त्रीदेविँचा संगम आणि धनसंपत्तीची देवता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी महालक्ष्मीचे मंदिर ( Mahalaxmi Temple Mumbai ) माता कालिका आणि माता सरस्वती यांच्यासोबत मुंबई मध्ये भुलाभाई देसाई महामार्गावर आहे.हे मंदिर इ. स. 1831 मध्ये धाकजी दादाजी या मुंबईच्या व्यापाऱ्याने बांधल्याचे सांगितले जाते. याच मंदिरात महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा त्रीदेवी आहेत. तसेच महाकाली आणि महासरस्वती या महालक्ष्मीच्या दोन बहिणी आहेत.
सन 1784 ते 1785 च्या काळामध्ये महालक्ष्मीच्या महाकाली आणि महासरस्वती या बहिणी येथे कशा आल्या आणि महालक्ष्मीचे हे स्थान कसे निश्चित झाले याचीही एक सत्य कथा सांगितली जाते. स्वातंत्र्यपूर्व इंग्रजांच्या काळात ईस्ट इंडिया ही इंग्रज कंपनी आपल्या भारतात कार्यरत होती. त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर विल्यम हॉर्नबी हे इंग्रज अधिकारी होते. त्या काळात मुंबई ते वरळी हा एक खाडी मार्ग होता. हा रस्ता पक्का बांधायचा हे या गव्हर्नर ने ठरवले होते. ईस्ट इंडिया कंपनीला तो मार्ग पसंत नव्हता. त्यासाठी भरपूर खर्च लागणार होता तरीही व्यापारात अग्रगण्य असणारी ही कंपनी हा रस्ता बांधण्यासाठी प्रयत्न करत होती.
एकदा या कंपनीने निश्चय केला की हा रस्ता पक्का बांधायचा. मुंबईचे दक्षिण टोक म्हणजे महालक्ष्मी मंदिर. त्याकाळी वरळी पर्यंत समुद्राचे सर्व पाणी पसरत असायचे. तसेच भरतीच्या वेळी पाणी पार भायखळ्यापर्यंत पोहोचत असायचे. मुंबईतून जर वरळीला जायचे ठरले तर होडी शिवाय पर्याय नसायचा. तसेच भरतीच्या वेळी जे समुद्राचे पाणी आत घुसायचे त्या भागाला ब्रिटिश “द ग्रेट ब्रिज”असे म्हणायचे म्हणजे खिंडार. हे खिंडार बंद करायचे असे ब्रिटिश गव्हर्नर ने ठरवले होते. त्याला एवढी घाई झाली होती की त्याने आपल्या इंग्लंडच्या कंपनीची परवानगी न घेता रस्त्याचे काम सुरू केले.
या कामाचे कॉन्ट्रॅक्ट मुंबईचे कॉन्ट्रॅक्टर रामजी शिवजी पाठारे या तरुण इंजिनीयरच्या कंपनीला देण्यात आले. रामजी शिवजी यांनी हे काम अतिशय जोरात चालू केले. त्यांनी दगडाचे मोठे मोठे ढीग आणून टाकले. तसेच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु समुद्राच्या भरतीचे पाणी यायचे आणि टाकलेल्या दगडाच्या राशी त्यामध्ये परत माघारी वाहून जायच्या. परंतु रामजी शिवजी पाठारे प्रभू इंजिनीयर आणि हा इंग्रज गव्हर्नर यांनी हा रस्ता काहीही झाले तरी बांधायचा असे ठरवले होते.
महालक्ष्मी पासून ते वरळी पर्यंत रस्त्यासाठी टाकलेल्या खाडी भरती ओहोटी मध्ये वाहून जायच्या. एक दिवस रामजी शिवजी त्यांच्या घरी रात्रीच्या वेळी झोपेत असताना त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. दृष्टांता मध्ये साक्षात महालक्ष्मी येऊन रामजी शिवजीला म्हणाली रामजी उठ मी आणि माझ्या दोन बहिणी महाकाली आणि महासरस्वती समुद्राच्या तळाशी बसलेलो आहेत. आम्हाला तू बाहेर काढ आणि आमची स्थापना कर. असे जर तू केले तर तू घेतलेले रस्त्याचे काम पूर्णत्वास जाईल. तू टाकलेला माल समुद्रात वाहून जाणार नाही. रामजी शिवजी यांना फार आनंद झाला आणि झोपेतून जाग आली. सकाळ कधी होते त्याची रामजी शिवजी वाट बघत होते.
सकाळ होताच रामजी इंग्रज गव्हर्नरला ही सर्व हकीगत सांगण्यासाठी गेले. इंग्रजांना रामजी शिवजी यांनीही हकीगत सांगितल्यानंतर समुद्रातून या मूर्ती बाहेर काढण्यासाठी इंग्रज गव्हर्नर ने तात्काळ मंजुरी दिली. इंग्रज देवी देवतांना जरी मानत नसले तरी त्यांना या रस्त्याचे काम लवकर करायचे असल्यामुळे रामजीच्या श्रद्धेवर त्यांनी लगेच विश्वास ठेवला. या मूर्ती समुद्रात शोधण्यासाठी छोट्या छोट्या बोटींची तात्काळ उपलब्धता करण्यात आली. समुद्रात काम करणाऱ्या आणि बोटीवर चालाकिने काम करणाऱ्या कोळी बांधवांना बोलावण्यात आले. समुद्रात मोठे-मोठे जाळे टाकून मूर्ती शोधण्याचे काम चालू झाले. सलग दोन दिवस मूर्ती शोधण्याचे काम हिरीरीने चालू होते. तिसऱ्या दिवशी त्या कोळी बांधवांना जाळ्याला काहीतरी जड अडकल्याचे जाणवले.
जाळे बाहेर ओढल्यावर बघतात तर काय महाकाली,महासरस्वती आणि महालक्ष्मी या तीनही देवींच्या मूर्ती जाळ्याला अडकून आल्या होत्या. त्या मुर्त्या घेऊन रामजी शिवजी इंग्रज गव्हर्नर कडे गेले. तसेच त्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांच्याकडे जागेची मागणी केली. आज ज्या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर आहे ती जागा इंग्रज गव्हर्नरने दिलेली आहे. त्याकाळी या तीनही मूर्तींची स्थापना त्या जागेवर छोटेसे मंदिर बांधून करण्यात आलली होती. तसेच त्यानंतर महालक्ष्मी ते वरळी पर्यंतच्या रस्त्याचे काम अतिशय जोरात चालू झाले आणि दगडाचा टाकलेला बांध वाहून गेला नाही. पुढे महालक्ष्मीच्या कृपेने तो रस्ता जोरात पूर्ण झाला.

ही खरी कहाणी आहे. तसेच रस्ता पूर्ण झाल्यानंतर इंग्रज गव्हर्नरच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी महालक्ष्मीचे छोटे मंदिर बांधण्यात आले होते. तेथून पुढे महालक्ष्मीच्या कृपेने मुंबईच्या अनेक कामांना वेग आला होता. मुंबईकरांसाठी हे श्रद्धेचे आणि इच्छापूर्तीचे ठिकाण आहे. मंदिरात महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी यांच्या तेजोमय मुर्त्या आहेत. वस्त्रालंकार आणि हिरे जडित सुवर्ण अलंकार चढवलेल्या या मुर्त्या पाहून मन अगदी प्रसन्न होते. येथे मनापासून भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात असा मुंबईकरांचा ठाम विश्वास आहे. भुलाभाई देसाई रोडवर असलेले महालक्ष्मीचे हे मंदिर मुंबईतील सर्व प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असून मंदिर परिसरामध्ये हार,फुले आणि पूजेच्या साहित्यासह इतर अनेक दुकाने आहेत.
येथील नवरात्र उत्सव फार मोठा आणि अप्रतिम असतो. या मंदिर परिसराच्या आसपासच्या परिसरात देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर आहे. त्याचप्रमाणे देवी सरस्वती चे पुजारी पंडित हृदयनाथ यांचा मंदिराजवळ असलेल्या “लक्ष्मीकानी” निवास मध्ये राहतात. या परिसरात अजूनही कायमस्वरूपी माता कालिका,माता सरस्वती आणि माता महालक्ष्मी यांचा वास आहे असा भक्तांचा विश्वास आहे.
या ठिकाणी भक्तांना दर्शनासाठी जायचे असल्यास विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन पुढे 20 किलोमीटर अंतरावर महालक्ष्मी मंदिर आहे. रेल्वेने जायचे असल्यास महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून हे मंदिर फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे. तसेच मुंबई हे राष्ट्रीय आणि द्रुतगती मार्गाने जोडलेले मोठे शहर असल्यामुळे बेस्ट बस ने किंवा प्रायव्हेट मुंबई दर्शन बसणे येथे जाणे सहज शक्य होते. तसेच मुंबईमध्ये गेल्यानंतर अनेक टॅक्सी येथे जाण्यासाठी मिळतात.