अहिल्याबाई होळकर | Ahilyabai Holkar

या पृथ्वीतलावर अनेक राजे महाराजे होऊन गेले. त्यापैकीच एका व्यक्तीला देवीची उपमा दिली जाते अशी  राजमाता, धर्मरक्षक आणि पराक्रमी राणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ( Ahilyabai Holkar ) . अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर म्हणजे सध्याचे अहिल्यानगर या जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी एका धनगर कुटुंबात झाला होता. या चोंडी गावाला पूर्वी मल्हारपीठ असे सुद्धा म्हटले जायचे. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे आणि आईचे नाव सुशिलाबाई शिंदे असे  होते. त्यांचे वडील त्यावेळी त्या गावचे पाटील होते.

पुढे पेशव्यांनी ज्यावेळी दिल्लीवर आक्रमण केले होते. त्यावेळी युद्धामध्ये अग्रगण्य असणारे पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर यांनी सध्याच्या मध्यप्रदेशातील माळवा प्रांत जिंकला होता त्यात इंदोर आणि महेश्वर हे मुख्य भाग होते. पुढे या भूभागाचे रक्षण करण्यासाठी मल्हारराव होळकर यांनाच ठेवण्यात आले होते. पुढे एक दिवस मल्हारराव होळकर ( Malharrao Holkar ) पुणे दौऱ्यावर जात असताना मध्येच जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी विश्रांतीसाठी थांबले होते.

त्यावेळी त्यांनी एक आठ वर्षाची मुलगी शंकराच्या मंदिरासमोर गरीब लोकांना अन्नदान करताना पाहिली. तसेच ती मंदिराची साफसफाई सुद्धाकरीत होती. हे पाहून त्यांनी थेट माणकोजी शिंदे यांना विचारले की, तुमची मुलगी आमच्या मुलाला देता का? मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव फार चतुर आणि देखणा होता. शिवाय मल्हाराव होळकर हे इंदोरचे राजे होते. त्यामुळे माणकोजी शिंदे लगेच हो म्हटले आणि थोड्याच दिवसात खंडेराव आणि अहिल्या यांचा विवाह संपन्न झाला.

नंतर पुढे अहिल्याबाई आपल्या सासरी इंदोरला गेल्या. पुढे काही दिवसानंतर त्यांना एक मुलगा झाला आणि त्याचे नाव त्यांनी मालेराव ठेवले. पुढे तीन वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव त्यांनी मुक्ताबाई ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी 1754 मध्ये कुम्हेर युद्धामध्ये अहिल्यादेवींचे पती खंडेराव मृत्युमुखी पडले. त्यावेळी पती गेल्यानंतर पत्नीने सती जाण्याची पद्धत होती. परंतु असे करण्यास त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी विरोध केला आणि अहिल्याबाई होळकरांना सांगितले की यापुढे राज्याचा कारभार तुम्हाला सांभाळायचा आहे. मग सासऱ्यांच्या आदेशानुसार अहिल्यादेवींनी राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.

अहिल्यादेवींचे पती खंडेराव आणि सासरे मल्हारराव यांच्या प्रमाणेच राज्याची न्यायव्यवस्था आणि सैन्याची व्यवस्था पाहून निर्धाराने राज्यकारभार चालू ठेवला.अशातच एक दिवस त्यांचा मुलगा मालोजीराव रथ घेऊन इंदोर मध्ये फिरण्यास निघाले होते. त्यांचा रथ वाऱ्याच्या वेगाने इंदोर मध्ये धावत असताना एक गाय आपल्या वासरा बरोबर रस्त्यापलीकडे चालली होती. त्यावेळी मालोजीरावांनी रथ थांबवलाच नाही आणि रथ वासराच्या अंगावरून गेला. आणि वासराचा त्यावेळी मृत्यू झाला. त्या पाठोपाठच अहिल्यादेवींचा रथ त्याच रस्त्याने येत होता. अहिल्यादेवींनी हा होऊन गेलेला सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला.

मेलेल्या वासराच्या अंगातून रक्त वाहत होते. गाईच्या डोळ्यात पाणी होते आणि गाय वासरा भोवती वेढे घालत होती. त्यावेळी त्यांनी आजूबाजूच्या लोकांना या घटनेची सविस्तर माहिती विचारली असता लोकांनी सांगितले की तुमच्याच मुलाचा रथ वासराच्या पोटावरून निघून गेला. त्यावेळी अहिल्यादेवींना खूप राग आला होता. त्या ताबडतोब घरी आल्या आणि आपल्या सूनेला म्हणजे मालोजीरावांच्या पत्नीला त्यांनी विचारले की, जर एखाद्या मुलाला त्याच्या आईच्या समोरच मारले गेले तर त्याला काय शिक्षा द्यायला हवी त्यावेळी मालोजीरावांच्या पत्नीने उत्तर दिले की ज्याप्रमाणे त्या मुलाला मारले गेले त्याप्रमाणेच त्यालाही शिक्षा देणे गरजेचे आहे

दुसऱ्या दिवशी अहिल्यादेवी होळकरांनी दरबार भरून आपल्या राज्याची न्याय व्यवस्था बोलवली आणि स्वतःच्या मुलाला न्याय व्यवस्थेपुढे उभे केले. भर दरबारात न्यायालयीन सूचनेनुसार मालोजीरावांना हातपाय बांधून रस्त्यावर टाकून त्यांच्यावरून रथ नेण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु ही शिक्षा देताना त्या रथावर सारखी होण्यास कोणी तयार होईना. उलट सगळ्या दरबारातील लोक एक वेळेस मालोजींना माफ करा असे म्हणत होते. परंतु अहिल्यादेवी काही ऐकण्यास तयार नव्हत्या. शेवटी स्वतः अहिल्याबाई रथावर बसल्या आणि ज्या ठिकाणी रस्त्यावर मालोजींना हात पाय बांधून टाकले होते तेथे रथ पोहचला.

त्या ठिकाणी ती गाय मालोजी भोवती फिरत होती. मग लोकांनी हाहाकार केला की गाईच्या मनात सुद्धा मालोजींना माफी आहे. कृपया मालोजींना ही शिक्षा देऊ नका. मग अहिल्यादेवींनी त्याला एक वेळेस माफ करून तोडून दिले. अशी होती अहिल्यादेवी होळकर यांची कठोर न्यायव्यवस्था. तसेच त्यांच्या राज्यामध्ये धर्मभेद,जातीभेद,वर्णभेद,अजिबात सहन केला जात नसे. पुढे काही दिवसांनी अहिल्यादेवींच्या सासर्‍यांचा मृत्यू झाला आणि पुढे थोड्या दिवसातच त्यांचे पुत्र मालोजीराव यांचेही निधन झाले.

अशा मोठ्या दुःखातूनही अहिल्यादेवींनी स्वतःला सावरत तुकोजी होळकर यांना आपल्या सैन्याचे प्रमुख सरदार पद दिले.आणि राज्याचा कारभार सुरळीत चालू ठेवला. नंतर पुढे महाराणी अहिल्यादेवींनी आपली राजधानी महेश्वरला नेली. त्यांना महेश्वर हे सुरक्षित ठिकाण वाटत होते. मग त्यांनी नर्मदा नदीच्या किनारी सुंदर मोठा महाल बांधला. तेथून पुढे त्यांनी आपल्या राज्यकारभाराबरोबर आणखी जास्त वेगाने राज्याची सुधारणा करण्याचे काम सुरू केले. अनेक मंदिरे बांधली, अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला, गरीब जनतेसाठी धर्मशाळा बांधल्या, मुख्य तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठे घाट बांधण्यात आले.

तसेच त्यांनी पाण्याच्या सोयीसाठी अनेक विहिरीही खोदल्या. गुजरात,द्वारका, काशी, विश्वेश्वर,वाराणसी गंगा घाट, उज्जैन विष्णू मंदिर,आणि परळी वैजनाथ अशा अनेक ठिकाणी मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या. त्यावेळी मुस्लिम आक्रमणांनी हिंदूंचे मंदिरे उद्ध्वस्त केलेली होती. अशा अनेक मंदिरांची पुनर्बांधणी राणी अहिल्याबाई देवींनी केली. शंकराचे सोमनाथ मंदिर ही अहिल्यादेवींनी बांधलेले आहे. पुढे त्यांच्याच राजधानीच्या नजदीक काही राजे महाराजे होते त्यांना असे वाटले की, अहिल्याबाईंचे राज्य आता कमकुवत झाले आहे सासरे गेले,मुलगा गेला आता हे राज्य फार कमकुवत झालेले दिसते.

म्हणून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा विचार काही सरदार करत होते. ही बातमी अहिल्याबाईंच्या कानावर आली. तुकोजीराव होळकरांनी सांगितले की पेशवे आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहेत आणि ते या दिशेने निघालेले आहेत. त्यावेळी अहिल्यादेवींनी फार हुशारीने सावध पवित्रा घेत सर्व महिलांना एकत्र करून महिलांची एक फौज तयार केली आणि एक पत्र पेशव्यांना पाठवण्यात आले. त्या पत्रात असे लिहिले होते की, पेशवे तुम्ही कधीही लढाईसाठी या आम्ही तयार आहोत. परंतु आमची सैन्याची  फौज  ही सर्व महिलांची आहे आणि या महिलांच्या फौजेबरोबर तुम्हाला लढावा लागेल. विचार करा आम्ही हरलो तर स्त्रीयांची फौज हरेल. परंतु तुम्ही जर हरला तर स्त्रीयांच्या फौजेने हरवले म्हणून तुमचे नाव इतिहास जमा होईल.

मग हे पत्र वाचल्यानंतर पेशवे घाबरले आणि त्यांनी निरोप पाठवला की, आम्ही तुमच्यावर आक्रमण करण्यासाठी आलेलो नसून अचानक तुमच्यावर कोसळलेल्या दुःखापायी तुमच्या दुःखात सामील होण्यासाठी आणि तुमची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. अशा रीतीने अहिल्याबाईंनी न लढताच हे युद्ध जिंकल्यासारखे झाले होते.तसेच अहिल्याबाईंचे देवावर फार प्रेम होते आणि अफाट भक्तीत आणि श्रद्धेने त्या जगत होत्या. शंकराच्या त्या निस्सीम भक्त होत्या. मुस्लिमांच्या आक्रमणांमध्ये झालेल्या मंदिरांची मोडतोड सुधारण्याचे काम अहिल्याबाईंच्या राज्यकारभारात अनेक वर्ष चालले होते.

महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे झाले तर जेजुरीचे खंडोबा मंदिर त्यांनीच बांधलेले आहे. त्यांच्या काळात केलेली बांधकामे ही चिरकाल टिकणारी होती. आजही तेथे अहिल्यादेवींचा वाडा आहे. अशा या पराक्रमी राणी अहिल्याबाईंचे इंदोर म्हणजे सध्याचे मध्य प्रदेश मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी  13 ऑगस्ट 1795 मध्ये निधन झाले आणि त्यांचा सर्व पराक्रम इतिहास जमा झाला. अहिल्यादेवींकडे जेवढी काही संपत्ती होती त्या सगळ्या संपत्तीचा आणि  पैशाचा उपयोग त्यांनी शेवटपर्यंत गोरगरीब जनतेसाठी आणि धर्म वाढवण्यासाठी केला होता. म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे म्हणतात.

एका इंग्रजी लेखकाने त्यांच्या पुस्तकात अहिल्याबाईंचा उल्लेख भारत देशाच्या त्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट” आहेत असा केला आहे. थोडक्यात त्या लेखकाने रशिया,डेन्मार्क आणि इंग्लंड या तिन्ही शूर राण्यांच्या नावांचा उल्लेख एकत्रित करून अहिल्यादेवींना उपमा दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या पुस्तकात असे म्हटले आहे की ज्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव प्रथम स्थानी असेल.

त्यांच्या नावाने इंदोरच्या विमानतळाला “देवी अहिल्यादेवी विमानतळ” असे नाव देण्यात आलेले आहे आणि इंदोर विद्यापीठाला “ देवी अहिल्या विश्वविद्यालय” तसेच महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाला” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ” असे नाव देण्यात आले आहे. आणि सध्या 13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने  अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून “अहिल्यानगर’ असे नाव ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे अहिल्यादेवींच्या नावाने आजही अनेक शाळा,मंदिरे,घाट, विमानतळे आहेत. अशा या वीर मातेला कोटी कोटी प्रणाम ……
     
  

Leave a Comment