राशीनची देवी जगदंबा ( Aai Jagdamba Rashin ) ही तुळजाभवानी देवीचेच एक रूप असून या ठिकाणी ती प्रकट झाल्याचे सांगितले जाते. याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते कि वेताळांनीच या मंदिराची स्थापना केली होती. परंतु मंदिराच्या रचनेवरून आणि बांधणीवरून या मंदिराची बांधणी हेमाडपंथीयांच्या नंतरच्या काळात झाल्याचे दिसून येते असे अभ्यासकांचे मत आहे.
त्यानंतर इतिहास काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते. तेथील चौथऱ्यावरूनही असे लक्षात येते की या मंदिराची बांधणी शिवपूर्व काळात झालेली असावी. मुरार जगदेव आणि त्यांचे मित्र म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी बऱ्याचश्या मंदिरांचा जिर्णोद्धार केला होता तेव्हाच या मंदिराचाही जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते.
पेशवाईतील प्रसिद्ध जनकोजी माणकेश्वर यांनी येथील वोव्हऱ्याचे बांधकाम केल्याचा येथील शिलालेखात उल्लेख आहे.तसेच 1660 साली सुप्याचे गंडे कुलकर्णी यांनीही येथील ओहऱ्यांचे बांधकाम केल्याचा उल्लेखही आहे. तसेच अक्काप्पा भुजंगाप्पा जंगप यांनी 1704 ते 1710 या कालावधीमध्ये देवळाचे उर्वरित काम पूर्ण केल्याचे सांगितले जाते.
राशीनची आई जगदंबेचे मंदिर अहमदनगर (अहिल्यानगर ) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राशीन या गावात नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेलगत आहे. साधारणपणे दीड हजार वर्षांपूर्वी हे क्षेत्र वसलेले असावे असे सांगितले जाते. परंतु इस 700 पासून पुढील माहिती या क्षेत्राबाबत मिळते. भारताच्या धार्मिक, राजकीय व सामाजिक इतिहासात राशीन या तीर्थक्षेत्राला फार मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. येथील आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच दूरवर या देवीची फार महती आहे.
जगदंबा मातेचे स्वयंभू स्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राचा प्राचीन इतिहास फार बोलका आहे. अष्टभुजा देवीने महिषासुरासी नऊ दिवस युद्ध करून त्याचा वध केला या घटनेचा राशीनच्या या स्वयंभू देवीशी जोडला जातो. श्रीक्षेत्र राशिन हे यमाई देवीचे स्वयंभू स्थान आहे असे मानले जाते. या देवीला काहीजण जगदंबा माता म्हणतात तर काहीजण यमाई माता म्हणतात.
एका अख्यायिकेनुसार जेव्हा सीता मातेचे रावणाने अपहरण केले होते. तेव्हा सीतेच्या आठवणीत प्रभू रामचंद्र वेडेपिसे झाले होते. त्यावेळी रामाची गंमत करण्यासाठी पार्वती मातेने सीतेचे रूप धारण केले आणि पार्वती देवी सीता मातेच्या रूपात रामा पुढे उभी राहिली होती. त्यावेळी प्रभू रामचंद्राने त्यांना ऐ माई अशी हाक मारली होती. त्यामुळे राशीन च्या देवीला यमाई असे नाव पडले. अशी एक आख्यायिका आहे. येथील देवीची मूर्ती चतुर्भुज असून स्वयंभू उभी आहे.
ऐतिहासिक माहितीनुसार येथील देवीचे स्थान तेराशे वर्षांपूर्वीचे आहे असे मानले जाते. देवीचे मंदिर राशीन शहराच्या दक्षिण दिशेला असून मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मूळ मंदिराच्या चारही बाजूला ओवऱ्या आहेत. समोर भव्य दोन दीपमाळा असून त्यातील एक दीपमाळ हलणारी आहे. हे येथील एक खास वैशिष्ट्य आहे. देवीचे मंदिर पुरातन असून ओवऱ्या आणि प्रवेशद्वार 200 ते 250 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. मंदिराच्या आवारातून दक्षिणेला एक दगडी मार्ग आहे.
तसेच मंदिराच्या आवारातून प्रदक्षिणेसाठी पूर्ण दगडी मार्ग आहे. येथील हे मंदिर रंगीबेरंगी रंगात रंगवलेले असल्यामुळे विलोभनीय दिसते. येथील देवीची मूर्ती चतुर्भुज मूर्ती असून हे माहूरच्या रेणुका मातेचे स्थान असल्याचे सांगितले जाते. तसेच देवीच्या उजव्या बाजूला तुळजापूरच्या तुकाई देवीचे स्थान आहे. मध्यभागी चतुर्श्रुंगी देवीची पंचधातूची चलमूर्ती आहे. जगदंबा मंदिराच्या त्यावेळच्या शेंदुर्गी लाकडाच्या कमानी अद्यापही तशाच आपणास पहावयास मिळतात.
नवरात्रीमध्ये या ठिकाणी फार मोठा उत्सव भरतो. यावेळी देवीची पालखी निघते. गावात पालखी फिरत असताना मोठा आनंद उत्सव साजरा केला जातो. तसेच अनेक भक्त पालखीचे दर्शन घेतात. जगदंबा देवीचा उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत दरवर्षी साजरा केला जातो. नवव्या व दहाव्या शतकातील हे मूळ स्थान साधारणता सतराव्या शतकामध्ये उभारलेले आहे. येथील यमाई आणि तुकाई देवीचे मंदिर या देवीचा उल्लेख रेणुका,जगदंबा, भवानी असा केलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. येथील या मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय आकर्षक दगडी नक्षीकाम करून कोरलेले आहे. मंदिरामध्ये जाण्या अगोदरच देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच मन अगदी प्रसन्न होते.
येथील सभा मंडपात चौथऱ्यावर स्थापित केलेली एक सिंह प्रतिमाकृती ही फार आकर्षक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजवीकडे भला मोठा एक नगारखाना आहे. तसेच मंदिराच्या प्रांगणात सुंदर सुरेख भव्य दिव्य नक्षीकाम असलेल्या विविध रंगात डोलणाऱ्या दीपमाळा अगदी गगनचुंब दिसतात. दक्षिण बाजूला असलेल्या दीपमाळेवर जाण्यासाठी बाजूला पायऱ्या आहेत. आणि उजव्या बाजूच्या दीपमाळेवर आतून जिन्या प्रमाणे पायऱ्या आहेत.
दीपमाळांचे बांधकाम खाली दगड आणि वरच्या बाजूस विटांचे केलेले आहे. जिन्याने वर गेले की एक आडवा एक लाकडी दांडा येतो तो हलवला की दीपमाळ हलते. अशी आश्चर्यजनक दीपमाळेची रचना आपणाला येथे पाहावयास मिळते. एरवी बंद असलेले हे जिने फक्त दसऱ्याच्या वेळेस उघडले जातात. मंदिराच्या आवारात शेंदूर अर्पित गणपतीची दूर्वा फुलांच्या हारांनी नटलेली अशी एक मूर्ती पहातच रहावे अशी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात उजवीकडे राशीनची यमाई आणि डावीकडे तुळजापूरची तुकाई अशा दोन सुरेख सुबक मूर्ती आहेत. मंदिराचा कळस विविध रंगात आणि देव देवतांच्या मूर्ती कलाकृतींनी फुललेला आहे.
मंदिराच्या बाहेरील सभा मंडप भल्या मोठ्या दगडी शिळानी सुसज्ज असा बांधलेला आहे. ही राशीनची जगत जननी असलेली जगदंबा आपल्या भक्तांच्या कल्याणाकरिता सर्वतोपरी आशीर्वाद देते असा भक्तांचा विश्वास आहे. तिची अनेक मंदिरे आपणाला निरनिराळ्या ठिकाणी पाहावयास मिळतात. परंतु येथील राशीनच्या देवीचे हे मंदिर फार पुरातन आणि विश्वंभर आहे.
अनेक भक्त राशीनच्या जगदंबेला आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोक आणि महाराष्ट्रातील विविध भागांमधून देवीचे भक्त दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. अंगावर खरुज नायट्यासारख्या आजाराने त्रस्त असणारे भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि आजारपण बरे होण्यासाठी देवीला साकडे घालतात. तसेच देवीचे पारंपारिक पूजा पठण करतात. असे केल्याने आजार नष्ट होतो असा भक्तांचा विश्वास आहे.
त्याचप्रमाणे देवीच्या महात्म्याबरोबरच या राशीन गावाची काही खास वैशिष्ट्य आहेत. ते म्हणजे या राशीन गावाला संपूर्ण तटबंदी बांधलेली असून राशीन गावामध्ये राशीन मधील श्रीमंत अकोबा स्वामी भुजंग आप्पा शेटे समाधी मंदिर आणि बारा ज्योतिर्लिंग आहेत. तसेच गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्तारूढ पुतळा आहे. त्याचप्रमाणे येथील जनावरांचा बाजार प्रख्यात आहे आणि राशिन गावामध्ये पालावरचे चिकन,मटण , ताजे मासे प्रसिद्ध आहे.
अशा या राशीनच्या तीर्थक्षेत्री जाणारे भाविक येथील जवळच्या काही पर्यटन स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांनाही भेटी देतात. जसे की जवळच 21 किलोमीटर अंतरावर असलेले अष्टविनायकापैकी सिद्धटेक चा सिद्धी विनायक आणि अंबालिका साखर कारखाना,कर्जतचे गोदडेज महाराज मंदिर, जामखेडचे नागेश्वर मंदिर, देशातील एकमेव असलेले दुरगाव येथील दुर्योधनाचे मंदिर, सौताड्याचा रामेश्वर धबधबा
धाकटी पंढरी समजले जाणारे धनेगाव चे विठ्ठल रुक्माई मंदिर, खर्डा येथील किल्ला आणि संत सिताराम बाबा यांचे समाधी मंदिर, महादेव मंदिर चोंडी, पीर बाबा दर्गा जामखेड, कर्जतचे रेहकुरी काळवीट अभयारण्य , इत्यादी दर्शनीय आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी राशीनच्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आलेले भाविक जातात. येथे जाण्यासाठी अनेक एसटी बसेस आणि खाजगी वाहनांचा पर्याय निवडता येतो.
👌
Chan