आधुनिक काळातील माऊली महावैष्णव,वारकरी संप्रदायातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान,भागवत धर्माचा वैश्विक राजदूत,अहंम ब्रम्हांशी, पंचमहाभूतांवर वर्चस्व मिळवलेले तसेच वाणीभूषण आणि महाराष्ट्रातील प्रख्यात जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर ( Baba Maharaj Satarkar ) यांनी वयाच्या 89 व्या वर्षी म्हणजेच 26 ऑक्टोबर 2024 ला आपला देह ईश्वरचरणी ठेवला. त्यांनी स्वतः उभारलेल्या नेरूळ मधील मुंबईच्या विठ्ठल रुक्माई मंदिरात त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
त्यावेळी लाखो भक्तांनी दुःखद अंतकरणाने त्यांना निरोप दिला होता. संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन अर्पण केलेल्या बाबा महाराज सातारकरांचे संपूर्ण नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. बाबा महाराजांचा जन्म 7 फेब्रुवारी 1936 मध्ये सातारा येथे वडील ज्ञानेश्वर आणि आई लक्ष्मीबाई यांच्या घराण्यात झाला होता. त्यांचे वडील उत्कृष्ट मृदुंग वादक होते तर आई लक्ष्मीला संत वाड्मयाची अत्यंत आवड होती. बाबा महाराज सातारकर यांच्या घराण्यात मागील तीन पिढ्यांपासून संत परंपरेचा आणि कीर्तनाचा वारसा जोपासला जात आहे. इयत्ता दहावी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या बाबा महाराजांनी पुढे वकिलीची पदवी संपादन केलेली होती. इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आणि मराठी वर फार प्रेम होते.
सहज सोप्या भाषेत आणि आपल्या गोड वाणीत संतांचे विचार मांडून रोजच्या आयुष्यातील दृष्टांत दिल्यामुळे त्यांची कीर्तने महाराष्ट्रात फार गाजली. त्याचप्रमाणे इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका अशा अनेक देशांमध्ये विदेश भूमीवर सुद्धा त्यांची अनेक कीर्तने झाली. त्यांच्या कीर्तनामध्ये मधे मधे येणारा विठ्ठल नामजप भाविकांना अगदी मंत्रमुग्ध करत असायचा. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी आपल्या सुरेल वाणीतून समाज प्रबोधन करण्यास सुरुवात केली होती. पुढे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी मुंबई आकाशवाणीवर काम करण्यास सुरुवात केली. दादा महाराज व आप्पा महाराज यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर होता. तेजस्वी चेहऱ्याच्या बाबा महाराजांचा नेहमीच पांढरा शुभ्र पोशाख आणि फेटा असायचा. त्यांना कीर्तनाच्या व्यासपीठावर पहाणे हा एक मोठा सोहळाच असायचा.
त्यांच्या प्रत्येक कीर्तनात तुळशीचे आणि तुळशी माळेचे महत्त्व सांगताना ते कधीच विसरत नव्हते.अध्यात्मिक मार्गावर त्यांनी जीवनाचे मार्गक्रमण सुरू केले होते. बाबा महाराजांचे आजोबा म्हणजेच दादा महाराज यांनी या फडाची सुरुवात केली होती.वारकरी सांप्रदायातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या त्यांच्या या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. दादा महाराजांच्या निधनानंतर त्यांचे दुसरे पुत्र आप्पा महाराज सातारकर यांनी या फडाची धुरा सांभाळली होती.
इ.स. 1962 मध्ये आप्पा महाराजांचे निधन झाल्यानंतर आप्पा महाराजांचे पुतणे अर्थातच बाबा महाराज सातारकर यांच्या खांद्यावर पडली व ती त्यांनी जबाबदारीने सांभाळली. 26 मार्च 1954 ला बाबा महाराज यांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांची विणकरी व पांडुरंग जाधव यांची नात दुर्गा जाधव यांच्याशी झाला व दुर्गा सकल सौभाग्य रुक्मिणी बनल्या. पुढे बाबा महाराजांना तीन अपत्य झाली. इ.स. 1958 ला भगवती, इ.स. 1962 ला रासेश्वरी, व इ. स.1963 ला चैतन्य याचा जन्म झाला. त्यांचा हा एक भाग्यशाली संसार विश्व कल्याण अवतीर्ण झाला. पुढे मात्र एकुलता एक असलेला त्यांचा चैतन्य हा मुलगा आकस्मिकरित्या मरण पावला. बाबा महाराजांचे कीर्तन चालू असताना, कीर्तनातच त्यांच्या मुलाचे निधन झाले तरी त्यांनी कीर्तन चालूच ठेवले होते.
त्यांची ज्येष्ठ कन्या ह.भ.प. भगवती महाराज हीने त्यांची ही परंपरा पुढे चालवली. पुढे ह.भ.प.चैतन्य महाराज हे भगवती महाराजांचे जेष्ठ पुत्र यांनी बाबा महाराजांचे वार्धक्य आणि आजारी काळात आई भगवती सोबत साथ दिली. लग्न अगोदर बाबा महाराजांनी इ.स. 1950 ते इस 1954 या काळामध्ये लाकूड कारागिरी म्हणजे फर्निचरचा व्यवसाय केला. सुमारे दीडशे वर्ष परमार्थात असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे 80 वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या बरोबरच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची मानकरी परंपरा आहे. महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यात त्यांनी प्रवचने आणि कीर्तने केली. 1974 साली प. पू.दादा महाराज सातारकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी मुंबई,आळंदी,पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले. 1980 ते 1999 या कालावधी त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रवचने केली.
1998 ते 2001 या कालावधीत अमृतानुभव या विषयावर त्यांनी प्रवचने केली. तसेच 1987 पासून दरवर्षी संत महात्म्यांच्या समाधी स्थानावर आणि कर्मभूमी वर किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू, नेवासे, त्रंबकेश्वर,पैठण, पंढरपूर,पिंपळनेर इत्यादी ठिकाणी त्यांची कीर्तने गाजू लागली. बाबा महाराज सातारकरांनी त्यांच्या जीवन कार्यास सुमारे 15 लाख लोकांना तुळशी माळा घालून वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली. तसेच त्यांनी दीक्षा दिलेल्या अनेक लोकांना व्यसनमुक्त केले. बाबा महाराजांनी सन 1983 साली जनसेवेसाठी श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्थेची स्थापना केली.
या संस्थेमार्फत 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य औषधे आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात. 1986 मध्ये लंडन येथे हिंदीतून बाबा महाराजांची चार प्रवचने झाली. तसेच अमेरिकेमध्ये 14 विविध ठिकाणी त्यांची ज्ञानेश्वरीची प्रवचने झाली. त्यामुळे संपूर्ण जगाला बाबा महाराज हे नाव माहीत झाले. त्याचबरोबर कैवल्याचा पुतळा,ज्ञानाची दिवाळी, तुका झालासी कळस , अनाथांचा नाथ, देवाचिया द्वारी अशा विविध प्रवचन मालिका त्यांच्या दूरदर्शन वरून प्रसारित झाल्या. त्यांच्या एकूण 57 ध्वनिफिती प्रसिद्ध आहेत.
ऐश्वर्यवती,ज्ञानेश्वरी, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत, श्री सांप्रदायि दादा महाराज भजन मालिका अशा अनेक ग्रंथसंपदा बाबा महाराज सातारकर यांच्या प्रसिद्ध आहेत. तसेच एक विक्रमी कॅसेट विक्री त्यांच्या कीर्तनाच्या कॅसेटची झाली. त्यामुळे त्यांचा राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिमम डिस्क देऊन सारेगमप कॅसेटच्या वतीने गौरव करण्यात आला. महाराष्ट्रामधील बाबा महाराज सातारकर हे पहिले कीर्तनकार आहेत की ज्यांची विक्रमी कॅसेट विक्री झाली आणि त्यांचा एवढा मोठा गौरव करण्यात आला.
बाबा महाराजांनी अध्यात्मिक कार्यात देह झिजवून केलेल्या समाज प्रबोधनामुळे आणि त्यांच्या कर्तव्यामुळे त्यांना अनेक गौरव पुरस्कार देण्यात आले. जसे की देवेश्वर संस्थान सारसबाग पुणे पुरस्कार तसेच पुणे विद्यापीठता पुरस्कार, नामदेव अध्ययन पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि अध्यात्मिक पुरस्कार, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन तर्फे तत्कालीन कुलगुरू श्री श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार झाला.
याशिवाय सातारा भूषण, फलटण भूषण तसेच महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी बाबा महाराज सातारकरांना पुरस्कृत करण्यात आले. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि समाजसेवा यांचा सुंदर समन्वय बाबा महाराज सातारकर यांनी आपल्या कर्तुत्वाने साध्य केला आहे. मुंबई येथे नेरूळ या भागामध्ये नेरूळ जिमखाण्याच्या अगदी समोर बाबा महाराजांनी विस्तीर्ण असे भव्य दिव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर संगमरवरी दगडामध्ये उभारलेले आहे. अलीकडच्या काळामध्ये बाबा महाराज साताराकरांची कीर्तने याच मंदिरात व्हायची. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचा देह याच ठिकाणी ठेवण्यात आला होता.
बाबा महाराज सातारकरांचे कर्तुत्व, वकृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व तसेच अख्या महाराष्ट्राला भावनारा त्यांचा भक्तीस्वर अख्या महाराष्ट्रात अजूनही भावतो. अशा या नादब्रह्म वाणीभूषण महान विभूतीस कोटी कोटी प्रणाम