गुढीपाडवा | Gudhipadawa

गुढी पाडवा ( Gudhi padawa) म्हणजे हिंदू मराठी नववार्षाचा पहिला दिवस,गुढीपाडवा हा सन प्रतीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर तसेच विशेषतः महाराष्ट्रामधे हा सण मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या घराच्या , दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गुढी उभारतो. घरासमोर गुढी का उभारली जाते हे आपणास माहित आहे का? आपली नविनपिढी आपली संस्कृती विसरत चालली आहे कारण त्यांना आपल्या सण उत्सवाचे माहात्म्य माहित नाही. इंग्रजी नववर्ष साजरे करण्याच्या नादात आपल्या नूतन वर्षाचा पहिला दिवस आपण विसरत चाललो आहोत.

चला तर जाणून घेऊया गुढी पाडवा या सणाचे माहात्म्य.गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर गुढी उभारतो. हिंदू संस्कृती प्रमाणे हि गुढी स्नेह, मांगल्य, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. गुढी पाडवा हा साढेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी लोक सोने चांदी, नवीन वास्तू, नवीन वस्त्र, नवीन वाहन, यांची खरेदी करतात . नवीन कार्याची सुरवात तसेच अनेक धार्मिक कार्य या दिवशी केले जाते.

गुढी पाडवा या सणाचे माहात्म्य

ब्रह्म पुरानामध्ये असे म्हटले आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेस या सृष्टीची निर्मिती ब्रम्ह देवाने केली अथर्व वेद शतपत ब्राम्हण वेदा मधे याचा उल्लेख केलेला आहे. मर्यादा पुरषोत्तम श्री राम माता सीता आणि लक्ष्मण चौदा वर्ष वनवासाला गेले होते. या चौदा वर्षाच्या कालखंडा मधे त्यांनी अनेक राक्षसांचा संहार केला. लंकाधीपती रावणाचा वध केल्या नंतर भगवान राम ,सीता माता आणि लक्ष्मण सह स्वगृही परतले, त्या वेळेस लोकांनी विजय उत्सव साजरा केला .घरावरती गुढ्या उभारल्या तोरणे बांधली आणि आनंद उत्सव साजरा केला. म्हणूनच गुढीस विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून संबोधले जाते.

महाभारताच्या आदिपर्वा मधे उपरीचर नावाचा राजा होता राजास इंद्र देवाने कळकाची (बांबू) ची काठी राजास दिली. राज्याने ती काठी जमिनीवर रोवून त्या काठीची पूजा केली, पुढे त्यांची परंपरा म्हणून बाकीचे राजेही चैत्र शुद्ध प्रतिपदेला या काठीला रेशमी वस्त्र घालून पूजा करू लागले. या शिवाय पुराणा नुसार भगवान श्री हरी विष्णू चे अनेक अवतार असून त्या पैकी मत्स्य अवतार आहे, शंखा सुराचा वध करण्यासाठी श्री हरी विष्णू ने हा अवतार घेतला, त्या मत्स्य रुपी श्री हरी विष्णुचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला होता.

या शिवाय अजून एक मान्यता अशी आहे की शालिवहन राजाने आपल्या शत्रूचा पराभव करण्या साठी, सहा हजार मातीचे सैन्य तयार करून त्यांच्या वरती पाणी शिंपडून सैन्यामध्ये प्राण फुंकला, याच सैन्याच्या मदतीने त्यांनी शत्रू चा पराभव केला. याच विजयाच्या प्रित्यर्थ शालिवहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरवात होते.तसेच अनेक संत साहित्यात गुढीपाडव्याचा उल्लेख आलेला आहे. संत चोखामेळा यांचा पाच चारणाचा अभंग आहे, संत चोखामेळा असे लिहतात.


“टाळी वाजवावी , गुढी हि उभरावी
वाट ही चालावी पंढरीची “

संत तुकाराममहाराज , संत जनाबाई संत ज्ञानेश्वरमहाराज संत एकनाथ महाराज याच्या अभंगा मधे गुढी पाडव्याचा उल्लेख केलेला आहे. या शिवाय शिव कालीन पत्रसार संग्रह, शिव चरित्र साहित्य, मराठ्यांचा इतिहास साधने खंड 20 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यांनमधे हे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे, कर्नाटक आंध्रप्रदेश, तेलंगणा मधे याला उगादी म्हणून संबोधले जाते राजस्थान हरियाणा मधे याला थपना असे म्हणतात हिमाचल मधे याला चैत्ती तर काश्मीर मधे नववर्षाला नवरेह असे म्हणतात. गुढी पडवा या सणाला आपल्या हिंदू संस्कृती मधे अनन्य असाधारण महत्व आहे.

गुढी कशी उभरावी : मुख्य प्रवेश द्वारा बाहेर जेथे गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून तेथे रांगोळी काढावी. दाराला तोरण लावावे,गुढी उभारण्यासाठी आपण जी बांबू ची काठी घेणार आहोत ती प्रथम धुऊन पुसून घ्यावी तिच्या टोकाला कडुनिबाचा किंवा अंबाच्या पानाचा डहाळा बांधावा नवीन वस्त्र बांधून, सुवासिक फुलांची माळ घालावी, साखरेचा गाठीची माळ घालावी त्या वरती चांदीचा किंवा तांब्याचा कलश उलटा करून घालावा, रांगोळी काढलेल्या जागेवरती गुढी उभारावी, गुढीला हळदी कुंकू लावून फुले वहावी त्या सोबत धूप दीप नैवेद्य दाखवावा. गुढी हि सकाळी लवकर उभरावी, सूर्यास्त होण्याच्या वेळी तीला गुळाचा नैवेद्य ठेऊन उतरून ठेवावी. या गुढीला ब्रम्हध्वज असेही म्हटले जाते.

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा आणि उत्सव साजरे केले जातात त्यानिमित्ताने काही ठिकाणी बैलगाड्यांची शर्यती आणि कुस्त्यांचा आखाडा सुद्धा असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो पुरणपोळीचे जेवण केले जाते आणि त्याचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो. पूर्वीच्या काळी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र घेण्याची पद्धत होती त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये गुढीपाडव्याला सर्व लोकांना कपडे घेतली जात असत. गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो आणि या चैत्र महिन्यात कडुनिंबाला पालवी फुटते . ही एक प्रकारे निसर्गाच्या नवीन वर्षाची सुरुवातच असते.

Leave a Comment