शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून पुण्यामध्ये शनिवार वाड्याप्रमाणे “पर्वती टेकडी” ( Parvati hill Pune ) हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. या टेकडीवर 103 पायऱ्या असून समुद्रसपाटीपासून 640 मीटर उंचीवर ही टेकडी आहे. त्यामुळे पुण्याच्या अनेक भागातून ही टेकडी दिसते.
या टेकडीवर जाण्यासाठी 103 पायऱ्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बांधून घेतलेल्या आहेत. या टेकडीवर असणाऱ्या पर्वताई देवीच्या महात्म्यांमुळे या टेकडीला पर्वती टेकडी असे नाव पडले. श्री नवलोबा तावरे यांच्या मातोश्री साखर आऊ यांना एक दुर्धर आजार जडला होता. तो या देवीच्या कृपेमुळे बरा झाल्याची आख्यायिका येथे फार प्रसिद्ध आहे. श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या मातोश्री काशीबाई यांच्या पायाचे दुखणे काही केल्या बरे होत नव्हते.
टेकडीवरील पर्वताई देवीचा महिमा काशीबाईपर्यंत पोहोचला आणि त्यांनी देवीच्या दर्शनाला जाऊन देवीला नवस केला आणि त्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना या देवीचे देवालय बांधण्याची आज्ञा केली. अशा प्रकारे 1749 मध्ये थोरले बाजीराव यांचे पुत्र श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पुण्याच्या या धार्मिक आणि पवित्र स्थळाची निर्मिती केली.टेकडीच्या सर्व पायऱ्या चढून वर गेल्यानंतर समोर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर दिसते. त्याच्या डाव्या बाजूला पेशवे संग्रहालय आहे. तसेच उजव्या बाजूला भवानी माता मंदिर आहे. पर्वती वरील इतर मंदिरांपेक्षा हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसे नवीनच आहे.

इस 1931 मध्ये हे मंदिर बांधले गेले आहे. मंदिरातील सर्व मूर्ती पर्वतीच्या श्री देव देवेश्वर संस्थानचे एक सेवेकरी श्री गणेश मुदगल यांच्या घरातील होत्या. पुढे इस 1953 मध्ये या जागी नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख आढळतो. येथील भवानी माता मंदिरासमोर बाहेरील बाजूस द्वारपालाच्या मूर्ती दिसतात. मंदिरात प्रवेश करताना चौकोनात चौकोन अशा महिरपी आकाराच्या कमानीतून जावे लागते. भवानी माता मंदिराची रचना फार सुरेख असून मंदिर आवारात सगळीकडे जमिनीवर सुद्धा फरशा बसवलेल्या आहेत. येथे पर्वती ते शनिवार वाडा असा एक भुयारी मार्ग होता असे मानत असत.
परंतु पुण्याचे प्रसिद्ध अभ्यास श्री मंदार लवाटे यांच्या संशोधनातून असा कुठलाही भुयारी मार्ग नाही हे स्पष्ट झाले. येथे दिसणारा भुयारी मार्ग ही एक फक्त छोटी गुफा आहे. येथील भगवान शिव शंकराची म्हणजे देव देवेश्वराची प्रतिष्ठापना 23 एप्रिल 1749 रोजी झाली होती. देव देवेश्वर च्या मंदिराजवळ छत्रपती शाहू महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांची छायाचित्र आणि त्यांच्या कारकिर्दीतील माहिती बोर्डवर लावलेली आहे. अतिशय विशिष्ट अशा पंचायतन मांडणीचे हे देवालय आहे.
यामध्ये मध्यभागी श्री शंकराची स्थापना करून त्याभोवती सूर्यनारायण, श्री गणेश, आई भवानी आणि विष्णू यांची छोटी मंदिरे बांधलेली आहे. येथे एक मोठा तट आहे त्या तटावरून पुण्याचे रूप अतिशय सुंदर दिसते. येथे एकदा इतिहासात श्री देव देवेश्वराच्या मंदिराचा सोन्याचा कळस निजामाच्या सैन्यांनी कापून नेला होता. ही घटना इस 1751 मध्ये घडली होती. इस 1751 ते इस 1752 या काळात हैदराबादचा निजाम पुण्यावर चालून आला होता. या दरम्यानच ही घटना घडली होती परंतु येथील सर्व देव त्यावेळी सिंहगडावर आधीच नेऊन ठेवल्यामुळे देव देवतांच्या मूर्ती सुखरूप राहिल्या होत्या.
पुढे इस 1767 साली थोरल्या माधवराव पेशव्यांनी मंदिरावर पुन्हा सोन्याचा कळस बसवला.पर्वतीवरील संग्रहालय इतिहासकार मंडळींसाठी एक खजिनाच आहे. तसेच भक्तांसाठी सुद्धा हे एक मोठे आणि मुख्य आकर्षण आहे.इस 1988 सालापासून येथे सुरू असलेल्या या संग्रहालयात जुनी शस्त्रे,जुने पोशाख, जुनी तैलचित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. तसेच येथे एक ऐतिहासिक असे ठिकाण आहे की ज्याला बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे निधन स्थान मानले जाते.
मराठा साम्राज्यावर एकदा फार मोठा आघात झाला होता. ही घटना इस 1761 मध्ये घडली होती. ही घटना म्हणजे पानिपतची लढाई. याच पानिपतच्या लढाई नंतर जून 1761 मध्ये नानासाहेब पेशवे यांचे याच पर्वतीवर दुःखद निधन झाले होते. जानेवारी 1761 मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये नानासाहेब पेशवे यांचे चुलत भाऊ सदाशिव भाऊ आणि थोरले पुत्र विश्वासराव यांच्या व अनेक मराठा सरदारांच्या मृत्यूमुळे काही दिवसातच सहानेच्या खोलीत म्हणजे होम शाळेच्या जागी नानासाहेबांनी आपला अखेरचा श्वास घेतला होता. आज हे ठिकाण त्यांचे स्मरण स्थळ म्हणून चांगल्या प्रकारे सांभाळले जाते आहे.
अष्टकोनी चौथरा व संगमरवरी पादुका अशी या ठिकाणाची रचना केली आहे. या स्मारक भोवती पेशवेकालिन व्यक्तींची चित्रे व माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच या ठिकाणी पानिपतच्या रणसंग्राम मध्ये ज्या मराठा सरदारांची शौर्य गाजवले त्यांची नावे असलेला फलक लावण्यात आलेला आहे. परम प्रतापी वीर बाजीराव पेशवे यांचे धाकटे पुत्र म्हणजे नानासाहेब पेशव्यांचे धाकटे बंधू राघोबा दादा उर्फ रघुनाथराव यांनी पर्वतीवर कार्तिकियाचे मंदिर उभारले.
कार्तिकेय मंदिरापासून दक्षिणेकडे थोड्याच अंतरावर एक विष्णू मंदिर आहे. पर्वती टेकडीच्या शेवटच्या भागातून एस पी कॉलेज, सर परशुरामभाऊ कॉलेज अशी दुरून छोटी दिसणारी परंतु ओळखता येणारी अनेक पुण्याची ठिकाणे ओळखता येतात. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकापासून पर्वती टेकडी फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आणि धार्मिक ठिकाणे आहेत. त्यामुळे मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त विदेशी पर्यटक पुण्यामध्ये येतात.
जसे की बुधवार पेठ येथे असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. हे पुण्यातील सर्वात लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळ आहे. तसेच शिवाजीनगर परिसरात असलेले पाताळेश्वर लेणी आणि मंदिर. येथील लेण्या जमिनीखाली खोदलेल्या आहेत. या ठिकाणी पाताळेश्वर शिवलिंग आहे. या मंदिरात शिवालय राजवटीच्या खुणा दर्शवणाऱ्या लेण्या आहेत. तसेच येथे जंगली महाराजांचे मंदिर आहे.
तसेच दुसरे बाजीराव पेशवा यांचे निवासस्थान विश्रामबाग वाडा, तसेच घोले रोड शिवाजीनगर परिसरात असलेले थोर हुतात्मा महात्मा फुले यांचे निवासस्थान असलेले महात्मा फुले संग्रहालय. या संग्रहालयाला “रे म्युझियम” या नावानेही ओळखले जाते. त्याचप्रमाणे पुण्यातील भांडारकर प्राच्य शोध संस्थान, राजा केळकर वस्तुसंग्रहालय , महात्मा फुले मंडई जवळील विविध वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले तुळशीबाग ,ही ठिकाणेही लोकप्रिय आहेत. तसेच पुण्याजवळील हवेली तालुक्यातील दोंदे गावाजवळचा सिंहगड किल्ला सुप्रख्यात आणि पाहण्यासारखा आहे.
या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा किल्ला म्हणून ओळखले जायचे. तसेच पुणे शहरातील लोकप्रिय उद्यानांपैकी एक असलेले सारसबाग, पुणे शहराच्या अगदी मध्यभागी असलेली ऐतिहासिक वास्तू लाल महल, पुणे शहरातील महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आगाखान पॅलेस, शनिवार वाडा ( Shanivar wada ) अशी अनेक ठिकाणी पुण्यात पाहण्यासारखी आहेत.