ग्रामगीता | Gramgeeta

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा मराठी काव्यातील “ग्रामगीता” (Gramgeeta ) हा ग्रंथ असून भारत देशाच्या ग्रामीण भागातील जीवन, ग्रामीण लोकांची संस्कृती, तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यामध्ये उपाय सांगितले आहेत. ग्रामीण जनतेसाठी हा ग्रंथ एक आदर्श संदर्भ ग्रंथ असून ग्रामगीतेचे महत्व अनन्यसाधारण आहे. या ग्रंथामधून ग्रामीण भागातील सामान्य जनतेला जगण्याचे आणि विकासाचे ज्ञान मिळते. तसेच जीवन जगत असताना सर्वसामान्य अडचणी आणि दुःख दूर करण्यास मदत होते.

ग्रंथात सांगितल्याप्रमाणे उपायोजना करून येणाऱ्या अडचणींवर मात करून ग्राम विकासासाठी आणि ग्रामसंस्कृतीसाठी उपयोग होऊ शकतो संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये देवाचे दर्शन, धर्माचे अध्ययन, भारतीय आश्रम धर्म, संसारीक परमार्थ, भारतीय वर्णव्यवस्था, संसर्ग रोगप्रभाव, आचार विचार प्राबल्य, प्रचार आणि महिमा, सेवाभाव सामर्थ्य आणि संघटनेची शक्ती अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर मराठी काव्यसंग्रहातून वर्णन केले आहे.

ग्राम गीतेमधून रोजच्या जीवनात उपयोगात आणता येतील असे विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला दिले आहेत. त्यातील मानवाला जीवन जगण्यासाठी चार-पाच फारच महत्त्वाचे असलेले विचार जर आपण पाहिले तर फॅशन, कर्म, पैशाची बचत, प्रयत्न आणि स्वयंप्रेरणा हे आहेत. फॅशन हा शब्द त्यांच्या ओवी मध्ये आढळतो.“नवी फॅशन थाटमाट, यांची वाढतच गेली चट l शिवता पन्नासाचा कोट, लागे प्यांटही तोलाचा ll” फॅशनचा अतिरेक आपले नुकसानच करील असे ते सांगतात. तसेच महाराज सांगतात “ ह्या गरजा वाढतच जाती, तेथे न पुरे कुबेर संपत्ती ll” म्हणजे कितीही संपत्ती असली तरी अशा वाढत जाणाऱ्या गरजांना ती पुरणार नाही.

त्यामुळे बरं रहावं, नीट दिसावं, सुंदर सात्विक कपडे घालावेत परंतु याचाच केवळ अतिरेक नसावा, सौंदर्य असावं ते विचार, गुण, आरोग्य, बाणेदारपणा, आदर्श आणि मानवतेचं. मानव मानवतेने शोभावा असे संत तुकडोजी महाराज सांगतात. दुसरा महत्त्वाचा विचार म्हणजे कर्म. म्हणजेच श्रम संपत्ती बद्दल बोलताना तुकडोजी महाराज म्हणतात “कर्ममय विश्व आहे, कोण रिकामा बसला आहे l प्रत्येकजण करीतचि जाय, काहीतरी कर्म ll” म्हणजेच प्रत्येक जण कर्म करतोच पण तुकडोजी महाराजांच्या मते “तेचि माणुसकीचे कर्म, जे दुसऱ्यांसाठी केले श्रम ll” म्हणजेच माणुसकीच्या नात्याने माणसाने माणसासाठी कर्म केले पाहिजे.

पुढे त्यांनी कशा पद्धतीत कर्म करू नये हे देखील सांगितले आहे.” एक नवजवान आळसे निजला, म्हणे हेही पाहिजे शरीराला ll म्हणूणी तो सारखाची झोपला, फक्त उठला भोजनाशि ll” म्हणजे तरुण मुलगा विश्रांती हवी शरीराला म्हणून सारखाच झोपत आहे आणि फक्त जेवण करण्यासाठी उठत आहे. अशी अनेक आळशी माणसे आपणास आजूबाजूला दिसतील. तुकडोजी महाराजांचा तिसरा विचार प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे “पैशाची बचत.” सुविचार वाचूनी काही, पैसा सत्कारणी लागत नाही l धन वाढता मन वाढत जाई, घटता सवयी न घटती ll” म्हणजेच योग्य विचार,योग्य व्यवस्थापनाशिवाय पैसा सत्कारणी लागत नाही.

कारण पैसा अधिक येऊ लागला की माणसाच्या गरजा अधिक वाढत जातात. म्हणून कितीही पैसा आला तरी जडलेल्या सवयी सुटत नाहीत. म्हणजे पैसे वाचवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र काही जण खूपच कंजूशी करतात. या कंजूशीबद्दल सुद्धा तुकडोजी महाराज म्हणतात “ कंजूशीही न करणे बरे, उधळपट्टीही न व्हावी ll” थोडक्यात जास्त कंजूसही नसावे आणि जास्त उधळपट्टी ही करू नये. संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतून त्यांचा चौथा महत्त्वाचा विचार मांडतात प्रयत्न प्रभावाचा. अनेकदा काही माणसं ध्येय ठरवतात पण त्या दिशेने प्रयत्न करत नाहीत. मग ध्येयप्राप्ती न झाल्यामुळे इतरांना दोष देतात.

इथे तुकडोजी महाराज फार छान वचन सांगतात., “ प्रयत्न करता होतो उद्धार, आपला शत्रू मित्र आपणचि ll” म्हणजेच प्रयत्न केल्याने आज ना उद्या नक्कीच फलप्राप्ती मिळते आणि उद्धार होतो. म्हणजेच प्रयत्नांती परमेश्वर! म्हणजे प्रयत्न केल्याने नक्कीच यश मिळते,उद्धार होतो. याच प्रमाणे जीवन जगत असताना संत तुकडोजी महाराज यांचा ग्रामगीतेतील पाचवा विचार सुद्धा फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे “स्वयंप्रेरणा”. स्वयंप्रेरणा असल्याशिवाय माणूस प्रयत्न करत नाही.

याबाबत महाराज म्हणतात “ मनी आत्मोन्नतीची तळमळ, त्याशी वाट देती सकळ l आपुले आपण आतची बळ, पाहिजे आधी ll” म्हणजे प्रगती करायची असेल तर आधी स्वतःमध्ये इच्छा हवी. एकदा ठरवले की जमते पण तरीही जेव्हा आपल्या मनात शंका येते की ही गोष्ट मला जमेल का तेव्हा आपल्यात असलेल्या कौशल्यांकडे आपण लक्ष द्यावे.

याबाबत तुकडोजी महाराज म्हणतात.” आपल्या अंगी प्रकाश भरला, तो पाषाणची हिरा ठरला l खाणीत शोधूनी आणिती त्याला प्रयत्ने जन ll” पाषाण म्हणजे दगड आणि दुसरा म्हणजे चकाकणारा दगड म्हणजे हिरा. तर आपण स्वतःला दगड न मानता हिरा आहे असे समजून प्रयत्न करायचा म्हणजे आपल्यात असणारी कौशल्य आपणच वाढीस लावायची. म्हणजे आपण चकाकतो. मग हिऱ्याची पारख करणारे किंवा त्याला मदत करणारे अनेक जण असतात. परंतु यासाठी “स्वयंप्रेरणा” महत्त्वाची असते.

मानवी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या “ग्रामगीता” या ग्रंथाच्या एकूण नऊ प्रस्तावना आहेत. तसेच सुदाम सावकारांनी अकरा खंडात संत तुकडोजी महाराजांचे चरित्र रेखाटले आहे. ग्रामगीता म्हणजे तुकडोजी महाराजांच्या मनात रुजलेले ग्रामोन्नतीचे धडे, ग्राम संस्कृतीचे नितळ रूप आणि उत्कट दर्शन होय. महाराजांनी आयुष्यभर खेडोपाडी फिरून भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून ग्रामीण विवंचना तपासल्या. त्यानंतर त्यांनी दूरवर पसरलेली खेडे गावे हीच माझी दैवते आणि ग्रामसेवा करणे हीच खरी पूजा असा संदेश समस्त भारतीयांना दिला. तुकडोजी महाराजांनी ग्राम शुद्धीकरण, ग्राम निर्मिती, ग्राम संरक्षण, ग्रामीण आरोग्य, ग्रामीण शिक्षण, ग्रामीण कुटुंब, ग्रामीण मंदिरे आणि प्रार्थना, ग्राम सेवाभाव, ग्राम संस्कार आणि उद्योग, ग्रामीण संघटन, ग्राम आचार विचार अशा सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर ग्रामगीतेत संस्कृत भाषेतून विचार मांडले.

संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामदेवतेला अर्पण केलेली ग्रामगीता परस्परांमध्ये स्नेहभाव निर्माण होण्यासाठी आणि सर्वार्थाने ग्रामविकास होण्यासाठी तसेच गावातील लोकांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी व मानवतेचे तेज झळाळण्यासाठी मोठ्या तळमळीने ग्राम जीवन समृद्धी व्हावी म्हणून लिहिली आहे. समाज सुधारक थोर संत तुकडोजी महाराज यांनी “जनसेवा हीच ईश्वर सेवा” ग्रामगीतेत सांगितली आहे आणि सिद्धांतिक दिशा देऊन ग्राम सुधारणा करण्यासाठी उपदेश केले आहेत. म्हणून असे म्हटले जाते की, ग्राम विकासाची संहिता म्हणजे “ग्रामगीता”.

Leave a Comment