भारतीय संस्कृतीत तुळशीला ( Importance of Tulsi ) खूप महत्त्व आहे . पवित्र असलेली वनस्पती तुळस हिंदू धर्मात पुजनीय आहे. तुळशीला विष्णू प्रिय आणि माता लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते. मातेसमान समजल्या जाणाऱ्या तुळशीची पूजा केल्याने सर्व संकटे नाहीशी होतात. श्रीहरी विष्णू अवतार पांडुरंगाला देखील तुळस फार प्रिय आहे. भगवान श्री विष्णूला तुळशीपत्र फार प्रिय आहे. हिंदू धर्मात तुलसी पूजन शिवाय नित्य पूजा पूर्ण होऊ
शकत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र टाकणे शुभ मानले जाते. त्यामुळे मृतकाच्या मुखामध्ये गंगाजलाबरोबर तुलसी पत्र ठेवले जाते. पुराना मध्ये व्यास मुनींनी जन्मजय राजाला तुळशी देवीचे आख्यान सांगितलेले आहे. ते म्हणतात ज्यांच्या दारी तुळशी वृंदावन असते ते धन्य आणि पुण्यवंत होतात. तसेच जे तुळशी पूजन करतात त्यांच्या हातून श्री हरिची पूजा घडते. तुळशी पूजनाने भगवान श्रीहरी विष्णू संतुष्ट होतात. तुळशी मातेस पाणी घालणारे आणि तुळशीची पूजा करणारे सदा सर्वकाळ सुखी होतात.
तुळशी पूजन करणारे सारेच जण श्रीकृष्णाचे म्हणजे श्रीहरी विष्णूंचे आवडते भक्त असतात. अशी सर्व कथा व्यास मुनींनी गायली आहे. स्वतः श्रीकृष्णांनी उद्धवास असा उपदेश केला होता की, तुळशीची पूजा करणारे कधीही दरिद्री राहणार नाहीत. ज्या स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतील त्या अखंड सौभाग्यवती बनतील. तसेच त्यांची संतती चिरंजीव होईल. त्यांना सुख संपत्ती प्राप्त होईल. तुळशीला प्रदक्षिणा घालणाऱ्यांना कसलीच भीती उरणार नाही. त्यांना यम यातना भोगाव्या लागणार नाहीत.
“तुळशीचे नाव जो नित्यदिनी उच्चारी तोच माझा भक्त शिरोमणी” असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. माझे एक ठिकाण भक्तांच्या हृदय कमळी आणि दुसरे तुळशीजवळ आहे. असे श्रीहरी सांगतात.वैकुंठलोकीची तुळस संतांनी मृत्युलोकी आणली. भगवान विष्णूंना तुळस ( Tulas ) अतिशय प्रिय असल्याची एक कथा आहे. जालंदर सुराची पत्नी वृंदा ही एक महापतिव्रता स्त्री होती. तिच्या पुण्य प्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. तेव्हा वृंदेला वृष्ट केल्याशिवाय जालंदराचा पराभव करणे शक्य नाही हे ओळखून भगवान श्रीविष्णूंनी
जालंदराचे रूप धारण करून वृंदेचे सत्वहरण केले.सती वृंदा हीच पुढे तुळसी रूपाने प्रकट झाली. तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केले.त्या विवाहाची स्मृती म्हणून दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळसी विवाह करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासूनच तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंची अर्धांगिनी झाली. त्यामुळे तुळस त्यांना अतिशय प्रिय आहे.अधिक मास हा विष्णू भक्तीसाठी खास पर्वणी समजला जातो. अधिक मासा मध्ये अधिक मास महात्म्य पोथीबरोबरव तुळशी महात्म्याचे सुद्धा एकदा तरी श्रवण पठण करायला हवे. तुळशी महात्म्य श्रवण केल्याने भगवान श्रीहरी श्रीविष्णूंची कृपा होते.
तुळशी पूजा नेहमी कशी करावी त्यावर सुद्धा आपणास तुळशी पूजेचे मिळणारे फळ अवलंबून असते. स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून नित्यनेमाने तुळशीस पाणी घालावे आणि प्रदक्षिणा घालावी. तुळशी समोर रांगोळी काढावी व तुळशीची पूजा करावी. घरातील लहान मुलांना सुद्धा तुळशी पूजनाची सवय लावावी. तुळशीजवळ बसून रामरक्षा स्तोत्र पठण करावे.सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. तुळशीजवळ दिवा लावण्यापूर्वी
दिव्याखाली अक्षदांचे आसन अर्थातच दिव्याखाली अक्षता ठेवाव्यात व आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णू अक्षदांचे आसन ग्रहण करतात व तेथे विराजित होतात. अक्षता शुद्धतेचे प्रतीक आहे. म्हणून अक्षदा वापरल्याने दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा राहते. त्याचप्रमाणे तुळशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तुळशीमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे तुळशी पत्र सेवन केल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, कफ प्रवृत्ती कमी होते, श्वसनाचे त्रास कमी होतात, दमा आणि खोकल्यासारख्या आजारांवर उपचार होतो, तुळशी सेवनाने तणाव कमी होऊन बुद्धी तेज बनते, ह्रदय विकाराच्या औषधामध्ये तुळस वापरली जाते, तसेच अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये तुळशीचा उपयोग केला जातो.
तुळशीच्या झाडाचे दोन प्रकार आहेत त्यापैकी एक कृष्ण तुळस आणि दुसरी रान तुळस आहे . कृष्ण तुळशीला थोडीफार काळसर रंगाची पाने आणि फुले येतात शिवाय त्या झाडाच्या फांद्याही थोड्या काळसर रंगाच्या असतात . रान तुळस ही हिरवीगार पानांची असते त्या झाडाची फुले पांढरी आणि फांद्या हिरव्या रंगाच्या असतात. तसेच घराजवळ तुळस असल्याने सापासारखे विषारी प्राणी घराकडे येत नाहीत. तुळशी पूजा करताना “ओम” या मंत्राचा अकरा किंवा 21 वेळा उच्चार करावा आणि श्री हरी विष्णूंची पूजा करताना त्यांना तुळशीची पाने अर्पण करण्यासाठी ती तोडत असताना “ॐ सुभद्राय नमः” हा मंत्र अकरा वेळा म्हणावा.
तुळशी पूजन करत करत असताना आणखी काही मंत्रांचा उच्चारही अनेक भक्तगण करत असतात. तसेच ज्याप्रमाणे तुळशी धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्याप्रमाणे तुळशीच्या लाकडापासूनबनवलेली “तुळशी माळ” फार पवित्र समजली जाते. महाराष्ट्रात विशेष करून वारकरी संप्रदायामध्ये तुळशी माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक वैष्णव भक्त आपल्या गळ्यात तुळशीच्या लाकडापासून तयार केलेली माळ घालून तिचे पावित्र्य जपत असतो. तुळशी माळ घातल्यामुळे मनाला शांतता मिळून आत्मशुद्धी होते, तुळशी माळ घातल्याने आरोग्य लाभते, तुळशी माळ घातल्याने बुध व गुरु ग्रह प्रबळ होतात.
तुळशी माळ घातलेल्या भक्ताला अनेक यज्ञाचे फळ मिळते व वास्तुदोष नाहीसा होतो, तुळशीची माळ घालून स्नान करणाऱ्या भक्ताला सर्व पवित्र नद्यांचे स्नान केल्याचे फळ मिळते. तसेच तुळशी माळेची अनेक धार्मिक महत्त्व असल्यामुळे भाविकाला सर्व संकटातून मुक्ती मिळते.