आषाढी एकादशी महात्म्य | Ashadhi Ekadashi

 आषाढ महिन्यात शक्यतो जून किंवा जुलै महिन्यात ही आषाढी एकादशी ( Ashadhi Ekadashi ) असते. आषाढ महिन्यात अकरावी तिथी म्हणजेच ही आषाढी एकादशी म्हणजेच  “महाएकादशी”. या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते.हा एक फार मोठा पवित्र दिवस असतो. या दिवसापासून चतुर्थ मासास सुरुवात होते चतुर्थ मास म्हणजे चार महिन्याचा काळ.आषाढी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो . असे म्हणतात, या चार महिन्याच्या काळात भगवान श्रीहरी श्रीविष्णू हे क्षीरसागरात शेषनागावरती योगनिद्रीस्त होतात. आणि चार महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला ते या योगनिद्रेतून बाहेर येतात.

आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात. एक आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी. त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची, पवित्र आणि पूज्य मानली जाते. या आषाढी एकादशीला अनेक लोक दिंड्यामधून पंढरपूरची वारी करतात. पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी अनेक भक्तगण वारीत जातात. ज्यांना वारीत जाणे शक्य नसेल ते एसटी बसेस किंवा स्वतःच्या वाहनाने जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातूनही अनेक लोक दिंड्यामधून तर काही लोक स्वतःच्या वाहन व्यवस्थेने पंढरपूरकडे येतात. आषाढी एकादशीला पायी दिंडीमध्ये सामील होऊन पंढरपूरकडे जाणाऱ्या समूहाला आषाढी वारी असे म्हणतात.

या आषाढी एकादशीची एक कथा सांगितली जाते. कुंभदैत्याचा पुत्र मृदूमान्य याने कडक तप करून भगवान शिव शंकरांना प्रसन्न केले होते. आणि भगवान भोलेनाथांकडून अमरत्व मिळवले होते. म्हणजे मृदूमान्य आता कधीही मरणार नव्हता. परंतु शंकरांनी मृदूमान्यला  वरदान देताना तू एका स्त्रीच्या हातून मरशील असा त्याला वर दिला होता. आणि म्हणून ब्रह्मदेव भगवान श्रीहरी विष्णू  आणि भोलेनाथ या सर्वांना मृदूमान्य अजिंक्य बनला होता. म्हणजे मृदूमान्यला या देवांपासून आता भीती राहिलेली नव्हती. नंतर सर्व देव एकत्र येऊन भगवान शंकरांकडे गेले मात्र भगवान शंकरांनी त्यांना मदत करण्यास नकार दिला. मग मात्र सर्व देव घाबरून,भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावर धात्री म्हणजे आवळीवृक्षाच्या खाली असलेल्या एका गुहेत लपून बसले होते.

त्यादिवशी पंचांगानुसार आषाढी एकादशी होती तसेच त्यांनी त्यादिवशी काहीही खाल्लेले नव्हते. त्यामुळे आपोआपच त्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास घडला आणि त्या दिवशी तेथे  पाऊस येत असल्यामुळे पावसामध्ये भिजून त्यांना स्नानही घडले. त्याच दिवशी त्यांच्या एकवटलेल्या श्वासांमधून एक शक्ती उत्पन्न झाली आणि या शक्तीने त्या मृदूमान्य राक्षसाला ठार केले. त्यामुळे या सर्व देवांची त्या मृदूमान्य राक्षसाच्या भीतीतून, छळातून मुक्तता झाली. ही एकवटलेल्या श्वासांपासून ही जी शक्ती तयार झाली होती ती म्हणजेच एकादशी देवता होय. म्हणूनच एकादशी व्रत्तामध्ये सर्व देवांचे तेज एकवटलेले असते, म्हणूनच शैव आणि वैष्णव या दोन्हींचे उपासक एकादशीचे व्रत करतात.

 त्याप्रमाणेच पांडुरंगाच्या अनेक कथा आपण ऐकत आलेलो आहोत. विठ्ठल हे महादेव फक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये आले होते. विठ्ठलाचा अवतार हा गयासुर नावाच्या अधर्म संस्थापक भ्रष्ट राक्षसांचा समूह नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. गयासुराने सत्यश्रेष्ठ हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देवांना भुलवलं होतं, फसवलं होतं. आणि तो गो ब्राह्मणांची हत्या करत होता. म्हणूनच मनमहामूळ जगतपित्याच्या आज्ञेने म्हणजेच श्रीहरीने अवतार धारण करून त्याला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते. आणि नंतर श्रीहरीने पुंडलिकाला स्वतःचे स्वरूप दाखवले. पुंडलिकाने माता-पित्याची कठोर सेवा केल्यामुळे पुंडलिकाला त्यांनी मोक्ष प्रदान केला.

तेरावे ते सतरावे शतका दरम्यान संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानदेव अशा अनेक संतांनी पांडुरंगाची मनोभावे भक्ती केली आणि पांडुरंगाच्या स्तुतीत अनेक काव्य, अभंग, आणि कविता रचल्या. आणि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्राची रचना केली.आणि म्हणूनच आषाढी एकादशीला पांडुरंगाला भक्त भेटण्यासाठी पंढरपूरची वारी करताना दिसून येतात. अनेक भक्त आपल्या सवडीनुसार किंवा इतर एकादशींना  विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. परंतु आषाढी एकादशीला याचे विशेष महत्त्व आहे.अतिशय पुरातन काळात या मंदिराची निर्मिती झाली असून बऱ्याच वेळा या विठ्ठल मंदिराची पुनर्बांधणी सुद्धा झाली.

प्रतिष्ठान नावाच्या राजाने शालिवाहन वंशात इ.स. 83 मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केल्याचे पुरावे सुद्धा आढळतात. पुढे अशा अनेक राजा महाराजांनी मंदिराला भेट देण्याचे आणि पुनर्बांधणीचे काम केले. पुढे इ.स. 1296 मध्ये पादुका प्रदक्षिणेची प्रथा पडली. पुढे हैबत बाबांनी आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीची प्रथा पाडली. आणि तेव्हापासून  ते आजपर्यंत पांडुरंगाचे भक्त वाढतच गेले. आणि अख्खा महाराष्ट्र काय तर पूर्ण देश आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या भक्तीत विलीन झालेला पाहावयास मिळतो.

अशा या आषाढी एकादशीचे व्रत फार महान समजले जाते. एवढेच नव्हे भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी वैष्णव भक्त एकादशी व्रत करणे हे आपले कर्तव्य समजतात. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. त्यातील सर्वात मोठी आषाढी एकादशी समजली जाते. या एकादशीच्या दिवसाला माधव तिथी सुद्धा म्हणतात. तसेच या दिवसाला भक्ति जननी असे सुद्धा म्हणतात. या एकादशीच्या दिवशी व्रत पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. पहिले म्हणजे निर्जला एकादशी. निर्जला म्हणजे पाणी न पिता उपवास करणे. दुसरे म्हणजे सर्जला एकादशी ज्यामध्ये आपण फक्त पाणी पिऊन उपवास करतो. आणि तिसरे म्हणजे सफला एकादशी. यामध्ये फळांचा आहार घेऊन उपवास केला जातो. या एकादशीच्या दिवशी स्वतः अन्नग्रहण करू नका आणि दुसऱ्याला अन्नग्रहण करण्यास आग्रह करू नका असे म्हटले जाते. कारण दुसऱ्याला अन्नग्रहण करण्यास आग्रह केला तरी आपल्याला पाप लागते असा भक्तांचा समज आहे.

उपवास या शब्दाचा अर्थ  उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहने असा सांगितला जातो. कारण उपवासाच्या दिवशी आपण हरिनामाच्या जवळ जातो. उपवासाच्या दिवशी आपण पापापासून आणि इंद्रिय तृप्ती पासून दूर जात असतो. एकादशी व्रत केल्याने धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष याची प्राप्ती होते असे समजले जाते. त्यासोबतच भगवान विष्णूंची भक्ती केल्याने आपण भगवंताच्या जवळ जातो. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरसह सर्वदूर भक्तिमय वातावरण झालेले आढळते. भगवंताच्या तेजातून निर्माण झालेली ही आषाढी एकादशी असून भगवंताचे एक नाव माधव आहे म्हणजेच लक्ष्मीचे पती. म्हणून या तिथीला भगवंताचे नाव देऊन माधव तिथी म्हणतात. जो एकादशी करतो त्याची आध्यात्मिक प्रगती आणि भक्ती प्राप्त होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून एकादशीचे महत्त्व सांगतात की,


ज्यासी नावडे एकादशी । तो जिताची नरकवासीll
ज्यासी नावडे हे व्रत । त्यासी नरक तोहि भीत ll
ज्यासी घडे एकादशी । जाणे लागे विष्णुपाशी ll
तुका म्हणे पुण्यराशी । तोचि करी एकादशीll 

 म्हणजे या अभंगाचा अर्थ असा होतो की,”ज्याला ही एकादशी आवडत नाही किंवा एकादशी विषयी हेवा वाटत नाही. तो जिवंतपणीच नरकात राहणारी व्यक्ती असल्यासारखे आहे. तसेच त्याला नरकात सुद्धा जागा नाही. तो महापापी आहे. आणि ज्याला हे व्रत घडते त्याला नरकदेखील घाबरतात.जो एकादशीव्रताचे पालन करतो, त्याला निश्चितच वैकुंठप्राप्ती होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्याने चालू जन्मामध्ये  पुण्य कर्म केले, व्रत वारी केली आहे तोच केवळ एकादशीव्रताचे पालन करतो.”
तसेच पांडुरंगाला वारकरी संप्रदायाचा कैवारी समजले जाते. सर्व वारकरी, विठ्ठल भक्त पंढरपूर देवपूर मध्ये गेल्यानंतर भक्त विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतात. या आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये महाराष्ट्रासह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपूर मध्ये येतात.

जसे की पैठणवरून संत एकनाथ महाराजांची पालखी, त्र्यंबकेश्वर वरून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, आळंदी वरून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी, देहू वरून जगद्गुरु  संत तुकाराम महाराजांची पालखी, विदर्भातील शेगाव वरून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येते. उत्तर भारतातून कबीरांची पालखी. आणि इतरही अनेक संत साधूंच्या पालख्या पंढरपूर कडे जातात.या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व असते. आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांसह महाराष्ट्रात तसेच विविध राज्यातील लोक लहान मुलांसह मोठी माणसेही उपवास करतात. घराघरामध्ये उपवास केला जातो. अनेक लोक आषाढी एकादशी निमित्त जवळच्या लोकांना, नातेवाईकांना, मित्रांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा पाठवतात. अनेक शाळा कॉलेजमध्ये मुलांच्या दिंडीचे आयोजन करून, वारकरी पोशाखात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशाप्रकारे आषाढी एकादशीचा सण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात साजरा होतो.

Leave a Comment