माळशेज घाटाजवळ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात पुणे, ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर हरिश्चंद्रगड आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरावर हरिश्चंद्रगड किल्ला ( Harishchandragad Fort ) असून किल्ल्याजवळ पाचनई, खिरेश्वर आणि सावर्णे ही गावे आहेत. चार हजार फूट उंचीवर असणारा हा गड पूर्वी आदिवासी महादेव कोळी समाजाकडे होता. हा गड गिरिदुर्ग प्रकारात मोडतो.
ऐतिहासिक माहितीनुसार साधारणपणे पाचव्या किंवा सहाव्या दशकामध्ये त्रिकूट किंवा कलचुरी या राजांच्या काळात झाली या गडाची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते.फार प्राचीन काळचा असणाऱ्या हया किल्ल्याचे वर्णन काशी पुराण,अग्नि पुराण आणि मत्स्य पुराणात आढळते. इस 1670 -71 मध्ये हरिचंद्र गड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला होता व हे त्यांचे विश्रांतीचे ठिकाण होते असे सांगण्यात येते. इस 1688 ते इस 1747 या कालावधीत हरिश्चंद्रगड मुघलांच्या ताब्यात होता.
अनेक वर्षांच्या मुघल राजवटीनंतर इस 1747 मध्ये मराठ्यांनी पेशवाई काळात हा किल्ला जिंकला. पुढे 1751 मध्ये हरिश्चंद्र गडाचा कारभार माहुली किल्ल्याचे किल्लेदार कर्णाजी शिंदे यांच्याकडे आला होता. त्यांच्या काळात त्यांनी या गडाची तूट फुट दुरुस्ती व इतर कामे केली. त्यानंतर पुढे या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार हरिश्चंद्र गडकर जोशी हे होते. हरिश्चंद्र जोशी यांना कर्नल साईक्स यांच्यासोबत लढाई करताना इस 1818 मध्ये वीरमरण आले. पुढे याच कर्नलने इस 1820 मध्ये संपूर्ण कोकण कड्यावरून गोल इंद्रधनुष्य म्हणजे पहिले इंद्र वज्र पाहिले होते अशी नोंद आढळते.
तसेच चांगदेव यांच्या तत्त्व सार मधील १०३६ ओव्या मध्ये 404 ओव्या सध्या उपलब्ध असून त्यामध्ये हरिश्चंद्र गडाचा उल्लेख आढळतो. हरिश्चंद्रगडावर पर्यटक सुरुवातीला मंगळ गंगेच्या पात्राजवळ पोहोचतात. पुढे गडावर गेल्यानंतर त्यांना श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिर पाहण्यास मिळते. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कलेमध्ये असून पुढे रतनगडाच्या पायथ्याशी अमृतेश्वराचे मंदिर आहे. अकराव्या शतकाच्या जवळपास झांज राजाने महत्त्वाच्या बारा नद्यांच्या उगम स्थानाजवळ बारा शिवलिंगांची आणि मंदिरांची निर्मिती केली होती.

हे मंगळगंगा नदीच्या उगमस्थानचे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर त्यापैकीच एक आहे. 16-17 मीटर उंचीचे हे मंदिर असून मंदिराचे बांधकाम हे पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या गर्भगृहात एक शिवलिंग असून शिवलिंगावर सतत अभिषेक होईल असे ग्रामस्थांनी नियोजन केलेले आहे. मंदिराच्या बाजूने दगडी भिंत असून बाजूला ओढ्यावर दगडी पूल आहे. हा ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो.
तसेच मंदिराच्या मागे गणेश मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा जिवंत झरा आहे. या झर्यालाच मंगळगंगा नदीचे उगम स्थान असे म्हणतात. मंदिराच्या आजूबाजूला काही गुहा आहेत. या गुहा अगदी मुक्काम करता येईल एवढ्या छान आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या एका गुहेमध्ये एका दगडी चौथर्या खाली एक खोली आहे. परंतु या खोलीच्या दरवाजाला प्रचंड मोठी शिळा लावून खोली बंद करण्यात आलेली आहे. याच खोलीत बसून चांगदेव ऋषी यांनी 14 वर्ष तपश्चर्या केली होती तसेच चांगदेवांनी तत्त्वसार ग्रंथाची निर्मिती येथे केल्याचे सांगितले जाते.
येथे एका शिलालेखावर “चक्रपाणी वटेश्वर नंद तू l तस्य सुतू व्यंकट देव ll” असे लिहिलेले आढळते.
तसेच मंदिरासमोर एक पुष्करणी असून या पुष्करणीला 14 कोनाड्या आहेत. या पुष्करणीमध्ये विष्णू देवाच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती होत्या असे म्हटले जाते. सध्या या मूर्ती येथेच एका गुहेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. येथून काही अंतर पुढे गेल्यानंतर एका पाणी असलेल्या टाकी शेजारी शिवलिंग असलेले एक छोटेसे मंदिर आहे.
पौराणिक दंत कथेनुसार डोंबाऱ्याच्या घरी सत्यवचनी हरिश्चंद्र राजा या टाकीला भरण्यासाठी कावडीने पाणी आणत असायचा. या मंदिराच्या समोर खांद्यावर कावड असलेल्या व्यक्तीचे शिल्प आहे. येथे विश्व मित्रांची शिळा पाहण्यास मिळते. सूर्यास्त व्हायला लागल्यानंतर अनेक पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी कोकण कड्याकडे जातात. आणि जर सूर्यास्त व्हायला वेळ असेल तर केदारेश्वर ची गुहा पहायला भक्त जातात. या मंदिरापासून कोकण कड्याकडे जाण्यासाठी अर्धा तास लागतो.
कोकण कडा हे हरिश्चंद्र गडाचे मुख्य आकर्षण असून गिर्यारोहकांसाठी हे प्रसिद्ध आणि प्रचलित ठिकाण आहे.अर्धवक्र कोकण कडा द्वितीय आणि पाहण्यासारखा आहे. म्हणूनच पर्यटकांसाठी हे संपूर्ण ठिकाण एक मुख्य आकर्षण आहे. कोकण कड्यावरून सूर्यास्ताची डोळ्याची पारणे फेडणारी दृश्य पर्यटक येथे पाहतात. काहीजण तर तंबूची व्यवस्था करून येथे कॅम्पिंग करतात. पुन्हा मंदिराकडे मंगळ गंगेच्या दिशेने आल्यास मंगळ गंगेच्या पाण्याच्या खळखळाटाचा पुन्हा आनंद घेता येतो.
गंगेच्या दिशेने थोडे पुढे गेल्यानंतर आणखी एक शिवलिंग मंदिर लागते. हे शिवलिंग म्हणजे केदारेश्वर आणि केदारेश्वर ची गुहा. दोन मीटर लांब आणि एक मीटर उंच असे भव्य हे शिवलिंग असून तीन फूट उंचीच्या चौथर्यावर ते आहे. मंगळ गंगा नदीच्या पाण्याने ही गुहा सतत पाण्याने भरलेली असते. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालताना थंड पाण्यातून प्रदक्षिणा घालावी लागते. या गुहेच्या डाव्या हाताला भिंतीवर शिवलिंग पूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. केदारेश्वर ची गुहा चार दगडी खांबावर उभी आहे.
असे सांगितले जाते की हे चार खांब चार युगांचे प्रतीक आहेत. सध्या हे चार खांब पडलेले असून एका खांबावर गुहेचे छत टिकून आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गुहेचे खांब हळूहळू कमकुवत होत चाललेले आहेत.तसेच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर म्हणजे तारामती शिखर येथे हरिचंद्र गडावर आहे. 4850 फूट उंचीच्या या शिखराच्या पोटात एकूण सात लेण्या आहेत. येथे एका गुहेत श्री गणेशाची वेगळ्याच रूपातील जवळपास साडे आठ फूट उंचीची मूर्ती आहे.
ही मूर्ती पाहिल्यानंतर पर्यटक इतर सहा लेण्या पाहण्यास जातात. यातील काही गुहेंचे काम पूर्ण झालेले नसल्यामुळे येथे पर्यटक राहतात. येथून डाव्या बाजूला जाणाऱ्या वाटेने अर्धा तास वरच्या दिशेने गेल्याने तारामती शिखरावर आपण जातो. या वाटेने शिखरावर जाणे धोक्याचे आहे.त्यामुळे अनेक पर्यटक इकडे जाणे टाळतात.तारामती शिखरावर जाताना गोमुख पहावयास मिळतात तसेच शिखरावरून जवळपासचे सर्व किल्ले दिसतात. या उंच शिखरावरून खाली पाहिल्यानंतर आकाशातून खाली पाहिल्यासारखा भास होतो.तारामती शिखरावर तीन शिवलिंग आहेत.
तारामती शिखरावर गेल्यावर कळसुबाई शिखर पार केल्यासारखा आनंद मिळतो. हरिश्चंद्रगड नाशिक पासून 110 किलोमीटर अंतरावर आहे व पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर असून या गडावर जाण्यासाठी पुण्यावरून आळेफाटा मार्गे खिरेश्वर गावातून गडावर जाता येते. तसेच मुंबई पासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई किंवा कल्याण वरून इकडे जाण्यासाठी मुळबागल – माळशेज घाटाच्या रस्त्याने जाऊन खुबी फाट्यावर गाडी लावून पुढे धरणावरून चालत जावे लागते.
खुबी फाट्यापासून पाच किलोमीटर अंतरावर खिरेश्वर गाव आहे. खिरेश्वर गावातून दोन वाटा गडावर जातात. एक म्हणजे टोलार खिंडीतून तीन चार तास पायी चालत गडावर जाता येते. तसेच या वाटेने जाताना टोलार खिंडीत वाघाचे शिल्प पाहण्यास मिळते. पूर्वी या वाटेला राज दरबारी वाट म्हटले जायचे. त्यामुळे ही वाट पूर्वीच्या काळात प्रसिद्ध होती. तिसऱ्या मार्गाने म्हणजे नळीच्या वाटेने गडावर जाता येते परंतु हा मार्ग फार अवघड आहे. फक्त अनुभवी गिर्यारोहकांनीच या मार्गाने जावे.
हरिचंद्र गडावर जाण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी पर्यंतचा काळ चांगला असतो. पावसाळ्यात सुद्धा येथे फिरणे चांगले असते परंतु पाण्यामुळे रस्ते चिखलमय झालेले असतात. त्यामुळे घसरून पडण्याची भीती जास्त वाढते.