कर्नाटक मधील पाच आणि महाराष्ट्रातील सहा अशा एकूण 11 स्थानांपैकी पालीचा खंडोबाला ( Khandoba Pali ) जेजुरीच्या खंडेराया प्रमाणे मानणारे अनेक भक्त आहेत. साक्षात महादेवाचा अवतार तसेच काळभैरवनाथाचा अवतार म्हणून मानल्या जाणाऱ्या खंडोबाचे कडेपठार आणि पाली ही मूळ स्थाने मानली जातात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात तारळी नदीच्या काठाला तालतिंबर नावाच्या गावात मल्हारी मार्तंडाचे हे दैवत आहे. हे प्राचीन मंदिर पालीचा खंडोबा म्हणून प्रसिद्ध आहे.
या दैवताला मानणारे धनगर समाजासह अनेक महाराष्ट्रीयन लोक असून अनेकांचे हे कुलदैवत आहे.या ठिकाणी खंडोबाचे ठाणे कसे आले याची एक कथा सांगितली जाते. आत्तापर्यंत आपण भक्तासाठी देव भक्ताच्या श्रद्धेपोटी विविध रूपात स्थानांतरित झालेल्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत. अगदी तशीच ही कहाणी आहे. या तालतिंबर गावामध्ये पालाई नावाची एक गवळण राहत होती. या पालाईकडे भरपूर दूध देणाऱ्या गायी होत्या. या गायींचे दूध विकून ही गवळण आपला उदरनिर्वाह करत होती. तसेच रोज नित्य नेमाप्रमाणे या गाईंना चरण्यासाठी ती जवळच्या डोंगरावर जात असे. गावाच्या पूर्वेला एक तामनागिर नावाचा पर्वत होता.
त्या पर्वतावर ती रोज गाईंना चारायला घेऊन जात होती. त्याच डोंगरावर एक महादेवाचे मंदिर होते. तेथे गेल्यानंतर ती रोज महादेवाची सेवा करायची. पूजा अर्चा करत आपल्या गाईंचा सांभाळ करणे हा तिचा नित्यक्रम झाला होता. पुढे पालाईचे वय झाले त्यामुळे ती वयोवृद्ध झाली. त्यामुळे तिला डोंगर चढणे शक्य होत नव्हते. शेवटच्या वेळी ती जेव्हा डोंगरावर गेली त्यावेळेस तेथील महादेवाची तिने मनोभावे पूजा केली आणि म्हणाली हे शिवशंभो आता मी म्हातारी झाली आहे. आता माझ्याकडून हा डोंगर चढणे शक्य होत नाही. तर तूच आता माझ्यासाठी खाली ये. असे म्हटल्यानंतर देवाला शेवटचा प्रणाम करून ती घरी आली.
त्याच रात्री ती गाढ झोपेत असताना तिला एक स्वप्न पडले. तो दिवस होता चंपाषष्ठीचा. त्या दिवशी तिच्या स्वप्नात भगवान शिव शंभो आले आणि तिला म्हणाले की, तुझ्याकडे जी काळी कपिला गाय आहे ती ज्या ठिकाणी आपोआप दूध सोडेल त्या ठिकाणी मी तुला दर्शन देईल. सकाळी पालाई उठल्यानंतर तिने तिला पडलेला स्वप्नातील दृष्टांत सगळ्या गावाला सांगितला आणि ज्या ठिकाणी ही कपिला गाय दूध सोडेल त्या ठिकाणी साक्षात महादेव आपल्याला मिळेल असेही गावातील लोकांना सांगितले.दुसऱ्या दिवशी पाळत ठेवून ज्या ठिकाणी काळ्या गाईने दूध सोडले त्या ठिकाणी गावकऱ्यांनी खड्डा खोदण्यास सुरुवात केली.
हे काम जवळपास एकूण सहा दिवस चालू होते परंतु महादेवाची पिंड काही सापडत नव्हती. परंतु एकनिष्ठ भक्ती करणाऱ्या पालाईने निश्चय केला होता की, जोपर्यंत महादेवाची पिंड सापडत नाही तोपर्यंत मी अन्न आणि पाणी काहीच घेणार नाही. तिने अन्न पाण्याचा त्याग केला होता. अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर सहाव्या दिवशी त्या खोदकामामध्ये महादेवाची पिंड सापडली. तसेच पिंड सापडल्यानंतर भगवान महादेवाने पालाईला साक्षात दर्शन देऊन विचारले की पालाई तुला काय पाहिजे ते माग मला. त्यावेळी पालाईने देवाला धन, दौलत काही मागितले नाही तर पालाई म्हटली देवा मला तुझ्या पायाजवळ जागा पाहिजे.
त्यावेळी शंभू महादेवाने तथास्तु म्हटले.त्यानंतर काही दिवसातच पालाईचे निधन झाले. त्यानंतर पिंड सापडलेल्या ठिकाणी गावकऱ्यांनी छोटेसे मंदिर बांधले. आणि याच मंदिराच्या पायऱ्यांच्या बरोबर खाली पालाईची समाधी बांधण्यात आली. त्यामुळे मंदिराकडे खंडोबाच्या दर्शनासाठी आलेले सर्व भाविक अगोदर पालाईचे दर्शन घेतात. आणि नंतर खंडोबा महाराजांचे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे महापराक्रमी सरदार संताजी आणि धनाजी यांनी हे मंदिर फार मोठे बांधले.
याचे पुरावे इतिहासात सापडतात. या ठिकाणी लाखो भाविक मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेण्यासाठी जातात. याच ठिकाणी मल्हारी मार्तंडाचे लग्न म्हाळसाई सोबत झाले होते. ज्यावेळी समुद्रमंथन सुरू होते त्यावेळेस राक्षस आणि देव हे दोन्ही होते. त्यावेळी समुद्रमंथनातून बाहेर आलेले धन, दौलत, विष, अमृत यापैकी विष महादेव पिले तर अमृताचे वाटप करताना राक्षसांनी अमृत मागितले होते. परंतु राक्षस अमर होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णांनी मोहिनी रूप धारण केले होते.
या मोहिनी रूपात भगवान श्रीकृष्ण अमृत वाटत होते. त्यावेळी मोहिनी रूपावर भगवान शिवशंकर भाळले असता श्रीविष्णू यांनी शंकराला सांगितले की तु ज्या वेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करेल. तसेच श्री भगवान शिव शंकरांनी पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती आणखीन सुंदर दिसू लागली त्यामुळे तिचे नाव महालया शक्ती असे ठेवण्यात आले होते. ही महालया शक्ती म्हणजे म्हाळसादेवी होती. नेवासे या ठिकाणी तिम्मा सेठ नावाचे लिंगायत वाणी होते. मोठे व्यापारी असलेले तिम्मा सेठ शंभू महादेवाचे मोठे भक्त होते.
महादेवांच्या या एकनिष्ठ भक्ताला महादेव प्रसन्न झाले होते. तेव्हा महादेवाने त्यांना सांगितले होते की तुझ्या घरी जन्माला येणारे बाळ हे साक्षात आदिमाया शक्ती पार्वती माता असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराजवळ एक लहान बाळ रडत होते. त्या लहान मुलीला घेऊन ते घरी आले. त्यावेळी आकाशातून आकाशवाणी झाल्याप्रमाणे ती मुलगी म्हणजे साक्षात पार्वती माता असून तिचे लग्न शिवशंभो चा अवतार असनाऱ्या मल्हारी मार्तंडा बरोबर होईल असे त्यांना सांगण्यात आले होते. तसेच मल्हारी मार्तंड हे तुझ्या घरी स्वतः येऊन तुम्हाला आमंत्रण देतील असाही दृष्टांत होता.पुढे अगदी तसेच झाले पुढे म्हाळसा हळूहळू थोडी मोठी झाली.
मल्हारी मार्तंड यांनी त्यांच्या घरी येऊन सांगितले की म्हाळसाला घेऊन तुम्ही पालीला या. शेठ म्हाळसेला घेऊन पालीला आले आणि त्या ठिकाणी खंडोबा बरोबर म्हाळसाचे हजारो भक्तांच्या उपस्थितीत लग्न झाले. आजही हजारो वर्षानंतर हा लग्न सोहळा पालीला साजरा केला जातो. आजही आजूबाजूच्या परिसरातून या लग्नाच्या दिवशी अनेक लोक बैलगाड्या मधून येतात. या लग्नाच्या दिवशी शिवणी या गावच्या गाड्याला पहिला मान असतो. करोडीचा बारा बैलांचा जो गाडा आहे त्यांना करवलीचा मान असतो.
आणि कराडहून पासलकरांचा गाडा येतो. पाली वरून शिवाजी बुवाचा गाडा येतो. तसेच अनेक गावांमधून काठ्या घेऊन लोक येतात. या ठिकाणी पवारांच्या काठीला पहिला मान आहे. दुसरा मान ढोर समाजाच्या काठीला असतो. कोल्हापुरातून चोपदारांचा घोडा या ठिकाणी लग्न सोहळ्यासाठी येतो. या लग्न सोहळ्याच्या दिवशी या ठिकाणी तलवार,ढाल, दांडपट्टा असे अनेक कार्यक्रम असतात. तसेच या सोहळ्याला सर्व समाजाची लाखो लोक जमा होतात. उंच आकाशात भंडारा आणि खोबरे उधळून देवाचा उदो उदो केला जातो. खंडोबा आणि म्हाळसादेवीच्या या लग्न सोहळ्याला म्हणजे पालीच्या यात्रेला जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातून तसेच भारतातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशासारख्या विविध प्रांतातून खंडोबा भक्त येथे येतात.
भंडाऱ्याची उधळण करत देवाचे लग्न अगदी आनंदात पार पाडले जाते. या लग्नात बारा बलुतेदारांना मान असतो. असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी ही लग्नाची प्रथा सुरू केली आहे. खंडेरायाच्या पालखीचा मान पाटील कुटुंबाला असतो. सोबत देशपांडे आणि कुलकर्णी सुद्धा असतात. देवाच्या पालखीच्या छत्रीचा मान माळी समाजाच्या लोकांकडे असतो. विवाह सोहळ्यामध्ये आरसे पकडण्याचा मान नाभिक समाजाकडे असतो. धोबी समाजाकडे देवाची पालखी उचलण्याचा मान असतो.
तसेच इतर समाजातील लोकांकडे सुद्धा विविध प्रकारचे मान आहेत. हेमाडपंथी रचनेचे हे मंदिर अति प्राचीन असून 1000 वर्षांपेक्षा जास्त जुने मानले जाते. मंदिराला तीन प्रवेश करण्याचे दरवाजे आहेत. मंदिराच्या परिसरात ज्योतिबा, मारुती, विठ्ठल, म्हसोबा यांच्याही मुर्त्या आहेत. तसेच खंडोबा आणि माळसा देवीच्या मुखवट्यासह बाणाईची सुद्धा मूर्ती आहे. मंदिरा समोर उंच दीपमाळ आहे.चंपाषष्ठीला येथे फार मोठी यात्रा भरते. तसेच दर पौर्णिमेला येथे भक्तांची अलोट गर्दी पाहवयास मिळते.
अनेक भक्त आपल्या श्रद्धेनुसार येथे छोटेसे जागरण गोंधळ ही घालतात.आजूबाजूच्या परिसरात पालीचा खंडोबा नवसाला पावणारा आहे अशी श्रद्धा रुजलेली आहे. येथे जाण्यासाठी सातारा या जिल्ह्याच्या शहराच्या ठिकाणापासून एसटी बसेस आणि अनेक खाजगी वाहनाची सोय असते. पुण्यापासून साधारणपणे पाली 144 किलोमीटर आहे. दूरचे भक्त प्रवासी सातारा रेल्वे स्टेशन आणि पुणे विमानतळ या ठिकाणी उतरून पुढील प्रवास टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने करतात.