कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपुर तालुक्यात भीमा आणि अमरजा नदीच्या संगमाकाठी गाणगापूर ( Gangapur ) हे गाव आहे. श्री दत्तात्रय महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावाला दत्तधाम म्हणतात. तसेच या मंदिराचे नाव श्री दत्त निर्गुण असेही आहे.या ठिकाणी श्री गुरुदेव दत्तांचा दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते.म्हणून ते एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थ आहे. श्री दत्तात्रय महाराज हे आचार्य किंवा द्वापार युगाच्या आधीचे त्रेतार युगामध्ये होते. ब्रह्म, विष्णू आणि महेश यांनी गुरु अत्री आणि माता अनुसया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात श्री दत्तात्रेय दिल्याचे मानले जाते.
त्यांच्या जन्मावेळी त्यांना ब्रह्म विष्णू आणि महेश अशी तीन डोकी होती. परंतु अशा प्रकारे त्यांना समाजात टिकून राहणे कठीण होईल म्हणून ही तिन्ही डोकी एक झाली. तो अत्र्यांचा पुत्र असल्याने त्याला अत्रेय म्हणायचे आणि पुढे त्यांना या तिन्ही दैवी शक्तींचा अवतार असल्याने दत्तात्रेय म्हटले जाऊ लागले. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी 5:46 मिनिटांनी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.श्री दत्त महाराजांचे एकूण सोळा अवतार त्यातील दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती मानले जातात. परंतु ते गाणगापूर या ठिकाणी कधी आणि कसे आले याचीही एक आख्यायिका आहे.
1378 मध्ये वाशिम जिल्ह्यातील लाड करंजा या ठिकाणी दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधव तर आईचे नाव आंबाभवानी होते. त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव शाळीग्रामदेव आणि नरहरी असे ठेवले. लहानपणी हे बाळ ओम या शब्दाशिवाय काहीही बोलत नव्हते. परंतु आई-वडिलांचे त्याला दुःख समजत होते म्हणून त्याने खानाखुणा करून एकदा त्याच्या आई-वडिलांना सांगितले की माझी मुंज लावल्यानंतर मी बोलू शकेल.
नंतर त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी मुंज केल्यानंतर तो बोलू तर लागलाच परंतु त्याने वेदांचे पठणही सुरू केले. त्यानंतर 1386 साली ते घर सोडून काशीला गेले. त्यांना तिथे गुरू रूपाने श्रीकृष्ण सरस्वती भेटले आणि त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेऊन संन्यास घेतला. मग गुरु श्रीकृष्ण सरस्वती यांनी श्री नरहरी यांचे नाव नरसिंह सरस्वती असे ठेवले. पुढे त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आणि वयाच्या तिसाव्या वर्षी एकदा पालकांना भेटून आले. आणि नंतर त्यांनी इ. स.1422 ते 1434 मध्ये सांगली जिल्हाजवळील नरसिंह वाडी या ठिकाणी आपले वास्तव्य केले.
नंतर ते इ. स.1435मध्ये गाणगापूर येथे आले आणि त्यांच्या अवतार समाप्ती पर्यंत म्हणजे इ. स.1458 पर्यंत त्यांनी गाणगापूर येथे वास्तव्य केले त्यांनी आपल्या या दोन्ही वास्तव्याच्या ठिकाणी ग्राहस्थाश्रमींना नानाविध चमत्कार करून दाखवले. अतिशय शक्तिशाली आणि जागृत असलेल्या या गाणगापूरचे (Gangapur ) श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज मानले जातात. येथे त्यांच्या निर्गुण पादुका आहेत.
येथे हजारो दुःखी,कष्टी,व्याधीग्रस्त तसेच भूतबाधा झालेले अनेक भाविक समर्पित भावनेने जातात. आणि मनोभावे देवाला प्रार्थना करतात आणि त्यांच्या अडचणी आश्चर्यकारक दूरही होतात. अशी प्रचिती आत्तापर्यंत लाखो भावीकांना आलेली आहे त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांचे लोंढेच्या लोंढे या ठिकाणी जातात. या मंदिरात भक्तांना पहाटे 3:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत देवाचे दर्शन घेता येते. पहाटे तीन वाजता देवाची कपूर आरती होते. दुपारी साडेबारा वाजता महाराजांची आरती करून नैवेद्य दिला जातो. संध्याकाळी परत पालखी सोहळा आणि आरती होते.दुपारच्या आरतीनंतर भक्तांना येथे मोफत महाप्रसादाचा लाभ घेता येतो. असे म्हणतात की स्वामी कोणाच्याही रूपाने येऊन येथे अन्नदान करतात किंवा भोजन साहित्य देतात.
भीमा आणि अमरजा या नदीच्या संगमावर स्वामी स्नान करत असत. म्हणून या ठिकाणी स्नान केल्याने सर्व पापे धुऊन जातात व अपमृत्यु टळतो अशा भाविकांच्या भावना आहेत. एकदा या ठिकाणी सूर असूरांचे घनघोर युद्ध झाले आणि त्यामध्ये अनेक देव मृत्युमुखी पडले. त्यावेळी इंद्रदेव भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांच्याकडून एक अमृत कलश घेऊन आले व त्या अमृताचे सिंचन त्यांनी देवावर केले. त्या सिंचनाने सूरदेव पुन्हा जिवंत झाले होते. आणि त्यांनी पुन्हा नव्या दमाने असुरांशी लढाई करून जिंकले. मग तो अमृत कलश परत शंकर भगवानांकडे घेऊन जाताना या ठिकाणी त्या कलशातील अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातूनच या अमरजा नदीची उत्पत्ती झाली असे मानतात.आणि ह्याच अमरजा नदीत पंढरपूरहुन आलेली चंद्रभागा नदी संगम पावते.
तसेच पंढरपूरहुन आलेली चंद्रभागा नदी म्हणजे भीमा नदी ही उत्तर वाहिनी असल्याने ती गंगेपेक्षाही पवित्र असल्याचे मानले जाते.आणि म्हणूनच या संगमांमध्ये स्नान केल्याने प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते असे म्हणतात. या संगमाच्या तीरावर पवित्र आणि दिव्य असा औदुंबराचा वृक्ष आहे. या वृक्षात साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे असे म्हणतात. या वृक्षाखाली एक गणेशाची मूर्ती आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची स्थापना आहे. या ठिकाणी अनेक भक्तगण मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर उपासना करतात. आपापल्या परीने जप, नामस्मरण, गुरुचरित्राचे पोथी पारायण करतात.आणि मनोभावे देवाला आपल्या अडचणी सांगतात आणि कित्येकांच्या मनोकामना येथे पूर्णही होतात. म्हणून या वृक्षाला येथे कल्पवृक्ष असेही म्हणतात

गाणगापूर ( Gangapur ) या ठिकाणी स्वामींनी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या वहिनी म्हणजे रत्नाबाईला आणि एका नरहरी नावाच्या भाविकाला त्यांच्या व्याधींपासून मुक्त केले होते. तसेच माहूरवरून एक स्त्री आपल्या व्याधीग्रस्त पतीला घेऊन स्वामींकडे या ठिकाणी आली होती तेव्हा तिचा पती येथेच मृत्यू पावला होता. तेव्हा ती स्वामींच्या चरणावर डोके ठेवून रडू लागली. त्यावेळी स्वामींनी तिला सौभाग्यवती भव: असा आशीर्वाद दिला आणि रुद्र अभिषेकाचे मनी प्रेतावर शिंपडले होते. त्यावेळी तिचा पती लगेच उठून बसला होता. असे अनेक चमत्कार स्वामींनी केले आणि आजही तेथे अनेक भाविक अशा चमत्कारांची अनुभूती घेत आहेत.
या संगम तीर्थाजवळच षटकुळ तीर्थ, नरसिंह तीर्थ, भगीरथी तीर्थ, पापनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्र तीर्थ आणि मनमथ तीर्थ अशी आठ तीर्थे आहेत. या तीर्थांचेहीं भाविक दर्शन घेतात. तसेच या संगमांमध्ये सात वेळा डुबकि मारून तेथून पाणी घेऊन या तीर्थावरती जर आपण अभिषेक केला तर आपल्याला काशी, गया,आणि प्रयाग या ठिकाणी यात्रा केल्याचे फळ मिळते असे म्हणतात. तसेच या संगमावरच संगमेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय संगमात स्नान केल्याचे सार्थक होत नाही असे म्हणतात.
संगमापासून जवळच भस्माचा डोंगर आहे. याच ठिकाणी भगवान परशुरामांनी लोककल्याणासाठी अनेक यज्ञ केले असे म्हणतात आणि त्या यज्ञांतूनच भस्माचा हा भला मोठा डोंगर तयार झाल्याचे मानले जाते. येथील हा भस्म कपाळाला लावल्यास मागील 42 पिढ्यांचा उद्धार होतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे गाणगापूरला येणारे लाखो भाविक या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी जातात. लोकांनी कपाळी भस्म लावून येथील हा भस्माचा डोंगर अक्षरश:सपाट झाला आहे. तरीही भाविक येथील जागेमध्ये त्या भस्माचा अंश असावा म्हणून येथील मातीच प्रसाद म्हणून घेऊन जातात. येथील या यज्ञ भूमीवर भगवान परशुरामांचे एक मंदिरही आहे.
पुढे संगमाकडून निर्गुण मठाकडे परतताना रस्त्यात कल्लळेश्वर तथा शनेश्वराचे मंदिर आहे. आणि येथेच आपल्याला नवग्रहांचे आणि पंचमुखी गजाननाचे दर्शन घडते. तसेच याच रस्त्यावरील श्री नरसिंह सरस्वती कट्टा या ठिकाणी जाऊन आवर्जून दर्शन घ्यावे. या ठिकाणी स्वामी काही काळ विश्रांती घेत असत. आणि केवळ त्यांच्या सहवासाने येथील नापिक जमिनीवर डोलदार पीक आल्याचे सांगितले जाते. गाणगापूर मध्ये संगमाच्या जवळच भस्म्या डोंगराच्या सानिध्यात सर्व सुविधानयुक्त असे ओम दत्त चिले भक्त निवास आहे. हे भक्त निवास प्रशस्त जागेमध्ये तीन मजल्यांचे असून येथे 50 खोल्या भक्तांसाठी उपलब्ध आहेत. हे भक्त निवास भक्तांसाठी पुण्याच्या ओम दत्तराज चिले सेवा मंडळ यांच्यातर्फे उपलब्ध करून दिलेली एक सुविधा आहे.
प्रसन्न वातावरणात स्वच्छ रूम,स्वतंत्र बेड,आणि प्रत्येक रूमला स्वतंत्र संडास बाथरूम, पिण्यासाठी आरो फिल्टर पाणी, तसेच श्री गुरुचरित्र पारायणासाठी मंगलमय सभा मंडप, प्रवचन व कीर्तनासाठी मोठे हॉल, मुंज, बारशे आणि लग्न समारंभासाठी हॉल सुद्धा येथे उपलब्ध आहेत. पुणे शहराच्या आजूबाजूच्या सर्व भागांमधून गाणगापूरला जाणारे जवळजवळ सर्वच भाविक शक्यतो तुळजापूर अक्कलकोट, पंढरपूर आणि गाणगापूर अशा दर्शन घेतात. आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून येणारे भाविक त्यांच्या रस्त्यामधील काही तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांना भेटी देतात. पुणे शहराच्या आजूबाजूच्या भागांतून जाणारे भाविक पुणे सोलापूर महामार्गाने जाऊन अगोदर तुळजापूरला दर्शनासाठी जातात तुळजापूरला जाताना अगोदर एक घाट लागतो आणि तो घाट उतरताना एक मंदिर दिसते त्याला घाटशीळ मंदिर असेही म्हणतात. ते माता तुकाई देवीचे मंदिर आहे.
जेव्हा प्रभू रामचंद्र लंके कडे निघाले होते तेव्हा तुळजाभवानीने सीता मातेचे रूप घेऊन प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी तेथे एका शिळेवर उभी राहिली होती.त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी देवीला ओळखले आणि म्हणाले “तु का आई “ तेव्हापासून त्या शिळेला तूकाईदेवी नाव पडले. आणि त्या मंदिरात त्या शीळेची स्थापना ही केलेली आहे. येथे दर्शन घेतल्यानंतर भावीक तुळजापुरला जाऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतात आणि पुढे सोलापूर मार्गे अक्कलकोट ला जातात. आणि नंतर सुमारे 70 किलोमीटरवर असलेल्या गाणगापूरला प्रभु दत्तांच्या दर्शनासाठी जातात. तसेच काही भाविक जाताना किंवा मागे परतताना पंढरपूरचे ही दर्शन करतात.