श्रमण संस्कृती पासून तयार झालेला जैन धर्म ( Jain Religion ) केवळ भारतात नाही तर जगातील महत्त्वाच्या धर्मांपैकी एक मानला जातो. जगामध्ये अनेक देशांमध्ये जैन धर्मीय लोक आढळतात. या धर्माचे अनुयायी जेवढे भारतात आढळतात तेवढ्याच प्रमाणात भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्येही आहेत. असे मानले जाते की या धर्माची सुरुवात महावीर यांच्या पासून झाली होती. परंतु हे खरे नसून जैन धर्माची सुरुवात भगवान तीर्थकार ऋषभ देव म्हणजेच आदिनाथ यांच्या द्वारे झाली होती.
भगवान वर्धमान महावीर स्वामी जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थकार होते. तीर्थकार ते होतात ज्यांनी धर्माचे संपूर्ण ज्ञान मिळवलेले असून मोक्ष प्राप्ती मिळवलेली असते. तीर्थकार महावीर यांच्या काळात जैन धर्माचा प्रचार प्रसार जास्त प्रमाणात झाला होता. त्यामुळे जैन धर्मीय भगवान महावीर यांना जैन धर्माचे संस्थापक मानतात. भगवान महावीर यांनी जसे जसे मानवाला मानवता विषयी सांगू लागले होते तसतसा जैन धर्माचा प्रसार वाढू लागला. त्यांच्या प्रवाहित विचारामुळे आणि त्यांनी माणसाला दिलेल्या मानवतेच्या शिकवणीमुळे त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले होते.
त्यांनी दिलेल्या अहिंसेच्या शिकवणीमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले होते. कधीही हिंसा करायची नाही ही जैन धर्माची मूळ शिकवण आहे. माणसांना आणि प्राण्यांना मारणे तर दूरच परंतु डोळ्यांना न दिसणाऱ्या प्राण्यांना सुद्धा मारले नाही पाहिजे ही जैन धर्माची शिकवण आहे. एवढेच नव्हे तर जैन धर्मातील लोक जमिनीखाली पिकणाऱ्या भाज्या आणि फळांना जसे की बटाटा, गाजर,मुळा, कांदा, लसूण, अद्रक यांना हातही लावत नाहीत. जैन धर्माच्या शिकवणीनुसार जमिनीखाली येणाऱ्या या सर्व भाज्या म्हणजे इंद्रिय जीव आहेत. त्यांना खाणे पाप आहे. जैन धर्माचे 24 वे तीर्थकार भगवान वर्धमान महावीर यांच्या हातात जैन धर्माची सूत्रे येण्याअगोदर जैन धर्म 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांच्या हातात होता. त्यांनी या धर्माला नवी दिशा दिली होती.
असे मानले जाते की पार्श्वनाथ यांना झारखंडमध्ये सम्मेद शिखर येथे ज्ञानाची प्राप्ती झाली होती. त्यानंतर पार्श्वनाथ यांनी चार नियम तयार केले होते. त्यामध्ये चतुलार धर्म ज्याला म्हणतात त्याला जैन धर्माचे जुने नाव म्हटले जाते. हिंसा करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये आणि संपत्ती साठवून ठेवू नये. अशा चार विचारांमध्ये त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार केला होता. त्यांच्या काळामध्ये सुद्धा लाखो लोक त्यांचे अनुयायी म्हणून तयार झाले होते आणि या नियमांचे पालन पुढे अडीचशे वर्ष त्यांच्या अनुयायांनी केले. पुढे हळूहळू त्यांच्या या चार सिद्धांताविषयी अवहेलना सुरू झाली. कोणी हे सर्व नियम पाळू शकत नव्हते.
पाळले तरी आपल्या सोयीनुसार पाळले जायचे. तसेच आपल्या पद्धतीने नवीन नियमही जोडू लागले. हा तो काळ होता ज्यावेळी भारतामध्ये लोक आपल्या रितीरिवाजाप्रमाणे वागू लागले होते. त्यावेळी लोक धर्मापेक्षा जास्त अंधश्रद्धेला महत्त्व देऊ लागले होते. त्यावेळी जैन धर्माचे 24 वे तीर्थकार भगवान महावीर यांचा जन्म झाला होता. त्यांना जैन धर्माचे खरे संस्थापक म्हटले आहे 540 इ.स.पूर्वी भगवान महावीर यांचा जन्म आजच्या बिहार मध्ये क्षत्रिय परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते तर आईचे नाव त्रिशाला होते. महावीर यांच्या पत्नीचे नाव यशोदा असे होते. तसेच त्यांच्या मुलीचे नाव प्रियदर्शनी होते.
भगवान महावीर यांचे लहानपणीचे नाव वर्धमान असे होते. त्यांना जेव्हा त्यांच्या तीस वर्षाच्या वयामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली होती तेव्हापासून त्यांना त्यांचे अनुयायी महावीर असे म्हणू लागले होते. त्यांच्या अध्यात्मिक जीवनाविषयी जाणून घेतले असता ते जेव्हा तीस वर्षाचे झाले होते तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर लगेच त्यांनी त्यांचे मोठे भाऊ नंदिवर्धन यांच्याकडून आज्ञा घेऊन संन्यास घेतला आणि अरण्यात निघून गेले. तेथे त्यांनी सलग बारा वर्षांच्या कठोर तपश्चर्यनंतर रिजूपार या नदीच्या किनारी एका वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली. हे स्थळ जैन धर्मामध्ये सर्वात जास्त पूजनीय आणि श्रद्धेचे ठिकाण आहे.
ज्ञान प्राप्तीनंतर भगवान महावीर आपल्या अनुयायांना आणि समाजाला उपदेश करण्यासाठी निघाले. त्यांनी आपला पहिला उपदेश राजगीर मध्ये दिला होता. त्यांनी आपल्या उपदेशामध्ये पाच नियम दिले होते. जैन धर्मातील चार नियमांमध्ये त्यांनी एका नेमाची वृद्धी करून पाच नियम उपदेश ते करत असत. त्यातील पाचवा नियम ब्रह्मचारी राहिले पाहिजे असा होता. त्यामुळे सध्याच्या काळात सुद्धा जैन धर्मामध्ये ब्रह्मचारी राहण्याचे प्रमाण जास्त आहे. या व्यतिरिक्त भगवान महावीर यांनी आणखी काही उपदेश त्यांच्या अनुयायांना आणि समाजाला केले होते. त्यांच्या उपदेशांपैकी अनेक उपदेश जैन धर्मा व्यतिरिक्त इतर धर्मामध्ये सुद्धा पाळले जातात.
जैन धर्मामध्ये ईश्वराला जास्त मानले जात नसून आत्मा हाच देव मानला जातो. भगवान महावीर यांनी मूर्तीपूजा,कर्मकांड यांना सरळ सरळ विरोध केला होता. त्यानुसार त्यांचे अनुयायी आजही नियम पाळतात. त्यांनी पुनर्जन्मावर विश्वास करण्यास सांगितले आहे. आत्मा कधीही मरत नाही असे जैन धर्मात सांगितले जाते , असा उपदेश करत जेव्हा ते 72 वर्षांचे झाले होते तेव्हा इ.स. 468 पूर्वी बिहार मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि या दुनियेला जैन धर्म सुपूर्त केला. भगवान महावीर यांच्यानंतर त्यांचे महत्त्वाचे दोन अनुयायी होऊन गेले. एक होते श्वेतांबर आणि दुसरे होते दिगंबर. पांढरे कपडे परिधान करणाऱ्यांना श्वेतांबर म्हणतात तर कुठलेही वस्त्र धारण न करणाऱ्यांना दिगंबर म्हटले जाते. दोघांची मान्यता वेगळी आहे परंतु मुळे ही एकच आहेत.
या धर्मामध्ये तपचर्या आणि वासना यांना जास्त महत्त्व आहे. भगवान महावीर यांनी दोन प्रकारच्या तपचर्या सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे बाह्य तपचर्या आणि दुसरी म्हणजे अंतर तपश्चर्या. या तपश्चर्यामध्ये नम्रता, सेवा आणि स्वाध्याय विषयी सांगितलेले आहे. बाह्य तपचर्या केल्याने व्यक्ती विकास होतो असे सांगितले जाते. भगवान महावीर यांनी तपचर्येंचा साधा आणि सरळ उपाय म्हणजे उपवास सांगितला आहे. त्यामुळे शरीराची शुद्धी होऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो. या धर्मानुसार तीन सिद्धांताप्रमाणे जीवन जगणे अनिवार्य आहे. एक म्हणजे सम्यक दर्शन त्यामुळे जीवनाचा सामूहिक दृष्टिकोन मिळतो.दुसरा आहे सम्यक ज्ञान यामुळे धार्मिक दृष्टिकोन समजण्यास मिळतो.आणि तिसरा म्हणजे सम्यक आचरण म्हणजे दुष्कर्म पासून मुक्ती.
अशाप्रकारे जैन धर्मामध्ये अहिंसा आणि आचरणाला महत्त्व दिले गेलेले आहे. अशाप्रकारे जैन धर्मामुळे भारतीय संस्कृतीमध्ये मानवतावादी विचारांना महत्व दिले गेले आहे. जैन धर्मामध्ये उच्च – निच आणि जातीवादाला नेहमीच विरोध केला गेला.
त्याचप्रमाणे जैन धर्मीयांनी भारतीय कला, विज्ञानाला महत्त्व दिले आहे. जैन धर्मियांनी अनेक मूर्ती, स्तूप, मठ, मंदिरे आणि गुफा निर्माण केल्या. त्यांच्या उदयगीरी आणि एलोरा च्या गुफा फार महत्त्वपूर्ण आहेत. मध्य प्रदेशातील खजुराचे जैन मंदिर, काठीयावाड चे गिरनार मंदिर, पालितानाच्या डोंगरातील जैन मंदिर ही सगळी उदाहरणे जैन कलेची उदाहरणे आहेत.
समाजसेवेमध्येही जैन धर्माचे फार मोठे योगदान आहे. जैन धर्मियांनी अनेक मोठमोठे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल बांधलेले असून दीनदुबळ्यांना दान धर्म करण्यामध्येही त्यांचे मोठे योगदान आहे. नारीशक्तीच्या दृष्टिकोनातून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी हा धर्म नेहमीच पुढे राहिला. त्यांच्यामध्ये पुरुषांप्रमाणेच बरोबरीने महिलांना अधिकार दिले जातात.परंतु भगवान महावीर यांच्या मृत्यूनंतर जैन धर्मामध्ये काही प्रमाणात विभाजन झाल्यामुळे जैन धर्म काहीसा कमजोर झाला. तरीही जगामध्ये दुनियेतील प्रमुख धर्माप्रमाणे जैन धर्म प्रिय आहे. इतिहासामध्ये असे सांगितले जाते की मौर्य काळामध्ये अशी वेळ आली होती की तो काळ बारा वर्षापर्यंत राहिला होता. या काळामध्ये श्वेतांबर अनुयायी दक्षिनेला गेले होते आणि दिगंबर आपल्या जागेवरच राहिले.
याच काळात जैन धर्म भारतामध्ये पसरला. जसजसे जैन धर्मीय आपल्या उपदेशानुसार वाटचाल करू लागले तसतसा जैन धर्माचा बोलबाला भारताच्या शेजारच्या देशांमध्ये होऊ लागला. जैन धर्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांच्या ग्रंथांचा उपयोग जास्त प्रमाणात झाला. जैन धर्माचे साहित्य हे त्यांचे फार मोठे धन होते.त्यांच्या मध्ये अनेक धार्मिक ग्रंथ लिहिले गेले होते. संस्कृत शिवाय इतर भाषांमध्येही त्यांचे ग्रंथ आणि साहित्य उपलब्ध आहे. त्यांच्या या साहित्याला आगम असे म्हणतात.
त्यांच्या साहित्यामध्ये भगवान महावीर आणि त्यांच्या अनुयायांचे ही उपदेश आहेत. त्यामध्ये आगम ग्रंथ, तत्वार्थ सूत्र, कल्पसूत्र, कल्पद्रुम, अवदानशतक, प्रवचनसार, अष्टांगयोग हे प्रमुख ग्रंथ मानले जातात. प्राकृत भाषेमध्ये हे ग्रंथ उपलब्ध असून जैन धर्माचे आणखीही काही ग्रंथ आहेत. जसे की, हरिवंशपुराण, विक्रमार्जुन-विजय, पांडव पुराण इत्यादी.