून वर्णिली आहे. त्या काळात देवांचे थोतांड मांडून काहींनी  कसा समाजाचा खेळ केला तेही समर्थ स्वामी आपल्या कवितेतून सांगतात. त्या दुष्काळ प्रसंगी समाजाची झालेली राजकीय, सामाजिक, आणि धार्मिक स्थिती पूर्णपणे त्यांनी आपल्या कवितांमधून सांगितलेली आहे. त्यांच्या तीर्थयात्रेत त्यांनी जे जे पाहिले आणि त्यांना अनुभवायला मिळाले त्याचेहि वर्णन त्यांनी करून ठेवलेले आहे. त्यानंतर त्यांना त्या काळात त्यांनी धर्माचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परत भक्ती मार्गाने काम सुरू केले. म्हणून बारा वर्षांच्या तीर्थयात्रेनंतर परत ते जाम या गावी आले.

काही काळ त्यांची आई आणि भाऊ गंगाधर यांच्यामध्ये ते राहिले. व नंतर कृष्णा नदीच्या उगमाजवळ महाबळेश्वरला ब्रह्मारण्यामध्ये जाऊन त्यांनी पुन्हा काही काळ तपश्चर्या केली. आणि नंतर कृष्णा नदीच्या काठाने  जागा शोधत शोधत चाफळ या ठिकाणी साताऱ्यात आले. आणि त्यांनी त्यांचे ते शेवटचे ठिकाण असेल असे ठरवले. त्यांनी चाफळ या गावाची निवड करण्याची तीन कारणे सांगितली ती म्हणजे, पहिले म्हणजे रामचरित्राशी संबंधित ती भूमी होती. दुसरे म्हणजे आपले महात्मे आपल्या गावापासून दूर राहिल्याशिवाय लोकांना कळत नाही.

आणि तिसरे म्हणजे साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ त्याकाळी सुरू झाली होती. महाराजांचा आधार त्यांना तिथे मिळेल असे त्यांना वाटायचे. आणि मग उर्वरित सर्व आयुष्य त्यांनी या ठिकाणी घालवले. समर्थ रामदास स्वामींना एकांत आणि लोकांत प्रचंड आवडायचा. चाफळ या ठिकाणी त्यांनी विविध कवितांचे लिखाण केले. येथील पावसाचे दऱ्याखोऱ्यांचे वर्णनही त्यांनी त्यांच्या कविता मधून केले. देवांचे वैभव वाढवणे हे त्यांचे काम ते समजायचे. ते एकांतात जाऊन नामस्मरण व लिखाण करायचे तर आकांतात जाऊन देवाच्या वैभवाचे काम करायचे.

घरात परंपरेने आलेली राम उपासना तर चालूच होती. नद्यांमध्ये टाकून दिलेले देव परत त्यांनी मंदिरात नेऊन बसवले. आणि जागोजागी हनुमंतांची मंदिरे बांधून त्यांनी एक आदर्श  घडवला. त्यानंतर  महाराष्ट्रामध्ये गावोगावी हनुमंताची मंदिरे बांधण्यात आली. त्यामुळे सध्या हनुमंताचे मंदिर नाही असे गावच उरले नाही. ही चळवळ रामदास स्वामींनी केलेली होती. माणसाचे शरीर म्हणजे देऊळ आणि आत्मा म्हणजे मंदिरातील देव असे ते सांगायचे. त्यावर त्यांनी एक अभंगही रचला.

 पुढे चाफळ मध्ये त्यांचा मोठा शिष्य परिवार झाला. त्यांचा पहिला शिष्य अंबाजी सांगितले जातात.त्यांना पुढे कल्याण असे नाव पडले याचीही एक आख्यायिका आहे. एकदा चाफळला राम जन्मोत्सवाच्या दिवशी निर्णय मिरवणुकीच्याआड एका चाफ्याच्या झाडाची फांदी आल्यामुळे ती फांदी तोडण्यासाठी अंबाजी गेला. फांदी तोडत असताना तो पाय घसरून विहिरीत पडला. विहिर फार खोल असल्यामुळे सगळ्यांना वाटले की तो आता मेला. परंतु त्याचवेळी समर्थ स्वामींनी त्याला वेगळे नाव देऊन कल्याण या नावाने हाक मारली तर तो व्यवस्थितरित्या विहिरीतून बाहेर आला.

पुढे या कल्याण स्वामींनीच समर्थ रामदासांच्या ग्रंथांचे संकलन आणि पुनर्लेखन केले. म्हणून आपल्यावर कल्याण स्वामींचे फार उपकार आहेत. तसेच मराठी साहित्यातील समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या वेणूताई आणि अक्काताई यांचेही समर्थ वाड्मयात मोठे योगदान आहे. समर्थ रामदासांच्या शेवटच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदासांचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे शेवटची चार-पाच वर्षे त्यांची सुखासमाधानात गेली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना सज्जनगड भेट दिला होता. काहींच्या मते महाराजांची आणि स्वामींची भेट हि स्वामी चाफळला आल्यानंतर चार-पाच वर्षात झाली तर काहींच्या मते महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांची भेट झाली.

कसेही असो मात्र या दोघांचे सख्य होते हे नक्की. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल समर्थांच्या मनात किती प्रेमभाव होता हे त्यांच्या कवितेतून आपणास पहावयास मिळते. महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर स्वामी एकदा तुळजापुरला गेले तेव्हा तुळजापूरच्या भवानी आईला त्यांनी केलेल्या प्रार्थनेमध्ये ते शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद मागतात.असे त्यांच्या साहित्यातून आपणास कळते.एकदा स्वामींनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिले होते त्या पत्रात “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू “ असे स्तुती वर्णन दिसते. तसेच रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात. “शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप” अशी शिवाजी महाराजांबद्दल बरीच महती लिहून ते संभाजी महाराजांना कळवतात.

 शेवटी 1680 मध्ये शिवाजी महाराज गेले. त्याआधी त्यांच्या आवडत्या शिष्या वेणाबाई ह्याही गेल्या होत्या . त्यामुळे समर्थांच्या मनात उदासी भरली होती. अशातच 2 फेब्रुवारी 1681 ला समर्थ रामदास स्वामींनी आपला देह ठेवला. समर्थ रामदास स्वामींनी रामदासी संप्रदायाची स्थापना केली होती. त्यांचा दासबोध ग्रंथ आणि त्यांचे वाड्मय आजही लोक अभ्यासत आहेत.

Leave a Comment