गंध, बुका, टिळा | Gandh Buka Tila

मानवाच्या बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा गंधा ( Gandh Buka Tila ) द्वारे केली जाते. देवपूजा करताना साधकाने आपल्या कपाळी गंध लावावे. गंध म्हणजे केवळ कपाळाची शोभा नसून ती आपल्या बुद्धीची पूजा समजली जाते. ईश्वर हे साध्य तर बुद्धी हे साधन असल्याने बुद्धीची पूजा करणे आवश्यक समजले जाते. नित्य गंध लावणारा मरणोत्तर वैकुंठलोकी जातो असे धर्मशास्त्र सांगते. गंध लावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आपल्या शरीरात सात प्रमुख ऊर्जा केंद्र असतात जी आपल्या शरीराच्या

अपारशक्तीचे भांडार आहेत. त्यांना “चक्र” असे म्हणतात. कपाळाच्या मध्ये जेथे आपण टिळा लावतो तेथे आज्ञाचक्र असते. या ठिकाणी शरीराच्या प्रमुख तीन नाड्या इडा, पिंगला, सु्षुग्ना येऊन मिळतात.या स्थानाला संगम किंवा त्रिवेणी असेही म्हणतात. आपल्या चैतन्याचे हे मुख्य स्थान आहे. येथूनच आपल्या पूर्ण शरीराचे संचलन होते. तसेच याला मनाचे घर असेही म्हणतात.

त्यामुळे हे स्थान संपूर्ण शरीरात जास्त पूजनीय आहे. ध्यान करते वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते. आपला देह ईश्वराचे मंदिर आहे. ईश्वरी तत्व विशेषता मर्मस्थानात प्रतीतीस येते.भ्रूकूटीचे मध्य स्थानी आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वराचा वास असतो. म्हणूनच स्नान झाल्यानंतर कपाळाच्या मध्यभागी असणाऱ्या परमेश्वर मूर्तीस टिळा लावला म्हणजे ही एक छोटी पूजा ठरते. मांगल्याचे प्रतीक आणि वारकऱ्यांचा खरा दागिना म्हणजे वैष्णव टिळक म्हणजेच गोपीचंद गंध. तुळशीची माळ, सदाचार आणि नम्रता याबरोबरच भारताच्या

कानाकोपऱ्यात असलेल्या वैष्णव भक्ताची सुरुवात ही गंध लावून म्हणजे टिळा लावून होते. बऱ्याच विठ्ठल भक्तांना प्रश्न पडला होता की पांडुरंगाच्या कपाळावर असलेल्या गंधाचे रहस्य काय असावे. अनेकांना वाटते कि,हे भगवान शिव शंकरांचे प्रतीक तर नाही ना? परंतु भगवान शिव शंकराला तुळस चालत नाही. त्यामुळे हा तर्क तेथे चालत नाही. परंतु याबद्दल जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात. तसं पाहिले तर तुकाराम महाराजांचा हे सांगण्याचा अधिकारही आहे आणि पांडुरंगा बद्दलचे रहस्य त्यांना उलगडलेलेही होते. कारण स्वतः पांडुरंग तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला येत होते. संत तुकाराम महाराज म्हणतात-

सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटी।
नागर नाग खोपा, केशर कस्तुरी मळवटी वो।
विशाल व्यंकट नेत्र वैजयंती,तळपें कंठी वो ।
कांस पितांबराची,चंदन साजे उटी वो।।१।

हा पुरावा संत तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. असे अनेक पुरावे ग्रंथात आढळतात. भगवान श्री विष्णू यांनी श्रीकृष्ण स्वरूपात आपले मोठे भाऊ बलराम यांना शेषनागाच्या स्वरूपात मस्तकावर गंध स्वरूपात धारण केले होते.भगवान विष्णूंच्या पांडुरंग अवतारा मध्ये भगवंताच्या हातामध्ये कमळ, शंख आणि काठी असायची परंतु रुक्मिणी देवीला शोधण्यासाठी व आपला आवडता भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पांडुरंग पंढरपूरला आले होते त्यावेळी त्यांच्याजवळ असे काहीही नव्हते. त्याचवेळी शेषनाग देवांना

म्हणाले, ” देवा ” क्षीरसागरामध्ये आपण माझ्या शैयेवरती उभे होता. रामावतार मध्ये,कृष्ण अवतारामध्ये असे सगळीकडे तुम्ही मला घेऊन जाता. परंतु पांडुरंगा तुम्ही या अवतारामध्ये मला कुठेच जागा दिली नाही. असे म्हटल्यामुळे पांडुरंगाने त्यांना आपल्या कपाळावर जागा दिली. त्यामुळेच चंदन, कुंकू, बुक्का आणि तुळस यांच्या एकत्रित मिश्रणामुळे टिळ्याचे पावित्र्य आणि आकार अधिक उठून दिसतो. भगवान श्री विष्णूंच्या सोबत गरुड आणि शेष नागांना महत्त्व आहे. त्यामुळे शेषनागाने त्रेतायुगामध्ये श्रीरामांचे

लहान भाऊ लक्ष्मण बनवून भगवान श्री विष्णूंची सेवा आणि सुरक्षा केली आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम या रूपामध्ये त्यांची सेवा आणि संरक्षण केले.पंढरपूरला भगवान श्री विष्णू कृष्ण अवतारामध्ये आले आणि आपल्या भक्तांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेले. त्यावेळी ते निशस्त्र होते. त्यांनी त्यांचे हात कटेवर ठेवले आहेत. अशा अवस्थेमध्ये त्यांची सुरक्षा आणि संरक्षणाची काळजी त्यांच्या मोठ्या भावाने म्हणजे बलरामने घेतली होती. त्यामुळे बलरामाचे चिन्ह म्हणजे प्रतिकृती विठ्ठलाच्या

मस्तकी टिळ्याच्या स्वरूपात धारण केलेली आहे. असे हे विठ्ठलाच्या गंधाचे रहस्य आहे. अर्थात मोठा भाऊ आपल्याला लहान भावाचे संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी श्री हरीच्या कपाळावर आहेत. त्यामुळे सर्व वैष्णव भक्त पांडुरंगाचा गंध कपाळी लावतात. जो पांडुरंगाच्या कपाळी असणारा गंध आपल्या मस्तकी लावतो त्याची जीवनभर सुरक्षा पांडुरंग करतात. वीस पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आपण जर पाहिला तर आपल्या घरातील जवळजवळ सर्वच माणसे कपाळी अष्टगंध लावायचे किंवा अनेक जण ज्या देवाची श्रद्धा

आपल्या मनात आहे त्या देवाचा गंध आपल्या कपाळी लावतात. आजही वारकरी संप्रदायातील लोकांसह अनेक जण आपल्या कपाळी गंध, टिळा, बुका लावतात. भारत देशामध्ये टिळा किंवा गंध कपाळी लावण्यामागे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक कारणे आहेत. कोणत्यातरी देवावर अपार श्रद्धा असल्यामुळे लोक कपाळी टिळा लावतात. टिळा लावल्यामुळे मन एकाग्र व शांत राहून एकूणच आरोग्य चांगले राहते. टिळा लावल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढून शांती व समाधानाचा अनुभव येतो.

टिळा लावल्यामुळे माणसांमध्ये सकारात्मक विचार आणि ऊर्जा तयार होते. तसेच टिळा लावल्यामुळे माणसाला मन शांती मिळून त्या व्यक्तीचे सात्विक भाव स्पष्टपणे दिसतात. कपाळावर टिळा किंवा गंध लावण्याचा अनेक पद्धती आहेत. भस्म, भंडारा किंवा हळद, शेंदूर, गोपीचंदन कुमकुम, माती, चंदन शेणाची किंवा अगरबत्ती ची राख म्हणजेच आयुर्वेदिक भस्म अशा अनेक प्रकारचे टिळे भक्तगण आपल्या कपाळी लावतात. त्याबरोबरच अष्टगंधाचा टिळा जास्तीत जास्त भक्त आपल्या कपाळी लावतात.

अनेक जण कपाळावर लावला जाणारा हा गंध गळ्याला, नाभीवर, कानाच्या पाळीला, पाठीला तसेच हृदयावरही लावतात. टिळा लावताना नेहमी मधल्या बोटाने लावावा. मधल्या बोटाचा संबंध हृदयाशी असल्यामुळे हृदयाची स्पंदने बोटातून प्रवाहित होतात.
टिळा लावण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आहेत. श्रीकृष्णाचे उपासक उभा गंध लावतात तर शिव उपासक आडवे गंध लावतात. मोक्षप्राप्तीसाठी टिळा अंगठ्याने लावतात. शत्रुनाशासाठी तर्जनीने टिळा लावतात. धनप्राप्तीसाठी मध्यमेने टिळा लावतात.

शांतीप्राप्तीसाठी अनामिकेने टिळा लावतात. तसेच पित्राला टिळा लावताना अंगठ्याशेजारील बोटाने लावतात.पूजा करताना गंध किंवा टिळा लावण्याची पद्धत तर आहेच परंतु प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गंध लावूनच होते. अशाप्रकारे हिंदू धर्मशास्त्रात टिळयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Leave a Comment