महाराष्ट्रात संत मंडळी मध्ये प्रख्यात असलेले संत जंगली महाराज ( Sant Jangali Maharaj ) हे फक्त भजन, कीर्तनातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवून आणणारे महान संत होऊन गेले. सुरुवातीच्या काळात त्यांना लोक जंगली शहा म्हणून ओळखायचे. जंगली महाराजांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील होनमुर्गी या लहानशा खेड्यात सन 1810 मध्ये झाला होता. त्यावेळी या खेड्यात प्रमुख दोन ग्रामदैवत होती.पहिले म्हणजे महादेव बसवेश्वर आणि दुसरे महबूब सुसानी हा पिराचा दर्गा.
लहानपणापासूनच त्यांना भक्ती मार्गाची आवड असल्याने ते नेहमी मंदिरात जायचे आणि नंतर हळूहळू त्यांनी रामायण व महाभारत वाचून दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यांची हुशारी पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी तेथून जवळच असलेल्या लोणी या ठिकाणी पाठवले. एक दिवस मंदिरात त्यांची भेट अक्कलकोट वरून आलेल्या एका फकीराशी झाली. त्यानंतर जंगली महाराज त्या फकीरा बरोबर अक्कलकोटला गेले. काही दिवस ते स्वामी समर्थ यांच्या सहवासात राहिले होते. तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थांनी सांगितले की, तुझ्याकडे फार मोठी दैवी शक्ती आहे. तू काही विश्वात्मक कार्य करू शकतो.
या शक्तीचा उपयोग तू समाजकार्यासाठी कर. अगोदर तू गाणगापूरला जाऊन दत्तगुरूंचे आशीर्वाद घे. श्री दत्त महाराज तुझे गुरु आहेत. मग जंगली बाबा गाणगापूरला गेले दत्तगुरूंचे दर्शन घेऊन परत श्री स्वामी समर्थांकडे आले. त्यानंतर स्वामींच्या सांगण्यावरून त्यांनी समाज कार्याला सुरुवात केली होती.ते ठिकठिकाणी प्रवचन करत, रामायण वाचून दाखवत. त्यांच्या या आध्यात्मिक कार्यात त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले. त्यामुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. या भ्रमण काळात महाराजांनी जमखिंडी जवळ कुडची गावातील मासाहेब दर्गा परिसरातील देवळे, समाधी ठिकाने,वृंदावणे यांचा पुनर्विकास केला होता.
पुढे ते जमखिंड आणि मिरज येथील भाविक व शिष्य परिवारासहित नरसोबावाडीला गेले होते. नंतर हुपरी जवळील कारदगा येथे काही दिवस त्यांनी वास्तव्य केले होते. येथील चार-पाच वर्षांच्या वास्तव्याच्या काळात त्यांनी तेथील बंगाली बाबा समाधीचे नूतनीकरण केले होते.त्याचप्रमाणे दूधगंगा नदीवर घाटाचे बांधकाम करून जनतेच्या समस्या सोडवल्या होत्या.तसेच सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील नेरले व रेठरे हरणाक्ष या गावांमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे भक्त आणि शिष्य परिवार होता.
नंतर त्यांच्या समाजकार्याच्या प्रवासात ते पुणे येथे आले. पुढे त्यांचे बरेचसे वास्तव्य आणि कार्य पुण्यात झाल्यामुळे बरेच जण त्यांना पुण्याचेच मानतात. जंगली महाराज हे लहानपणापासूनच खूप तल्लक बुद्धीचे होते. जंगली महाराजांनी मराठी, कन्नड,उर्दू, संस्कृत आणि फारशी या भाषांचा अभ्यास केला होता. तसेच त्यांनी मल्लविद्याचा, अनेक धर्माचा आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास केला होता. मंत्रोच्चार , राजयोग, हठयोग, योगशास्त्र आणि वेदांत यांचा अभ्यास करून नाथ संप्रदायातील साधुंसोबत त्यांनी आळंदी मध्ये साधना केल्या होत्या. तसेच येवला नगरीमध्ये त्यांनी एकांतात फार मोठी तपचर्या केली होती.
त्यांच्या तपश्चर्या नंतर ते त्यांच्या जागेवरून बाहेर आल्यानंतर तेथील लोकांनी फार मोठा आनंद साजरा केला होता.त्यामुळे जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप व्यापक झाला होता.पुढील काळात त्यांनी आपल्या वयातील तरुणांना धार्मिक शिक्षण देण्याची सुरुवात केली होती. पुढे जंगली महाराज यांनी 1868 मध्ये देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या घरापासून ते वैकुंठ गमनाच्या स्थळापर्यंत रस्ता बांधून घेतला होता. तेथे भक्तांसाठी धर्मशाळा व पुंडलिकाचे मंदिरही बांधले होते. त्यामुळे आजही तुकाराम बीज या दिवशी जंगली महाराज भजनी मंडळ भक्त पुंडलिकाची पालखी घेऊन देहुला जाते.
त्याचबरोबर अनेक देवस्थाने, मंदिरे यांचा जिर्णोद्धार करून धार्मिक उपदेश करणे, गरिबांच्या दुःखाचे निवारण करणे तसेच त्यांच्या सिद्धिप्राप्तीमुळे त्यांनी अनेक चमत्कार करून दाखवले व समाजसेवेची अनेक कामे त्यांनी केली. त्यांच्या समाजकार्यामुळे आणि समाज प्रबोधनामुळे त्यांची ख्याती राज्यभर पसरली होती. कित्येक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले होते. त्यांच्या प्रबोधनाचे प्रभावी परिणाम होत होते . त्यांचे कार्य इतके मोठे होते की, पुण्यातील एका रस्त्याला जंगली महाराज रस्ता म्हणून नामकरण केले गेले. तसेच अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने शाळा, धर्मशाळा, आणि मंदिरे उभारण्यात आली.
जंगली महाराज मंदिर हे पुण्यातील शिवाजीनगर येथे जंगली महाराज रस्त्यावर असून मंदिराच्या प्रवेशद्वारातून सतरा अठरा पायऱ्या चढून वर गेले असता प्रशस्त पाटांगण आणि पुढे सभा मंडप लागतो. पटांगणात 75 फूट उंचीचा ध्वजस्तंभ असून त्यावर भगवा ध्वज सतत फडकत असतो. येथील मंडप हंड्या आणि झुंबरांनी सुशोभित केलेला असून तेथेच डाव्या बाजूला नगारा आणि उजव्या बाजूला एक समाधी दिसून येते.ती समाधी जंगली महाराजांच्या गुरूंची आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. नगाऱ्याच्या डाव्या बाजूला एक छोटे मंदिर असून त्यात पादुकांची स्थापना केलेली आहे. जंगली महाराज त्यावेळी या ठिकाणी स्नान करीत असल्याचे सांगितले जाते.
मंडपाच्या आतील बाजूस दोन-तीन पायऱ्या चढून गेलं की समाधी लागते या समाधीच्या मागे जवळजवळ नऊ ते दहा फूट उंचीचे जंगली महाराजांचे तैलचित्र आपल्याला दिसते. असं म्हणतात की भांबुर्डे गावातील रोकडोबा मंदिरामध्ये त्यावेळी जंगली महाराजांचे वास्तव्य असायचे. रोकडोबाचे ते रूप हे भैरवाचे असल्याने त्या मंदिरात पशुबळी देणे, विंचू दंश झाल्यास देवासमोर वाद्यांचा गजर करून साकडे घालने,नवसपूर्तीसाठी माणसाला बगाडाला अडकवणे, एवढेच नाही तर रेड्याच्या झुंजी आणि तमाशा ही तेथे चालत होते. त्यावेळी या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी संत जंगली महाराजांनी रोकडोबा भैरोबाचं रूप बदलून त्याला मारुतीचे रूप दिले होते. देवापाशी रेड्यांच्या झुंजी ऐवजी आता कुस्तीचे आखाडे भरले जाऊ लागले होते.
बगाड, पशुबळी, तमाशा अशा अघोर प्रकारा ऐवजी कुस्त्या,व्यायाम, भजन,कीर्तन आणि गळ्यात विना अडकून अखंड हरी नामाचा जप तेथे सुरू केला होता. याचाच परिणाम म्हणजे त्यांनी स्थापन केलेले 1821 सालचं भजनी मंडळ अजूनही तितक्यात जोमाने कार्यरत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात रेठरे हरणाक्ष येथील प्रसिद्ध पठ्ठे बापूराव यांनीही जंगली महाराजांकडून सण 1865 मध्ये अनुग्रह घेतला होता. महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर पठ्ठे बापूराव हे कला क्षेत्राकडून भक्तिमार्गाकडे वळाले होते. त्यांच्या पुण्यातील कार्यकाळामध्ये आळंदीचे नृसिंह सरस्वती, पुण्याचे बीडकर महाराज, जोग महाराज, लोकमान्य टिळक इत्यादी थोर लोकांबरोबर महाराजांचा सत्संग होत असायचा.
पुढे 1890 च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालवली होती. आपल्या शेवटच्या काळाची चाहूल लागताच भांबूर्डयाच्या टेकडीवर त्यांनी स्वतःच आपली समाधीची जागा निश्चित करून ठेवली होती. 4 एप्रिल 1890 रोजी जंगली महाराजांचे निधन झाले. महाराजांच्या पश्चात त्यांच्या एकनिष्ठ शिष्या रखमाबाईंनी त्यांचा संप्रदाय पुढे चालवला. जंगली महाराजांना पुण्यातील तुळशीबाई इंगळे नावाच्याही एक शिष्या म्हणून लाभल्या होत्या. आज जर आपण त्यांच्या समाधीच्या जागी पाहिले तर त्यांच्या समाधी जवळच रखमाबाईंची आणि तुळसा आक्काची समाधी आहे. जंगली महाराजांनी कर्मकांड आणि अघोरी प्रकारांऐवजी मनोपासना आणि भक्ती भाव येथे रुजवला होता. पुण्यातील त्यांच्या समाधी स्थानी रोज सकाळ संध्याकाळ आरती व पंचपदी होते.
तसेच प्रत्येक गुरुवार व चतुर्मासातील एकादशीला रात्रीच्या वेळी भजनाचा कार्यक्रम महाराज होते तेव्हापासून ते आत्तापर्यंत चालू आहे. तसेच या ठिकाणी चैत्र पाडव्याला मोठा उत्सव भरतो. तो त्यांच्या समाधी दिनापर्यंत म्हणजे चतुर्दशी पर्यंत चालतो. यावेळी महाराष्ट्रातून अनेक कीर्तनकार, प्रवचनकार समाज प्रबोधन करून आपली सेवा करतात. तसेच या उत्सवासाठी पुण्यातून आणि महाराष्ट्रातून अनेक भाविक येतात आणि संत जंगली महाराज यांच्या समाधीवर डोके टेकवतात.