आचार्य रजनीश ओशो | Acharya Rajneesh Osho

 भगवान श्री रजनीश ज्यांना ओशो  किंवा आचार्य रजनीश ( Acharya Rajneesh Osho ) असेही म्हणतात. जास्त करून त्यांचे ओशो हे नावच प्रसिद्ध आहे. ओशो या शब्दाचा अर्थ स्वतःला मोठ्या प्रमाणात किंवा सागरात वाहून घेणारी व्यक्ती असा होतो. त्यांचे मूळ नाव चंद्र मोहन जैन असे होते. ओशो यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 साली कुजवाडा म्हणजेच सध्याच्या मध्य प्रदेश मध्ये झाला होता. त्यांच्या बाबतीत असे म्हटले जायचे की जेव्हा ते लहान होते, तेव्हा साधू ऋषींनी असे सांगितले होते की त्यांच्या कुंडलीमध्ये दर सात वर्षांनी मरण्याचा योग आहे. ते 21 वर्षाचे होईपर्यंत हा योग आहे अशी भविष्यवाणी करण्यात आली होती.

परंतु जर ते 21 वर्षांचे झाले आणि त्यांच्याबद्दल अघटीत असे काही घडले नाही.ओशो रजनीश यांचे वडील बाबूलाल जैन आणि आई सरस्वती जैन हे दोघे तरणपंथी जैन समाजाचे होते. ओशो रजनीश यांचे बालपण त्यांच्या आजी- आजोबांकडे गेले होते. ते सात वर्षाचे होईपर्यंत आजी आजोबांनी त्यांना सांभाळले. ओशो सात वर्षांचे असताना त्यांच्या आजोबांचे निधन झाल्यामुळे ते पुन्हा त्यांच्या आई-वडिलांकडे राहण्यास आले. लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि प्रचंड हुशार होते आणि त्यांचे वाचन खूप जास्त होते असे म्हणतात.

असे म्हटले जाते की ते लहान असताना कोणत्याही विषयावर डिबेट करण्याचा इंटरेस्ट होता आणि त्यात ते पारंगत सुद्धा होते. शाळेत असताना ते आपल्या शिक्षकांशी सुद्धा डिबेट करायचे. एक तरुण बुद्धिजीवी असलेल्या रजनीश यांनी भारतात सक्रिय असलेल्या वेगवेगळ्या धार्मिक परंपरेच्या गुरु आणि शिक्षकांना भेटी दिल्या तसेच त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून त्यांनी अंतरदृष्टी मिळवली होती. त्यांनी जबलपूरच्या विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. तसेच त्यांनी 1955 मध्ये बी ए आणि 1957 मध्ये सागर विद्यापीठातून एम ए ची डिग्री मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओशो 1957 मध्ये रायपूर मध्ये एका संस्कृत विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. पुढे त्यांनी जबलपूरच्या विद्यापीठात लेक्चरर म्हणून नोकरी केली होती.

1960 ते 1968 दरम्यान ओशो यांनी अनेक शैक्षणिक पदे भूषवली होती.त्यावेळी त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षक मानले जात होते. नोकरी करत असताना आणि नंतर सुद्धा  त्यांनी भारत भ्रमण केले होते. त्यानंतर त्यांनी धर्माचा, राजकारणाचा, आणि मानवी समस्यांचा अभ्यास केला होता. पुढे  त्यांना एक तीव्र अध्यात्मिक जागृती मिळाली होती असे सांगितले जाते. सुरुवातीला रजनीश यांनी जुन्या परंपरा आणि कर्मकांडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर पुढे त्यांनी धर्मावर आणि वेगवेगळ्या आयडॉलॉजी वर प्रवचने देण्यास सुरुवात केली. ते नेहमी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत प्रवचन करायचे आणि प्रवचन करत असताना अनुयायांना डोळे मिटवण्यास सांगायचे. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सर्व धर्म,जाती,पंथ,गरीब,श्रीमंत असे सर्व प्रकारचे लोक जमत होते.

धर्म आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यामुळे समाज दुभंगला जात आहे असे ओशो यांचे मत असायचे. परंतु नंतर 1966 मध्ये रजनीश यांनी आपल्या विद्यापीठाच्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि ते गुरु म्हणजेच आध्यात्मिक मार्गदर्शक आणि ध्यानाचे शिक्षक बनले. पुढे 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी अनेक लोकांना दीक्षा दिली. त्यांच्या सेक्रेटरी म्हणून लक्ष्मी नावाच्या एक महिला होत्या. त्या योग्य त्या व्यक्तीलाच त्यांच्या अनुयायी म्हणून निवडायच्या.

ज्यांनी परंपरेने संसार त्याग करून संन्यास घेतला होता त्यांना संन्यासी होऊन जगापासून अलिप्त होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पारिवारिक जीवनात राहूनही संन्याशी घेऊ शकता असे रजनीश जगाला नेहमी सांगायचे आणि पटवून द्यायचे. रजनीश यांनी त्यांच्या अनुयायांना, शिष्यांना आणि सर्व सामान्यांना  शंभर पेक्षा जास्त ध्यानाचे मार्ग शिकवले होते. त्यातील सर्वात गाजलेला प्रख्यात ध्यानाचा प्रकार म्हणजे डायनॅमिक मेडिटेशन. हे मेडिटेशन पाच भागात विभागलेले होते. या मेडिटेशन प्रकारात व्यक्त होण्यासाठी गाणे, ओरडणे, नाचणे हसणे असे सगळे प्रकार आणि प्रयोग समाविष्ट होते. शिवाय या अख्या प्रोसेस मध्ये फक्त मेडिटेशन नाही तर योगाभ्यास, श्वासावरचे कंट्रोल अशा विद्येचा  सुद्धा समावेश होता. आणि यामध्ये ओशो स्वतः पारंगत होते.

सुरुवातीला त्यांनी मुंबईतील चौपाटीवर भाषणे केली नंतर त्यांची भाषणे आणि प्रवचने मोठ मोठ्या सभागृहांमध्ये होऊ लागले होते.
1970 च्या दशकाच्या सुरुवातीला पहिल्यांदा पाश्चात देशातील लोक रजनीश यांच्याकडे आले होते. रजनीश हे त्यांच्या लैंगिक विषयी प्रगतीचा दृष्टिकोन यासाठी अधिक प्रसिद्ध झाले होते. लैंगिक मुक्तीचा त्यांनी उघडपणे प्रसार केला होता. तसेच त्यांनी क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडल्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. लेखक लुईस एफ कार्टर यांनी असे लिहून ठेवले आहे की, अगदी जबलपूर विद्यापीठासारख्या काही विद्यापीठांमध्ये त्यांनी तत्वज्ञान विषय शिकवला होता.

परंतु पुढे मात्र त्यांनी स्वतःचे तत्त्वज्ञान जोपासण्यास सुरुवात केली होती. नोकरी सोडल्यानंतर आचार्य ओशो रजनीश यांनी शिष्यांची नवी तुकडी म्हणजेच नव संन्याशी गोळा केले. आपल्या मार्गदर्शनाखाली मॉडेल संन्याशी तयार केले.त्यांचे शेकडो अनुयायी स्वतःला रजनीशी म्हणू लागले होते. अनेक रजनीश यांचे अनुयायी आणि भक्त रजनीश यांचा फोटो असलेले लाकडी माळ असलेले लॉकेट परिधान करत असायचे. तसेच आपल्या अनुयायांनी केसरी किंवा लाल रंगाचे ढिले कपडे घालावेत अशी त्यांची इच्छा असायची. त्यामुळे शरीरात नेहमी ऊर्जा संचारत राहते असे त्यांचे मत होते.नंतर ग्रीक वारस असलेल्या त्यांच्या एका अनुयायाने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथे एक मालमत्ता खरेदी केली. ती मालमत्ता  नंतर 1974 पासून त्यांचा मुख्य आश्रम बनला होता.

1981 ते 1985 दरम्यान ओशो अमेरिकेला गेले आणि अमेरिकेतल्या एका प्रांतात त्यांनी त्यांचा आश्रम सुरू केला होता. तेथील ओशो यांचा आश्रम साधारण 65 एकर पसरलेला होता. असे म्हटले जाते की ओशो फ्री सेक्स कन्सेप्ट चा प्रसार करणारे होते. तसेच त्यांचे अनुयायी त्यांच्या आश्रमात महिन्यात 90 हून अधिक वेळा एकापेक्षा जास्त पार्टनर सोबत शारीरिक संबंध ठेवायचे. फ्री सेक्स या त्यांच्या आयडॉलॉजी मागील कारणच असे सांगितले जाते की, लग्न परंपरा म्हणजे फॅमिली कन्सेप्ट च्या ते विरुद्ध होते.

त्याचप्रमाणे त्यांच्या आश्रमात एक नियम पाळला जायचा तो म्हणजे कोणा दोन व्यक्तींमध्ये संबंध प्रस्थापित होऊ नयेत यासाठी त्यांनी फ्री सेक्स ही कन्सेप्ट दृढ केली होती. आणि अशी जणू मान्यता दिली होती. त्यांच्या सेक्स आणि संभोग या विषयांच्या मतांबद्दल ते अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्या या विषयीच्या भूमिका नेहमीच वादग्रस्त ठरायच्या.ओशो यांची प्रसिद्धी फक्त भारतातच नव्हे तर अख्या जगात झाली होती. पुण्याच्या कोरेगाव पार्क मध्ये असलेल्या त्यांच्या आश्रमाला  त्यांचे अनेक शिष्य आणि अनुयायी आजही जात असतात. माहितीनुसार त्यांच्या या आश्रमाला 1976 पासून सुमारे 30000 फॉरेनर्स  भेट देतात.

त्यातील सुमारे 25 हजार फॉरेनर्स दरवर्षी येणारे असतात. तसेच यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नावाजलेले लोक सुद्धा असतात. सायंटिस्ट, इंजिनियर्स,डॉक्टर, राजकारणी,हॉलीवुड, मोठे मोठे व्यावसायिक आणि सिने अभिनेते या सर्वांचा यामध्ये समावेश असतो. बॉलीवूड मधील विनोद खन्ना, प्रवीण बाबी, आणि महेश भट हे सेलिब्रिटी लोक ओशो यांच्या  तत्त्वज्ञानाचे गाढे समर्थक होते. तसेच भारतामध्ये सुद्धा अनेक लोकांना त्यांचे विचार आवडत होते.

ओशोंनी समाजाला अनेक तार्किक गोष्टी शिकवल्या परंतु जनतेने लक्षात ठेवला फक्त सेक्स असेही काहींनी म्हटले आहे. तसेच कित्येकांनी जीवनाचे वास्तव सांगणारे सद्गुरु, महान दर्शनीक ओशो, सत्य म्हणजेच ओशो, विसाव्या शतकातील बुद्ध पुरुष ओशो, संभोग से समाधि की और म्हणजे ओशो, ग्रेट गुरु ओशो, प्रखर सत्य मांडणारे ओशो, ग्रेट फिलॉसॉफीयर ओशो, जीवनाचा सर्व बाजूंनी विचार करणारे ओशो असे त्यांच्या विषयी मत मांडले होते. प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी म्हटले आहे की, “ओशो हे भारतामधील सर्वात मौलिक विचारवंत लोकांपैकी एक होते.शिवाय ते सर्वात विचारी, वैज्ञानिक आणि कल्पक व्यक्ती होते.” अशी त्यांच्या विषयी चांगली मते मांडणारे थोर आणि  विचारवंत होते.लोकांच्या त्यांच्याविषयीच्या अशा मतामुळे अनेक लोक त्यांचे भक्त झाले होते.

ओशो यांचा जन्म भारतात झाला होता त्यांचा आश्रम ही पुण्यात होता. परंतु ओशो यांना त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भारत देश सोडावा लागला होता. यामागील कारण म्हणजे जेव्हा भारतामध्ये त्यांच्या कार्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळायला लागली होती तेव्हा भारतात इंदिरा गांधी यांचे सरकार होते आणि भारत सरकार त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे आश्रम, त्यांचे अनुयायी या सगळ्यांच्या विरोधात होते. गव्हर्मेंट  रिपोर्टनुसार ओशो यांच्यावरती सरकारकडून  अनेक आरोप लावण्यात आले होते. त्यांच्यावर सेक्स वरील विधाने,वेश्याव्यवसाय, सोने तस्करी, टॅक्स चोरी असे अनेक आरोप करण्यात आले होते. या सगळ्यामुळे ओशो यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. त्यामुळे त्यांचे अनुयायी रजनी सिन्हा यांना या सर्व गोष्टींचा राग आला होता.

तसेच  पुढे 1981 मध्ये ज्यावेळी ते ओरेगॉनला रवाना झाले त्याच वर्षी हिंदू कट्टर वाद्यांनी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता असे म्हटले जाते आणि म्हणूनच ओशो भारताबाहेर गेले होते. नंतर ते जेव्हा पुन्हा भारतात आले तेव्हा देशातील त्यांच्या उर्वरित अनुयायांनी त्यांचे भक्तिभावाने स्वागत केले. पुढे त्यांनी घाट मांडू पासून जागतिक दौरा सुरू केला. त्यात त्यांना तेरा वेगवेगळ्या देशात प्रवेश नाकारला होता. शेवटी ते पुन्हा मायदेशी परतले. त्यानंतर त्यांची तब्येत ढासळू लागली होती. मग ते सार्वजनिक ठिकाणी सुद्धा कमी प्रमाणात येऊ लागले. नंतर 19 जानेवारी 1990 मध्ये त्यांचे निधन झाले.

त्यांचा मृत्यू होऊन अनेक वर्षे झाली आहेत परंतु त्यांच्यावर लिहिण्यात आलेली पुस्तके आणि स्वतः त्यांनी लिहिलेली पुस्तके असंख्य लोक आजही वाचतात आणि अभ्यासतात. तसेच त्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ भाषणे अनेक लोक ऐकतात. त्यांच्याबद्दल एवढं प्रेम निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तात्विक विचार,कोणत्याही परंपरेचा किंवा कोणत्याही धर्माचा भाग न होता त्यांनी तर्कबद्ध विचारांचा प्रसार केला होता.

Leave a Comment