कळसुबाई शिखर | Kalsubai Peak

महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले अति उंच शिखर म्हणजेच कळसूबाईचे शिखर ( Kalsubai Peak ) होय. या भागातील खोल दऱ्या, हिरव्यागार गवतांच्या चादरी पसरल्या प्रमाणे दिसणारे वातावरण ,पाऊस, ऊन,वारा या सगळ्यांचाच अनुभव मिळणारे हे ठिकाण काहींसाठी पर्यटन स्थळ तर अनेकांसाठी तीर्थक्षेत्र आहे .

तसेच काहींसाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच 1646 मीटर म्हणजे 5427 फूट उंचीचा शिखर, कळसुबाई ट्रेकर्स मंडळींची ड्रीम ट्रेक तर अनेक भक्तांसाठी श्रद्धास्थान असलेले आई कळसूबाईचे मंदिर (Kalsubai Temple ) . या शिखरावरून होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त यांचा महत्वपूर्ण क्षण अगदी टिपून ठेवणारा असतो. हे सर्व आहे अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर,पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांच्या सीमेवर बारीगाव हे कळसुबाईचे मुख्य ठिकाण आहे. या बारी गावातील वातावरण फार निसर्गमय आणि सुंदर आहे. आपल्याला या परिसरात भात उत्पादन आणि भगर निर्मिती मोठ्या प्रमाणात होताना दिसते.

येथील बाजारपेठ पूर्वी फार प्रसिद्ध होती. इंग्रजांनी मुळा प्रवरेचे पाणी अडवून या परिसरात धरणे बांधलेली आहेत. बारी गावापासून जवळच मोठी वनराई आहे. या वनराई मध्ये अनेक प्रकारच्या पक्षांचे थवे असतात. रात्रीच्या वेळी येथे निसर्गाचे चमचमते चलचित्र दिसते. काजव्यांच्या कोमल प्रकाशात येथील वातावरण रात्री उजळून निघते. काजवे आणि रात किड्यांच्या आवाजातील रात्र येथे किर्रर्र असते.

बारी गावातील जुन्या वास्तू इतिहासाचे जतन करून असतात. अनेक वेळा कळसुबाई शिखर धुक्यानी झाकलेले असते. महाराष्ट्राचे हे कळसुबाई शिखर आकाशात भिडल्या सारखे वाटते. महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास हा सह्याद्रीने घडवलेला आहे. सह्याद्री पर्वताने महाराष्ट्र राज्याला कणा दिला. मोडेल पण वाकणार नाही हा मराठी बाणा दिला. उंच आभाळाला गवसणी घालण्याची महत्त्वाकांक्षा दिली. अशा या सह्याद्रीचा कळस म्हणजे कळसुबाई शिखर होय. महाराष्ट्रात सह्याद्रीची अनेक शिखरे आहेत त्यातील हे सर्वात उंच शिखर आहे. त्याच्या खालोखाल येतो दुर्गेश्वर साल्हेर किल्ला.

कळसुबाई शिखराच्या आसपास महादेव कोळी लोकांची जास्त वस्ती आहे. या लोकांची कळसुबाई ही मुख्य देवता आहे. पूर्वापार कळसुबाईला हे लोक देवीचा अवतार मानतात. देवीची पूजा करायला आणि नवस फेडायला येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे कळसुबाई शिखराची पाऊलवाट रुळलेली आहे. पाय वाटेने वर चढताना पहिली टेकडी चढली की कळसुबाईच्या माचेवर कळसुबाईचे एक लहानससे मंदिर उभारलेले दिसते. हे मंदिर म्हणजे एक छोटे कौलारू घर. हे कौलारू घर एका भक्कम दगडी जोत्यावर उभे आहे. निसर्गाच्या कुशीत देवीच हे खरं खुरं राहुळ आहे. ही माची जागीरदार वाडीच्या हद्दीत मोडते.

याच कौलारू घरात जुनं दगडाचं एक छोट देवीचं मंदिर आहे. सध्या मंदिरातील आतील बाजूस कलर देऊन रंगवलेले असले तरी दगडावरील जुने नक्षीकाम अजूनही दिसते. शेंदुराने लेप दिलेल्या दोन दगडी मूर्ती मंदिरात दिसतात. मंदिराच्या छताला नवसाच्या अनेक घंटा बांधलेल्या दिसतात. बाजूलाच एका छोट्या देवळीत दिवा आहे. मंदिरा बाहेर एक छोटी दगडी दीपमाळ आहे.

कळसुबाईचा मध्ययुगीन इतिहास तसा अपरिचित आहे. तरी इथे काही वीरगळ्या उभ्या आहेत. काही वाघाचे चित्र दाखवणाऱ्या, वीरांचे चित्र दाखवणाऱ्या, तर काही युद्ध सन्मुख मुर्त्या येथे दिसतात. कोणास ठाऊक येथे काही युद्ध झाली असतीलही. परंतु ते आपणास अजून परिचित नाही. कळसुबाईच्या दर्शनासाठी जेव्हा संपूर्ण शिखर चढून जाणे अवघड वाटू लागलं तेव्हा लोकांनी मध्येच डोंगराच्या खांद्यावर छोटे माची मंदिर बांधले. या माची मंदिरावर सावली देणारे मोठे एक झाड आहे.

येथील डोंगराच्या खांद्यावर अनेक शेतकरी छोटी छोटी शेतीचे तुकडे पिकवताना आपल्याला दिसतात. इगतपुरी आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते त्यामुळे भात उत्पादनासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. माचीवर जवळ शेती करणाऱ्या दोन चार लोकांची घरे आहेत. आल्या गेल्याला गुळ पाणी देण्याची जुनी पद्धत शहरातील लोकांनी जरी सोडली असली तरी येथे मात्र ती टिकून आहे.

येथील अनेक शेतकरी शहरांमध्ये जाऊन मोल मजुरी करत आहेत. एकदा एका प्रेमी जोडप्याने लग्न करून आपल्या प्रेमाच्या गाठी याच डोंगरावर बांधल्या होत्या. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर त्यांनी थाटामाटात लग्न केले होते. असे सांगितले जाते कि या लग्नात 300 पेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित होते
एवढेच नव्हे तर लग्न लावणारे भटजी देखील मोठ्या उत्साहाने शिखर चढून लग्न लावण्यासाठी गेले होते.

कळसुबाईचा चौफेर परिसर हा बेलात आणि सालेवार किल्ल्यांनी सजलेला आहे. इगतपुरी च्या रांगेत आलम, मलम, खुदम सारखे मजबूत किल्ले आहेत. तर इगतपुरी घाटाच्या दिशेने हरिश्चंद्रगड व रतनगड किल्ल्याची शिखरे क्रमवार दिसतात. येथे उंच डोंगरावर एक मोठे डौलदार झाड आहे. इथेच पाण्याची विहीर आहे. देवी कळसुबाई याच विहिरीतून पाणी शिखरावर घेऊन जायची अशी एक आख्यायिका आहे. बारी गावापासून निघाल्यावर रस्त्यात कुठे पाणी मिळत नाही परंतु या विहिरीपर्यंत आल्यानंतर आपणास पिण्याचे पाणी विहिरीतून शेंदून काढल्यास पिण्यास मिळते.

त्यामुळे इथपर्यंत आपल्या बरोबर आणलेले पाणी जपून वापरावे लागते. या उंच डोंगरावर असलेल्या विहिरीला भर उन्हाळ्यात सुद्धा पाणी उपलब्ध असते .कळसुबाई शिखरावर चढताना आपल्याला अनेक टप्प्या टप्प्यांमध्ये शिड्या उभारलेल्या आढळतात .शेवटच्या सीडीपर्यंत आल्यावर आपल्याला खालच्या बाजूची झाडीझुडपे व माणसे अतिशय छोटी दिसतात. पुढे लगेच शिखरावरील छोटे कळसूबाईचे मंदिर दिसते. जेमतेम तीन-चार माणसे मंदिरामध्ये बसतील एवढीच मंदिरामध्ये जागा आहे.

मंदिरा बाहेर त्रिशूल, हिरवा चुडा,घंटा, देवळी,भगवा झेंडा असा परंपरागत थाट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे शिखरावरून खाली सोडलेली एक भक्कम लोखंडी साखळी आहे. जो कोणीही साखळी एकट्याने ओढून वर घेईल त्याच्या सर्व मनोकामना देवी कळसुबाई पूर्ण करते असा भक्तांचा विश्वास आहे. या शिखराला इतिहास आहे तो कळसुबाईच्या एका दंत कथेचा.

अशी कथा सांगितली जाते की कळसुबाई नावाची एक गरीब घरची सुंदर मुलगी तेथीलच इंदूर नावाच्या एका लहान गावाच्या पायथ्याशी येऊन राहिली होती. ती एका घरात झाडलोट करणार नाही आणि भांडी घासणार नाही या अटीवर काम करू लागली होती. एके दिवशी त्यांच्या घरी पाहुणे आले आणि कळसुबाईला झाडलोट करावी लागली. त्या दिवशी तिने मजबुरीने ते सर्व कामे केली परंतु दुसऱ्या दिवशी तेथून ती निघून गेली ति थेट शिखरावर आली.

ती एकटी डोंगरावर राहू लागल्याने आणि डोंगरावरील अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करून ती लोकांचे आजार बरे करीत असल्यामुळे लोक तिला देवीचा अवतार मानू लागले. पुढे एकदा ती शिखरावर गेली ती परत आलीच नाही. मग ती गेल्यावर तिचे लोकांनी एक मंदिरही शिखरावर उभारले.

कळसुबाई कोळी कुळातील आदिवासी असल्यामुळे कोळी कुळातील आणि आदिवासी लोक कळसुबाईला कुलदैवत म्हणून मानतात. माथ्यावरचे हे मूळ कळसुबाईच मंदिर भक्तांचे मुख्य आकर्षण असते. देवी नवसाला पावते अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. सह्याद्रीचा हा शिरोमणी युगानुयुगे येथे उभा आहे. उत्तरेकडे दूरवर रवळ्या जवळ अचला अहिवंत किल्ला आणि रवळ्या जवळ्या खोल दरी किल्ला आहे. बरेच जण प्रथम या कळसुबाई शिखरावर सराव करतात आणि नंतर एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी जातात आणि म्हणूनच त्यांना पुढील यश मिळाले आहे.

Leave a Comment