फार जुन्या काळापासून अनेक राज्यांमध्ये खंडोबा हे कुलदैवत म्हणून मानले जाते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात कोरठण या गावी श्री खंडोबाचे (Khandoba Temple Korthan ) प्रसिद्ध एक देवस्थान आहे. पिंपळगाव रोठा रोडवर कोरठण गावाच्या डोंगरावर वसलेले श्री खंडोबाचे हे देवस्थान पुण्यापासून शंभर किलोमीटर व मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे.
देवस्थानाकडे जाताना एक छोटा घाट लागतो आजूबाजूला सुंदर डोंगरदर्यांनी सजलेली हिरवळ आणि डोंगरावरील पवनचक्क्या दिसतात. कोरंलेल ठाणं म्हणजेच बिन टाक्याचा देव असे पूर्वी म्हटले जायचे त्यावरून या भागाला कोरठण असे नाव पडले. मध्ययुगीन काळात साधारणपणे मूळ जुने मंदिर इस 1491 मध्ये बांधलेले होते व पुढे इस 1559 मध्ये परत या मंदिराचे बांधकाम झाले असे दगडावरील शिलालेखावरून समजते.

त्यानंतर इस 1997 मध्ये गगनगिरी महाराजांच्या हस्ते उद्घाटन करून मंदिराचा पुन्हा जिर्णोद्धार करण्यात आला होता. इस 1987 पर्यंत येथे देवाला बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा होती. परंतु सध्या ही प्रथा बंद आहे. डोंगरावर जाताना सुरुवातीला मंदिराचे भव्य प्रवेशद्वार दिसते. या प्रवेश द्वाराजवळच खंडोबाची तळी भरण्याचे साहित्य मिळण्याची दुकाने आहेत . तसेच प्रसाद ,फोटो व इतर अनेक गोष्टीही मिळतात.
तेथून पुढे थोडे चालत गेल्यावर, मुख्य मंदिरात जाण्यासाठी लांब अरुंद मार्ग आहे .या मार्गातून थोडे पुढे गेल्यानंतर मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून वर जावे लागते. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर उजवीकडे खंडोबा आणि माळसा यांच्या पितळी मूर्ती बसवलेले मंदिर आहे व डावीकडे श्री खंडोबाचे मंदिर आहे.डावीकडे खंडोबा मंदिराकडे गेल्यानंतर मंदिरासमोर स्वच्छ सुंदर प्रांगण दिसते. श्री खंडोबा दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर पुढे सभा मंडप दिसतो.आत मध्ये गेल्यानंतर आपल्याला खंडोबा महाराजांचे दर्शन घडते.
दरवर्षी हजारो भाविक येथे खंडोबा दर्शनासाठी येत असतात. पूर्वीच्या छोट्या खंडोबा मंदिराचा पुनर्विकास करून इस 1997 मध्ये परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिरावर भव्य दिव्य कलश घालण्यात आला. मंदिराच्या आत मधील भिंतीवर मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराची माहिती आणि काही प्रसंगांचे फोटो लावलेले आहेत. मंदिरात एका दगडावर कोरलेला इस 1496 मधील एक शिलालेख कोरलेला आपणास दिसतो. दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वतंत्र खंडोबा देवाची मूर्ती आणि मुखवटा याचे दर्शन घडते.
गाभाऱ्याच्या बाहेर देवाची पालखी व पालखीतील फोटोचे अनेक जण दर्शन घेतात. येथे अनेक लोक भक्तिभावाने देवाची तळी भरतात व “सदानंदाचा येळकोट येळकोट” असा गजर करतात. तळी भरून झाल्यानंतर येथे भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते. तसेच तोच भंडारा खोबऱ्याचा प्रसाद भक्त घरी घेऊन जातात व घरातील लोकांच्या कपाळी भंडारा लावून खोबरे प्रसाद म्हणून खातात. तसेच यातीलच भंडारा खोबऱ्याने आपल्या घरातील देवांसमोर परत तळी भरतात.
अनेक भक्त येथील देणगी कक्षात जाऊन सढळ हाताने देणगी देतात. चंपाषष्ठी हा खंडोबा अवताराचा दिवस मानला जातो व पौष पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. हा यात्रा उत्सव येथे तीन दिवस चालतो. मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. त्या मार्गाने एक तरी प्रदक्षिणा घालून परत देवा समोर येऊन भक्त आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देवाला नवस करतात. नंतर समोरील देवस्थानाच्या कार्यालयाजवळ असलेल्या खंडोबा आणि माळसादेवींच्या घोड्यावर बसलेल्या पितळी मूर्तींचे दर्शन घेतात. या मंदिराच्या खाली स्वामी गगनगिरी महाराजांचे मंदिर आहे.
या मंदिरात जाऊन अनेक भक्त परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतात. येथील तीन दिवसाच्या यात्रा उत्सवात बैलगाडा शर्यत आयोजित केलेली असते.तसेच यात्रेच्या दिवशी तिसऱ्या दिवशी अनेक मानाच्या काठ्या घेऊन लोक येथे येतात आणि मंदिराच्या शिखराला स्पर्श करतात. येथे भक्तांना राहण्यासाठी एक भक्त निवास आहे ते मंदिराच्या समोरच्या भागात आहे. तिथे एक पोलीस केंद्र आहे , ते भक्त निवासाच्या शेजारीच आहे .काही मदत लागल्यास आपण तेथे संपर्क साधू शकता.
तसेच तेथे जवळच सभा मंडप आहे. या सभा मंडपात अन्नदान महाप्रसाद दिला जातो म्हणून या सभामंडपाला अन्नछत्र असेही म्हणतात. पौष पौर्णिमेव्यतिरिक्त सोमवती अमावस्या उत्सव, चंपाषष्ठी उत्सव, श्रावण उत्सव,मासिक पौर्णिमा उत्सव असे काही उत्सव येथे साजरे केले जातात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येथे भक्तांची फार मोठी गर्दी पहावयास मिळते. येथे आजही मंदिराची विकास कामे चालू असतात. अहिल्यानगर पुणे महामार्गाने जाऊन या ठिकाणी सहज जाता येते.
माळशेज घाटापासून 60 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. येथे धर्मशाळा,सभा मंडप, शौचालय, भक्तनिवास इत्यादी सोयी सुविधा असल्यामुळे येथे जाणाऱ्या भक्तांची संख्या अनेक आहे.अहिल्यानगर बस स्थानकापासून पिंपळगाव रोठा बसेस असतात. तसेच अहिल्यानगर येथे येण्यासाठी रेल्वे स्टेशन आहे. पारनेर पासून खंडोबा मंदिर 25 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच अहिल्यानगर पासून 55 किलोमीटर अंतरावर कोरठण खंडोबा मंदिर आहे.