नागपंचमी | Nagpanchami

 हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त सण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना समजला जातो. या श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी येते. नागपंचमी ( Nagpanchami ) हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी घरोघरी सर्पदेवतेची म्हणजेच नागाची पूजा केली जाते. हिंदू देवता भगवान शंकर यांच्या गळ्यामध्ये नाग असतो. आणि भगवान विष्णू तर शेषनाग नागावरती विराजमान आहेत आणि गणपती बाप्पाच्या तर कमरेला नाग असतो. त्यामुळे नागदेवतेला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.

नागपंचमी बद्दल अनेक आख्यायिका आणि धार्मिक कथा प्रचलित आहेत. अशाच एका अख्यायिकेमध्ये सांगितले जाते की, यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा एक विषारी नाग होता. त्याच्या साध्या फुसकाराने सुद्धा सर्व हादरून जाईल इतका तो भयंकर होता.अशा या कालिया नागाला भगवान श्रीकृष्णांनी मारले आणि आणि गोकुळातील लोकांचे रक्षण केले, त्यांना त्या नागाच्या भीतीपासून त्यांनी मुक्त केले. आणि तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमीचा दिवस होता. त्या दिवसापासून लोक नागाची पूजा करतात , नागाला दूध आणि लाह्या देतात. आणि त्याबरोबरच श्रीकृष्णांची ही पूजा करतात. आपल्या घराच्या अंगणामध्ये रांगोळीने नागाचे चित्र काढतात. पूजेच्या पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाद काढतात. व नऊ नागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. तसेच भावाला चांगले आयुष्य मिळो आणि त्याची भरभराट होवो यासाठी स्रिया उपवास करतात. याबद्दलची  एक कथा सांगितली जाते.

सत्यश्वरी  नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आधीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे भावाच्या शोकात सत्यश्वरीने अन्नग्रहण केले नाही आणि सत्यश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसत होता. तेव्हा तिने त्या नागालाच आपला भाऊ मानले. त्यावेळेस नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे मी रक्षण करेल. म्हणून या दिवशी प्रत्येक स्त्री नागाची पूजा करून उपवास धरते. व आपल्या भावाला औक्षण करून गोडधोड खाऊ घालते. आणि मनात भगवान श्री शंकराची भक्ती धरून नागदेवतेला दूध अर्पण करतात. कारण नागाला शंकर देवांचे सेवकही म्हटले जाते.

नाग भगवान शिवशंकरांच्या गळ्यात विराजमान आहे. एकदा एका शेतकऱ्याच्या नांगरणीच्या फळाने नागिनीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली होती. आणि त्यामुळे नागदेवतेचा खून झाला होता.अशी ही समजूत प्रचलित असल्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात मशागत करत नाहीत.शेतात खणले जात नाही. घरी कोणीही या दिवशी भाज्या चिरत नाहीत. तवा वापरायचा नाही व काही कुटायचे नाही असे काही नियम पाळण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू लोक नागदेवतेची पूजा करून तिला दूध लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी मनोभावे प्रार्थना करतात.

 गंगा गौतमी संगमावर दर बारा वर्षांनी नाथ संप्रदायातील भक्तगण देशभरातून तेथे येतात आणि स्नान करतात.  शेतकरी संस्कृतीत नागाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षण करतात. म्हणून नागाला शेतकरी बांधवांचा मित्र मानले जाते. कारण सापामुळे शेतातील उंदरांची संख्या आटोक्यात राहते. उंदरांसारख्या प्राण्यांमुळे शेताचे मोठे नुकसान होत असते. आणि साप उंदरांना खातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळते. म्हणून नागाबद्दल नागपंचमीच्या दिवशी चांगली भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या शहरात नागपंचमीचा सण म्हणजे एक मोठी यात्राच होती तेथे लोकांनी पकडलेल्या नागांची मिरवणूक काढली जात असे परंतु तेथे नागाला पकडून ठेवण्याची पद्धत, नागा सोबत  खेळले जाणारे खेळ अशा काही गोष्टींमुळे शासनाने त्यावर बंदी घातली आहे.

या दिवशी घरोघरी नागदेवतेला  पुजले जाते. नागपंचमीतून आपली संस्कृती आपल्याला प्राणी मात्रा वर दया करण्यास शिकवते. नाग
हा झाडाझुडपात , अडचणीच्या ठिकाणी किंवा जंगलात राहतो . पावसाळ्यात त्याची बिळे पाण्याने भरली जातात. त्यावेळी नाग बाहेर निघतात आणि एखाद्या दगडाच्या कपारीला, घराच्या वळचणीला, शेताच्या अडचणीला, गावात इकडे तिकडे आणि लोक वस्तीत सुद्धा आढळतात. थोड्या दिवसासाठी तो अतिथी पाहुणा समजला जातो. म्हणून त्याचे पूजन करतात. नागाला वनात अरण्यात झाडाझुडपात अडचणीत राहिलाच आवडते. फुलांचा सुगंध नागाला फार आवडतो.तो फुलांना जवळ करतो. त्याला स्वच्छता आवडते. नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातही चांगुलपणा पाहण्याचे अशी आपली संस्कृती सांगते. आपल्या संस्कृतीमध्ये  पशुपक्षी,पाळीव प्राणी, जंगली प्राणी सर्वांशी आत्मीतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचप्रमाणे ही नागपंचमी आपल्या देशात उत्साहात साजरी केली जाते.

श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवेगार असते, मध्येच पावसाच्या सरी येत असतात. शेतातील पिके वाऱ्यावर डोलत असतात. अतिशय सुंदर वातावरण असते ,त्यामुळे हा सण खूपच उत्साहपूर्ण वाटतो. उत्तर भारतातही खूप मोठया प्रमाणात हा सण साजरा केला जातो.. नागपंचमीच्या आधल्या दिवशी ग्रामीण भागामध्ये घराची पूर्ण स्वच्छता करून घर आणि अंगण शेणाने सारवले जाते. अंगणात रांगोळी काढली जाते. काहीजण नागाचे चित्र घराच्या भिंतीवर काढतात. तर काहीजण नागाचे चित्र देवघरात लावतात आणि त्याची पूजा करतात. नागपंचमीच्या सणाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला आपल्या घरी घेऊन येतो. गल्लीतील, वस्तीतील सर्व लहान थोर आणि स्त्रीया एकत्र येऊन फेर धरून गाणे,झिम्मा, फुगड्या, आणि झाडाला झोके बांधून झोके खेळतात.

तसेच वेगवेगळ्या भागात इतरही वेगवेगळे खेळ खेळले जातात. काही ठिकाणी महिला गाणी म्हणत वारुळाला जातात.” चल ग सखे वारुळाला वारुळाला, नागोबाला पुजायला पुजायला  “ ही ओवी त्यामध्ये प्रसिद्ध आहे  वारुळाच्या  ठिकाणी दूध आणि लाह्याचा प्रसाद अर्पण करतात. सर्व महिलांसाठी हा दिवस म्हणजे रोजच्या दिनक्रमातून वेळ काढून आनंद लुटण्याचा असतो. मात्र हा सण शहरांमध्ये अशा पद्धतीने साजरा केला जात नाही. बरेच भाविक स्त्रीया गरिबांना दूध आणि प्रसाद देऊन आणि नागदेवतेच्या फोटोचे पूजन करून नागपंचमी साजरी करतात. तर काहीजण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन दूध अर्पण करतात. आणि त्यांच्या आवडीच्या फुलांच्या माळा  देवाला अर्पण करतात.

नागपंचमीच्या दिवशी लोक नागाची पूजा करतात पण इतर वेळेस जर कोठे आढळला तर त्याला मारतात. नागच नाही तर इतर कोणत्याही सापाला मारले जाते. सापाला मारण्यामागे भीती हेच मुळ कारण असतें कारण अनेक लोकं दरवर्षी सर्पदंशामुळे मृत्यू मुखी पडतात. सापाला जर डिवचले तर तो डुक धरतो हा एक मोठा गैरसमज आहे त्यामुळे पण सापाला मारले जाते. कोणताही साप सहजा सहजी स्वतः आक्रमण करत नाही कारण त्यालाही स्वतःच्या जीवाची भीती असतें. आपला जर चुकून पाय पडला किंवा चुकून स्पर्श झाला तर तो घाबरून स्वसंरक्षणासाठी दंश करण्याचा प्रयत्न करतो. आजकाल ठिकठिकाणी सर्पमित्र आहेत. जर कोणत्याही प्रकारचा साप आढळ्यास त्याला न मारता सर्पमित्रकरवी पकडून निसर्गात सोडणे हीच त्यांच्यासाठी खरी पूजा आहे.

1 thought on “नागपंचमी | Nagpanchami”

Leave a Comment