पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकचे आराध्य दैवत आहे. नित्यनियमाने पायी किंवा इतर माध्यमाने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते याला पंढरीची वारी असे म्हणतात. वारीला जाणारे भाविक हे एकटे, समूहाने किंवा दिंडीसोबत पंढरपूरला जातात.
पंढरीची वारी (Pandharichi vari ) ही परंपरा खूप जुनी आहे. पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील लोकं जास्त करून पायी वारी करत असत. जसं जशी दळणवळणाची साधने वाढत गेली तशी वारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली आणि हळू हळू इतर राज्यातही गेली. आजच्या घडीला पंढरीची वारीची ख्याती जगभरात पसरली आहे. परदेशात नोकरीं करणारे किंवा तिथेच स्थायिक झालेले अनेक भारतीय, खास करून महाराष्ट्रीयन भाविक सुट्ट्या टाकून भारतात येऊन वारीमध्ये सामील होतात.
अनेक जाती धर्मातील लोकांचे पांडुरंग हे आराध्य दैवत असून पांडुरंगाच्या म्हणजेच विठ्ठलाच्या स्मरणात राहण्यासाठी वारकरी आपल्या गळ्यात तुळशीची माळ घालतात. गळ्यात तुळशीची माळ घालून नित्यनियमाने पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना वारकरी असे म्हणतात. वारकऱ्यांच्या मुखात सतत विठ्ठलाचे नाव असते. एवढेच नव्हे तर काही माणसे समोरील व्यक्तीला बोलतानासुद्धा काय पांडुरंग, ऐ विठ्ठला, जय हरी माऊली, चला पांडुरंग असे समोरासमोर किंवा फोनवर बोलताना सुद्धा आढळतात. एकंदर त्यांचे जीवनच पांडुरंगमय झालेले असते.
पंढरपूरला भीमा नदीला चंद्राचा आकार प्राप्त झाला आहे त्यामुळे या नदीला तिथे चंद्रभागा म्हणतात. चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन माघारी घरी आल्यावर वारी पूर्ण होते. बहुतेक जण आषाढी एकादशीला प्रत्येक वर्षी ही वारी करतात. आषाढी एकादशीला पंढरपूरची यात्रा असते. आषाढ महिन्यातील “देवशयनी” म्हणजेच आषाढी एकादशी या दिवशी देव निद्रिस्त होतात असे मानले जाते. या दिवशी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक राज्यातून वारकरी विठ्ठलाचा जयघोष करत आणि भजन कीर्तन करत,पायी तसेच विविध वाहनांनी पंढरपूरला जातात.
आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेचा आणि आरतीचा मान हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि सर्वात जास्त वेळा वारी करणाऱ्या दांपत्याला दिला जातो. ही एक प्रथा आहे. ह्या दिवशी घराघरात मोठी माणसे आणि मुले सुद्धा उपवास करतात. या दिवशी महाराष्ट्रासह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपूरास येतात. जसे की पैठणहुन संत एकनाथांची पालखी, त्र्यंबकेश्वरहुन संत निवृत्तीनाथांची पालखी, देहूवरून संत तुकारामांची पालखी, आळंदीहुन संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, शेगावहुन संत गजानन महाराजांची पालखी, उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येते. या दिवशी आजच्या या आधुनिक युगामध्ये विविध लोक एकमेकांना शुभेच्छा पाठवतात.
या आषाढी एकादशीची एक छोटीशी कथा आहे ती म्हणजे…… कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने प्रचंड तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि भगवान भोलेनाथांकडून अमरत्व मिळवले. याचा अर्थ आता मृदूमान्य मरणार नव्हता, मात्र शंकरांनी हे वरदान देताना तू एका स्त्रीच्या हातून मरशील असा त्यास वर दिला. आणि म्हणूनच ब्रह्मदेव,भगवान श्रीहरी, श्री विष्णू आणि भोलेनाथ या सर्वांना हा अजिंक्य बनला. त्यांच्यापासून त्याला कसलीच भीती ऊरली नाही. सर्व देव यावेळी भगवान शंकराकडे गेले मात्र शंकरांनी मदत करण्यास नकार दिला. यावेळी सर्व देव भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावर आवळी वृक्षाच्या तळी एका गुहेत लपून बसले.
त्यावेळी आषाढी एकादशी होती. यावेळी त्यांनी दिवसभर काहीही खाल्लेले नव्हते म्हणून त्यांना आपोआपच उपवास घडला आणि पाऊस चालू होता म्हणून स्नान सुद्धा घडले. यावेळी त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्तीने मृदूमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली आणि ही जी शक्तीदेवी म्हणजेच एकादशी देवता ,म्हणूनच एकादशी व्रतामध्ये सर्व देवांचे तेज एकवटलेले असते असे म्हटले जाते. शैव असो किंवा वैष्णव असो दोन्ही उपवासक एकादशीचे व्रत करताना दिसतात.
अशा अनेक कथा आपण ऐकत आलो आहे. विठ्ठल हा फक्त पुंडलिकाच्या भेटीला आला होता आणि तो वारकरी संतांचा कैवारी समाजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या अधर्म संस्थापक भ्रष्ट राक्षसाच्या समूहाचा नाश करण्यासाठी द्वापारयुगात झाला होता. गयासूर हरीने सत्यश्रेष्ठ हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देवगणांना भूलवले. गोमातांची हत्या सुरू केली म्हणूनच मनमहामूळ जगतमहापिताच्या आज्ञेने श्रीहरीने बौद्धनामे अवतार धारण करून गयासुराला अग्निकुंडात जाळून भष्म केले आणि नंतर पुंडलिकाची भेट घेऊन त्याला स्वतःचे स्वरूप दाखवले आणि माता-पिताची सेवा केल्यामुळे त्याला मोक्ष प्रदान केला.
तेरावे ते सतरावे शतकादरम्यान संत नामदेव,संत तुकाराम,संत ज्ञानदेव,संत एकनाथ अशा अनेक संतांनी विठ्ठलाची मनोभावे भक्ती केली. आणि विठ्ठलाच्या स्तुतीत अनेक अभंग रचले म्हणूनच विठ्ठलाला भेटण्यासाठी आषाढी एकादशीला अनेक भक्तगण आषाढीची वारी करतात.आषाढ महिन्यात शक्यतो जून किंवा जुलै महिन्यात ही आषाढी एकादशी असते. आषाढ महिन्यात अकरावी तिथी म्हणजेच ही आषाढी एकादशी “महाएकादशी”आहे . हा एक फार मोठा पवित्र दिवस असतो. या दिवसापासून चातुर्मासास सुरुवात होते चतुर्थ मास म्हणजे चार महिन्याचा काळ. आषाढी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो असे म्हणतात.
या चार महिन्याच्या काळात भगवान श्रीहरी श्रीविष्णू हे शिरसागरात शेषनागावरती योगनिद्रीस्त होतात. आणि चार महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला ते या योगनिद्रेतून बाहेर येतात. या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणतात. या चातुर्मासात अनेक लोक मांसाहार वर्ज करतात. नर्मदा परिक्रमा सुद्धा या चातुर्मासात थांबविली जाते.
पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती अत्यंत पुरातण आहे.अनेक वेळा या मंदिराची पूर्वबांधणीसुद्धा झाली. शालीवान वंशातील एका प्रतिष्ठान नावाच्या राजाने या देवळाचा इ. स. 83 मध्ये जिर्णोद्धार केला. तसेच इ. स.516 मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे अत्यंत चांगली लोकवस्ती असलेले गाव होते. इ.स. 1239 साली देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचे सुद्धा म्हणतात.तसेच, पादुका प्रदक्षिणेची प्रथा पडली ती इ. स. 1296 मध्ये आणि चालू झाली इ. स.1650 मध्ये. हैबतबाबांनी आळंदीतून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली. आणि त्यानंतर हळूहळू सर्व प्रख्यात संत मंदिराहून पंढरीकडे पालख्या जाऊ लागल्या.
आज या कलियुगामध्येसुद्धा ही प्रथा वाढतच चालली आहे हे आपण पाहत आहोत. या धावपळीच्या युगामध्ये ज्यांना दिंडीमध्ये जाणे शक्य नाही असे लोक विविध वाहनांच्या मदतीने पंढरपूरला जाऊन फक्त कलशाचे दर्शन घेऊन माघारी येतात किंवा जवळच्या संत मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन पांडुरंगाचे स्मरण करतात.
पांडुरंग,पांडुरंग,पांडुरंग,….
खूप छान पणे माहिती प्रस्तुत केलेली आहे, मला खुप आवडले वाचायला. 👍
👍khup Chan lihlay
👌👌
खूप छान लिहिल आहे मला खूप आवडलं वाचल्यवरती.