भक्त पुंडलिक | Bhakta Pundalik

पंढरपूर हे भीमा नदीच्या अर्थात चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आठ प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मांदियाळी असते. या तीर्थक्षेत्राच्या विशेष महात्म्यामुळे याला दक्षिण काशी असे संबोधले जाते आणि विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या विठ्ठलाला अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असे म्हणतात.

महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटक मधील हरिदास हे सारख्याच भक्तिभावाने येथे येत असतात. यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो. आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच बाहेरील राज्यातून वारकरी पायी दिंडीत येतात.स्कंद पुराणातील श्री विठ्ठल स्तवराज मध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचे विश्वव्यापकतेच वर्णन केले आहे त्यात भक्तवत्सल पांडुरंगाची आणि त्याचा भक्त पुंडलिक ( Bhakta Pundalik ) याची कथा सांगितली जाते.

लोहतंड नावाच्या एका खेडेगावात जालू देव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत सज्जन आणि सदाचारी होता. जेवढा धार्मिक होता तेवढाच सात्विक होता. मात्र त्याचा पुत्र पुंडलिक या सर्व गोष्टींना अपवाद होता. तो आई-वडिलांचा ऐकत नसे. थोरा मोठ्यांना मान देत नसे. मन मानेल तसे वागत असे. तसेच वाईट मुलांच्या संगतीत राहत असायचा. असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी असा विचार केला की त्याचे जर लग्न केले तर बायकोच्या दबावाखाली त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन होईल. परंतु त्याचे लग्न लावून दिल्यानंतर सगळे उलटेच झाले. पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला होता,

पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कोणाचीच आणि कशाचीच परवा वाटत नव्हती. तो आई-वडिलांचा फार राग करू लागला होता.एके दिवशी पुंडलिकाने आपल्या नशिबाला दोष देत या सर्व दुःखापासून मुक्ती कशी मिळावी या चिंतेत विचार करत बसलेल्या पुंडलिकाला घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ ऐकू आला. काय चाललं आहे हे पाहण्यासाठी पुंडलिकाचे आई वडील घराबाहेर आले. पाहतात तर काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय गावात मुक्कामासाठी आला होता. त्या समुदायांमध्ये म्हातारी

माणसे तसेच तरुणही होते. तरुण मुलं आपापल्या म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा करत होते. पुंडलिकाच्या आई-वडिलांना त्यांचा हेवा वाटला. परंतु आपल्या नशिबी असे सुख नाही अशा विचाराने ते दुःखी झाले. त्यानंतर मुकाट्याने ते घरात आले. पुंडलिकाला यात्रेची आणि यात्रेकरूची माहिती मिळाली होती. काशीयात्रा केल्यावर पुण्य लाभते. सगळी पापे धुतली जावून मुक्ती लाभते.असे सगळ्यांच्या चर्चेतून त्याला माहीत झाले. मग तो त्या यात्रेकरूना जाऊन भेटला. काशी यात्रेबद्दल त्यांच्या कडून त्याने माहिती घेतली.

त्यांच्यात सामील झाल्यानंतर त्यांच्यातील सर्व चर्चेमुळे पुंडलिकालाही काशी यात्रेसाठी जावेसे वाटले. तसेच त्याची बायकोही यात्रेला जाण्यासाठी तयार झाली. त्याच्या आई-वडिलांनाही खूप आनंद झाला. धूर्त आणि लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी आई-वडिलांसह काशी यात्रेला जाण्याचे ठरवले. सर्वजण काशीला निघाले. त्याकाळी यात्रा प्रवास पायी करावा लागत असे. वृद्ध माणसे प्रवासात थकत असायचे. चालत असताना पुंडलकाची तरुण बायको सुद्धा फार थकली. तेव्हा पुंडलिकाला आपल्या तरुण बायकोला आपल्या खांद्यावर घेतले आणि आई-वडिलांच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या आणि त्यांना तो ओढत ओढत चालू लागला.

परंतु पुढे मात्र त्याच्याबरोबरच्या लोकांची आणि पुंडलिकाची चुकामुक झाली. पुंडलिक रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या कुकुर स्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. जेव्हा पुंडलिकाच्या लक्षात आले आपण रस्ता चुकलो आहे तेव्हा त्याने कुकुर स्वामींना विचारले काशी कडे जाण्याचा रस्ता कोणता आहे. स्वामी त्याला म्हणाले मला काशीचा मार्ग माहित नाही मी तिथे कधीही गेलेलो नाही. पुंडलिकाने स्वामींची थट्टा करत म्हटले की तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीने तर काशीला जायलाच हवे.

स्वामी शांत मनाने पुंडलिकाला म्हटले की आजची रात्र इथेच मुक्काम करा. उद्या सकाळी गावात काशीच्या रस्त्याची चौकशी करू. पुंडलिकाने त्याची पत्नी आणि आई-वडिलां सोबत आश्रमातच मुक्काम करण्याचे ठरवले. झोपेत असताना पुंडलिकाला रात्रीच्या वेळी कसल्याशा आवाजाने जाग आली. तो बाहेर येऊन पाहू लागला तर आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या. कुतुहुलापोटी पुंडलिक त्यांच्या जवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला. तेव्हा त्यातील एकीने सांगितले की मी गंगा, हि यमुना आणि ती सरस्वती. आम्ही तिघी कुकुर स्वामींच्या आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत.

त्यांचे उत्तर ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुकुर स्वामींनी साधी काशीयात्रा सुद्धा केली नाही आणि अशा व्यक्तीच्या आश्रमासाठी या महान नद्या स्वच्छता करण्यासाठी आल्या आहेत. पुंडलिकाने आपली शंका त्यांच्याजवळ बोलून दाखवली. त्यावर त्या तीन महिलांनी पुंडलिकाला सांगितले की, धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीती रीवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते. पुढे त्यांनी सांगितले की कुकुर स्वामींनी मन लावून आपल्या आई-वडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केलेले आहे.

अशाप्रकारे कुकुर स्वामींनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पूण्य जमा केले आहे आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणलं आहे . नद्यांचे हे बोलणे ऐकून पुंडलिक भानावर आला. आई-वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत ओढत आपण त्यांना इथपर्यंत आणलं हे दृश्य त्याच्या डोळ्यात तरळलं. आपल्या उन्मत स्वभावामुळे आपण त्यांचे काय काय हाल केले ते आठवून त्याला दुःखाने रडू कोसळले. आपल्या जन्मदात्यांशी आपण कसे वागलो आणि आता आपण पुण्य कमावण्यासाठी काशीला

निघालो आहोत या विचाराने त्याला स्वतःचाच खूप राग आला. आपण दृष्ट आहोत, पापी आहोत असं वाटून तो स्वतःला दोष देऊन रडू लागला. तीनही नद्यांनी त्याच सांत्वन केलं आणि माता पित्याची मनोभावे सेवा करून सुखी हो असा आशीर्वाद देऊन त्या अदृश्य झाल्या. डोळे पुसत भानावर आलेल्या पुंडलिकाने लागलीच आपल्या मातापित्यांकडे धाव घेतली. त्यांचे पाय धरून तो वारंवार त्यांची क्षमा मागू लागला. पुंडलकाचे वृद्ध माता पिता त्याच्यातील हे परिवर्तन पाहून भांबावून गेले. दुसऱ्या दिवशी सर्वांनी उठून कुकर स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ते काशी कडे निघाले. आता माता पित्यांसाठी पुंडलिकाने प्रवासात बैलगाडीची व्यवस्था केली होती.

पुंडलिकामध्ये आता बदल झाला होता. राक्षस वृत्तीतून त्याच्यामध्ये देवत्व आले होते. तेव्हापासून पुंडलिक निश्चिम मातृपितृभक्त बनला होता. त्याने आपल्या मातापित्यांना काशी यात्रा घडवली होती, त्यानंतर पंढरपुरास आणले. आता नित्यनेमाने पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न राहत असे. वृद्ध माता पित्यांची सेवा ही त्याच्यासाठी भगवंत भक्ती बनली होती. भगवान श्री विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीने प्रसन्न झाले होते. त्याच्या सेवावृत्तीची आणि भक्ती भावाची परीक्षा घ्यावी तसेच त्याला आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करावे या विचाराने भगवंत पंढरीत आले होते. थेट येऊन पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आल्यानंतर भगवंत म्हणाले

“हे पुंडलिका मी आलो आहे इकडे ये. मला घरात घे मी तुझ्या निश्चिम भक्तीने प्रसन्न झालो आहे “. पुंडलिक खरोखरच आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यात गुंग झाला होता. साक्षात परब्रम्ह पांडुरंग पुंडलिकाची वाट बघत दारात उभे होते. तरीही त्याच्या स्वागताला पुंडलिक उठला नाही. त्याने सुहास्य वदनाने भगवंताला जागेवरूनच विनम्र अभिवादन केले. सेवेचे व्रत्तही मोडता येईना आणि भगवंताच्या गृहस्थ स्वागताचा धर्मही पाळता येईना. अशी अवस्था पुंडलिका पुढे झाली होती. पुंडलिका पुढे मोठे धर्म संकट उभे राहिले. तेव्हा त्याला जवळच पडलेली एक वीट दिसली. ती त्याने दाराबाहेर फेकली आणि ही सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या

विटेवर उभा राहण्याची विनंती केली. पांडुरंग पुंडलिकाच्या सेवेप्रती असलेल्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले. थोड्याच वेळात आपल्या मातापित्यांना गाढ झोप लागली आहे हे पाहून त्यांना वंदन करून पुंडलिक पांडुरंगाजवळ गेला. पांडुरंगाला मनोभावे वंदन करून दारात तिष्ठत ठेवल्याबद्दल क्षमा मागितली. त्यावर पांडुरंग त्याला म्हणाले पुंडलिका तू खरा भक्त आहेस. तुझ्या या परम समर्पित भावनेने आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी परीक्षा घेण्यासाठीच इथे आलो होतो आणि तु त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे तुला पाहिजे तो तू मला वर माग. त्यावर पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले.


तो अतिशय भक्ती युक्त अंतकरणाने म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको. मला फक्त तू हवा आहेस. आत्ता जसा तू उभा आहेस तसा सतत तुझ्या भक्तासाठी इथे उभा राहा आणि त्यांना तुझे परम पवित्र दर्शन सतत घडू दे. त्यावर पांडुरंग तथास्तु म्हणाले. तेव्हापासून परब्रम्ह पांडुरंग कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहून 28 युगं भक्तांना दर्शन देत आहेत. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागला आहे. त्याचे पाय समचरण आहेत. सर्वांकडे पांडुरंग समतुल्य दृष्टीने पाहतात. त्याच्या चरणी जो लीन होतो तोही समत्वदृष्टी प्राप्त करतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृ-पितृ भक्ती.

पंढरपूर मध्ये बारा महिने महाराष्ट्रातील आणि लगतच्या राज्यातील असंख्य संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणी संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात.आषाढी एकादशीचा उत्सव सर्वात मोठा असतो.परब्रम्ह पांडुरंग दर्शन आणि भक्त पुंडलिक मातृपितृ भक्ती हा आदर्श येथे येणाऱ्या भक्तांच्या मनात नेहमीच घर करून राहतो.

1975 मध्ये भक्त पुंडलिक हा पाहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, त्यानंतरही या विषयावर गुलशन कुमार, सुमित म्युझिक यांनी चित्रपट तयार केले आहेत. Youtube वर आपल्याला हे चित्रपट पहायला मिळतील.

Leave a Comment