वणीची सप्तशृंगी माता पुण्याच्या चतुर्श्रुंगी गडावर म्हणजे चार शिखरे असलेल्या पर्वतावर विराजमान आहे. वणीची सप्तशृंगी माता एका भक्तासाठी सप्तशृंगी गडावरून पुण्यामध्ये आल्याची कहाणी सांगितली जाते. पुण्यात काहीजण या देवीला अंबादेवी तर काहीजण अमरेश्वरी देवी असेही म्हणतात. ही कथा फार रहस्यमय आहे. या वणीच्या सप्तशृंगी मातेला पुण्यामध्ये चतुर्श्रुंगी देवी (Chatushringi Devi ) नाव का पडले याची सुद्धा एक कहाणी आहे.
पुण्यातील सेनापती बापट रोडवर पुण्याच्या वायव्य दिशेला चतुर्श्रुंगी मातेचे जागृत देवस्थान आहे. येथे नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. देवीला चतुर्श्रुंगी असे नाव कसे पडले याची एक सुंदर कथा आहे. हे सर्व तीनशे वर्षांपूर्वी घडले असल्याचे सांगितले जाते.पेशव्यांच्या काळामध्ये एक सावकार होते. त्यांचे नाव दुर्लभ शेठ असे होते. त्यांच्याकडे अमाप संपत्ती आणि ऐश्वर्य होते. त्यावेळी पेशव्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोहिमा चालत असत. त्या मोहिमांसाठी लागणारा खर्च दुर्लभ सावकार देत होते.
दुर्लभ शेठ यांची स्वतःची एक टाकसाळ होती. टाकसाळ म्हणजे नाणी तयार करण्याची मशीन. त्याकाळी नाणी तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. तेव्हा त्यांनी चतुर्श्रुंगी रुपयाचे नाणे तयार केले होते. हे दुर्लभ सेट सुरुवातीपासून सप्तशृंगी मातेचे परम भक्त होते.दर महिन्याला ते सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी वणीला जायचे. पुण्यापासून 284 किलोमीटर अंतरावर असलेल्या वणीच्या सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन तेथे सेवा करून आदिमाया शक्तीच्या पायाशी नतमस्तक होऊन दुर्लभ शेठ यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मातेच्या सेवेमध्ये घालवले होते. दिवसा मागून दिवस गेले आणि आता दुर्लभ सेठचे वय झाले होते.
त्यामुळे दुर्लक्ष शेठला वनीला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणे अशक्य वाटू लागत होते. शेवटी त्यांनी एकदा वनीला शेवटचे जायचे ठरवले. मग असाच एक मुहूर्त साधून ते वनीला देवीच्या दर्शनासाठी गेले. आई सप्तशृंगी मातेच्या पायाशी नतमस्तक होऊन आईची पूजा केली, खना नारळाने आईची ओटी भरली. पूजा चालू असताना दुर्लभ शेठच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवीला म्हणू लागले की, हे माते आदिमाया शक्ती मी संपूर्ण आयुष्य तुझ्या भक्तीमध्ये घालवले परंतु आता मला तुझ्याकडे येणे शक्य नाही. मला माझे शरीर आता साथ देत नाही मी फार वृद्ध झालो आहे. परंतु तुझ्या दर्शनाशिवाय मी माझे राहिलेले आयुष्य जगू शकत नाही.
असे देवीला बोलून देवीला दुर्लभ शेठ यांनी शेवटचा नमस्कार केला आणि पुण्याच्या रस्त्याला लागले. पुण्यात आल्यानंतर त्यांच्या त्याच रात्रीच्या झोपेत आदिमाया शक्ती सप्तशृंगी माता आली. मातेने दुर्लभ शेठला स्वप्नात सांगितले की तुला आता वनीला माझ्या दर्शनासाठी येण्याची गरज नाही. मी स्वतः तुझ्यासाठी पुण्यामध्ये येईल. तुझ्या जवळच असलेल्या पुण्याच्या वायव्य दिशेला असलेल्या डोंगरावर मी आलेली आहे. त्या ठिकाणी तू उत्खनन कर. त्या ठिकाणी तांदळा स्वरूप माझा मुखवटा तुला सापडेल.
दुर्लभ शेठ सकाळी लवकर उठून देवीने साक्षात स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार त्या डोंगरावर गेले. आत्ताच्या ठिकाणी चतुर्श्रुंगी मातेचे मंदिर आहे त्याच ठिकाणी चतुर्श्रुंगी मातेची मूर्ती असलेल्या ठिकाणी त्यांनी खोदले होते. तेव्हा त्या ठिकाणी त्यांना देवीचा तांदळा स्वरूप मुखवटा सापडला होता. मग त्याच ठिकाणी मंदिर उभारणी करण्यात आली.आजही आपण चतुर्श्रुंगी मातेच्या दर्शनाला गेले असता लक्षपूर्वक मातेकडे पाहिले असता देवीची मूर्ती आपणास वनीच्या सप्तशृंगी मातेप्रमाणे दिसते. जशी सप्तशृंगी मातेची मान वाकडी आहे तशी चतुर्श्रुंगी मातेचीही मान वाकडी आहे. अशा प्रकारे आपल्या भक्तासाठी वणीची सप्तशृंगी माता सप्तशृंगी गडावरून पुण्याच्या चतुर्श्रुंगी येथे आली असल्याची कथा सांगितली जाते.
देव आणि भक्त यांचे अतूट असे नाते यातून आपणास दिसते. पुढे लोक वर्गणीतून या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. अजूनही त्या ठिकाणी दिवसेंदिवस बांधकामामध्ये प्रगती केलेली आढळून येते.ज्या दिवशी माता चतुर्श्रुंगी गडावर प्रकट झाली तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा आणि ते वर्ष होते 1762 सालचे. जवळजवळ अडीचशे तीनशे वर्षांपूर्वी वनीची सप्तशृंगी माता येथे प्रकट झाली होती. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे वणीच्या सप्तशृंगी गडाला सात शिखरे आहेत. त्याचप्रमाणे चतुर्श्रुंगी मातेचे मंदिर आकाशातून पाहिले असता चार डोंगरांच्या मध्यभागी आहे. हे मंदिर मातेच्या दर्शनासाठी पहाटे साडे सहालाच उघडले जाते.
मंदिरात जाण्यासाठी टेकडीवरील जवळजवळ 170 पायऱ्या चढून जावे लागते. मंदीर परिसरात दुर्गा देवीसह गणेश मंदिरात अष्टविनायकाच्या आठ लघु मुर्ती आहेत.नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीचे भक्तांसाठी फार महत्त्व आहे. नवरात्र काळामध्ये मंदिराला आणि मंदिर परिसरामध्ये फार मोठी सजावट केली जाते. भक्तांची अमाप गर्दी येथे पाहण्यास मिळते. अनेक भक्त देवीला साडी चोळी आणि खना नारळाने ओटी भरून मातेच्या पायाशी नतमस्तक होतात. चतुर्श्रुंगी देवीच्या मंदिर परिसरातील पार्वती नंदन गणपती मंदिरामध्ये बसून श्री चाफेकर बंधूंनी त्याकाळी रँड चा कट रचला होता.
त्या ठिकाणी बसून त्यांनी देवीची आणि गणपतीची आराधना करून कटात यश मिळण्यासाठी आशीर्वाद मिळवला होता.त्यामुळे त्यांना रॅडच्या कटात यश मिळाले होते असा विश्वास चाफेकर बंधूंनी व्यक्त केला होता. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी रँडच्या कटावर लेखही लिहिला होता.अशी चतुर्श्रुंगी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. नवरात्र काळात देवीच्या मस्तकावर दीड किलो सोन्याचा मुकुट चढवला जातो. अनेक वस्त्रालंकराने देवी नटलेली असते. सप्तशृंगी देवीची दोन नवरात्र उत्सव असतात. चैत्र आणि अश्विन महिन्यामध्ये नवरात्रीत चतुर्श्रुंगी मातेच्या दर्शनासाठी जास्त भाविक येत असतात.
देवीच्या मंदिरात प्रवेश करताच चांदीच्या कमानी दिसतात. गाभाऱ्याला दोन, सभा मंडपात दोन अशा एकूण सहा महरुपी कमानी जवळजवळ 500 किलो चांदीच्या येथे बनवलेल्या आहेत. या मंदिरात गेल्यानंतर अक्षरश: डोळ्याचे पारणे फिटते. अनेक भक्त वनीच्या सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाता आले नाही तर पुण्याच्या चतुर्श्रुंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी जातात. पुण्यामध्ये ज्याप्रमाणे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव सुद्धा ठीक ठिकाणी साजरा केला जातो परंतु पुण्याची कुलदेवता समजली जाणारी देवी आदिमाया शक्ती देवी चतुर्श्रुंगी चा उत्सव फार मोठा साजरा होतो.
येथील सर्व कार्यक्रमाची आणि मंदिराची देखभाल चतुर्श्रुंगी देवस्थान ट्रस्ट कडे सोपवण्यात आलेली आहे. पुण्यातील भक्तांना हे ठिकाण जवळ असल्यामुळे अनेक भक्त नित्य नियमाने देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे डोंगरावर स्थानापन्न असलेल्या देवीचा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे अनेक भक्त सुट्टीचा दिवस चतुर्श्रुंगी देवीच्या सहवासात घालवतात.