स्वामी भक्त – नाना रेखी | Nana Rekhi

स्वामीभक्त आणि प्रसिद्ध ज्योतिषकार अहिल्यानगर ( Ahmednagar ) मधील नाना रेखी ( Nana Rekhi ) ही व्यक्ती त्या काळातील प्रसिद्ध ज्योतिषी व स्वामी भक्त होते. त्यांना घुबडाची भाषा सुद्धा समजत होती म्हणूनच त्यांची पिंगळा ज्योतिषी म्हणून सुद्धा ओळख होती. ब्रह्मीभूत स्वामी भक्त नाना रेखी यांचा अहिल्यानगर मध्ये स्थित असलेला अक्कलकोट स्वामी समर्थ मठ आहे.

ही परम पावन वास्तु नाना रेखी मठ म्हणून प्रसिद्ध आहे. संत भूमी समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर मध्ये दधिची ऋषी यांची तपोभूमी देवदैठण, मृगु ऋषी यांची तपोभूमी भिंगार, अगस्ती ऋषींचे वास्तव्य अकोले, श्रीरामाचे वनवास काळात वास्तव्य लाभलेले डोंगरगण, असा पौराणिक व प्राचीन वारसा लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याला संत भूमीची वैभवशाली परंपरा लाभली आहे. पारनेर येथील संत श्री निळोबाराय, नारायण डोह येथील योगी चांगदेव, श्रीगोंदे येथील श्री शेख महंमद यांचे अवतार कार्य देखील याच परिसरात घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ची रचना देखील येथील नेवासे गावी केली.

अलीकडच्या काळातील शिर्डीचे साईबाबा, साकोरी येथील श्री उपासनी बाबा, धनकवडी येथील शंकर महाराज यांच्या अलौकिक वास्तव्याच्या प्रासादिक खुनादेखील अहिल्यानगर जिल्ह्यात उमटल्या. येथील पुण्य पावन परिसराला नाथ संप्रदायाचा वारसा देखील लाभलेला आहे. मढी,मायंबा,गोरस वृद्धेश्वर येथील मच्छिंद्रनाथ,गोरखनाथ, कानिफनाथ आणि आदिनाथ यांच्या वास्तव्यामुळे अहिल्यानगर ही नाथांची सिद्ध भूमी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. अहिल्यानगर बऱ्याच काळ मुस्लीम राजवटीच्या अधिपत्याखाली असल्यामुळे मोगलाईच्या खुणा अहिल्यानगर परिसरामध्ये आजही आढळतात.

दरम्यान हा प्रांत आदिलशहाच्या अधिपत्याखाली असतानाची घटना म्हणजे श्री स्वामी समर्थ संप्रदायासाठी अतिशय महत्त्वाची घटना घडली. आणि याला कारणीभूत ठरले बीड जिल्ह्यातील पाठक घराणे. माहूरगडची आदिमाया शक्ती रेणुका देवी कुलस्वामिनी असलेल्या बीड जिल्ह्यातील जांब गावी वास्तव्य करणारे पाठक घराणे हस्तरेषा शास्त्राचे जाणकार व निष्णात ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध होते. रेखा शास्त्री म्हणून रेखी या उपनावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या या पाठक घराण्याचे लक्ष्मण हे सद्गृहस्थ आदिलशहाच्या राजवटीत अहमदनगर येथे आले होते.

तेव्हा त्यांच्यासोबत भणगे, कुकडे आणि अन्य काही घराण्यातील लोकसुद्धा त्यांच्यासोबत नगर येथे स्थायिक झाले. भिक्षुकी कार्य स्वीकारलेल्या लक्ष्मण पाठक उर्फ रेखी यांनी अल्पकाळातच स्वकर्तुत्वाचा ठसा उमटवला. नगर मधील प्रतिष्ठावंत अशा लक्ष्मण पाठक यांच्या वंशात माघ 1828 मध्ये जन्मास आलेले एक भाग्यशाली बालक पुढे श्री स्वामी समर्थ संप्रदायामध्ये नानाजी रेखी या नावाने अजरामर झाले. बापूजी रेखी यांचे सुपुत्र व लक्ष्मण पाठक यांचे नातू ही पूर्वापार ओळख पुढे श्री स्वामी समर्थ यांचे कुंडलीकार म्हणून व्हावी ही पूज्य श्री नानाजी रेखी यांच्या कर्तृत्व सामर्थ्याची खरी ओळख आहे.

वाड वडिलांपासून चालत आलेल्या ज्योतिर्विद्या पारंगत व निष्णात असलेल्या नानाजींनी लौकिक शिक्षणातही प्राविण्य संपादन केले होते. माता पित्याच्या प्रेमळ छत्र छायेखाली मराठी सातवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले होते. तसेच याज्ञिकी व संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान आणि ज्योतिषी शास्त्राचे अचूक ज्ञान असलेल्या नानाजींना प्रचलित काळातील चालीरीतीनुसार बाल वयातच बोहल्यावर चढावे लागले होते. कर्जतच्या भणगे कुटुंबातील सखुबाईशी नानाजी रेखी यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी सखुबाईची काळजी घेत आपला व्यवसाय चालू ठेवला होता. एकदा श्रावण महिन्यातील एका संकष्टी चतुर्थी ला नानाजी रेखी सप्तशती पाठ करत होते.

तेथे ब्राह्मण पुरोहितांचा सपत्नीक अभिषेक चालला होता. सखुबाई मोदकासाठी पीठ मिळत होत्या. तेवढ्यातच त्यांच्यासमोर असलेल्या खांबातून लख्ख प्रकाश पडला. त्या तेजस्वी प्रकाशाला दूर सारून नाथ संप्रदायी पेहराव प्रदान केलेली बालवयीन बटविन भिक्षापात्र घेऊन अवतीर्ण झाली. त्यावेळी आजूबाजूचा परिसर तेजाने उजळला होता. दोन हात अंतरावर उभी असलेली वामन मूर्ती “माई भिक्षा वाढ” अशी तीन वेळा म्हणाली. तेव्हा सखुबाई खुप भयचक्कीत झाल्या होत्या.मात्र स्वतःला सावरत त्यांनी बटूच्या झोळीत भिक्षा घालत असताना ती वामन मूर्ती हळूहळू अंतर धाम पावली आणि त्यासोबत ते तेजही मिळून गेले.

आश्चर्य असे की, त्याच वेळी नानाजींना भाव समाधी लागल्यामुळे त्यांना हे दृश्य पाहता आले नाही. मात्र ते भानावर येताच सखुबाईंनी ही घटना त्यांच्या कानावर घातली. नानाजींना त्याचा अपार आनंद झाला होता. तसेच ही घटना काहीतरी सुचवू पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. नानाजी व्यवसायानिमित्त बऱ्याच वेळा मुंबईला जात असत. असेच एकदा ते मुंबईला कामाठीपुरा येथे गेले असताना त्यांची श्री स्वामी समर्थ मुंबापुरी येथील मठाधिकारी श्री स्वामीसूत महाराजांशी भेट झाली. नानाजी येताच नगरकर ज्योतिषी आपणच ना! असे विचारून श्री स्वामी सुतांनी आश्चर्यचकित केले. त्यामुळे प्रथम भेटीतच नानाजी श्री स्वामी सुतांकडे आकर्षित झाले.

पुढील भेटीत चर्चेदरम्यान श्री स्वामी सुतांनी नानाजींना अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराज यांची जन्म कुंडली तयार करण्यास सांगितले. श्री स्वामी सुतांकडून माहिती घेऊन नानाजींनी श्री स्वामी समर्थांची जन्म कुंडली तयार केली. तेव्हा ती कुंडली घेऊन श्री स्वामी सुतांनी त्यांना अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आणि पत्रिका पोहोच करण्यासाठी जाण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून नानाजी सपत्नीक अक्कलकोटला गेले. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी नानाजी व त्यांची पत्नी सखुबाई यांना बालमूर्ती स्वरूपात पुन्हा दर्शन दिले आणि आपणच खांबातून बालरूपात प्रकट झालो होतो याची ओळख दिली.

नानाजींनी तयार केलेली पत्रिका पाहून खूश झालेले श्री स्वामी समर्थ महाराज यांनी “देखता क्या है,नोंबत बजावं!”. असे म्हणून नाना रेखी आणि त्यांच्या पत्नी सखुबाई यांचे मनापासून कौतुक केले. तसेच स्वामी समर्थांनी त्यांच्या हातावर टाळी दिल्यामुळे नानाजींच्या हातावर निळसर गोजिरे विष्णुपद उमटले. त्या कुंडलीवर पसंतीची मोहोर उमटवली आणि श्री स्वामी समर्थांनी नानाजी वर पूर्ण कृपा केली. तसेच नानाजींना नगरमध्ये श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करण्याची आज्ञा केली.

प्रत्यक्ष परब्रम्ह स्वरूप श्री स्वामी समर्थांची कुंडली बनवणाऱ्या श्री नानाजींनी प्रथम त्यांच्या राहत्या वास्तूतील लक्ष्मीनारायण मंदिरातच श्री स्वामी पादुका स्थापन केल्या होत्या. नगर मध्ये शनि चौकातील गुजर गल्लीतील ही परम पावन वास्तू आज स्वामींचा रेखी मठ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. नानाजींचे वंशज अचित आणि दयानंद हे बंधू हा समर्थ वारसा आत्मीयतेने सांभाळत आहेत आणि पुढे चिरंजीव योगेश रेखी हे देखील सेवेत हातभार लावत आहेत.

सन 1912 मध्ये समाधीस्थ झालेल्या नाना रेखी यांनी श्री स्वामी सुतांची अभंग गाथा स्वहस्ते लिहून व जतन करून श्री स्वामी समर्थ संप्रदायाला जन्म उपकृत केले आहे.

Leave a Comment