आत्मारामगिरी महाराज | Atmaramgiri Maharaj

ओम चैतन्य आत्माराम गिरी ( Atmaramgiri Maharaj ) स्वामी महाराज यांचा जन्म वडील श्री तुकाराम गाडीलकर व आई हौसाबाई तुकाराम गाडीलकर यांच्या घरात रा. हंगेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे झाला. परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे आई-वडील मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये काम धंद्यासाठी गेले होते. त्यांच्या कामाच्या ठिकाणी श्री रामचंद्र पांडुरंग शेळके हे ग्रहस्थ मूळचे मांदळीचे इंदोर मध्ये रेशनिंग वाटपामध्ये लेखनिक म्हणून काम करत होते.

आत्माराम गिरी महाराजांचे वडील श्री तुकाराम गाडीलकर इंदोर मध्ये गाठी गोदामात हमालीचे काम करत होते. त्यांना एकदा रेशनिंग कार्डची गरज लागली असता ते रेशनिंग मिल मधील मुकादम श्री गणपत गायकवाड मूळचे मांडवगणचे यांनी श्री शेळके यांची भेट घेण्यास सांगितली. भेटीनंतर ओळखीमुळे श्री गाडीलकर यांना रेशन कार्ड मिळाले. तेंव्हापासून गाडीलकर व शेळके यांची मैत्री झाली. या दोघांनाही भजनाचा खूप छंद असल्याने त्यांचे त्यानिमित्ताने जवळचे संबंध तयार झाले. या दोघांचे गुरु इंदोर मधील आयोध्या निवासी गंगाशरण महाराज हे होते. एकच गुरु असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी जास्त होऊ लागल्या होत्या.

त्यांचे गुरु गंगाशरण महाराज यांचे भजन कीर्तनाचे कार्यक्रम इंदोर मध्ये त्या काळी नेहमी होत असायचे . पुढे कैकाडी महाराजांचे शिष्य पुंडलिक महाराज म्हणजेच परीट बाबा यांचे मांदळी येथे जाहीर कीर्तन झाले होते. त्यावेळी मांदळीच्या लालगीर स्वामी महाराजांच्या मठामध्ये मठाधिपती शंकरगिरी महाराज होते. पुंडलिक महाराजांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर शंकर गिरी बाबांनी सांगितले की मी आता वयोवृद्ध झालो आहे. श्री लालगीर स्वामींच्या सेवेसाठी एक दत्तक मुलगा पहा. पुढे पाच-सहा महिन्यांनी पुंडलिक महाराज ज्यावेळी बद्रीनारायण यात्रेला चालले होते तेव्हा त्यांचा एक मुक्काम इंदोर मधील भेंडीखाव या ठिकाणी झाला.

तसेच मुक्कामाच्या ठिकाणी त्यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. कीर्तन दरम्यान महाराजांनी उल्लेख केला की श्री क्षेत्र मांदळी येथे श्री लालगीर स्वामींची संजीवन समाधी आहे. तेथे सेवेसाठी बालब्रह्मचारी मुलाची आवश्यकता आहे. तरी आपणापैकी कोणी आपला लहान मुलगा दत्तक म्हणून मांदळीच्या स्वामींच्या सेवेसाठी देऊ शकत असेल तर जाहीर करावे. कीर्तनाच्या ठिकाणी आत्माराम बाबांचे वडील श्री तुकाराम गाडिलकर हे गृहस्थ होते. त्यांनी याबाबत मनामध्ये भरपूर विचार केला. आत्माराम बाबांच्या वडिलांना याअगोदरही इंदूरमधील शीलानाथ महाराजांच्या ध्वनी मंदिरामध्ये आत्माराम बाबांना दत्तक देण्याविषयी विचार केलेला होता.

परंतु आजच्या कीर्तनातील महाराजांच्या सांगण्यावरून तसेच मी महाराष्ट्रीयन आहे या स्वाभिमानामुळे त्यांच्या मनात परिवर्तन होऊन इंदोर मध्ये माझा मुलगा दत्तक देण्याऐवजी श्री क्षेत्र मांदळी येथेच आपण स्वामींच्या सेवेसाठी आत्मारामला दत्तक देऊ असे त्यांना वाटले. श्री तुकाराम गाडीलकर यांनी मांदळीचे श्री भयाजी शिंदे व श्री रामचंद्र शेळके यांच्याकडून सर्व माहिती जमा करून आत्मारामला मांदळी देवस्थान साठी दत्तक द्यायचे ठाम केले.

त्यानंतर श्री शेळके यांचे बरोबर श्री गाडीलकर व आत्माराम हे बालक मांदळीला आले. त्यावेळी या मठात लालगीर स्वामींच्या सेवेसाठी शंकरगिरी महाराज व मोतीगिरी गोसावी महाराज हे मठाधिपती होते. त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार आणि तुकाराम गाडीलकर यांच्या सहमतीनुसार या चिमुकल्या तेजस्वी मुलाला शंकरगिरी महाराजांनी पाहताच होकाराचे उत्तर दिले. होकार मिळाल्यानंतर आत्माराम बाबांच्या वडिलांनी इंदूर येथे जाऊन आपल्या मीलमधील नोकरीचा त्याग करून आपला संसार प्रपंच घेऊन पुन्हा मांदळी येथे आले. पुढे तीन-चार महिन्यांनी तहसील कार्यालय कर्जत येथे या चिमुकल्या बालकाला म्हणजे आत्मारामला दत्तक दिले. हे कायदेशीर दत्तक पत्र करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्या आत्मारामाचे वय अवघे चार-पाच वर्षाचे होते.

दत्तक पत्रक झाल्यानंतर शंकरगिरींनी कान फुंकून त्यांना दीक्षा दिली तसेच सर्व विधी मार्ग केले. त्यावेळी मांदळी मध्ये मोठा कार्यक्रम झाला. दीक्षाविधीच्या कार्यक्रमाला गावातील लोकांना भोजन देऊन आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर या बालकाला शंकरगिरी महाराजांनी लालगीर स्वामी समाधीची सेवा करण्याचे शिकवले तसेच त्यांना शालेय शिक्षण दिले. आत्माराम बाबांनी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण येथेच मांदळी मध्ये जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेमध्ये पूर्ण केले. त्यानंतर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी मांदळी पासून जवळच असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोगरगाव येथे केले. देवपूजा व शिक्षणाबरोबरच त्यांनी भजन, तबला, हार्मोनियम यांचेही चांगल्यापैकी शिक्षण घेतले होते.

त्यामध्ये त्यांनी नाव लौकिक मिळवला. याबरोबरच आत्मारामगिरी बाबांना कुस्त्यांचा ही चांगला छंद होता. ते नियमित शारीरिक व्यायाम करीत असत. तरुणपणात ते मित्रांबरोबर फिरत असत परंतु कधीच त्यांनी मित्रांबरोबर भांडण तंटा केला नाही. पुढे त्यांचा मित्रपरिवार आपापल्या संसारात रमला व हे तरणेबांड बाळ संन्यास आश्रमात विहार करू लागले. संन्यास आश्रमातील कालावधीत त्यांचे वागणे लोकांना विक्षिप्तपणाचे वाटू लागले. बाबाजी भजन, गायन, वादन करीत होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना वादन कलेमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी माहीजळगाव गावचे वाद्य शिक्षक त्यांना हार्मोनियम व तबला शिकण्यासाठी ठेवले होते.

पुढे ते वाद्य कलेत तरबेज झाले. तेव्हा ते कामात इतके तरबेज झाले होते की श्री गडशे यांनी त्यांना सांगितले की जे माझ्याकडे नाही ते तुमच्याकडे आहे. पुढे या कलेचा उपयोग त्यांनी गावातील अनेक लोकांना शिकवण्यासाठी केला. त्यामुळे मांदळी गावांमध्ये भजन कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी अनेक वादक त्यांनी तयार केले होते. आत्माराम बाबा लालगीर स्वामींची सेवा, पूजा अर्चा नियमितपणे करीत असायचे तसेच पूजा आटोपल्यानंतर गावांमध्ये भिक्षा मागून जेवत असायचे. त्याचबरोबर ते मठातील शेतीची देखभाल सुद्धा करत होते. मठाच्या नावावर असलेल्या मळ्याची मशागत करून ते भजनाचा कार्यक्रम करायचे.

कधी कधी तर ते मळ्यात भजन गाण्यासाठी हार्मोनियम पेटी घेऊन जायचे. बाबाजी आपल्या आई-वडिलांबरोबर मठामध्ये आनंदी राहत असताना एकदा त्यांना आई-वडिलांसोबत श्री तीर्थक्षेत्र काशी येथे जाण्याचा योग आला होता. बरेच दिवस ते काशी या ठिकाणी आई-वडिलांसोबत राहिले होते.परंतु त्यांच्या मनात स्वामींची भक्ती इतकी अतूट होती की ते आपल्या आईवडिलांना नेहमी मांदळीला चला असे म्हणायचे. श्री लालगीर स्वामींचे मंदिर व मठाची वास्तू ही फार जुनी होती. दगड मातीच्या या मंदिराचे शिखर सुद्धा दगडी काम केलेले होते. मंदिरासमोर दीडशे ते दोनशे लाकडी खनांची सार्वजनिक इमारत होती. मठाच्या या वास्तूमध्ये एक भाग कचेरीचा होता. तेथे तेथे गावातील लहान मोठे तंटे मिटवले जायचे. मंदिराच्या पाठीमागे महाराजांना राहण्यासाठी घर दिले होते.

पुढे कालांतराने जास्त तंटे होत असल्यामुळे आत्माराम बाबांच्या वडिलांनी मांदळी सोडले व ते आपल्या मूळ गावी हंगेवाडी तालुका श्रीगोंदा येथे आत्मारामाला मांदळी मध्ये ठेवून आले. गावाला गेल्यानंतर त्यांच्या वडिलांचे काही दिवसातच आजारी पडून देहावसान झाले.लालगीर स्वामींच्या सेवेत खंड पडू नये म्हणून आत्माराम बाबा त्यांच्या वडिलांच्या ही अंत्यविधीला गेले नाहीत. वडील गेल्यानंतर बाबाजी व त्यांची आई मठामध्ये दोघेच राहू लागले. त्यानंतर अनेक दिवस त्यांचा स्वभाव फार हटयोगी बनला होता.

कधीकधी आई विनंती करून थकत असे तरी ते जेवत नसायचे. बाबांच्या या स्वभावामुळे काही दिवस गावातील अनेक भक्त त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले. तसेच त्यांच्याकडे येत नसायचे. पुढे काही दिवसांनी त्यांची आई वयस्कर झाल्यामुळे त्यांची मठामध्ये प्राणज्योत मालवली. त्यांच्या आईचे देहावसन झाले ते दिवस पावसाळ्याचे होते. गावातील सर्व जणांनी त्यांच्या मातोश्रीचा अंत्यविधी उरकून टाकला. तरी बाबाजी आईच्या अंत्यविधीसाठी गेले नाहीत. सर्व लोक आईचा अंत्यविधी उरकून येईपर्यंत भर पावसात बाबाजी मठाच्या समोर अगदी एक चित्त नजर लावून उभे होते. आई वडील दोघेही निवर्तले होते त्यामुळे बाबा नेहमी उदास वृत्ती ने मठात दिसायचे. परंतु स्वामींच्या निष्ठापूर्वक भक्ती मुळे त्यांनी गाव सोडले नाही.

त्यानंतर मांदळीच्या शिवारात त्यांनी बारा वर्षे कठोर तपचर्या केली. तपचर्येनंतर आत्माराम बाबांच्या हातून अनेक चमत्कार घडले. तेथे त्यांनी मोत्या नावाच्या कुत्र्याचा कान पिळला असता त्याला शंख फुटल्यासारखा आवाज काढायला लावत असायचे. उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये ते उन्हापासून पावसापासून किंवा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आसरा घेत नसत . भर पावसात भिजायचे, भर उन्हात हिंडायचे, कडक थंडीत सुद्धा अंगावर वस्त्र न घेता तपश्चर्या करत होते. अशा कठोर तपचर्येदरम्यान तब्बल बारा वर्ष ते कधी झाडावर बसत तर कधी उन्हात. त्यांना ना खाण्यापिण्याची काळजी ना अंधार पडला म्हणून घरी जाण्याची काळजी. कधी झाडाच्या लिंबोळ्या आणि पाला व खडा माती खाऊन ते आपली भूक भागवत असत.

फारच इच्छा झाली तर गावात येऊन भिक्षा मागून खात असत. तसेच काही वेळेस ते ताटातील फक्त भाजी खायचे. तर कधी फक्त भाकरी खायचे. कधी दिवसभर फक्त पाणीच प्यायचे. एखाद्या व्यक्तीने त्यांना घरी जेवायला बोलावले तर ते नक्की जायचे परंतु दुसऱ्यांदा परत त्या व्यक्तीकडे कधीच ते जेवत नसत. त्यांच्या मनात नेमके काय चालायचे कोणालाच कळत नसे. मनात आले तर चटणी भाकरीचे जेवण करायचे. परंतु मनात नसेल तर पाच पकवान्नाचे जेवण ते नाकारत असत. दैनंदिन दिनचर्या मध्ये देखील त्यांचा असाच हटयोगी स्वभाव होता. अशाच स्वभावात तब्बल बारा वर्षांची कठोर तपचर्या बाबांनी पूर्ण केली होती.

पुढे अशाच प्रकारची मठ तपचर्या सुद्धा त्यांनी केली. 27 डिसेंबर 1987 रोजी आत्माराम गिरी महाराज श्री लालगीर स्वामी मठात आले होते. त्यावेळी मठाची परिस्थिती पाहिजे तेवढी सुधारलेली नव्हती. तसेच त्यावेळी लालगीर स्वामी मठात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी फार कमी असायची. इमारतीची पडझड झालेली होती. परंतु बाबा मठात आल्यानंतर मठाच्या जीर्णोद्धाराचे काम जोमाने सुरू झाले होते. मठात आल्यानंतर त्यांनी त्यांची पुढील तपचर्या चालूच ठेवली. मात्र त्यांच्या स्वभावात थोडासा बदल झालेला होता. मठात आल्यापासून शक्यतो बाबा बोलत नव्हते. परंतु भाविकांनाच त्यांच्या दर्शनी लाभातून अनेक अनुभव येऊ लागले होते.

जसजसे अनुभव येऊ लागले तसतसे भक्तगणांची संख्या वाढू लागली. गर्दीचा ओघ वाढू लागला होता. या काळात रात्रंदिवस ते एकटेच भजन गात असायचे. तसेच नित्यनेमाने लालगीर स्वामींची पूजा अर्चा करायचे. पूजा झाल्यानंतर दिवसभरातून एकदा गावातून भिक्षा मागून ते जेवत असत. अशा प्रकारे त्यांनी पुढील बारा वर्षाची मठ तपचर्या पूर्ण केली होती. या बारा वर्षाच्या काळात ते कधीच गावाबाहेर गेले नाहीत. या दोन्ही प्रकारच्या तपचर्येनंतर बाबाजीं पहुडण्याच्या स्थितीत तपचर्या करू लागले.

आजही लालगीर स्वामींच्या मांदळीच्या या मठात परब्रह्म बालब्रह्मचारी आत्माराम गिरी महाराज त्यांच्या या पहुडण्याच्या स्थितीत तपचर्या करत आहेत. त्यांच्या सेवेतील सेवेकरी महाराजांची त्यांच्या या अवस्थेत सेवा करताना आपणास दिसतात. बाबा जशी स्थिती असेल त्या स्थितीमध्ये कित्येक तास कित्येक दिवस एकाच अवस्थेमध्ये राहतात. मनी आले तर अन्न ग्रहण करतात. नाहीतर कित्येक दिवस अन्नत्याग करतात. महाराजांच्या या ब्रह्मरूप विदेही स्थितीत प्रत्यक्ष त्यांचे दर्शन घेण्यासाठी आणि लालगीर स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक येतात. संत दर्शनी लाभ दुर्लभ l या ओवी प्रमाणे भाविक भक्तांची गर्दी मांदळी येथे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

Leave a Comment