उत्तर कर्नाटक मध्ये कन्नड जिल्ह्यात हिंदूचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या गोकर्णला ( Gokarna Mahabaleshwar ) दक्षिण काशी असे समजले जाते. तसेच याच ठिकाणाला मोक्षाचे द्वार म्हणून ओळखतात. त्यामुळे हजारो हिंदू भावीक या स्थळाला भेट देत असतात. गोकर्ण हे आध्यात्मिक ठिकाण म्हणून तर प्रसिद्ध आहेच शिवाय या ठिकाणाला निसर्ग रम्य ठिकाण म्हणून सुद्धा ओळखले जाते. येथील समुद्रकिनारा पाहून मन अगदी प्रफुल्लित होते.
गोकर्ण महाबळेश्वर चा उल्लेख श्रीमत गुरुचरित्र या ग्रंथात आपणास सविस्तर आढळतो. येथे मंदिरामध्ये जाण्यासाठी एक वस्त्र परिधान करावे लागते तेही येथे मिळते. 50 ते 100 रुपयांपर्यंत ही लुंगी परिधान करण्यासाठी मिळते. येथे श्रीपाद श्रीवल्लभ घरातून निघाल्यानंतर या ठिकाणी सलग तीन वर्षे राहिल्याचे सांगितले जाते. येथे पुरातन शिवमंदिर असून हे भक्तांच्या समस्या दूर करणारे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते .भगवान शिवाला समर्पित पश्चिम घाटावरील हे मंदिर सुमारे 1500 वर्षे जुने आहे आणि कर्नाटक मधील सात मुक्ती केंद्रांपैकी एक मानले जाते. हे मंदिर अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहे.
येथील धार्मिक श्रद्धेमुळे या ठिकाणाला दक्षिणकाशी असे म्हटले जाते. गोकर्ण तीर्थक्षेत्राचा महिमा शास्त्रात सुद्धा सांगितलेला आहे. हे मंदिर चौथ्या शतकामध्ये बांधलेले असून द्रविड शैलीतील आहे. कदंब राजा,मयूर वर्मा यांच्या काळात हे उभारलेले मंदिर आहे.
गोकर्ण महाबळेश्वर ची निर्मिती कशी झाली याबद्दल सांगितले जाते की, त्रेता युगात राक्षसाचा राजा रावण हा लंकेवर राज्य करत होता. लंकाधिश राजा रावण हा अत्यंत दृष्ट,महापराक्रमी आणि शिवभक्त म्हणून ओळखला जायचा. त्याचबरोबर रावणाची माता केकसी शिवभक्त होती. कैकसी रोज समुद्रकिनारी जायची आणि शिवलिंग तयार करून त्याची नित्यनेमाने पूजा करत असे.
परंतु रोज पूजेनंतर समुद्राच्या प्रवाहामध्ये हे शिवलिंग वाहून जात असे. असा हा तिचा दिनक्रम रोजचा होता. हे पाहून रावण कैकसी मातेला म्हणाला की माते तू रोज शिवलिंगाची पूजा करतेस परंतु तू तयार केलेले शिवलिंग रोज वाहून जात आहे. तुला मी प्रत्यक्षात शिवलिंग आणून देतो. ज्याची पूजा केल्याने प्रत्यक्ष भगवान शिव शंकराची पूजा केल्याचे फळ तुला मिळेल.रावण हा जसा शिवभक्त होता तसाच मातृभक्त सुद्धा होता. आपल्या मातेसाठी महादेवाचे आत्मलिंग आणून देण्यासाठी त्याने कैलास पर्वतावर भगवान शिव शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. यावर शिवशंकरांनी त्याला हवं ते वरदान मागण्याची आज्ञा केली.
त्यानंतर रावणाने आपल्या मातेसाठी आत्मलिंगाची मागणी केली. मागणी करताच शिवशंकरांनी आत्मलिंग रावणाला दिले परंतु देताना सांगितले की, तू हे आत्मलिंग जमिनीवर ज्या ठिकाणी ठेवेल तिथेच ते स्थापित होईल. मग रावण हे आत्मलिंग घेऊन आपल्या मातेकडे निघाला. हे पाहून सर्व देव देवता चिंतित पडले होते की, साक्षात भगवान शिव शंकरांनी आत्मलिंग दिल्यामुळे रावण अधिक बलशाली होईल आणि दिग्विजय होईल. तसेच त्याचा उतमात वाढेल. त्यामुळे सर्व देवांनी नारदमुनी आणि गणपतीकडे धाव घेतली आणि त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. तसेच त्यांनी नारदमुनी आणि गणपतीला विनंती केली की यावर तुम्ही मार्ग काढा.
त्यावेळी गणेशाने एका ब्राह्मण बालकाचे रूप धारण करून रावणाकडे गेले. व समुद्रकिनारी श्री गणेश येताच श्रीहरी विष्णू ने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला. सूर्यास्त झाला असे समजून रावण चिंतेत पडला. रावण अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषेध यांचे सखोल ज्ञान होते. त्यामुळे संध्याकाळची वेळ झाली म्हणजे संध्या करायची वेळ झाली हे त्याला माहीत होते. त्याच्या लक्षात होते की भगवान शिव शंकरांनी सांगितल्याप्रमाणे आत्मलिंग ज्या ठिकाणी ठेवेल त्या ठिकाणी ते स्थापन होईल. म्हणून रावणाने गुराखी रुपी असलेल्या गणेशाची मदत मागितली. तो गणेशाला म्हणाला की एक मदत करशील का?
मी समुद्रकिनारी जाऊन स्नान करून येईपर्यंत हे आत्मलिंग तू सांभाळ. तसेच मी येईपर्यंत ते तू खाली जमिनीवर ठेवू नकोस. त्याने रावणाची विनंती मान्य केली आणि रावणास म्हणाला की मी तुमचे काम करेल परंतु शिवलिंग फार जड असून ते मला इतका वेळ पेलवणे शक्य नाही. त्यामुळे जर तुम्ही लवकर आले नाही तर मी ते खाली ठेवेल. त्याअगोदर मी तुम्हाला तीन वेळा हाक मारेल. तरीही तुम्ही आले नाही तर मी ते खाली ठेवेल. गणेशाच्या ह्या अटी मान्य करून रावण त्या ठिकाणाहून निघून जातो. काही वेळाने गणेश आपल्या लीलांना सुरुवात करतो. तो घाई घाई ने रावणाला तीन हाका मारतो आणि हातातील शिवलिंग खाली ठेवतो.
मग गणेशाने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केले हे पाहून रावणास कळून चुकते की हे काम देव देवतांचे आहे. क्रोधित रावण आत्मलिंग उचलण्याचा फार प्रयत्न करतो. परंतु ते आत्मलिंग थोडे सुद्धा हलत नाही. तसेच आत्मलिंग हालत नाही म्हणून तो जोरजोराने सर्व शक्तीनिशी आत्मलिंग हलवण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्या आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा तयार होतो. शेवटी रावण निराश होऊन लंकेमध्ये परततो. हे आत्मलिंग गाईच्या कानासारखे तयार झालेले असते म्हणून याला गोकर्ण असे नाव पडते. तसेच महाबलीरावनाने अनेक प्रयत्न करून सुद्धा आत्मलिंग हलले नाही म्हणून या भागाला महाबळेश्वर असे नाव पडते.म्हणून या ठिकाणाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले.
आत्मलिंग हलत नाही म्हणून रावणाने रागाने आत्मलिंगा बरोबर आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली होती. म्हणजेच आणलेला डब्बा,डब्याचे झाकण,लिंगावरील कापड अशा पाच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी पडल्यामुळे त्या ठिकाणांना पंच क्षेत्र असे नाव पडले. गोकर्ण महाबळेश्वर म्हणजे महादेवाचे मुख्य आत्मलिंग होय. सज्जेश्वर हा आत्मलिंग आणलेला डब्बा होता. हे या ठिकाणावरून 35 किलोमीटर अंतरावर आहे. आत्मलिंग बांधून ठेवलेला धागा ज्या ठिकाणी पडला ते घारेश्वर ते येथून 45 किलोमीटर अंतरावर आहे. डब्याचे झाकण पडले ते ठिकाण म्हणजे गुणवंतेश्वर हे ठिकाण गोकर्ण पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे.
आत्मलिंग झाकलेला कपडा ज्या ठिकाणी पडला ते मुरुडेश्वर गोकर्ण पासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. अशा प्रकारे भगवान शिव शंकराच्या आत्मलिंगाची पाच तीर्थक्षेत्रे तयार होऊन श्री गणेशामुळे गोकर्ण महाबळेश्वर हे ठिकाण स्थापन झाले.याच मंदिराच्या शेजारी श्री महागणपती मंदिर आपणास पहावयास मिळते. येथे श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराकडे दर्शनासाठी जातो. सर्व भाविक या ठिकाणी गणपतीच्या उभ्या असलेल्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतात. येथे आजूबाजूला खूप मोठी मसाल्याची दुकाने आहे. येथील परिसराला मसाल्याचे उत्पादन करणारे राज्य म्हटले जायचे. येथे होलसेल दरात मसाले आणि मसाल्याचे कच्चे मटेरियल मिळते.

या ठिकाणी महादेवाच्या आत्मलिंगावर रुद्राभिषेक, नवधान्य अभिषेक, चांदीचा व सोन्याचा नागकेशर अभिषेक अशा प्रकारचे अभिषेक भावीक भक्त करत असतात.
येथील परिसरात भक्तांना राहण्यासाठी अनेक ब्राह्मणांची माफक दरात घरे किंवा खोल्या मिळतात. तसेच चांगल्या सुविधायुक्त लॉज सुद्धा येथे उपलब्ध आहेत. येथे भक्तांसाठी दुपारी आणि संध्याकाळी मोफत महाप्रसाद दिला जातो.या ठिकाणी जाण्यासाठी 140 किलोमीटर अंतरावर दाबोळी हे विमानतळ आहे.
तसेच रेल्वेने जाण्यासाठी अंकोला हे रेल्वे स्टेशन गोकर्ण पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने फोर व्हीलर ने जाण्यासाठी येथील रस्ते फार चांगले आहेत. येथे पार्किंगची व्यवस्था प्रशस्त जागेत बीचवर आहे. पार्किंग पासून अगदी जवळच मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. मुख्य मंदिराकडे जाताना थोडासा अरुंद रस्ता आहे. मंदिराकडे जाताना रस्त्याने पूजेचे साहित्य पेढे फराळ आणि इत्यादी साहित्याची दुकाने आहेत.