दत्त महाराजांचा सोळावा अवतार समजल्या जाणाऱ्या नाना महाराज तराणेकर ( Nana Maharaj Taranekar ) यांचा जन्म मध्यप्रदेश मधील उज्जैन जिल्ह्यातील तराने गावात दत्त संप्रदायातील वडील श्री शंकर शास्त्री आणि आई लक्ष्मीबाई या ब्राह्मण कुटुंबात सन 1896 मध्ये झाला होता. असे सांगितले जाते की त्यांचे घराण्यात पूर्वापार दत्त भक्ती चालत आली होती.
म्हणूनच नानांच्या रूपात सद्गुरु अवतार जन्माला आला होता. त्यांचे पूर्वज मूळचे खानदेश मधील घाटनांदरा या गावचे होते.त्यांचे पूर्ण नाव मार्तंड शंकर तराणेकर असे होते. पूज्य नाना महाराज तराणेकर महान दत्तभक्त व गायत्रीचे महान उपासक होते. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज उर्फ टेंबे स्वामी महाराज यांचे नाना महाराज शिष्य होते. सुरुवातीला नाना महाराजांनी दत्त मंदिरात पुजाऱ्याच्या रूपात काम पाहिले होते. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांना गुरूंकडून आशीर्वाद प्राप्त झाला होता.
तेव्हाच त्यांनी कठोर दत्त उपासनेला सुरुवात केली होती. ते नेहमी तराण्याच्या दत्त मंदिरात गुरुचरित्राचे पारायण करत होते. पारायणाला सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्यांनी पुढील पारायणासाठी आहार कमी करत शेवटी शेवटी नाममात्र काहीतरी फळ स्वरूपात आहार घेऊन तसेच शेवटी फक्त पाणी पिऊन ते पारायण करत होते. नाना महाराजांनी दत्त याग, विष्णू याग, आणि गणेश याग सारखे अनुष्ठान केले होते. शेवटच्या वेळी कार्तिक पौर्णिमेला ज्यावेळी नानांचे पारायण संपत आले होते तेव्हा दत्त महाराज तेथे प्रकट झाले आणि नानांना त्यांनी गुरुमंत्र दिला.नाना महाराजांना गिरनार पर्वत यात्रेमध्ये सुद्धा दिव्य अनुभव अनुभवयास मिळले होते.
नवनाथांचे साधना स्थान पहात असताना साक्षात अवधूतांनी त्यांना मदत केल्याचे नाना महाराज सांगतात. त्याचवेळी साक्षात दत्त महाराजांची माऊली माता अनुसयाने नानांना दर्शन दिल्याचे सांगितले जाते. अश्वत्थामा ने नाना महाराज यांच्याकडून गिरनार पर्वत यात्रे दरम्यान प्रसाद घेतल्याचा उल्लेख सुद्धा नानांच्या अनुभवामध्ये आढळतो. 1914 मध्ये नानांचे लग्न इंदोरच्या शंकर डाकवाले यांच्या मुलीशी झाले. काही कालावधीतच त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
पत्नीच्या निधनानंतर नाना महाराजांनी काशी, मथुरा, शेगाव अशा मुख्य तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रा करत ते बद्रिकेद्वार ला गेल्यानंतर तेथे त्यांनी अनेक संत,साधू, योगी आणि सत्पुरुषांची भेट घेऊन दर्शन घेतले.त्यांच्यावर सद्गुरु दयानंद सरस्वती स्वामी यांच्याप्रमाणेच गुळवणे महाराज यांचाही मोठा प्रभाव आढळत होता. त्यांनी वैदिक प्रार्थना, जप आणि मंत्र यांची निर्मिती केली होती. त्यांच्या कुटुंबात त्यांनी निर्माण केलेल्या त्रिपदिला फार महत्त्व होते. त्यांनी तयार केलेले मंत्र, प्रार्थना आणि जप यांचा त्यांचे अनुयायी कायमच्या दिनचर्येत वापर करत असत.
पुढे त्यांना रामाचे दर्शन, दत्त दर्शन, नर्मदा परिक्रमा, नर्मदा मातेचे दर्शन, कृष्ण दर्शन हे सर्व नानांना घडले आहे. पुढे अनेक दिवस ते तराना शहराचे धर्माधिकारी होते. इंदूरच्या होळकर घराण्याकडून त्यांना धर्माधिकारी हे पद प्रदान करण्यात आले होते. त्यांनी आपल्या शिष्यांना नेहमीच भौतिक आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या अनुयायांचा फार मोठा समुदाय होता. नामाची महती सांगणारे नाना महाराज यांचे महाराष्ट्र,मध्य प्रदेश, गुजरात तसेच विदेशात सुद्धा अगणित शिष्य परिवार आहेत. नाना महाराजांना पूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांचा अनुग्रह होता.
नाना महाराज तराणेकर श्री गुरु कृपांकित श्रेष्ठ दर्जाचे उपासक उत्तम वैदिक, याद्निक आणि आदरणीय शास्त्री होते. पूज्य नानांना थोरले स्वामी स्वप्नदृष्टांत द्वारे किंवा समक्ष भेटून मार्गदर्शन करत होते. पूज्य नानांना भजन खूप आवडायचे. संध्याकाळची करुणात्रिपदी ते आयुष्यात कधीच विसरले नाहीत. वेळेचे बंधन पाळून इंदोर मध्ये संध्याकाळची काकड आरती नित्यनेमाने ते करत होते. त्यांच्या साधकांना पूज्य नाना हे प्रत्यक्ष परब्रह्म आणि साक्षात दत्तगुरु असल्याची प्रचिती झालेली आहे.
परम पूज्य नाना महाराजांनी अनेक तीर्थस्थळांना भेट देऊन दिव्य अनुभवासह सिद्धी प्राप्त करून दुबळ्या, गोरगरीब,कष्टकरी आणि अशिक्षित लोकांसाठी त्याचा उपयोग केला. सांगितले जाते की नाना महाराजांनी सूक्ष्मजीव स्वरूपी हिमालय भ्रमण करून श्रीहरीच्या साक्षीने गीता ज्ञान मिळवले होते. तसेच नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना नर्मदा मातेने साक्षात दर्शन दिले होते. तसेच एका राम मंदिरात दर्शन झाल्यानंतर तेथील पुजाऱ्याने त्यांना मुक्कामी राहण्याचा आग्रह केला असता त्यांच्या त्या मुक्कामी रात्री त्यांच्याशी साक्षात राम, लक्ष्मणाने त्यांच्याशी संवाद साधला होता. परम पूज्य नाना महाराजांना अशाच प्रकारचे दिव्य अनुभव आणि दिव्य दर्शन गिरनार दर्शन, नाथ दर्शन,मथुरेतील कृष्ण दर्शन, इत्यादी ठिकाणी तीर्थयात्रे मध्ये मिळाले होते.
टेंबे स्वामींच्या सांगण्यावरून त्यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमामध्ये त्यांना अनेक देव देवतांचे साक्षात दर्शन झाल्याचे सांगितले जाते. नाना महाराज असेच एकदा हिमालय हिंडत असताना एका गुहे जवळ गेले असता गुहे जवळ दोन वाघ होते. परंतु त्याच गुहेमध्ये एक साधू ध्यानस्त बसलेले होते. त्या साधूने वाघांना आज्ञा करून नाना महाराजांना गुहेमध्ये येऊ देण्यासाठी आदेश दिला होता. आदेश मिळताच गुरगुरणारे वाघ शांत झाले होते.त्यानंतर नाना महाराज गुहेमध्ये गेल्यानंतर योगी आणि नाना महाराजांमध्ये बरीच चर्चा झाली. तसेच त्यांनी नाना महाराजांना सांगितले की मला साक्षात श्रीकृष्णाने दर्शन दिलेले असून त्यांच्या आदेशाप्रमाणेच मी या गुहेमध्ये ध्यानधारणा करत आहे.
नाना महाराजांना त्या साधू योगी ने ध्यान धारणा बरोबरच योग साधना शिकवली आणि त्यांच्या पुढील प्रवासाबद्दल विचारणा केली होती. नाना महाराजांनी त्यांना गंगातटी जायचे आहे असे सांगितल्यानंतर योगी साधूने त्यांना त्यांच्या पायाला धरून डोळे मिटून बसण्याचे सांगितले तसेच मी म्हटल्याशिवाय डोळे उघडू नका असेही ते बोलले. नाना महाराज त्या योगी साधूचे पाय पकडून डोळे मिटून बसले असता थोड्यावेळात ते गंगा तटी पोहोचले होते. डोळे उघडल्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या नानांनी पुन्हा एकदा साक्षात ईश्वराचे दर्शन घडल्याने आनंद व्यक्त केला.
गुरु शिष्याच्या नात्याचा अनुभव सांगताना नानांच्या बाबतीत घडलेली एक घटना विशेष उल्लेखनीय आहे. नानांना दोन मुले होती एक मुलगा शंकर आणि दुसरी मुलगी कुसुम. मुले लहान असतानाच नानांच्या पत्नीचे देहावसन झाल्यामुळे स्वतः नानांना पूजा अर्च्या करून मुलांना पहावे लागायचे. असेच एकदा कुसुम फार आजारी पडल्यामुळे तिला जुलाबाचा त्रास झाला होता. तिला बाथरूमला नेण्यापासून ची सर्व कामे करून नाना पूजा अर्चा करत असत. एक दिवस नानांना गाढ झोप लागली असताना रात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलगी कुसुम त्यांना हाक मारत होती तसेच हलवत होती. परंतु नाना थकल्याले असल्यामुळे गाढ झोपेतून काही उठेनात.त्यावेळी दत्त मंदिरातून एक नाना रुपी माणूस आला आणि कुसुमला बाथरूम ला घेऊन गेला.
कुसुमने दुसऱ्या दिवशी नानांना ही हकीगत सांगितली असता नानांना समजले होते की भक्तासाठी गुरु धावून आले आणि त्यांना आश्चर्य झाले होते. नानांच्या संदेशानुसार ज्ञानयुक्त भक्ती करावी, जाणीवपूर्वक स्तुती करावी, इच्छा पूर्ण होईपर्यंत करूणा करावी, आपल्यामध्ये दुर्गुणांचा नाश होऊन चांगले कर्म हाती यावे म्हणून भक्ती करावी, वासनांचा त्याग होण्यासाठी भक्ती करावी, परमेश्वरावर विश्वास ठेवून भक्ती करावी, संकटसमयी धैर्य मिळावे म्हणून भक्ती करावी, स्वतःवर व देवावर विश्वास ठेवून राहिलात तर प्रारब्धाचे भोग कमी होतात, सदा सर्वदा ईश्वर नाम जपावे, विश्वास म्हणजे स्वतःवर आणि ईश्वरावर असलेली श्रद्धा होय, असे अनमोल संदेश नाना महाराज तराणेकर यांनी आपल्या अनुयायांना, भक्तांना आणि समाजाला आवर्जून सांगितले.
मुंबईमध्ये नानांचे कार्य महान असून नानावर प्रेम करणारे असंख्य भक्त आढळतात. मुंबईमध्ये नाना महाराजांनी कवीश्वर यांच्याकडून भागवत सप्ताह करून घेतला होता. तसेच अनेक वेळा नाना महाराजांनी लहान मोठे कार्यक्रम करून त्यांच्या भक्तांना त्यांनी नेहमीच दर्शन दिले. पुढे काही दिवसांनी सण 1993 मध्ये नागपूर येथे नानांचे देहावसन झाले. त्यानंतर नाना महाराजांच्या पुढील वारसदारांनी सुद्धा नानांचे कार्य पुढे जबाबदारीने चालवले. नानांचा मुलगा डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब तराणेकर आणि वहिनीसाहेब आजही नानांचे कार्य करत आहेत. नानांच्या त्रिपदी परिवाराच्या भारतामध्ये एकूण दीडशे शाखा असून 35 समाज उपयोगी प्रकल्पही चालू आहेत. मुंबईमध्ये नाना महाराज स्मृति सभागृह आणि इंदोर मध्ये नाना महाराज प्रसादिक व परमार्थिक ट्रस्टमार्फत उत्सव आणि लोकहितवादी कार्यक्रम पार पाडले जातात.