लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे चाफळ चे राम मंदिर ( Ram Temple of Chafal ) आहे. तसेच चाफळ गावचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे बडोद्याचे राजकवी य.दि. पेंढरकर यांचे चाफळ हे जन्म ठिकाण आहे. त्यांना महाराष्ट्र कवी असे म्हणतात. पेंढरकरांचा उल्लेख सप्तर्षी मध्ये माधव जूलियन यांच्या सोबत केला जात असे. चाफळ हे गाव सातारा जिल्ह्यात मांड नदीच्या काठी वसलेले आहे .उंब्रज पासून अवघ्या 11 कि.मी. वर हे ठिकाण आहे . सह्याद्री पर्वतरांगेने वेढलेले हे गाव समर्थ रामदास स्वामी स्थापित चाफळ चे राम मंदिर म्हणून आणि समर्थ रामदास स्वामींचे जीवन चरित्र यामुळे महत्त्वाचे ठिकाण आहे.
त्याचप्रमाणे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व या गावाला लाभलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी 36 वर्षे या ठिकाणी वास्तव्य केले होते पाटणमधून चाफळ येथे येण्यासाठी तीन मुख्य मार्ग आहेत. पुणे बेंगलोर हायवे ने उंब्रज मार्गे आपण येथे येऊ शकतो हायवे पासून 11 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. तसेच दुसऱ्या ताडळी मार्गे चाफळला येता येते. तसेच कोकणातून खंडो आईच्या मंदिराकडून चाफळला येता येते. चाफळ गावात आल्यावर तेथे गाडी लावण्यासाठी मोठा वाहनतळ आहे, हे ठिकाण एस टी स्टॅन्ड च्या जवळच आहे . तेथे गाडी लावून गावाच्या मुख्य पेठेतून मंदिराकडे जाता येते.
गाव बाहेरून छोटे वाटते परंतु बरेच मोठे हे गाव आहे. समर्थ रामदास ( Samarth Ramdas ) स्वामींनी इ.स. 1648 मध्ये त्यांचे काही शिष्य आणि काही गावकरी यांच्या सहकार्याने राम मंदिराचे काम पूर्णत्वास आणले. मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांना फार मोठी साथ होती. राम मंदिर जमिनीपासून उंच टेकडीवर असून मंदिराचे बांधकाम जुन्या दगडांमध्ये केलेले आहे. मंदिराच्या आत मध्ये जाण्यापूर्वीच डाव्या बाजूला एक मोठा लाकडी रथ पहावयास मिळतो. श्री राम नवमीच्या दिवशी शोभायात्रेला हा रथ बाहेर काढण्यात येतो. अन्यथा वर्षभर तो रथ तेथेच असतो. मंदिराच्या दोन्ही बाजूला मोठमोठे बुरुज आपणास पहावयास मिळतात. समोरच मंदिराचे भव्य दिव्य मोठे मुख्य प्रवेशद्वार आहे.
प्रवेशद्वारातून आत मध्ये आल्यानंतर भरपूर मोठा सभा मंडप दिसतो. सभा मंडपाच्या समोर एक छोटे मारुती मंदिर आहे. रामदास स्वामी यांनी अकरा मारुतीची स्थापना केलेली आहे त्यापैकीच हे एक आहे. येथे सुंदर मोठी पाषाणाची मारुतीची मूर्ती आहे. या मारुतीला दास मारुती असे म्हणतात.या मारुती मंदिराच्याच मागच्या बाजूला गणपतीचे छान मंदिर आहे. तसेच हा मारुती अकरा मारुतीपैकी सर्वात पहिला मारुती आहे. तेथे जवळच आपणाला एका कट्ट्यावर छोट्या छोट्या काही पुरातन मुर्त्या पाहवयास मिळतात. जवळच पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे. येथील सर्व वातावरण एकदम प्रसन्न आहे.
इ.स. 1967 मध्ये कोयना भूकंपामुळे श्री रामदास स्वामींनी बांधलेल्या मंदिराला भेगा पडून मंदिर मोडकळीस आले होते. त्यावेळी मुंबईचे मोठे व्यवसायिक अरविंद मफतलाल यांनी मंदिराची पाहणी केली असता मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्धार केला. तसेच त्यांनी इस 1972 मध्ये नवीन मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. परंतु मंदिराचा काही पुरातन बांधकामाची बांधणी त्याप्रमाणेच ठेवण्यात आली. तारकाकृती असलेले हे मंदिर काळ्या दगडांनी बांधलेल्या चौथ्यावर उभे केले आहे. या मंदिराला पाच शिखरे आहेत .
तसेच मंदिराच्या मुख्य कलश सोन्याचा असून त्यावर तांब्याची पताका आहे. मंदिराचे बांधकाम करत असताना अजिबात लोखंड वापरलेले नसून मंदिराच्या पायऱ्या चढताना आपणास श्रीहरी विष्णूच्या दहा अवतारांची शिल्प दिसतात. तसेच मंदिराच्या उजव्या पिलर वर मत्स, वराह, कुर्मा, व नरसिंह या अवताराची कोरीव शिल्प रेखाटलेली आहेत. तसेच डाव्या पिलर वर बौद्ध, कलंकी, वामन व परशुराम यांची शिल्पे रेखाटलेली आहेत. इतर अवतार शिल्पे भिंतीवर कोरलेली आहेत.
मंदिराच्या पाठीमागे सुंदर पांढऱ्या दगडामध्ये अलीकडच्या काळात जीर्णोद्धार केलेले सुंदर राम मंदिर आहे. फार सुंदर अशी कलाकृती आणि नक्षीकाम मंदिराच्या खांबावर आणि भिंतीवर केलेले आढळते. मंदिराच्या आत मध्ये आल्यानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात फार सुंदर असे नक्षीकाम केलेले दिसते. मंदिरात सुंदर राम-लक्ष्मण आणि सीतामाईची मूर्ती आहे. मंदिरामध्ये एका बाजूला देणगी वगैरे देण्यासाठी एक काऊंटर आहे. तसेच एका बाजूला नेहमी होणारे धार्मिक कार्यक्रम आणि त्यांच्या वेळा व फी यांचे वेळापत्रक दिसते. येथे सतत राम नामाचा जप करत बसलेले भक्त आपणास दिसतात.
येथे एक वृंदावन आहे तेथे समर्थ रामदास स्वामी यांच्या काही अस्थी विसर्जनापूर्वी ठेवण्यात आलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस ध्यान गुफा पहावयास मिळते. गुहेमध्ये एका वेळेस एक माणूस आत मध्ये उतरू शकतो एवढा गुहेचा दरवाजा आहे. गुहेमध्ये लाईटची सोय केलेली असून बसत बसत किंवा जास्त वाकून यामध्ये प्रवेश करावा लागतो. गुहेमध्ये पूर्ण आत मध्ये गेल्यानंतर एक ते दोन माणसे बसू शकतात एवढी जागा आहे. समर्थ रामदास स्वामींनी या गुहेमध्ये कठीण तपचर्या केली.
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाबळेश्वर पासून ते साताऱ्यातील कराड पर्यंत मारुतीची अनेक मंदिरे बांधली. तसेच राम मंदिराच्या पूर्ण मागच्या बाजूला गेल्यानंतर अकरा मारुतींपैकी दोन नंबरचा वीर मारुती म्हणजे मुख्य मारुती आहे. या मारुतीला फार जागृत मारुती देवस्थान म्हणतात.तेथे अकरा मारुतीची माहिती लिहलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे.
मुख्य मंदिराच्या सुरुवातीला मोठे पाषाणाचे तुळशी वृंदावन आहे. वीर मारुती मूर्तीची स्थापना इस 1570 मध्ये झालेली असून अलीकडच्या काळात या मंदिराचा निर्णय करण्यात आलेला आहे. इ.स. 1648 मध्ये श्री रामदास स्वामी यांनी अनेक तीर्थाटन करून ते चाफळ मध्ये आले. सुरुवातीला श्री समर्थ रामदास स्वामी सध्याच्या राम मंदिराच्या पश्चिम दिशेला एका घळीमध्ये वास्तव्य करत होते. त्या घळीला रामघळ असे म्हणतात. त्या घळीतूनच त्यांना राम दर्शन होत होते.
त्यांनी राम मंदिर बांधण्यासाठी गावातील अनेक लोकांना जागा मागितली. शेवटी काहींनी स्मशानभूमीतील ही जागा दाखवली. त्या जागेचा स्वीकार करून श्री रामदास स्वामींनी भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मदतीने मंदिराची बांधकाम पूर्ण केले. त्याच कालावधीत त्यांना दृष्टांत होऊन अंगापूरच्या डोहामध्ये एक श्रीरामांची आणि दुसरी अंगलाई देवीची अशा दोन मूर्ती मिळाल्या. मग त्यांनी अंगलाई देवीची स्थापना सज्जनगड येथे केली व श्रीराम मूर्तीची स्थापना चाफळला केली. त्यानंतर दोन्ही देवस्थानाच्या ठिकाणी सर्व उत्सव सुरू करण्यात आले.
त्यानिमित्ताने 1648 मध्ये श्रीरामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट सिंगम वाडी बागेत झाली. येथे श्रीराम मंदिराच्या ठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त एक लाख महिला जमतात. त्यानंतर चैत्र शुद्ध एकादशी पर्यंत रामनवमीचा उत्सव चालतो. भक्तांना राहण्यासाठी येथे मोठे भक्तनिवास बांधलेले आहे. रामनवमी उत्सवासाठी अकरा मारुतींपैकी शहापूरचा मारुती येथे आणला जातो. शहापूर चा मारुती येथे आणल्याशिवाय उत्सवास सुरुवात केली जात नाही. तसेच सज्जनगडला सुद्धा रामाची मूर्ती तिथे नेहल्याशिवाय तेथील उत्सव साजरा करण्यात येत नाही. अशी परंपरा दोन्ही ठिकाणी घालून देण्यात आलेली आहे.
इ.स. 1919 मध्ये अतिवृष्टीमुळे भयंकर पाऊस झाला होता. त्यावेळी वीर मारुती मंदिराचे दोन-तीन तट पडले होते. वीर मारुती पासून जवळच असलेला अकरा मारुतींपैकी तिसऱ्या नंबरचा मारुती म्हणजे शिंगणवाडी चा मारुती आहे. तसेच राम मंदिरा पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. या शिंगणवाडी गावच्या तिसऱ्या मारुतीला खडीचा मारुती असेही म्हणतात. इ.स. 1649 मध्ये स्थापन केलेल्या या मारुतीचे मंदिर पाषाणाच्या दगडाचे बनलेले आहे.
जाफर पासून ते या सिंगणवाडी परिसरात पर्यंत श्री रामदास स्वामी यांचे वास्तव्य होते. येथेच जवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री रामदास स्वामी यांच्या भेटीच्या ठिकाणी नवीन बांधकाम झालेले असून त्या ठिकाणी त्यांच्या भेटीच्या मुर्त्या स्थापन केलेल्या आहेत. तेथील हे ठिकाण सुद्धा भाविकांसाठी प्रेक्षणीय आणि दर्शनीय आहे.
चाफळचे राम मंदिर हे खरोखरच एक अद्भुत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थान आहे. समर्थ रामदास स्वामींच्या काळापासून हे स्थान महत्त्वाचे राहिले आहे. मंदिराचे बांधकाम आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा खूपच प्रेरणादायी वाटतो. शिवाजी महाराजांच्या साथीने हे मंदिर आणखी महत्त्वाचे ठरले आहे. मंदिरातील मारुतीची मूर्ती आणि रथ हे खूपच आकर्षक आहेत. श्री राम नवमीच्या दिवशी येथे होणारी शोभायात्रा ही एक अविस्मरणीय अनुभव असावा. तुम्ही कधी चाफळच्या राम मंदिराला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कसा होता?