अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी हे एक तालुक्याचे ठिकाण आहे. आदिमाया शक्तीची एकूण 51 शक्तिपीठे आपल्या भारत देशात आहेत. त्यातील साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची लक्ष्मी माता, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची भवानी माता, आणि अर्धे शक्तीपीठ वनीची सप्तशृंगी माता मानले जाते. त्यातील माहूरची रेणुका माता म्हणजे साक्षात शिवशंकराचा अवतार मानले जाणारे जमदग्न ऋषींची पत्नी आणि आणि अमर ऋषी परशुरामाच्या त्या आई होत्या. स्वयंघोषित आणि जागृत माता जगदंबा माता ही महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीश्रेत्र माहूरगड येथील रेणुका मातेचा अवतार मानली जाते.
या परिसराला कानिफनाथ, गहिनीनाथ, वृद्धेश्वर, मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ आणि नागनाथ या महान विभूतींचा सहवास लाभलेला आहे . त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. अशा या रेणुका मातेचा मोहटा देवी ( Mohata devi ) हा एक अवतार समजला जातो. अहमदनगर म्हणजे सध्याचे अहिल्यानगर जिल्हा ही साधू संतांची भूमी मानली जाते. आणि ह्या साधुसंतांच्या भूमीमध्ये साक्षात रेणुका माता कशी आली त्याची एक आख्यायिका सांगितली जाते.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका समजला जातो. नेहमीच् या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती पहावयास मिळत होती. येथील अनेक गावांना कायमच पाण्याची टंचाई असायची. जनावरांना हिरवा चारा मिळत नसे. येथे कायमच वरून राजानी पाठ फिरवलेली असायची. शेतात अन्नधान्य पीकत नसे. कायमची या तालुक्याची बिकट परिस्थिती असायची. त्यामुळे येथील लोक कायमच आपल्या पोटापाण्यासाठी कामधंद्यासाठी इतरत्र भटकत असायचे. असेच एकदा येथील लोक पोट भरण्यासाठी कामधंद्यासाठी फिरत फिरत माहूरगड या ठिकाणी गेले होते.
तेथे ते माहूर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेताना एकदा त्यांच्या मनात आले की, आपणही सर्वांनी मिळून आईला साकडे घालावे की आमच्याही गावाकडे अशी हिरवळ,असे पाणी मिळू दे. आणि अशा आशेने हे सर्व लोक मनापासून माता रेणुकाची नेहमीच निष्ठेने भक्ती करत असत. अशातच एकदा माता रेणुकाने त्यापैकी एका भक्ताला स्वप्नात येऊन साक्षात्कार करून सांगितले की, मी तुमच्याकडे येईल आणि तुमचे संरक्षण करीन, असे वचनच मातेने दिले. आणि त्याच वेळी पाथर्डी तालुक्यामध्ये भयंकर पाऊस झाला. एका शेतकऱ्याच्या स्वप्नात येऊन आई रेणुका मातेने सांगितले की, मी तुमच्या गावांमध्ये तुमच्या संरक्षणासाठी आली आहे .
तो दिवस होता आश्विन शुद्ध एकादशीचा. तसेच दुसऱ्या दिवशी एक शेतकरी डोंगरावरती सरपन शोधण्यासाठी गेला. त्या शेतकऱ्याला डोंगराला एका हिरव्यागार झाडाखाली तांदुळा स्वरूपात रेणुका माता दिसली. हे पाहून क्षणात बातमी गावभर पसरली. आणि अख्खा गाव तेथे जमा झाला. सर्वांनी देवीचा जय जयकार केला. मग सर्वांनी मिळून तेथे डोंगरावर एक मातेचे छोटेसे मंदिर बांधले.
पुढे काही दिवसांनी हजारो लोक देवीच्या दर्शनासाठी यायला लागले , आणि तेथे मनापासून भक्ती करणाऱ्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. रेणुका माता मोहटा गावात आल्यामुळे तिला मोहटादेवी असे नाव पडले. विशेष म्हणजे येथील मंदिर हेमाडपंथी असून हे श्री यंत्राच्या आकाराचे आहे. येथील मंदिरात देवीच्या कृपेने अनेक चमत्कार घडल्याचे सांगितले जाते. जसे की एकदा मोहटा देवीच्या मूर्तीला शेंदूर काढायचे काम चालू होते. तेव्हा एका कारागिराने छनि हातोड्याने शेंदूर काढण्यास सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत देवीला राग आला आणि देवीचा कोप झाला होता.
त्यावेळी मूर्तीतून अग्नी तयार झाला होता. शेंदूर काढणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अग्नीने घेरले होते.आणि गावात मृत्यूं होणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती. त्यानंतर सर्व गावातील लोकांनी देवीचा अभिषेक करून देवीची विशेष भक्ती केली होती. आणि त्यानंतर हा सगळा प्रकार थांबला. देवीच्या जागृततेचा असाच एक प्रसंग सांगितला जातो की,त्यावेळी ग्वाल्हेरचे राजे शिंदे होते त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यावेळी त्यांना समजले की याच परिसरामध्ये नवसाला पावणारी मोहटा देवीचे मंदिर आहे. त्या देवीची मनापासून भक्ती केल्यास भक्तांचे मनोरथ पूर्ण होतात.

मग एक दिवस ग्वाल्हेरचे राजे शिंदे त्या ठिकाणी आले आणि आईसमोर नतमस्तक झाले. आणि देवीला नवस केला माता देवी आमची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ दे! आणि आमचा वंश वाढू दे. त्यावेळी थोड्याच दिवसात मोहटादेवी राजे शिंदेंना प्रसन्न झाली. आणि पुढे ग्वाल्हेरच्या राजे शिंदेना पुत्रप्राप्ती झाली. मग ग्वाल्हेरच्या राजे शिंदेंनी मंदिराचा जिर्णोद्धार करून गाभाऱ्याचे काम केले आणि दीपमाळ बांधली. असे अनेक चमत्कार येथे घडलेले आहेत.
अशाच प्रकारचा जवळच्या काळातील चमत्कार जर आपणाला पाहिचा असेल तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी यांचे विमान मोहटा गावावरून चालले होते. हे विमान मंदिराच्या शिखराच्या अगदी जवळून गेले. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधींना याविषयी काहीच कल्पना नव्हती. त्या दिल्लीला पोहोचल्या. त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या स्वप्नामध्ये मोहटादेवी आल्या आणि सांगितले की तू माझ्या जवळून गेलीस परंतु माझे साधे नामस्मरणही तू केले नाही. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी पंतप्रधान निधीतून मंदिराच्या कामासाठी निधी उपलब्ध केला आणि डोंगरावरील पायऱ्यांचे सर्व बांधकाम करून घेतले आणि अक्षरशः स्वतः देवीच्या दर्शनाला येऊन देवीसमोर नतमस्तक झाल्या. अशी ख्याती आहे आदिमाया शक्ती मोहटा देवीची.
त्यामुळे वेगवेगळ्या जाती-धर्माचे लाखो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतात आणि देवीपुढे नतमस्तक होतात. मोहटा देवीला नागवेलीचा विडा प्रसाद म्हणून दिला जातो आणि नंतर भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.अलीकडच्या काळात येथे देवीचे फार मोठे भव्य मंदिर बांधलेले असून भक्तांसाठी अनेक सुख सुविधांची सोय तेथे केली गेली आहे. तसेच मोहटादेवी मंदिर असलेल्या डोंगरावर वीस हजारांपेक्षा जास्त औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे लागवड बऱ्याच वर्षांपूर्वी केलेली आहे. येथील आजुबाजूच्या परिसरात मोहटा देवीला कुलमाता मानतात.
नवरात्रमध्ये लाखो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येऊन जिवापाड आपली श्रद्धा येथे ठेवतात आणि देवीच्या पायाशी नतमस्तक होतात. अश्विन शुद्ध एकादशी हा देवीचा प्रकट दिन असल्याने दरवर्षी या दिवशी देवीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसेच नवरात्र मध्ये ही देवीचा फार मोठा उत्सव भरतो. मंदिरात वसलेली जगदंबा माता माहूरगडाकडे तोंड करते. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर शिवमंदिर व आंघोळीचे तळे आहे. या आंघोळीच्या तलावात आंघोळ केल्याने सर्व प्रकारचे आजार दूर होतात असे म्हणतात. कोणताही भक्त रिकाम्या हाताने मातेचा दरबार सोडत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या ठिकाणी जाण्यासाठी अनेक एसटी बसेस आणि प्रायव्हेट साधनांचा उपयोग करून आपण जाऊ शकतो. अतिशय रम्य,सुंदर आणि प्रशस्त मोहटा देवीचे मंदिर असल्याने आणि मुक्कामी सोय तेथे असल्यामुळे नवसाला पावणाऱ्या या देवीला लाखो भावीक दर्शनासाठी जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवसही करतात.येथे जाण्यासाठी खालील प्रमाणे सोय आहे.
रस्त्याने:- पाथर्डी हे अहमदनगरपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी सरकारी बस किंवा खाजगी वाहन उपलब्ध आहे.
हवाई मार्गे:- पुणे आणि शिर्डी विमानतळ हे अहमदनगरसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहेत. अहमदनगर पुण्यापासून १८० किलोमीटर अंतरावर आहे. तर शिर्डी हे अहमदनगर पासून 70 किलोमीटरवर आहे.
खूप chhan माहिती दिली आहे
खूप सुंदर लेख आहे