भारत देशामध्ये प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या गोदावरी ( Godavari River ) नदीचे खोरे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे समजले जाते. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. गोदावरीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक या विभागीय क्षेत्रात तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये झालेला आहे.
ह्या ब्रम्हगिरी टेकड्या अरबी समुद्रापासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकचे त्र्यंबकेश्वर हे भगवान शंकराच्या एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या दहा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. गोदावरी नदीने महाराष्ट्रातील 48.6%, तेलंगणा 18.8%, आंध्र प्रदेशचा 4.5%, छत्तीसगडचा 10.9% आणि ओडिसाचा 5.7% भाग व्यापलेला आहे. या नदीचे एकूण खोऱ्याचे क्षेत्रफळ 3,12,812 चौरस किलोमीटर आहे.
काही छोट्या देशांच्या क्षेत्रफळा एवढे क्षेत्रफळ गोदावरी नदीची आहे म्हणून हिला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. गोदावरी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी असून भारताच्या द्विकल्पामध्ये सर्वात लांब नदी आहे.गोदावरी नदीच्या उगम स्थानापासून एकूण 1465 किलोमीटर अंतरापर्यंत पूर्वेकडे वाहते.आणि पुढे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. सुरुवातीला ही नदी उगम स्थानापासून ईशान्य कडे जाते.
ईशान्य कडे काही अंतर वहात गेल्यानंतर तिथे कश्यपि आणि गंगापूर धरण आहे. या धरणामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा होतो. त्यानंतर आठ किलोमीटर गोदावरी खडकाळ प्रदेशातून जाते. त्यामुळे तिथे दोन धबधबे तयार झालेले आहेत एक म्हणजे गंगापूर धबधबा आणि दुसरा म्हणजे सोमेश्वर धबधबा. या सोमेश्वर धबधब्याला दूध सागर धबधबा असेही म्हणतात. पुढे काही अंतर वाहत गेल्यानंतर गोदावरी नदीला दक्षिणेकडून दारणा नदी येऊन मिळते आणि वायव्य कडून पैनगंगा नदी येऊन मिळते.
पुढे गेल्यानंतर नांदूर मदनेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीकाठी मोठे अभयारण्य आणि मोठा जलाशय आहे. येथे गोदावरी नदीला कादवा नावाची नदी येऊन मिळते. तिथून पुढे गोदावरी नदी आग्नेयकडे प्रवास करत बंगालच्या उपसागराकडे जाते. नाशिक मधून गोदावरी नदी बाहेर पडल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यात तिचा प्रवेश होतो.त्यानंतर पुणतांबे येथील अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांच्या सीमेवर ती जाते.
येथून जाताना प्रवरानगर येथे गोदावरीला प्रवरा नदी येऊन मिळते. प्रवरा नदीवर अगोदर विल्सन नावाचा बंधारा होता आता त्याचे नाव बदलून भंडारदरा धरण झाले आहे. पुढे ही गोदावरी नदी पैठण शहरामध्ये जाते. पैठण या ठिकाणी जे धरण बांधले आहे त्याला नाथसागर असे म्हणतात. पुढे गोदावरी बीड जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तिला सिंदफणा आणि बिंदुसरा या दोन नद्या येऊन मिळतात. खरे तर सिंदफणा या नदी ची बिंदुसरा उपनदी आहे. पुढे गोदावरी परभणी मध्ये गंगाखेड या तालुक्यामधून जाते.
गोदावरीच्या दक्षिण गंगा नावावरून येथील शहराला आणि एका गावाला गंगाखेड असे नाव पडले आहे. पुढे गोदावरी नदीला डावीकडून इंद्रायणी आणि उजवीकडून मसुदी तसेच पुन्हा डावीकडून दक्षिण पूर्णा ही नदी येऊन मिळते. पुढे नांदेड येथे गोदावरी नदीवर विष्णुपुरी धरण बांधलेले आहे. हे विष्णुपुरी धरण म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. त्याला आपण लिफ्ट इरिगेशन असे म्हणतो. तसेच या विष्णुपुरी धरणाला शंकर सागर धरण असेही म्हणतात.
पुढे याच गोदावरी नदीवर वादग्रस्त बाभळी प्रकल्प आहे. शेवटी महाराष्ट्र मध्ये लातूर मधून वाहणारी मांजरा नदी गोदावरी नदीला येऊन मिळते. म्हणजे मांजरा नदीच्या उपनद्या तेरणा,तावर्जा,लेंडी आणि मंजर या सर्व नद्या गोदावरी मध्ये सामील होतात. पुढे गोदावरी नदी तेलंगणा राज्यात नुकताच जेव्हा प्रवेश करते तिथे गोदावरीला मांजरा आणि हरिद्रा अशा दोन नद्या येऊन मिळतात.
त्या ठिकाणाला त्रिवेणी संगम असे म्हणतात. पुढे तेलंगणा मध्ये गोदावरीला कदम नावाची नदी येऊन मिळते आणि विदर्भ मधून येणारी प्राणहिता नावाची नदी येऊन मिळते. प्राणहिता म्हणजे वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्रित प्रवाह म्हणजे प्राणहिता नदी होय. वर्धा नदी ची पैनगंगा ही उपनदी आहे.
बऱ्याचशा ठिकाणी असाही संदर्भ आहे की, प्राणहिता नदी गडचिरोली मध्ये गोदावरीला मिळते कारण गडचिरोलीच्या शेजारी तेलंगणा आहे. त्यामुळे प्राणहिता नदी कालेश्वरम या ठिकाणी गोदावरीला मिळते असा उल्लेख आढळतो. त्यानंतर गोदावरी नदीला छत्तीसगड मधील भद्रकाली गावात इंद्रावती नावाची नदी येऊन मिळते. इंद्रावती नदी गडचिरोलीची पूर्व सीमा आणि प्राणहिता नदी म्हणजे गडचिरोलीची पश्चिम सीमा होय. पुढे गोदावरी नदी आंध्र प्रदेशामध्ये प्रवेश करते.
तेथे पापी हिल्स नावाच्या टेकड्या आहेत. तिथे फार रुंद पट्टा असून गोदावरीला सब्री नावाची नदी येऊन मिळते. आंध्र प्रदेशामध्ये राजमुंद्री या ठिकाणी एक डोलेश्वरम धरण गोदावरी नदीवर तयार केलेले आहे. या धरणाच्या पुढे गोदावरी नदी दोन वेगवेगळ्या प्रवाहामध्ये वाहते. या दोन प्रवाहांना गौतमी गोदावरी आणि वशिष्ठ गोदावरी असे म्हणतात. त्यासोबतच या गोदावरी नदीचे डोवळेश्वरम धरणाच्या पुढे इतर चार-पाच छोटे छोटे प्रवाह सुद्धा वाहतात.
हे सर्व प्रवाह बंगालच्या उपसागराला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मिळतात. डौलेश्वर येथील गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात मासेमारी,भात शेती, नौकानयन इत्यादी व्यवसाय प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे गोदावरी नदी आणि तीच्या उपनद्यांच्या पाण्याचा वापर काही जलसिंचन प्रकल्प आणि बंधारे करून अनेक वाड्या वस्त्याचे,गाव खेड्यांचे, शहराचे आणि शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न सोडवले गेले आहेत. परंतु शहरांमधील सांड पाण्यामुळे गोदावरी मध्ये बऱ्याच प्रमाणात प्रदूषण दिसते.
गौतमी आणि वशिष्ठी गोदावरी मधील अंतर जवळपास 170 किलोमीटर आहे. म्हणजेच गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश आणि त्याची लांबी 170 किलोमीटर आहे. तसेच त्याच्या शेजारीच कृष्णा नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. म्हणून या भागाला कोनसीमा असे संबोधले जाते. तसेच येथील या त्रिभुज प्रदेशामुळे येथे सर्वात जास्त भाताची शेती होते. त्याचप्रमाणे गोदावरी नदीला उजवीकडून दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा आणि मन्याल तसेच डावीकडून कादबा, शिंगणा, खांब, दुधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती अशा अनेक छोट्या छोट्या उपनद्या येऊन मिळतात.
त्र्यंबकेश्वर मधील गोदावरीच्या उगम स्थानापासून ते त्रिवेणी संगमा पर्यंत नदीच्या दोन्ही बाजूने परिक्रमा पूर्ण केल्यास गोदावरी परिक्रमा पूर्ण होते. तसेच गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडावर कुंभमेळा भरतो. गोदावरी काठी असलेल्या त्र्यंबकेश्वर व पैठण ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे असून शिखांचे गुरु गोविंदसिंग यांचे नांदेड येथे गोदावरी काठी निधन झाले होते. तसेच आंध्र प्रदेशात त्रिवेणी संगमावर शिवालय आणि स्कंद नावाची प्राचीन मंदिरे आहेत.
त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशामध्ये गोदावरी काठी धर्मापुरी म्हणजे करीमनगर जिल्ह्यात सरस्वती मंदिर आहे. त्याचप्रमाणे पट्टी सीमा येथे वीरभद्र मंदिर, भद्राचलम येथे श्रीराम मंदिर असून आंध्रप्रदेश मध्ये दर बारा वर्षांनी गोदावरी नदीच्या काठी पुष्कर मेळा भरतो. या मेळ्याचे कुंभमेळ्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे. तसेच इंद्रायणीच्या काठी उगम स्थानापासून ते संगमा पर्यंत अनेक छोटे-मोठे प्रकल्प आणि ढवळेश्वर येथे फार जुना आणि आशिया खंडातील सर्वात लांब लोहमार्ग आहे.