प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे सर्वतीर्थ टाकेद ( Jatayu Mandir Sarvatirth Taked ) नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यामधे सह्याद्री च्या कुशीत वसलेले निसर्गरम्य पावन तीर्थक्षेत्र म्हणजे टाकेद. आपल्या हिंदू संस्कृती मधे प्राणी,पक्षी,वृक्ष यांमधे ईश्वराचा अंश असतो अशी आपली मान्यता आहे. रामायण कथेतील जटायु या पक्षाने याच ठिकाणी सीता मातेस वाचवण्यासाठी रावणा सोबत संघर्ष केला आणि त्याने आपले बलिदान दिले. येथे प्रभू श्री रामाने जटायु ( Jatayu ) ला मोक्ष दिला आणि पक्षी रुपी जटायू ला देवत्व प्राप्त झाले. येथे सर्वमनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
भारत देशातील सर्व तीर्थ येथे प्रकट झालेली असून त्यामुळे या तीर्थास सर्वतीर्थ टाकेद असे नाव पडलेले आहे. या सोबत हा परिसर दुर्गम किल्ल्यांनी व्यापलेला असून आड, औंढा,पट्टा,बितींगा हे किल्ले या परिसरामधे आहेत, तसेच टाकेद पासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर रतनगड, भंडारदरा ही पर्यटन स्थळे आहेत. टाकेद हे नाशिक पासून साधारण 48 किलोमीटर अंतरावरती आहे. टाकेद येथे महाराष्ट्रामधील एकमेव जटायू चे मंदिर असून या तीर्थाला धार्मिक दृष्टया विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. पौराणिक कथेनुसार राजा कश्यप यांना दोन पुत्र होते, गरुड आणि अरुण, अरुण हा सूर्य देवाचा सारथी होता.
अरुण ला दोन मुले होती जटायू आणि संम्पाती, हे दोन्ही भाऊ निशाकर ऋशी च्या सेवेमध्ये होते. त्या काळामध्ये अनेक दैत्य ऋशी-मुनींना त्रास देत असत, त्यांचे संरक्षण करण्याचे कार्य जटायू देण्यात आले होते. राजा दशरथ दंडक अरण्यामधे शिकारी साठी आले असताना जटायू आणि राजा दशरथ यांची मैत्री झाली होती.श्री राम वनवासात असताना पंचवटी येथे वास्त्यव्यास होते. पंचवटी येथून रावणाने सीता मातेचे अपहरण करून, तिला आकाश मार्गे घेऊन जात असताना,सीता माता आक्रोश करत होत्या, मातेचा रडण्याचा आवाज जटायू ने ऐकला, जटायू ने पाहिले रावण सीता मातेस घेऊन लंकेच्या दिशेने जात आहे.
जटायू ने आकाशाकडे झेप घेऊन रावणावर हल्ला केला. रावण आणि जटायू मधे भयंकर युद्ध झाले, या युद्धामध्ये जटायू ला हार पत्करावी लागली, रावणाने जटायू चे पंख छाटून टाकले. पंख छाटल्या मुळे तो शक्तिहीन झाला होता, त्याला उडता हि येईना. तो तसाच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून श्रीरामाची वाट पाहू लागला. दुसरीकडे प्रभू श्री राम आणि लक्ष्मण सीता मातेचा शोध घेत असताना, त्यांना रक्ताच्या थारोळ्यात जखमी पडलेला जटायू दिसला. जटायू जवळ जाऊन श्रीरामांनी त्याची विचारपूस केली असता जटायू ने घडलेली सर्व हकीकत श्रीराम यांना सांगितली, जटायू मुळे श्रीरामाला समजले की सीतेचे अपहरण रावणाने केले आहे.
आणि तो सीता मातेस घेऊन दक्षिण दिशेला गेलेला आहे.श्रीरामांसाठी पहिले बलिदान देणारा सैनिक हा जटायू होता. जटायू ची झालेली अवस्था पाहून श्रीराम यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. श्रीराम जटायू ला बोलले मी तुला परत एकदा जीवन देतो, परुंतु जटायू ने श्रीरामांना विनंती केली की प्रभू मला मोक्ष हवा आहे. तुमच्या हाताने मला पाणी पाजा आणि मला मोक्ष दया.
श्रीरामांना फार दुख: झाले, त्यांनी तेथील झाडाच्या मुळाशी बाण मारला आणि भारतातील सर्व तिर्थांना आमंत्रित केले. सर्व तीर्थ तेथे वाहू लागले,परंतु तीर्थांचा राजा प्रयागराज काही आला नाही. श्रीरामानी परत बाण मारला आणि प्रयागराज थोडा उशिरा आला, परंतु तो पर्यंत श्रीरामानी जटायू ला पाणी पाजले होते. हे सर्व तीर्थ तेथील कुंडा मधे आहेत फक्त प्रयागराज एका बाजूस आहे आहे. या प्रयागराज चे पाणी कधी संपत नाही आजही तेथील लोक याच पाण्याचा वापर करतात. महाशिवरात्रीस येथे तीन दिवस मोठा उत्सव असतो , लाखो भाविक याच पाण्याचा उपयोग करतात.
श्रीरामाने जटायूला पाणी पाजल्या नंतर याच ठिकाणी त्याने प्राणत्याग केला आणि प्रभू श्रीरामाने वडिलांनप्रमाणे त्याचे अंत्य संस्कार करून त्याला मोक्ष दिला त्या सोबत त्याच्या तेराव्या पर्यंत श्रीराम टाकेद मधेच राहिले. तेरावा झाल्या नंतर येथे श्रीरामांनी मानकामेश्वर लिंगाची स्थापणा केली. टाकेद येथे जाटायूचे मंदिर असून या मंदिरा मधे श्रीराम यांनी जटायू ला मांडीवर घेतलेले आहे आणि बाजूस लक्ष्मण उभे आहेत अशी मूर्ती आहे. अजून बरीच मंदिरे येथे आहेत त्या मधे दत्तगुरु, राम लक्ष्मण आणि सीता, सत्याई माता, दक्षिण मुखी मारुती, कुंडा जवळ शनिदेव, मानकामेश्वर शिवलिंग, तसेच रामलखन महाराज यांचे मंदिर आहे. या ठिकाणी जटायू ची प्रतिकृती बनवलेली आहे तेथे आधी झाड होते.
तसेच येथे एक शिव लिंग असून लिंगाचा मधील भाग खोलगट असून त्या मधे एक शालिग्राम आहे मनातील इच्छा बोलून तो शालिग्राम बाहेर काढून सर्वतीर्थ कुंडात स्नान घालून परत शिव लिंगामध्ये ठेवल्यास मानतील इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. टाकेद हे प्राचीन धार्मिक दृष्टया विशेष महत्व असलेले ठिकाण आहे, महाराष्ट्रामधील एकमेव जटायू मंदिर असल्यामुळे एकदा अवश्य भेट दया , धन्यवाद….
खूप छान माहिती दिली आहे.. खूप खूप धन्यवाद