खंडोबा-दावडी निमगाव | Khandoba-Dawadi-Nimgav

पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यात भीमा नदी तिरावरती वसलेले निमगाव हे तीर्थ क्षेत्र आहे. राजगुरूनगर या शहरा पासून अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतरावर, मार्तंड भैरवाचे (खंडोबाचे ) हे स्वयंभु मंदिर येथे असून नवसाला पावणार खंडोबा (khandoba) म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर या तीर्थ क्षेत्राची ख्याती आहे. अनेक निमगाव असल्यामुळे शेजारील गावाचे नाव जोडले जाते, शेजारील दावडी हे गाव मोठे असल्यामुळे,या तीर्थ क्षेत्राला दावडी निमगाव चा खंडोबा ( Khandoba – Dawadi Nimgav ) असेही संबोधले जाते.

भारतामधे जसे बारा ज्योतिर्लिंग आहेत, तसेच बारा मार्तंड भैरव (खंडोबाचे ) तीर्थ क्षेत्र आहेत, निमगाव खंडोबा हे त्यामधील सहा नंबर चे तीर्थ क्षेत्र आहे. या देवस्थान ची स्थापना ही मार्गशिर्ष शुद्ध पंचमी शके 1347 म्हणजे 26 नोव्हेंबर 1424 रोजी केलेली आहे असा उल्लेख इतिहासात आढळतो .पेशवे, होळकर, आणि बडोद्याचे संस्थानिक गायकवाड यांचा या मंदिराच्या जीर्णोद्धारा मधे मोठा सिंहाचा वाटा आहे.या मंदिराचे जेजुरी येथील मुख्य मंदिराप्रमाणे बांधकाम आहे, मंदिरामधे गेल्यानंतर जेजुरी च्या मंदिरात गेल्या प्रमाणे भास होतो. मंदिरामधे असलेल्या शिलालेखावर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी शिखराचे काम केलेले आहे असा उल्लेख आढळतो.

या मंदिराच्या तटबंदी कोटाचे काम इ. स 1769 साली बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आहे. तसेच चिमाजी आप्पा पेशवा यांनी वसई च्या युद्धामध्ये मिळालेल्या घंटा पैकी एक घंटा या देवस्थानाला भेट दिलेली आहे. येथील वाड्यामध्ये पेशव्याचे दिवाण चंद्रचूड वास्तव्यास होते त्या मुळे या गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे. येथील वाडे, तटबंदी आणि मंदिराचे बांधकाम आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. निमगाव च्या उत्तरेस साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर एका टेकडीवर स्थित आहे.आपण थेट वाहन घेऊन मंदिराच्या प्रवेश द्वारा पर्यंत जाऊ शकतो.

तसेच येथे पायरी मार्ग पण उपलब्ध आहे. या मंदिराच्या चारही बाजूने दगडी कोट(तटबंदी )बनवलेला आहे हा दगडी कोट मजबूत असून कोटावरती बुरुंज ही बनवण्यात आलेले आहे. या दगडी कोटाची उंची साधारण पंचवीस इतकी फूट आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक दुकाने आहेत तेथे आपण बेलभंडार, फुले हार, तळी, पेढे नारळ खरेदी करू शकतो, मंदिराच्या बाहेरील बाजूस थोडयाश्या वेगळ्या दीपमाळी आहेत. तसेच या कोटाच्या परिसरामधे अनेक पुरातन वास्तू असून त्या वरती सुरेख शिल्प काम केलेले आहे.

मंदिरास तीन दरवाजे असून मंदिराच्या मुख्य दरवाजा हा पूर्व दिशेस आहे बाकीचे दोन दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत, मुख्यप्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूस छोटया मंडपी आहेत उत्तरेकडील बाजूस मारुतीची मूर्ती असून दक्षिण बाजूस गजाननाची मूर्ती आहे. मुख्य दरवाज्या च्या वरती नगारखाना असून त्यावरती अनेक शिल्प कोरलेली आहेत. मुख्य प्रवेश द्वारामधून आतमधे गेल्यास, आपल्या उजव्या बाजूस दोन दगडी घोडे आहेत आणि एक तुलसी वृंदावन देखील आहे.

समोरील बाजूस नंदी मंडपामध्ये नंदी ची मूर्ती आहे. त्याच्या शेजारीच चिमाजी अप्पानी दिलेली पोर्तुगीज घंटा या ठिकाणी आहे. आपल्या मंदिरात असणाऱ्या घंटा आणि या घंटेच्या आवाजामध्ये खूप फरक आहे . त्या घंटेवरती 1691 असे कोरलेले आहे, चिमाजी अप्पानी अश्याच प्रकारची एक घंटा भीमाशंकर येथील मंदिरास दिलेली आहे.

शेजारील बाजूस भव्य दिव्य अश्या दीप माळी आहेत. मुख्य मंदिराच्या प्रवेश द्वाराच्या बाहेरील बाजूस दोन द्वारपाल आहेत, आणि वरील बाजूस श्री गणेशाची मूर्ती आहे. प्रवेशद्वारा मधून आत मधे प्रवेश केल्यानंतर आत मधे सभामंडप आहे, सभामंडपाची वरील बाजू घुमटाकार आहे. गर्भगृहामधे प्रवेश केल्यानंतर समोर शिवलिंग आहे. येथे मल्हारी, बाणाई, म्हाळसा, भैरवनाथ, माता जोगेश्वरी यांच्या धातूच्या मूर्ती असून पाठीमागे खंडेराया बाणाई आणि म्हाळसाच्या मोठया मूर्ती आहेत. देवाच्या पूजेसाठी दररोज भीमा नदीचे पाणी आणले जाते. दक्षिण आणि उत्तर बाजूस दोन खोल्या आहेत. दक्षिण बाजूची खोली हे देवाचे शेजघर आहे.

गर्भगृहाच्या मागे प्रदिक्षणा मार्गावर एका कोपऱ्यात म्हाळसा मातेची आणि भवानी मातेची मूर्ती कोरलेली आहे, तसेच अनेक देवी देवतांची मूर्ती आहेत.येथे चार भुयारी मार्ग असून एक भुयारी मार्ग निमगाव येथील गढी मधे निघतो, आणि दुसरा भुयारी मार्ग हा दावडी येथील गायकवाड महाराज्यांच्या गढी मधे निघतो, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. येथे चंपाषष्टी, माघ पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा या दिवशी मोठा उत्सव असतो महाराष्ट्रामधून लाखो भाविक या उत्सवामधे सहभागी होतात. चैत्र पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेला महाराष्ट्रामधील सर्वात मोठी घाटातील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते.

निमगाव येथे अजूनही काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. येथे भीमा नदीच्या तीरावरती पेशव्याचे वतनदार यशवंतराव चंद्रचूड यांची गढी आहे, गढी चे प्रवेशद्वार हे पुण्यातील शनिवार वाडयाप्रमाणे आहे. वाड्याच्या बाहेरील बाजूस महादेवाचे मंदिर असून येथील ग्रामपंचायतने सुंदर उद्यान विकसित केलेले आहे, येथे श्री गणेश आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चे मंदिर आहे. असे बोलले जाते की या गढी चे निर्माण चंद्रचूड यांचे पुत्र बाजी आणि गंगाधरराव यांनी केलेले आहे. निमगाव पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दावडी हे गाव असून या गावामध्ये बडोद्याचे संस्थानिक गायकवाड यांची गढी आहे.

गढीचा राजवड्याचा भाग हा रयत शिक्षण संस्था यांना शाळेसाठी देण्यात आलेला आहे . येथील गढी चे प्रवेश द्वार अजून चांगल्या स्थितीमधे आहे, गढी मधे एक भुयारी मार्ग असून तो थोडे आत मधे गेल्यास बंद करण्यात आलेला आहे, असे म्हणतात हा भुयारी मार्ग निमगाव येथील खंडोबा मंदिर येथे निघतो.

गढी च्या आजूबाजूला लोक वस्ती असून येथे गाव वसलेले आहे गावाच्या चारही बाजूनी तटबंदी असून तटबंदीच्या पूर्व दिशेला मुख्य दरवाजा आहे व उत्तरेस एक छोटा दरवाजा आहे, येथे अजून ही त्या काळातील तोफा उपलब्ध आहेत गावाच्या बाहेरील बाजूस ग्रामदेवी महलक्ष्मी मंदिर असून त्या शेजारीच गायकवाड संस्थानिकांनी बांधलेले मोठे तळे आहे. जवळच कण्हेरसर येथे चंद्रचूड यांनी बांधलेला वाडा अजून चांगल्या स्थितीमधे असून, येथे प्रसिद्ध यमाई माता मंदिर देखील आहे.

निमगाव पासून जवळच आळंदी आणि भीमाशंकर ही प्रसिद्ध तीर्थ क्षेत्रे आहेत जी खेड तालुक्यातच येतात. शहीद राजगुरू यांचा वाडा ( जन्मठिकाण) खेडमध्येच आहे. हे स्मृतीस्थळ पाहण्यासारखे आहे. निमगाव पासून पाबळ हे गाव जवळच आहे, तेथे पेशवे बाजीराव यांची पत्नी मस्तानी हिची कबर आहे. तेथून पूढे धामणी येथे प्रसिद्ध खंडोबा मंदिर आहे.

Leave a Comment