भौगोलिक दृष्ट्या अनेक पर्वतांचा आणि शिखरांचा समूह असलेला येथील परिसर असून शिव पुरानामध्ये याचा उल्लेख रेवतीचल पर्वत असा आढळतो. तसेच स्कंद पुराणांमध्ये रैवत, कुमुद, उज्जयंत अशी गिरनार ची वेगवेगळी नावे आढळतात. ही नावे त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्म,विष्णू, महेश या संदर्भात आहेत. येथे गिर जंगल असून सध्या या पर्वताचे नाव गिरनार पर्वत ( Girnar Parvat ) असे प्रचलित आहे. प्रभू दत्तात्रेय यांनी आपल्या चिरंतन वास्तव्य आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे गिरनार पर्वत आहे अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे. गिरणार पर्वत हे दत्त भक्तामध्ये सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेले ठिकाण आहे.
सौराष्ट्र म्हणजेच गुजरात मध्ये स्थित असलेल्या या पर्वताला पौराणिक कथांमध्ये हिमालय पर्वत इतकेच महत्व आहे. गिरनार हा भारताच्या गुजरात राज्यातील सर्वात उंच पर्वत आहे. या पर्वताची उंची 3600 फूट असून 30 किलोमीटर अंतर पसरलेला आहे. या पर्वताचा विस्तार 16 गावांपर्यंत आहे. पर्वतावर जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या आहेत. गुजरात मधील जुनागड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हा पर्वत आहे . या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेय यांनी गोरक्षनाथ यांना अनुग्रह दिला असल्यामुळे हे स्थान दत्तभक्तामध्ये प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान आहे.
येथे सद्गुरु दत्तात्रेय यांच्या पादुका स्थापित असून आजही येथे नेहमी सद्गुरु दत्तात्रेय यांचा निवास असतो असा भक्तांचा विश्वास आहे. अनेक संत महात्म्यांना श्री गुरुदत्तात्रेय यांनी येथे साक्षात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. प्रभू राम आणि पाच पांडव यांचेही या पर्वतावर वास्तव्य होते असे पुराणांमध्ये पुरावे आढळतात. तसेच पुराणांमध्ये श्वेताचल, श्वेतगिरी असा उल्लेखही या गिरणार पर्वताचा केलेला आढळतो. कित्येक वर्षांपासून अनेक साधुसंतांनी आणि सिद्धयोगिनी येथील गुहांमध्ये कठोर तपचर्या आणि साधना केलेली आहे आणि प्रत्यक्ष गुरु दत्तात्रेयांचे दर्शन मिळवलेले आहे. त्यामुळे येथील भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न असून आजही कित्येक महात्मे या ठिकाणी तपश्चर्या करताना आढळतात. येथे महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते.
अनेक भाविक वेगवेगळ्या राज्यांमधून येथील महादेवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला येथे येतात. येथील मृगी कुंडात स्वयं महादेवांनी स्नान केलेले आहे. त्यामुळे या कुंडात स्नान करणे हे येथील मुख्य आकर्षण आहे. गिरनार पर्वतावरील गुरु शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत एक एक टप्पे पार करावे लागतात. त्यामध्ये सुरुवातीच्या पायरीला हनुमान दर्शन होते. पुढे गहिनीनाथ मंदिर,अंबाबाई टेकडी, गोरक्षनाथ टेकडी आणि शेवटी दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शन होते. श्री दत्तात्रय प्रभुंनी ज्या टेकडीवर वास केला होता त्या टेकडीलाच गिरणार पर्वत असे म्हटले जाते. दहा हजार पायऱ्या चढून जाणे हे शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी असले तरी एकदा तरी येथे जायलाच पाहिजे असे हे ठिकाण आहे .
भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या टेकड्यांचा म्हणजेच पर्वतांचा समूह असलेला असा हा परिसर आहे. पुराना मध्ये याचा श्वेताचल पर्वत, श्वेतगिरी पर्वत असा उल्लेख आढळतो. हा परिसर अत्यंत विलोभनीय, वन्य प्राणी, विविध औषधी वनस्पती युक्त आणि निसर्गरम्य आहे. ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेक योगी त्यांच्या स्थानावर येथे तपश्चर्याला बसलेले आढळतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला गिरणात तलेटी, बहुनाथ मंदिर, मृगी कुंड, हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने साधुसंत आणि लाखोच्या संख्येने भाविक येथे येत असतात. गिरनार पर्वतावर स्वयंभू म्हटल्या जाणाऱ्या दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त भक्ताची इच्छा असते.
सुमारे दहा हजार पायऱ्या चढून जाऊन हे स्थान लागते. जाताना वाटेत आजूबाजूला चहा, कॉफी, फराळ, खेळण्या,प्रसाद इत्यादी दुकाने लागतात.वाटेत सुरुवातीलाच एक कमान लागते. तसेच तेथे ज्या भाविकांना वर चढणे अशक्य वाटते त्यांच्यासाठी डोली वाले असतात. पायऱ्या चढत असताना सुमारे 200 पायऱ्या अंतर चढून गेल्यानंतर डावीकडे एक भैरवाची मूर्ती दिसते. दोन हजार पायऱ्या चढून गेल्यानंतर वेलनाथ बाबा असा फलक दिसतो. हेही एक भक्तांसाठी सिद्ध स्थान आहे. 2200 पायऱ्या चढून गेल्यानंतर राजा वृद्ध हरी आणि गोपीचंद यांची गुहा आहे. गुहेच्या आत मध्ये जाऊन दर्शन घेतल्या दोन सुंदर मूर्ती दिसून येतात.
थोड्या अंतरावर आत गेल्यानंतर माली पर्वत येतो तेथे रामाचे एक सुंदर मंदिर आहे. आणि त्या शेजारी थंडगार पिण्याचे पाणी असलेले कुंड आहे. पुढे काही अंतरावर वर चढवून गेल्यानंतर राखणदेवीची एक मूर्ती लागते. त्या दगडी मूर्तीवर दोन हाताच्या पंजाची निशाण आहे. तेथून पुढे गेल्यानंतर सुमारे साडेतीन हजार पायऱ्या पाशी प्रसूती देवीचे स्थान आहे. तेथून पुढे गेल्यानंतर दत्तकृपा,संतोषी माता,कालि माता,वर्डी माता,खोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला यात्रेकरूंना बसण्यासाठी जागाही आहे. साधारणता चार-पाच हजार पायऱ्या चढून गेल्यानंतर एक जैन मंदिर येते.
या ठिकाणी नेमिनाथाचे अतिशय सुंदर सुबक नेमीनाथाची मूर्ती बसवलेली आहे. नेमिनाथ हे 22 वे जैन तीर्थकार आहेत. थोडे पुढे गेल्यानंतर जैन दिगंबर मंदिरांचा समूह आहे.तेथे जवळच आदिनाथांची मूर्ती दिसते.ही सर्व मंदिरे प्राचीन कालीन असून सुंदर कलाकृतींनी नटलेली आहे. यानंतर पुढे गेल्यानंतर गोमुखी गंगा स्नान आढळून येते. येथे गायीच्या मुखातून गंगाचे पाणी येते.जवळच बटुक भैरव आणि गंगेश्वर महादेव मंदिर आहे . गोमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढताना पाच हजार पायऱ्यांवर अंबाजी मंदिर येते. या ठिकाणी देवी अंबाबाईचा सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे.
येथून पुढे पाचशे पायऱ्या चढल्यानंतर गुरु गोरक्षनाथ यांचे स्थान येते. गिरनार पर्वतावरील सर्वात उंच ठिकाणावर असलेले हे स्थान आहे. समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फूट उंचीवर हे स्थान आहे. नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी येथे फार काळ तपचर्या केलेली असून आजही त्यांचा येथे गुप्त रूपाने वावर आहे असा भक्तांचा विश्वास आहे. आणखी थोडे अंतर पुढे गेल्यानंतर दोन मोठ्या कमानी दिसतात. उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायऱ्या उतरल्यानंतर श्री कमंडलू स्थान आहे. आणि डाव्या बाजूच्या कमानीतून वर चढल्यानंतर दत्त मंदिर दिसते.
या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस आणि निसर्गाचा अनुभव काही वेगळाच असतो असा भक्तांचा अनुभव आहे. या स्थानावर बसून श्री दत्तप्रभूंनी बारा हजार वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि तेथूनच ते अंतर्धान झाले. असा समज सर्व दत्त भक्तामध्ये आहे. दहा बाय बारा अशा चौरस फूट जागेमध्ये दत्तप्रभूंच्या पादुका,एक सुबक मूर्ती आणि पुजाराला बसण्या एवढी जागा येथे उपलब्ध आहे. येथून पुढे जाण्यासाठी कुठलाही रस्ता नसल्याने आपण आलो त्याच वाटेने आपणास खाली उतरावे लागते.
येथील आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा,अग्नि आखाडा, आव्हान आखाडा निरंजन आखाडा असे काही पाहण्यासारखे आखाडे असून गुरु त्रैलोक्यनाथ बापूंचा प्रसिद्ध आश्रम आहे. येथे जाऊन अनेक भक्तगण श्रीशेरनाथ बापूंच्या दर्शनाचा लाभ घेतात. येथे गुरु शिष्य नाथ परंपरा अजूनही जपली जात असून अनेक वर्षापासून येथे मोफत अन्नदान केले जाते. येथील प्रसादाचा लाभ घेणे फार पुण्याचे मानले जाते. त्यामुळे येणारे सर्वच भाविक या आश्रमाला भेट देतात. येथून जवळच दोन-तीन किलोमीटर अंतरावर श्री काश्मिरी बापूंचा आश्रम आहे. काश्मिरी बापूंचे वय दीडशे वर्ष असून त्यांच्या तपचर्येने येथील भूमी पवित्र झालेली आहे.
गिरनार पर्वताला उजव्या बाजूने प्रदक्षिणा करण्याच्या पद्धतीलाच गिरनार परिक्रमा असे म्हणतात. फार पूर्वीपासून या परिक्रमेची प्रथा असून आजही अनेक जण येथे गिरणार परिक्रमा करतात. गिरनार पर्वताच्या आजूबाजूला मोठे जंगल असल्यामुळे येथे फक्त परिक्रमा काळातच पाच दिवस भक्तांना परिक्रमा करण्यास प्रवेश दिला जातो. हा परिक्रमा करण्याचा कालावधी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरा पोर्णिमा इथपर्यंत पाच दिवस असतो. परिक्रमा करत असताना बारा किलोमीटर अंतरावर जिना बाबा की मढी हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तसेच परिक्रमा करत असताना वाटेत अनेक श्रद्धास्थाने आहेत. गिरनार पर्वतावर येणारे सर्व भाविक येथील शक्य होईल तेवढ्या तीर्थक्षेत्रांचा आणि पर्यटन स्थळाचा अनुभव घेतात.