इंद्रायणी नदी ( Indrayani River ) ही संत तुकाराम , ज्ञानेश्वर , सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई , जगनाडे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तुकोबांच्या गाथांनी पवित्र झालेली हीच ती इंद्रायणी . इंद्रायणीच्या खोऱ्याने अनेक लढाया अनुभवल्या आहेत, अनेक शूर वीरांचे रक्त या भूमीवर सांडले आहे , मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा आणि तलवारिंचा खणखणाट ऐकला आहे .
याच नदीच्या खोऱ्याने शिवाजी महाराजांचे कर्तृत्व ,संभाजी महाराजांचे बलिदान, तळेगावचे मराठा सरदार सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा पराक्रम , मोगलाई ,पेशवाई आणि ब्रिटिशसत्ता अनुभवली आहे . याच इंद्रायणीच्या भागातील तळेगाव येथे स्वदेशीच्या चळवळीतून लोकमान्य टिळकांनी पैसा फंड काच कारखाना उभारला होता. त्यामुळे इंद्रायणी नदी ही महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार आहे.
इंद्रायणी नदी पुणे जिल्ह्यात मावळ भागात उगम पावते आणि पुणे जिल्ह्यातच ती तुळापूर जवळ भीमा नदीला मिळते. एकंदर या नदीचा प्रवास एका जिल्यापुरताच मर्यादित आहे इंद्रायणी नदी ( Indrayani river ) ही पूर्ववाहिनी असून पूजनीय आणि पवित्र आहे. काही अंतरापर्यंत ती दक्षिण दिशेकडे वाहते व नंतर पूर्वेकडे वळते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणाऱ्या भीमा नदीची इंद्रायणी ही एक उपनदी आहे. लोणावळ्याच्या नैऋत्य दिशेला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कुरवंडे घाटाजवळ ही नदी उगम पावते.

या ठिकाणाला नाने मावळ ( Nane Maval ) असेही म्हणतात. इंद्रायणीचे उगम स्थान समुद्रसपाटीपासून अंदाजे 2300 फूट उंचीवर आहे. भारताच्या सह्याद्रीतील पर्वतरांगेमध्ये कुरवंडे हे एक हिल स्टेशन आहे. या ठिकाणापासून थंड हवेचे ठिकाण लोणावळा थोड्याच अंतरावर आहे. इंद्रायणी नदीचे खोरे लहान आणि उथळ आहे. प्रसिद्ध इंद्रायणी तांदुळ ( Indrayani Rice ) याच भागात पिकतो. इंद्रायणी नदीच्या नावावरूनच ते नाव दिले गेले आहे. इंद्रायणी नदी पुढे 93 किलोमीटर अंतर वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावात भीमा नदीला मिळते तसेच पुढे गेल्यानंतर इंद्रायणीचे खोरे पसरट आणि खोल आहे.
कामशेत ,इंदुरी , देहू, मोई, निघोजे, मोशी आणि आळंदी ही मुख्य गावे इंद्रायणी नदी काठावर आहेत. आंद्रा नदी ही तिची एक प्रमुख उपनदी आहे. घाटमाथ्याजवळ टाटा कंपनीने बांधलेल्या लोणावळे, वरवंड, शिरवत व आंद्रा या चार मुख्य तलावातील पाण्याच्या साह्याने तळ कोकणात वीज निर्मिती होते. देहू व आळंदी ही भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे पुण्याजवळ इंद्रायणी नदीच्या काठी आहेत. लोणावळा भागातील इंद्रायणी नदीचा प्रवाह अंदाजे चार पाच किलोमीटर अंतराचा आहे.
लोणावळा शहरात या नदीचे पात्र फार कमी रुंदीचे असून कामशेतच्या रेल्वे स्थानकाजवळ ते पुन्हा रुंद झाले आहे. इंद्रायणी नदीची कुंडलिका नदी उपनदी आहे. वडिवळे गावाजवळ या दोन नद्यांचा संगम होतो. वडिवळे गावचे एक धरण आहे.तसेच कुंडलिका नदी आणि इंद्रायणी नदी यांच्या संगमावर एक प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे भक्तांची फार मोठी गर्दी दिसते.
इंद्रायणी नदीला आंद्रा नावाची एक छोटी व इंद्रायणी नदीच्या बाजूला याच धरणाजवळ कुबेर गंगा ही एक छोटी नदी इंद्रायणी नदीला येऊन मिळते. कुबेर गंगा ज्या ठिकाणी इंद्रायणीला मिळते त्या ठिकाणी एक बेट तयार झाले आहे त्या बेटाला सिद्धबेट असे म्हणतात. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीवर कामशेत येथे प्रसिद्ध वळवण धरण विद्युत निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र आहे. तसेच पिंपरी चिंचवड आणि चाकण औद्योगिक वसाहती जवळून इंद्रायणी वाहत असल्यामुळे या नदीला विशेष महत्त्व आहे.
पुढे परत 58 मैल वहात गेल्यानंतर इंद्रायणी भीमा नदीला जाऊन मिळते. दक्षिण पठाराच्या उताराप्रमाणे या नदीचा प्रवाह आहे. इंद्रायणी नदीच्या दक्षिणेस मुळा, मुठा व पवना नद्यांची खोरी आहेत आणि उत्तर बाजूला भीमा नदीचे खोरे आहे. राजगुरुनगर, मावळ आणि हवेली या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांना इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्राचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा मध्य भाग इंद्रायणी नदीमुळे समृद्ध आणि सुपीक झालेला आहे. पावसाळ्यात इंद्रायणी नदी जोरात वाहते परंतु उन्हाळ्यात या नदीमध्ये कमी पाणी असते. इंद्रायणी नदीकाठच्या सर्वच जमिनी सुपीक,काळ्या, गाळाच्या आणि काही ठिकाणी चुनखडी प्रकारच्या आहेत. इंद्रायणी नदीच्या उगमस्थानी पावसाळ्यात खूप पाऊस पडतो.
पुणे शहराजवळ चिखली गावच्या हरगुडे वस्ती जवळ असलेला राम झरा इंद्रायणी नदीला येऊन मिळतो. कुदळवाडी मधून तो झरा चिखली आणि मोई गावच्या फाट्याजवळ इंद्रायणी नदीला मिळतो. पूर्वीच्या काळात हा झरा सतत वाहता राहत असायचा त्यामुळे या झऱ्याचा उपयोग येथील जवळच्या शेतकऱ्यांना आणि गुराख्यांना जनावरांना पाणी पाजण्यासाठी होत असे. तसेच या झऱ्याचा उल्लेख संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंग मध्ये आढळतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram maharaj ) आळंदीची वारी करीत असताना या झऱ्याचे पाणी पिऊन येथे विसावा घेत होते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पदस्पर्शाने इंद्रायणी नदीचा परिसर पावन झालेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि मुख्य कार्यस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहू गावाची महती जगभर आहे. याच देहू गावाजवळून इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणी काठी असलेले संत तुकाराम महाराजांचे मुख्य विठ्ठल रुक्माई मंदिर, वैकुंठ स्थान, संत तुकाराम गाथा मंदिर ( Gatha Temple )आणि जवळच असलेला प्रख्यात भंडारा डोंगर ( Bhandara Dongar ) येथे दर्शनासाठी आलेले भक्तगण इंद्रायणी मध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जातात.
त्याचप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी ज्यावेळेस आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाते त्यावेळी आणि तुकाराम बीज या दिवशी महाराष्ट्रासह अनेक प्रांतातून भक्तगण येथे येत असतात.त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भक्तांना इंद्रायणी नदीचे दर्शन घडते. त्याचप्रमाणे ज्ञानियांचा राजा माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी येथील समाधी स्थळी आळंदी यात्रेला आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला येणारे भाविक लाखोच्या संख्येने आळंदी मध्ये इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करतात. इंद्रायणी काठी असलेल्या देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्रामुळे आणि येथे होणाऱ्या उत्सवामुळे इंद्रायणीचे पवित्र स्नान अनेक भाविकांना घडते.
नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी लोक जागृती या उद्देशाने दरवर्षी इंद्रायणी नदीतून पंढरपूर पर्यंत जलदिंडी चे आयोजन केले जाते. जलदिंडी पंढरपूर मध्ये बारा दिवसात पोहोचते. तसेच पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त इंद्रायणी नदी बरोबर तिच्या घाटावरील भागाची स्वच्छता स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फत अभियान राबवले जाते. प्रख्यात इंद्रायणी नदीवर शेतकरी आणि अनेक, सर्वसामान्य आदिवासी, मत्स्य व्यवसायिक कुटुंब जीविकेसाठी व्यवसाय करत असतात.
काहीजण तर नदीमध्ये टाकलेले पैसे जमा करून आपली उपजीविका भागवत असतात. अनेक जण देहू आणि आळंदी या ठिकाणी इंद्रायणी नदी काठावर आपले छोटे छोटे व्यवसाय करून उपजीविका करतात. नदीकाठच्या अनेक गावांना इंद्रायणी नदीच्या पाण्यामुळे आपल्या शेतीमध्ये वर्षभर पिके घेता येतात. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी या नदीवर धरणे बंधारे आणि कालवे बांधले आहेत. अनेक ठिकाणी नाले ओढे इंद्रायणी नदीस मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात या नदीचा प्रवाह जोरात असतो.