दिवाळी | Diwali

हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षांपासून सण उत्सवांना फार महत्त्व आहे. त्यामध्ये काही सण देशभर साजरे केले जातात. त्यापैकी दिवाळी (Diwali ) हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीला संस्कृतमध्ये “दीपावली”असेही संबोधले जाते. “दीपावली” Deepawali या शब्दाचा अर्थ “दीप” म्हणजे “दिवा” आणि आवली म्हणजे माळ किंवा ओळ. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ ( Festival of Lights ). हेमचंद्राने आणि वात्स्यायनाच्या कामसूत्रात दीपावलीचे मूळ नाव, “यक्षरात्री”असे सांगितले आहे. तर नीलमत पुराण या ग्रंथात दीपावलीला “दीपमाला”असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे दीपावलीचा ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात “दिवाळी” तर भविष्यत्तर पुराणात “दीपमाला” असा उल्लेख आहे. आणि काल्विवेक ग्रंथात दीपावलीला ‘सुखरात्री”म्हटले आहे तर व्रतप्रकाश ग्रंथात दिवाळीचा उल्लेख “सुखसुप्तिका” असा केला आहे.

 पुराव्यानुसार  दिवाळी सण 3000 वर्षांपासून साजरा केला जातो.आणि तो साजरा करण्या पाठीमागे काहीतरी कारणही आहे. त्याची कथा काही ग्रंथांमध्ये आपणास पाहावयास मिळते. ती कथा अशी आहे की, या पृथ्वीतलावर  एक रक्तबीज नावाचा राक्षस होता. या रक्तबीज नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची थोर तपचर्या केली होती. या राक्षसाने अन्न पाणी न घेता घनदाट अरण्यात अनेक वर्ष ब्रह्मदेवाची तपचर्या केली. मग ब्रह्मदेवाकडून त्याला वर प्राप्त झाला की तुला कोणीही मारू शकणार नाही. तसेच तुला जर कोणी मारले तर जमिनीवर पडलेल्या तुझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून राक्षस जन्म घेईल.

असे वरदान त्याला ब्रह्मदेवांकडून मिळाले होते . त्याला मिळालेल्या या वरदानामुळे त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. त्यामुळे तो इतका उन्मत राक्षस झाला की ऋषी,मुनी, साधू संत या सर्वांना तो भयंकर त्रास देऊ लागला. एवढेच नव्हे तर त्याने देवांवरती ही चाल करण्यास सुरुवात केली. परंतु त्याला कोणीही मारू शकत नव्हते. त्याला घाबरून सगळे देव इकडे तिकडे धावू लागले.नंतर तो आपले सर्व सैन्य घेऊन कैलास पर्वतावर आला. त्यावेळी तेथे पार्वती माता होत्या. त्यावेळी पार्वती मातेकडे बघून तो मोहित झाला. आणि पार्वती मातेच्या अंगावर धावून गेला.

त्यामुळे पार्वती मातेचा राग अनावर झाला आणि पार्वती मातेने सांगितले की, हे रक्त वीर राक्षसा तू दूर हो नाहीतर जळून खाक होशील. परंतु तो ऐकण्यास तयार नव्हता. त्याला वरदान असल्यामुळे तो वाईट वागत होता. त्याला त्याच्या ताकतीचा अहंकार झाला होता. अशातच देवीने रागाने प्रभू शिवशंकरांचा त्रिशूल उचलून त्याच्याकडे फेकला. त्रिशूल त्याला लागताच त्याच्या अंगातून रक्तस्त्राव झाला. परंतु त्याला मिळलेल्या  वरदानामुळे त्याच्या पृथ्वीवर पडलेल्या रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस तयार झाले. आणि हे सर्व राक्षस आता पार्वती मातेबरोबर युद्धासाठी तयार झाले. अशा परिस्थितीत राक्षस न मेल्यामुळे पार्वती मातेचा राग अनावर झाला.

त्यावेळी पार्वती मातेने रागाने महाकालीचे गंभीर रुद्र रूप धारण केले. तिच्या गळ्यामध्ये मुंडक्यांची माळ आणि सर्व हातामध्ये तिने शस्त्र धारण केले. पार्वती मातेचे हे रूप इतके भयंकर होते की पृथ्वी आणि पाताळ हलेल अशी अवस्था निर्माण झाली होती. देवीचे हे रूप पाहून रक्तबीज नावाचा हा राक्षस पळायला लागला. त्यावेळी देवीने त्याचा पाठलाग करून त्याला मारण्यास सुरुवात केली. शेवटी देवीने त्याच्याकडे त्रिशूल फेकून मारला आणि त्याचे मुंडके उडवले. तसेच त्याचे रक्त  खापराच्या भांड्याने पृथ्वीवर पडून दिले नाही. त्यामुळे त्याच्या रक्तापासून दुसरे राक्षस तयार झाले नाहीत. आणि रक्तबीज राक्षसाचा नाश झाला.

तसेच राहिलेले राक्षस देवीने स्वतः गिळून टाकले. अशा प्रकारे देवीच्या महाप्रलय रूपातून रक्तबीज राक्षसाचा नाश झाला. त्यावेळी देवीच्या या रौद्ररूपातून  अख्खी पृथ्वी अस्वस्थ झाली होती. सगळीकडे घबराहट निर्माण झाली होती. अशावेळी सर्व देव मिळून भगवान शिवशंकरांकडे गेले आणि हा सर्व प्रकार भगवान शंकरांना सांगितला. मग भगवान शिव शंकरांनाही प्रश्न पडला की देवीच्या या महाकाली रूपाला शांत कसे करायचे.मग भगवान महादेव देवी च्या समोर जमिनीवर झोपले महाकाली त्यांच्याकडे नाचतच आली आणि देवीचा पाय महादेवांच्या शरीराला लागला.

त्याचवेळी देवीला ज्ञात झाले की हे आपले पती साक्षात शिवशंकर आहेत. त्यावेळी देवी शांत झाली. महाकाली देवीने रक्तबीज नावाच्या राक्षसाला मारलेला दिवस होता नरक चतुर्थीचा आणि याच दिवसापासून दिवाळीचा सण साजरा केला जातो. एवढेच नव्हे तर अजून एका गोष्टीचा दिवाळी सणाला संदर्भ घेतला जातो. सत्याने केलेला असत्याचा पराभव म्हणजेच प्रभू रामचंद्राने रावणाला मारले आणि सीतेला घेऊन हनुमानजी, राम, लक्ष्मण, आणि सीता हे सगळे अयोध्येला आले होते आणि तो दिवसही होता नरक चतुर्थीचा म्हणजे दिवाळीचा. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले होते त्यावेळी अयोध्येमध्ये घरोघरी दिवे लावण्यात आले होते तसेच घरोघरी त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी नरक चतुर्थीला संपूर्ण भारत देशामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दिवाळी किंवा दीपावली हा सन मुख्य हिंदू सण असून तो इतर धर्मीय सुद्धा काहीसा वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. मराठीतील अश्विन आणि कार्तिक महिन्यात तर इंग्रजीतील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या मध्यंतरी तिथीप्रमाणे हा सण येतो. साधारणपणे पाच ते सहा दिवस साजरा केला जाणारा हा सण वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम , देवदर्शन आणि आपल्या जन्म गावी जाऊन किंवा आपल्या नातेवाईकात मिसळून साजरा केला जातो.

दिवाळी सणाला देशभर घरोघरी, मंदिरांमध्ये, दुकाने,कार्यक्षेत्रे अशा सर्वच ठिकाणी दिवे, मेणबत्त्या आणि कंदील लावले जातात. तसेच उत्सवाच्या प्रत्येक दिवशी तेल आणि सुगंधी उटण्याने लोक आंघोळ करतात व नवीन कपडे परिधान करतात. तसेच दररोज घरोघरी फटाके वाजवले जातात. महिला मंडळी सकाळी दररोज घरासमोर रांगोळी काढतात. आणि घरोघरी रोज गोड मेजवानीचा बेत केला जातो व सगळेच बराच काळ टिकणाऱ्या मिठाई तयार करतात.या काळात गाव खेड्यांमध्ये शेतीच्या कामातून लोक विसावा घेतात तर शहरांमध्ये नोकरदारांना आणि उद्योग व्यवसायातील कर्मचाऱ्यांना सुट्ट्या दिल्या जातात.

 त्याचप्रमाणे कुटुंब तसेच सामुदायिकरित्या वार्षिक एकत्र येण्यासाठी दिवाळीची वेळ प्रमुख असते. शहरी भागात अनेक ठिकाणी संगीत आणि नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेक लोक सणासुदीच्या काळात एकमेकांना ग्रीटिंग कार्ड,गिफ्ट आणि मिठाई भेट पाठवतात. एवढेच नव्हे तर दिवाळीच्या सणाला आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. विशेष करून हिंदू, जैन आणि शीख धर्मीय लोकांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा केला जातो. तसेच अनेक देशांमध्येही दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजन या दिवशी अधिकृत शासकीय सुट्टी असते

वसू बारस  – दिवाळीची सुरुवात वसू बारस या दिवसापासून सुरू होते. आश्विन महिन्यात वद्य द्वादशीचा हा दिवस असतो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी सकाळी घरासमोर रांगोळी काढून संध्याकाळी घरासमोर दिवे लावले जातात. आणि गाई वासराची पूजा केली जाते. समुद्रमंथनावेळी पाच गाई उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नावाच्या गाईला उद्देशून हे व्रत केले जाते.घरातील सर्वांना चांगले आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न व्हावे यासाठी सगळे प्रार्थना करतात तर काही स्त्रिया या दिवशी उपवासाचे व्रत करतात आणि बाजरीची भाकरी आणि गवार शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.

धनत्रयोदशी – हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. हा दिवस आश्विन महिन्यातील तेरावा दिवस असतो. या दिवशी वैद्य धन्वंतरी या देवाचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी धन्वंतरी च्या फोटोची पूजा करून देवाकडे आरोग्य मागितले जाते. घराघरात तसेच दुकानांमध्ये आणि आपापल्या उद्योगधंद्यामध्ये धन्वंतरी ची पूजा केली जाते. आणि या दिवसापासून काही व्यवसायिक आपल्या धंद्याचा हिशोब नवीन वह्यांमध्ये लिहिण्यास सुरुवात करतात. या दिवशी देवासमोर दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून दिवा लावतात आणि दिव्याचे दर्शन घेतात. असे केल्याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. या दिवशी इंद्राने आसुरांबरोबर समुद्रमंथन करताना लक्ष्मी देवी प्रगट झाली होती. त्याचवेळी धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. अशा अजूनही काही दंतकथा या दिवसाविषयी आहेत.

नरक चतुर्दशी – तसेच कॅलेंडर प्रमाणे आश्विन महिन्यात कृष्ण पक्षात 14 वा दिवस नरक चतुर्दशी चा येतो. दिपवाळीच्या पाच दिवसात हा दुसरा दिवस येतो. पुराणानुसार या दिवशी श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली यांनी नरकासुराचा वध केला होता. म्हणून हा दिवस असत्यावर सत्याचा विजयदिन म्हणून साजरा करतात . या दिवशी दिवे दान करण्याची प्रथा आहे.

लक्ष्मीपूजन – हिंदू संस्कृतीत अत्यंत विश्वसनीय मानली जाणारी ही पूजा आश्विन महिन्यातील अमावस्येला दरवर्षी संध्याकाळी केली जाते. दिवाळीमध्ये या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी माता रात्री सर्वत्र संचार करते आणि तिच्या निवासाची जागा शोधते असा समज आहे. म्हणून या दिवशी घरातील अलक्ष्मी केर कचरा घालून टाकणाऱ्या नव्या लक्ष्मीची म्हणजे केरसुनीची आणि पाटावर अक्षदांनी स्वास्तिक काढून त्यावर लक्ष्मी मातेच्या फोटोची किंवा मूर्तीची देवासमोर पूजा करतात.

त्याबरोबरच साक्षात लक्ष्मी म्हणजे सोने,नाणे आणि पैशांची पूजा केली जाते व देवीला लवंग वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या पेढ्याचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य देतात. तसेच साळीच्या लाह्या, बत्तासे, धने,गूळ इत्यादी लक्ष्मी मातेला अर्पण करतात. आणि फटाके वाजून आनंद साजरा करतात. या दिवशी विष्णू देवांनी आपली पत्नी लक्ष्मी मातेसह सर्व देवांना बळीच्या शिक्षेतून मुक्त केल्याचे एका  दंतकथेत सांगितले जाते.

बलिप्रतिपदा ( दीपावली पाडवा )– दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी येणारा कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा दिवस दिवाळीचा पाडव्याचा दिवस असतो. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी श्री विष्णूंनी बळीराजा असुर असताना सुद्धा देवाला शरण गेल्यामुळे त्याचा उद्धार केला. कारण बळीराजा फार उदार राजा होता.

त्यामुळे “इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे “अशी म्हण पडली.तसेच या दिवशी उज्जैनचा राजा विक्रमादित्याने शकांचे आक्रमण हाणून पाडले. शकांचा पाडाव केल्यामुळे या दिवसाला पाडवा असे नाव पडले. तसेच हा दिवस अशा अनेक कारणांमुळे शुभ दिवस मानला जातो.म्हणून अनेक लोक या दिवशी मोठ्या खरेदी करणे, आपल्या घराची, दुकानाची, व्यवसायाची, मशिनरींची, गाड्यांची  तसेच मालमत्तेची पूजा करणे अशी अनेक प्रकारची शुभ कामे करतात.

भाऊबीज – दिवाळीतला हा सहावा दिवस कार्तिक शुद्ध द्वितीयेला म्हणजेच यमद्वितीया  या दिवशी असतो.या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या घरी जाते. किंवा बहिणीला घेऊन भाऊ आपल्या घरी येतो आणि तिला गोडधोड जेवण केले जाते तसेच बहिणीही आपल्या भावासाठी काहीतरी गोड पदार्थ घेऊन येत असते. या दिवशी संध्याकाळी आकाशातील चंद्रकोरीचे पूजन केल्यानंतर बहीण आपल्या भावाला ओवाळतेआणि भाऊ आपल्या बहिणीच्या ओवाळणी ताटात त्याच्या परीने ओवाळणी टाकत असतो.

तसेच बहिणीला आणि तिच्या लेकरांना भाऊ नवीन कपडे खरेदी करतो. बहिणी आपल्या भावाकडे या दिवसापासून तीन-चार दिवस मुक्कामी येतात आणि आपल्या माहेरी आनंदात राहतात. त्यानंतर त्यांच्या घरी परत जातात. यम आणि यमी या भाऊ बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो. त्याबद्दलची एक दंत कथाही सांगण्यात येते.आपल्या भावाला निरोगी आणि उदंड आयुष्य मिळण्यासाठी प्रत्येक बहिण आपला भावाला ओवाळत असते. या दिवशी पत्नीच्या हातचे जेवण करू नये असेही धर्मग्रंथात आढळते.

तसेच जवळचा किंवा दूरचाही भाऊ नसेल तर चांदोबाला बहीण ओवाळन्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी यमुना नदीत अंघोळ करणे पवित्र मानले जाते. यम जेव्हा मृत्यू पावला त्यावेळी यमीचे रडणे थांबत नव्हते शेवटी दिवस संपला आणि रात्र झाली आहे हे दाखवण्यासाठी देवाने त्यावेळी अंधार तयार केला त्यामुळे यमीचे दुःख कमी झाले. असे त्याविषयीच्या एका दंतकथेत सांगितले जाते.म्हणून या दिवशी यम राजाला प्रार्थना करून आपल्या भावाचे आयुष्य चांगले होण्यासाठी त्याला ओवाळायची प्रथा पडली.

1 thought on “  दिवाळी | Diwali”

Leave a Comment