बोटे स्वामी | Bote Swami

कर्नाटक मध्ये गोकर्ण या गावी वेदशास्त्र संपन्न गटातील बाळकृष्ण भट आणि अन्नपूर्णा भट या ब्राह्मण कुटुंबात दोन मुलांनंतर 23 जानेवारी 1857 मध्ये आणखी एक मुलगा झाला होता. या तिसऱ्या मुलाच्या ( Bote Swami ) जन्माच्या आधी एका साधूने त्याची भविष्यवाणी केली होती. त्यामध्ये असे सांगितले होते की तुमच्या पोटी आता संत अवतारी मुलगा जन्माला येईल. त्यानंतर काही दिवसांनी ज्यावेळी हे मूल झाले त्यावेळी ते रडले नाही. परंतु त्याच्या चेहऱ्यावरील तेज फारच अनोखे होते आणि ओंकाराचे स्वर त्याच्या मुखातून येत होते.

वडील बाळकृष्ण भट हे सुरुवातीपासूनच रामाचे भक्त होते. त्यामुळे त्यांना असे वाटायचे की, प्रभू रामाचाच हा अवतार आहे. त्यामुळे त्यांनी त्या मुलाचे नाव रामचंद्र असे ठेवले. रामचंद्रला घरातील अध्यात्मिक वातावरणामुळे लहानपणापासूनच अध्यात्माची आवड लागली होती. अध्यात्मिक वाचन, लेखन आणि पठण करत करत तो घरातील पूजा आर्च्या करू लागला. पुढे काही दिवसांनी वेद वगैरे शिकण्यासाठी तो मुरगुडला गेला. हे शिक्षण घेत असताना मुरगुड मधील वेद भवनामध्ये त्याची अध्यात्मिक आवड आणि हुशार बुद्धी बद्दल अनेक जण कौतुक करत होते. त्याच्या तीक्ष्णबुद्धीमुळे रामचंद्रने लवकरच वेदशास्त्र यावर प्रभुत्व मिळवले होते.

त्यामुळे अनेक जण विविध अडचणींना रामचंद्राला विचारत असायचे. अगदी मोठ मोठी माणसे सुद्धा या आठ नऊ वर्षाच्या राम चंद्राला  वेदशास्त्राबद्दल आणि अध्यात्मिक काही अडचणी बद्दल विचारणा करत असायचे. त्यामुळे लवकरच रामचंद्राची आजूबाजूच्या परिसरात फार मोठी ख्याती झाली होती. एकदा मुरगुड मधील नाईक आडनावाच्या एका श्रीमंत माणसाने त्याच्या स्वतःच्या शेतात एक मोठी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि अनेक मजूर लावून विहीर खोदण्यास सुरुवात केली. विहिरीचे काम खूप खोलवर जाऊन सुद्धा विहिरीला एक थेंब भर पाणी लागले नव्हते. त्यामुळे नाईकांच्या डोक्याला मोठा ताप झाला होता.

एवढा मोठा खर्च होऊन सुद्धा विहिरीला पाणी लागले नाही म्हणून नाईक डोक्याला हात लावून बसले होते तेवढ्यात त्यांना छोटा रामचंद्र जाताना दिसला. मग त्यांनी रामचंद्राला हाक मारून आपल्याकडे बोलावून घेतले आणि आपली खंत रामचंद्र समोर व्यक्त केली. राम चंद्राने विहिरीमध्ये डोकावून पाहिले आणि नाईकांना सांगितले की तुम्ही चिंता करू नका. निवांत घरी जाऊन झोपा. विहिरीला नक्की पाणी येईल. रामचंद्राचे हे बोलणे ऐकून नाईक घरी जाण्यासाठी उठले तोपर्यंतच विहिरीतून पाण्याचा आवाज येऊ लागला. विहिरीत डोकावून पाहतात तर विहिरीला चोहोबाजूने पाण्याचे झरे फुटले होते.

तसेच थोड्यावेळात ती विहीर पाण्याने तुडुंब भरली गेली. आजही नाईकांच्या वावरातील त्यांच्या वाड्यासमोरील ती विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असते. मुरगूडच्या चितंबरम दिक्षितांचा रामचंद्र खास भक्त होता. चितंबर महाराजांनी समाधी घेऊन अनेक वर्ष लोटली होती. रामचंद्र त्यांच्या समाधीसमोर नेहमी नतमस्तक होत असे व समाधीसमोर ध्यान लावून बसत असे. एकदा तेथील महादेवाच्या पिंडीतून अचानक अक्राळ विक्राळ असा माणूस बाहेर आलेला रामचंद्रला दिसला. हे पाहून रामचंद्र चितंबर महाराजांचे नामस्मरण करू लागले तेवढ्यातच तो माणूस नाहीसा झाला.

बारा तेरा वर्षाचा रामचंद्र चितंबर महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाची आस लावून बसलेला होता. तेथील पुजाऱ्यांनी रामचंद्राची समज घालण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु रामचंद्र परमेश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनाची वाट पाहत होता. मग तेथील पुजाऱ्यांनी त्याला एक गुरुमंत्र दिला. तेथे चितंबर दीक्षित यांचे पणतू होते. त्यांचे नाव प्रभाकर दीक्षित असे होते. नंतर राम चंद्राची चितंबर महाराज यांच्यावर असलेली श्रद्धा आणि निष्ठा पाहून  चितंबर दीक्षित यांच्या पादुका प्रभाकर गुरुजींनी रामचंद्रला दिल्या. राम चंद्राला साक्षात चितंबर महाराजांचे दर्शन झाल्याप्रमाणे आनंद झाला. रामचंद्र त्या पादुका घेऊन आपल्या घरी आला आणि त्या पादुकांची नित्य सेवा करू लागला. त्याचे वडील बाळकृष्ण नेहमी पुराण सांगत असायचे.

एक दिवस बाळकृष्ण यांनी पुराणामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे आख्यान सांगितले.अख्यान सांगत असताना स्वामींची लीला रामचंद्राच्या कानावर पडते. बाळकृष्ण सांगायचे की, श्री स्वामी समर्थ हे साक्षात दैवी अवतार असून ते परमात्मा आहेत, ते परमेश्वर आहेत आणि ते सदेह स्वरूपात अक्कलकोटला आले आहेत. त्यानंतर रामचंद्र ला श्री स्वामी समर्थांच्या  दर्शनाची आस लागते. एवढ्या लांब अक्कलकोटला जाण्यासाठी घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणून रामचंद्र अन्नपाणी त्याग करतो. तरीही घरच्यांची परवानगी न मिळाल्यामुळे रामचंद्र एक दिवस एकटाच एक वस्त्र आणि कटोरी घेऊन अक्कलकोटच्या वाटेने चालू लागतो.

वाटेमध्ये त्याला गाणगापूरला जाणारा एक यात्रेकरू भेटतो. त्या यात्रेकरू बरोबर तो गाणगापूरला पोहोचून श्री दत्त प्रभूंचे दर्शन घेऊन प्रसन्न होतो. गाणगापूर पासून अक्कलकोट जवळ असल्यामुळे त्या मुक्कामी रात्री त्याची स्वामी समर्थांकडे जाण्याची इच्छा फारच तीव्र झालेली असते. त्याच रात्री एक संन्याशी त्याला भेटतो आणि म्हणतो की, तू उद्या अक्कलकोटला जाणार आहेस ना तिथे तुला परब्रम्हाचे दर्शन होईल परंतु एक गोष्ट लक्षात ठेव चितंबर आणि दिगंबर वेगळे नाहीत बरं का! दुसऱ्या दिवशी तो जेव्हा अक्कलकोटला पोहोचतो तेव्हा तिथे त्याला कळते की दाजीबा भोसलेंच्या वाड्याजवळ औदुंबर आहे आणि त्या ठिकाणी स्वामी महाराज बसलेले आहेत. दाजीबा भोसलेंनी त्यांचा वाडा बाळप्पाला दिला होता आणि आज त्याचे गुरु मंदिर झालेले आहे.

स्वामींच्या दिव्य मूर्तीला पाहून रामचंद्राची ब्रह्मानंदी टाळी लागते. तो स्वामी महाराजांच्या चरणाला मिठी मारतो. स्वामी चरणी रामचंद्राचे आनंदाश्रू गळतात. त्याला स्मरण होते की हेच दिगंबर आहेत तसेच गाणगापूरला संन्याशाने सांगितल्याप्रमाणे चिदंबर आणि दिगंबर हे वेगळे नाहीत याचीही त्याला प्रचिती येते. स्वामी महाराज उठून त्याचे चुंबने घेतात. बाळकृष्ण घरातून निघताना त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की माझी काळजी करू नका मी अक्कलकोटला जाऊन येतो. तरीही बाळकृष्ण भट यांना फार काळजी वाटत असे. 14 15 वर्षाचा रामचंद्र चार पाचशे किलोमीटरचा प्रवास कसा करेल. तो अक्कलकोटला पोहोचला का नाही. अशा अनेक चिंता त्यांना ग्रासत होत्या. शेवटी त्याच्या वडिलांनी मजल दर मजल करत थेट अक्कलकोट गाठले.

अक्कलकोट ला पोहोचल्यानंतर त्यांनी स्वामी महाराजांना एकच मागणी मनात केली की, जर माझा मुलगा अक्कलकोट मध्ये सापडला तर आठ आण्याची साखर मी तुमच्याकडे वाहीन. एवढे बोलून ते गुरु मंदिरामध्ये आले. तेथे राहण्याची जेवणाची सर्व सोय होती असे त्यांना समजले होते. गुरु मंदिरामध्ये येताच रामचंद्राचे स्वर त्यांच्या कानी पडले. त्यांच्या मुलाला पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. रामचंद्र जप करत होता म्हणून त्यांनी त्याच्या जपामध्ये व्यत्यय आणला नाही.

जप पूर्ण झाल्यानंतर दोघांची कडकडून भेट झाली. मग रामचंद्र आणि त्याचे वडील बाळकृष्ण दोघेही वटवृक्षाजवळ स्वामींच्या दर्शनासाठी गेले असता तेथे स्वामींच्या आजूबाजूला फार लोकांची गर्दी होती म्हणून ते एका बाजूला कोपऱ्यात उभे राहिले आणि डोळ्यांनी स्वामींकडे पाहून स्वामींचे दर्शन घेत होते. तेवढ्यात स्वामींचा आवाज आला की बाळकृष्ण रामचंद्रला घेऊन पुढे या. मुलाचे आणि आपले नाव घेऊन स्वामी काहीही माहित नसताना आपल्याला बोलवतात हे ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला होता. त्यानंतर काही दिवस बाप लेक दोघेही स्वामी जवळ अक्कलकोट मध्ये राहिले. नंतर काही दिवसांनी ते आपल्या गावी निघाले त्यावेळी स्वामींनी राम चंद्राच्या उपासनेचे कौतुक केले तसेच “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”असे म्हणाले.

पुढे नंतर रामचंद्र यांची बोटे स्वामी म्हणून प्रचिती झाली. कर्नाटक मध्ये व्यंकट नावाचे ग्रहस्थ स्वामींचे निश्चिम भक्त होते. काही दिवसानंतर त्यांचे  फार वय झाल्यानंतर त्यांना अक्कलकोटला जाणे कठीण व्हायचे. तेव्हाच एकदा श्री स्वामी समर्थ यांनी त्यांना सांगितले की, तुला आता इकडे येण्याची गरज नाही. मुरगुड मधील रामू मास्टर यांच्याकडे जा. त्यांचे दर्शन घेऊन तुला माझे दर्शन घेतल्यासारखेच वाटेल. मग व्यंकट मुरगुडला बोटे स्वामींच्या दर्शनासाठी जातात. हा रामचंद्र आता फार मोठा झालेला होता.

तिथे तो शिक्षकाची नोकरी करत असे. म्हणून मुरगुड मधील जनता त्याला रामू मास्टर असे म्हणायचे. स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे व्यंकट रामू मास्टर चे दर्शन घेतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला स्वामींनी सांगितले आहे तुमचे दर्शन घ्यायचे.
व्यंकट भटांना रामू मास्टर चे दर्शन घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यासारखे वाटले. त्यानंतर दर महिन्याला ते रामू मास्टर यांचे दर्शन घेण्यासाठी जायचे. पुढे रामचंद्रला पुन्हा स्वामी महाराजांच्या दर्शनाची इच्छा झाल्यामुळे ते परत अक्कलकोटला गेले.

त्यावेळी अक्कलकोट मध्ये फार मोठा दुष्काळ पडलेला होता. अक्षरशा जनावरेच नव्हे तर मानसेसुद्धा त्या दुष्काळात मरत होती. कुठेही जनावरांसाठी आणि माणसासाठी पाणी शिल्लक राहिले नव्हते. अशा परिस्थितीत रामचंद्र अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी ध्यान करत बसला होता. त्यावेळी स्वामी महाराजांनी त्यांना पाच रुपये देऊन त्यांच्या डोक्यावर हात ठेवला होता. अशा पद्धतीने रामचंद्रला म्हणजेच बोटे स्वामींना श्री स्वामी समर्थ यांचे सदेह दोन वेळा दर्शन झाले होते.

लोकमान्य टिळकांनी सुद्धा बोटे स्वामींचे मुरगुडला दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. त्यावेळी बोटे स्वामी टिळकांना एक मुक्काम करण्याचा आग्रह करत असताना सुद्धा टिळकांनी पुढील अर्जंट कार्यक्रमाचे कारण दाखवत माघारी पुण्याकडे निघाले होते. परंतु रस्त्यात मुसळधार पाऊस लागल्याने लोकमान्य टिळक परत बोटे स्वामींकडे येऊन त्यांनी बोटे स्वामींकडे मुक्काम केला होता. पुढे 1911 मध्ये बोटे स्वामींचे वय अंदाजे 54 -55 वर्षे झाले असताना गोपाळपंत नावाच्या त्यांच्या एका भक्ताला त्यांनी भरपूर मीठ आणायचे सांगितले होते. गोपाळ पंत यांनी बोटे स्वामींच्या सांगण्यावरून बरेच मीठ आणून ठेवले होते. परंतु कोणालाच या एवढे मोठे मीठ आणल्याची कल्पना आली नाही.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे जशी त्यांची ब्रह्मानंद टाळी लागायची तशाच प्रकारचे त्यांचे ध्यान लागले होते. नेहमी शांततेत नामस्मरण करणारे बोटे स्वामी त्या दिवशी मोठ्या आवाजात नामस्मरण करत होते. थोड्यावेळाने त्यांचे नामस्मरण हळूहळू कमी आवाजात होऊन पूर्णपणे थांबले होते. लोकांना असे वाटले की नेहमीप्रमाणे स्वामी ध्यान करत आहेत. परंतु पहाटे पावणे  पाच वाजता त्यांनी देह ठेवला होता. सन 1911 मध्ये पहाटे पावणे पाच वाजता वयाच्या 54 व्या वर्षी बोटे स्वामी श्री स्वामी समर्थ मध्ये विलीन झाले होते. कर्नाटक मधील बेळगाव मध्ये गुर्लापूर नावाच्या गावात त्यांची समाधी आहे.
            

1 thought on “बोटे स्वामी | Bote Swami”

Leave a Comment