कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी | Kamakhya Devi Temple Guwahati

आपल्या भारत देशामध्ये अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत परंतु देवीच्या योनीचे दर्शन आणि पूजन होणारे गुवाहाटीचे कामाख्या देवी मंदिर ( Kamakhya Devi Temple Guwahati ) हे एकमेव आहे. एवढेच नव्हे तर देवीच्या मासीक पाळीच्या दरम्यान येथील नदीचे पाणी लाल होते. त्यामुळे हे एक रहस्यमय मंदिर आहे. या मंदिराचे काही रहस्य विज्ञान सुद्धा शोधू शकले नाही.

पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे सतीने यज्ञकुंडात आपला प्राण अर्पण केला होता. तेव्हा भगवान शिवशंकरांनी तो अर्धवट जळालेला सती देवीचा देह घेऊन पृथ्वीतलावर फिरत होते. हे दृश्य धरतीवर योग्य नाही हे पाहून विष्णू देवाने त्या मृतदेहाचे आपल्या सुदर्शन चक्राने 51 तुकडे केले होते.ज्या ज्या ठिकाणी देवीच्या शरीराचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी देवीचे शक्तीपीठ तयार झाले.

त्यातील देवीच्या योनीचा तुकडा नीलांचल पर्वतावर पडला होता. याच योनीने देवी कामाख्या रूप धारण केले म्हणून या ठिकाणी कामाख्या देवीचे मंदिर उभा आहे. येथे भारत देशातून अनेक प्रांतामधून देवीच्या योनीचे दर्शन घेण्यासाठी भक्त येतात. योनी ही सृष्टी निर्माण करण्याचे कारण असल्यामुळे देवी सतीच्या गर्भाचे आणि योनीचे पूजन करण्यासाठी फक्त येथे येतात.

ज्याप्रमाणे स्त्रीच्या योनीतून मानव निर्मिती झाली त्याप्रमाणे देवीच्या योनीतून संसार निर्मिती झाली अशी मान्यता आहे व असे कामाख्या देवीच्या रूपात पाहिले जाते. हे कामाख्या देवीचे मंदिर आसामची राजधानी गुवाहाटी मध्ये नीलांचल पर्वतावर आहे. कामाख्या देवीचे मंदिर फार पौराणिक असून या मंदिराचे बांधकाम आठव्या शताब्दी मध्ये झालेले आहे.

तसेच एकेकाळी हे मंदिर आक्रमणांमध्ये नष्टही झाले होते. त्यानंतर बिहारचे राजे नर नारायण सिंग यांनी 27 व्या शताब्दी मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे देवीचे महापीठ मानले जाते. या मंदिरात दुर्गा किंवा अंबादेवीची कुठलीही मूर्ती किंवा फोटो आपणास दिसत नसून मंदिरामध्ये एक पिंड बनवलेले आहे. या पिंड कुंडावर नेहमी फुले दिसतात. या छोट्याशा कुंडातून नेहमी पाणी येते. काली माता आणि त्रिपुरा सुंदरी माता यांच्यानंतर कामाख्या माता सर्वात श्रेष्ठ देवी मानली जाते.

कामाख्या देवीची पूजा भगवान शिवशंकराची नववधू म्हणून केली जाते. येथे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. बाजूला एका छोट्या मंदिरात माता कामाख्या देवीची मूर्ती आपणास दिसते. माता सती देवीच्या 51 शक्ति पीठांपैकी एक असलेल्या या कामाख्या देवीच्या मंदिरात भक्तांना सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी अडीच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दर्शन घेता येते. येथे दर्शनाचे दोन प्रकार आहेत. मोफत तिकीट दर्शन (जनरल लाईन) आणि 500 रुपये देऊन व्हीआयपी तिकीट दर्शन.

मोफत दर्शन मार्गाने येथे नऊ दहा तासात दर्शन होते. तर व्हीआयपी दर्शन पाच सहा तासात होते. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे जनरल लाईन आणि व्हीआयपी लाईन या दोन प्रकाराने देवीचे पिंड दर्शन होते. पुजाऱ्या कडून शॉर्टकट दर्शन घेणाऱ्या भक्तांना देवीच्या फोटोचे दर्शन मिळते पिंड दर्शन मिळत नाही हे येथे जाणाऱ्या अनेक भक्तांना माहीत नसते. तसेच व्हीआयपी दर्शनासाठी पाचशे रुपयांचे तिकीट एका व्यक्तीसाठी असते. त्या तिकिटावर ग्रुपने दर्शन घेता येत नाही.

दर्शनासाठी जवळपास एका दिवसासाठी लिमिटेड 2000 जनरल टोकन असतात. तसेच मोबाईल मध्ये देवीचे किंवा मंदिराचे फोटो काढताना पकडल्यास पाच हजार रुपये दंड घेतला जातो. अनेक मंदिरामध्ये लाडू , पेढे ,खोबरे , अशा प्रकारचा प्रसाद मिळतो परंतु या मंदिरात एक वेगळीच प्रथा आहे येथे प्रसाद म्हणून देवीचे मासिक पाळीतील रक्त वस्त्र दिले जाते.

येथे दरवर्षी मंदिरात वर्षातून तीन वेळा पांढऱ्या रंगाचे मासिक पाळीत वापरायचे कपडे आणून ठेवले जातात. येथे देवीच्या मासिक पाळी मध्ये तीन दिवस मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात. देवीच्या मासिक पाळीतील तीन दिवसांनी जेव्हा दरबार उघडला जातो तेव्हा त्या कपड्यांचा रंग लाल झालेला असतो. हे लाल कापड भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. देवीचे हे लाल वस्त्र अतिशय पवित्र मानले जाते.

कामाख्या मंदिर वेगवेगळ्या तीन भागांमध्ये तयार केलेले आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे येथे सर्वांना प्रवेश नसतो. दुसऱ्या भागामध्ये कामाख्या देवीच्या योनीचे दर्शन होते. येथे महिन्यातून तीन दिवस मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तीन दिवसानंतर मोठ्या उत्साहात हे दरवाजे उघडले जातात. येथे साधू आणि अघोरी काळी जादू करतात. हे ठिकाण तंत्र साधनेसाठी महत्त्वाचे आणि प्रसिद्ध मानले जाते.

सगळ्यात जास्त काळी जादू या ठिकाणी पाहण्यास मिळते. जर एखादी व्यक्ती काळ्या जादूने पीडित असेल तर ती व्यक्ती येथे येऊन त्यामधून मुक्त होऊ शकते. येथील तांत्रिक काळ्या जादूला (करणी ) नष्ट करण्यासाठी समर्थ असतात. तसेच अनेक लोक मूल बाळ न होणे, घरातील कलह, व्यवसायातील प्रगती अश्या इत्यादी गोष्टीत यश मिळवण्यासाठी येथे येतात.भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे कन्या पूजन करून भंडारा केला जातो. त्यावेळी येथे कोंबडे बकरी कापली जातात. त्याचप्रमाणे येथे उमानंद भैरवाचे दर्शन करणे अनिवार्य किंवा महत्त्वाचे मानले जाते.

कामाख्या देवी मंदिरापासून जवळच एका पाण्यातील टेकडीवर उमानंद भैरव मंदिर आहे. या टेकडीला “मोर द्वीप” असे म्हणतात. हे उमानंद भैरव शिवशंकरांचे उग्ररूप व कामाख्या देवीचे भैरव मानले जातात. त्यामुळे उमानंद भैरवाच्या दर्शन शिवाय कामाख्या देवीची यात्रा अपूर्ण मानली जाते. या ठिकाणाला मध्यांचल पर्वत असेही म्हणतात.

समाधिस्त भगवान शंकराला या ठिकाणी काम देवाने जागे केले होते मग समाधी अवस्थेतून जागृत झालेल्या शंकराने त्याच्या तिसऱ्या डोळ्याने काम देवाला भस्मसात करून टाकले होते. नंतर काम देवाची पत्नी रती ( तथापि ) हिच्या विनंतीवरून शिवशंकराने त्यांना पुन्हा “अनंग” स्वरूपात म्हणजे शरीर नसलेल्या रूपात जीवदान दिले. या रूपात कामदेव फक्त त्यांच्या पत्नी रती हिलाच दिसायचे.

भगवतीच्या महातीर्थ नीलांचल पर्वतावर काम देवाला जीवनदान मिळाले म्हणून या भागाला कामरूप या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी जून महिन्यामध्ये मोठी यात्रा भरते. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराच्या ठिकाणी असे मानले जाते की जून महिन्यामध्ये देवीला मासिक पाळी आल्यामुळे तीन दिवस ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल कलरचे होते. मंदिराचे गर्भगृह या तीन दिवसांत बंद ठेवले जाते. अगोदर देवीला पांढऱ्या रंगाचे नवीन लांब वस्त्र नेसवले जाते.

परंतु तीन दिवसानंतर हे वस्त्र पूर्णपणे लाल झालेले असते . याला अंबुबाची वस्त्र असे म्हणतात. तसेच या यात्रेला अंबुबाजी यात्रा असे म्हणतात. वर्षभर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते परंतु दुर्गा पुजा, वसंत पूजा, मदान देऊळ, मनासा पूजा, नवरात्र उत्सव, अंबुबाची उत्सव अशा काही उत्सवांना लाखोंच्या संख्येने भक्तगण येथे येतात. तसेच या ठिकाणी वशीकरण पूजा विशेष मानली जाते. येथे कामाख्या देवी सोबत काली मातेच्या दहा रूपांची पूजा केली जाते. वशीकरण मध्ये पूजा आणि हवन केले जाते.

मंदिरामध्ये जाण्या अगोदर तेथील सौभाग्य कुंडात स्नान केल्याने व कुंडात काही नाणी टाकल्याने सर्व पापे धुऊन जातात अशी भक्तांची श्रद्धा आहे. गुवाहाटी एअरपोर्ट पासून कामाख्या देवी मंदिर 20 किलोमीटर अंतरावर आहे. गुवाहाटी रेल्वे स्टेशन आणि गुवाहाटी पलटण बाजार पासून सात -आठ किलोमीटर अंतरावर आहे.

कामाख्या देवीच्या ( Kamakhya Goddess ) मंदिराजवळ लॉज आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी व्यवस्था होते . भारताच्या पूर्व भागात म्हणजेच आसाम ,मेघालय , गुवाहाटी बरोबर कामाख्या देवीच्या मंदिर हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. कामाख्या देवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती किंवा ऊर्जा संचारते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे.

Leave a Comment