गणेशोत्सव | Ganesh Festival

बुद्धीची देवता, संघटनेची देवता, सर्व गणांचा अधिपती, श्री गणेशाची ऋग्वेदातही स्तुती केलेली आहे. पुराण काळात या ब्रह्मणस्पती देवतेला गणपती असे रूप प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. अशा या सुखकर्ता व दुःखहर्ता देवतेचा म्हणजेच भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणजे गणेश चतुर्थी ही मराठी महिना भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला असतो असे मानतात.

या दिवसाला महासिद्धी विनायक चतुर्थी असेही म्हणतात. या चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला ( Ganesh Festival ) सुरुवात होते. ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. भगवान गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी नांदते असा हिंदू धर्मियांचा विश्वास आहे. गणेश उत्सवाच्या काळात मोदकाच्या नैवेद्यासह गणपतीला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या आवडीचे जास्वंदीचे फुल,शमी पत्री, आणि दुर्वा असे अर्पण करतात.

उंदीर हे गणपतीचे वाहन समजले जाते. गणेश चतुर्थीला म्हणजे गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मातीच्या मूर्तीची घराघरांमध्ये तसेच मंडळांच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीचे यथासांग पूजन करून सर्वजण मिळून आरती केली जाते. गणपतीचे अनेक भक्त या दिवशी उपवासाचे व्रतही करतात. तर काहीजण या काळामध्ये अथर्वशीर्ष स्रोताचे पठण करतात. तसेच अनेक जण गणेश गीता या ग्रंथाचे वाचन करतात.

ज्याच्या त्याच्या परीने या काळात महाराष्ट्रभर तसेच इतर राज्यांमध्येही गणेशाची यथा सांग पूजा केली जाते. त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ गणपतीच्या प्रतिष्ठापनेची आरती आणि पूजा चालूच असते. तसेच इतर काही देशांमध्येही भारतीय हा उत्सव साजरा करतात. पुराणानुसार दहा दिवसानंतर गणपतीला पाण्यात विसर्जन करण्याची सुद्धा एक कथा आहे. गणपतीला वेद व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी निवडले होते. कारण व्यासांच्या बोलण्याच्या गतीने लिहिणारे त्यांना कोणीतरी हवे होते.

अशावेळी व्यासजींनी हा प्रस्ताव गणपतीपुळे मांडला आणि गणेशजींनी तो स्वीकारला होता. त्याचवेळी सलग दहा दिवस वेद व्यासांनी महाभारताचे न थांबता वर्णन केले होते आणि गणपतींनी ते लिहिले होते. परंतु दहा दिवसांनी वेदव्यासांनी गणपतीकडे पाहिले असता गणेशाचे तापमान फार वाढले होते. त्यावेळी वेद व्यासांनी गणपतीला पाण्यात बुडवून थंड केले होते. याच गोष्टीचा संदर्भ घेऊन लोकमान्य टिळकांनी दहा दिवस गणपती उत्सवाची स्थापना करून दहा दिवसानंतर गणपती पाण्यात विसर्जन करण्याची प्रथा पाडली.

तसेच गणपती विसर्जनाच्या दिवसाला म्हणजेच अनंत चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान श्री विष्णू यांना समर्पित केला जातो. या दिवशी ध्रुताच्या खेळात ज्यावेळी सर्व राज्य सोडून जंगलामध्ये पांडव शिक्षा भोगत होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत करण्याचे सांगितले होते. म्हणून या दिवशी अनंतसूत्रबंध केला जातो. म्हणून या दिवशी अनंत देवाची पूजा केल्याने संकटापासून संरक्षण होते असे म्हणतात.

अनेक जण गणेशोत्सवाच्या काळात आपल्या घरामध्ये दीड दिवसांसाठी तर काहीजण पाच दिवसांसाठी, सात दिवसांसाठी तर काहीजण दहा दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि त्यानंतर गणपतीचे पाण्यामध्ये विसर्जन करतात. गणपतीच्या विसर्जनापूर्वी मूर्तीची उत्तर पूजा करण्यात येते. काही मंत्रोच्चार आणि आरती झाल्यानंतर मूर्तीवर आणि कलेश नारळावर अक्षदा वाहून मूर्ती थोडीशी हलवली जाते. त्यानंतरच गणपतीचे वाजत,गाजत, नाचत, गुलाल उधळत आणि घोषणा देत पाण्यामध्ये विसर्जन करतात.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल, ताशे, डीजे ची गाणी,लेझीम इ.च्या ताल धरून गणेशाचे विसर्जन नदी, तलाव, विहीर किंवा समुद्रात केले जाते.  भक्तगण ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देतात. आणि लाडक्या गणरायाला पाण्यात विसर्जित करून निरोप देतात.  असा हा गणेश उत्सव आपणास एकता व बंधुभावाची शिकवण देतो.

भारत देशामध्ये विशेष करून शहरी भागांमध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी 1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी समाजात एकी निर्माण करण्यासाठी या उत्सवाची सुरुवात पुण्यात विंचुरकर वाड्यातून केल्याचे सांगितले जाते. याचा उल्लेख त्यांच्या केसरी नावाच्या वृत्तपत्रातून आला होता आणि त्यावर्षी पुण्यामध्ये एकूण शंभर गणपतीची स्थापना करण्यात आली होती असे सांगतात. तर काहींच्या मते भाऊसाहेब रंगारी म्हणजेच भाऊसाहेब लक्ष्मण जावळे नावाच्या एका व्यवसायाने वैद्य असलेल्या व्यक्तीने 1892 मध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली.

याचा उल्लेख महाराष्ट्र शासन प्रकाशित स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश मध्ये आढळतो. पुण्यातील जंगली महाराजांशी चांगले संबंध असलेल्या हया जावळे  कुटुंबीयांचा शालूंना रंग देण्याचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे त्यांना रंगारी असे नाव पडले होते. त्यांनी 1892 मध्ये राक्षसावर स्वार असणारी गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली होती असे सांगितले जाते. त्यामुळे या उत्सवा दरम्यान अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करून देखाव्या मधून आणि अनेक विविध कार्यक्रमांमध्ये गणेश उत्सवाच्या व्यासपीठाचा उपयोग करून टिळकांनी देश जागृतीचा प्रयत्न केला होता.

गणेश उत्सवाचा शुभारंभ हा साधारणपणे १० ते ११ दिवस चालतो.  सार्वजनिक गणेश मंडळे या उत्सवाला गणपती स्थापने समोर खूप सुंदर आणि आकर्षक असे देखावे तयार करतात. त्यामुळे या उत्सवा- दरम्यान सर्वत्र भूमय वातावरण पहावयास  मिळत असते.  विशेष करून शहरी भागामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.गणेश उत्सवाला नेत्रदीपक आरास केली जाते.सर्वांना सकाळ व संध्याकाळी आरतीचा लाभ मिळतो. या उत्सवा दरम्यान पारंपारिक पोषण परिधान केले जातात.

जास्त करून आरतीनंतर गणरायास प्रिय असणाऱ्या मोदकाचा नैवेद्य देवाला दाखवतात आणि उपस्थितांना प्रसाद म्हणून दिला जातो.गणेश उत्सवाची सुरुवात गणेश- चतुर्थी ज्या दिवशी होते.  या दिवशी सार्वजनिक ठिकाणी गणेशाची स्थापना केली जाते.  गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सण आहे आणि हळू हळू संपूर्ण भारतभर लोकप्रिय होत आहे. लोकार्थ भाद्रपद पक्षातील शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणजे भगवान गणेशाचा वाढदिवस म्हणून सर्वत्र मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो.

उत्सवप्रिय असलेल्या या भारत देशामध्ये गणेश उत्सवाच्या दरम्यान गणपती स्थापनेच्या डेकोरेशन साठी लागणारे साहित्य, मुर्त्या, आरस साहित्य, मिठाई, कपडे, पारंपारिक पोशाख आणि आपली हौस भागवण्यासाठी लागणारे सर्वच इत्यादी साहित्याच्या खरेदी विक्रीमुळे सर्वाधिक आर्थिक उलाढाल या काळामध्ये होते. तसेच या काळामध्ये अनेक दुकानदार आणि ऑनलाइन खरेदी विक्रीमध्ये विशेष सूट देण्याच्या ऑफर सुटतात. अशा या स्पर्धेमध्ये ग्राहकांचाही खूप फायदा होतो.

तसेच भारत देशामध्ये पाय रोवून बसलेल्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या अनेक परदेशी कंपन्यांना याचा खूप मोठा फायदा होतो. या दरम्यान शेअर बाजारामध्ये सर्वोच्च उच्चांक झालेला आढळतो.विशेष करून या उत्सवा दरम्यान मुंबई आणि पुणे शहरांमध्ये फार मोठी आर्थिक ऊलाढाल होते. तसेच मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात दान केले जाते. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी विक्री या काळामध्ये फार वाढलेली असते. भारत देशामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे आणि या सणाला तरुणांचे जास्त प्रोत्साहन असल्यामुळे अख्खा देश या काळात रम्यमय झालेला असतो.

1 thought on “ गणेशोत्सव | Ganesh Festival”

Leave a Comment