स्वातंत्र्यानंतरच्या काळात अत्यंत गाजलेलं एकमेव नाव म्हणजे बापू बिरू वाटेगावकर ( Bapu Biru Vategaonkar ) . सह्याद्रीच्या पर्वतरांगे जवळ सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील बोरगाव गावात इ.स.1922 मध्ये वीर बापू बिरू वाटेगावकर या ढाण्या वाघाचा जन्म झाला होता. धनगर समाजातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या या बापूंना लहानपणापासूनच तालमीतला गावठी व्यायाम करण्याचा आणि आखाडी कुस्त्या खेळण्याचा छंद होता. लहानपणापासून ते कधीच शाळेत गेले नाहीत त्यामुळे त्यांचे शिक्षण अजिबात झालेले नव्हते.
म्हणून अक्षर ओळख असण्याचा अजिबात संबंधच नव्हता. परंतु आई-वडिलांकडून मिळणारी तोंड माहिती,ओव्या,भजन,कीर्तन आणि प्रवचन हेच त्यांच्या शिक्षणाचे साधन होते. त्यांच्या आई-वडिलांनी सुद्धा लहानपणापासूनच त्यांना पैलवान बनवण्यासाठी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली होती. कृष्णा वारणेच्या खोऱ्यात जन्मलेला अध्यात्मिक आणि सात्विक तरुण बापू, शेतीची कामे करून घोंगडं अंगावर टाकून दिवसभर मेंढरामागे राहायचे आणि आई-वडिल आणि आपल्या पत्नी मुलांसोबत समाधानाने जगत होते. परंतु त्यांच्या गावातच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सर्वसामान्य जनतेचा छळ चालवला होता.
गरिबांच्या मुलींना छेडणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, दुकानदारांकडून फुकट किराणा आणि कपडे घेऊन जाणे , लोकांची फुकट कोंबड्या बकरी नेवून कापून खाणे असे वेगवेगळे प्रकारचे अत्याचार तेथील प्रख्यात गुंड रंगा शिंदे आणि त्यांच्या टोळीतील लोक करायचे आणि कोणी त्यांना उलटे बोललाच तर त्याला धमकायचे आणि वेळ प्रसंगी त्याचा खूनही करायचे. त्यातील महत्त्वाचा गुंड म्हणजे रंगा शिंदे गावगुंडांच्या टोळीचा मोहरक्या होता. तो आणि त्यांच्या साथीदारांनी गावात अन्यायाचा हैदोस माजवला होता.
शेतकऱ्यांचे ,कष्टकऱ्यांचे रॉबिन हूड समजले जाणाऱ्रे बापू बिरू वाटेगावकर हे अशा असह्य परिस्थितीत अन्यायाविरुद्ध पेटून उठले होते. ही गोष्ट आहे 1970 च्या दशकातली. सांगली जिल्हा म्हणजे त्या वेळेचा दक्षिण सातारा. कृष्णा नदी मध्ये बारमाही पाणी असल्यामुळे वाळवा तालुक्यातलं त्यांचे जन्मगाव बोरगाव हे तसं समृद्ध गाव होतं. त्यामुळे आजूबाजूच्या वाड्यावत्यांकडून अनेक तरुण आणि माणसे पोटापाण्यासाठी या समृद्ध गावाकडे कामधंद्यासाठी यायची. या गरीब लोकांकडे बघून तेथीलच काही धनदांडग्या लोकांनी आपली मनमानी येथे सुरू केली होती. त्यातूनच पुढे गाव गुंडांच्या टोळ्या वाढल्या.
याच बोरगाव मध्ये गरीब कष्टकरी शेतकरी धनगर समाजाच्या कुटुंबात बापू बिरू वाटेगावकर यांचा जन्म झाला होता. तालमीची प्रचंड आवड आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची धमक त्यांच्यामध्ये प्रचंड होती. संपूर्ण आयुष्यात अध्यात्माची प्रचंड आवड आणि निर्व्यसनी असे बापू प्रचंड शांत आणि समजदार होते. परंतु अन्याय त्यांना कधीच सहन होत नव्हता. याच बापू बिरू वाटेगावकर यांनी इ.स. 1966 मध्ये गावगुंड रंगा शिंदे चा पहिला खून केला. तेव्हा गणपतीचे दिवस होते. नेहमीप्रमाणे सार्वजनिक गणपती समोर ओव्यांचा कार्यक्रम चालू होता.
त्या कार्यक्रमात अचानक रंगा शिंदे घुसला आणि आत घुसून रंगा शिंदेने बायकांच्या अंगावर हात टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमात दंगा सुरू झाला. महिला इकडे तिकडे पळू लागल्या. नेमकंच त्या दिवशी बापू त्या कार्यक्रमाला आलेले होते. बापू रंगाला म्हटले की, अण्णा कशाला असलं काम करता, सणासुदीचे दिवस आहेत, शोभते का तुम्हाला हे! मग काय रंगा शिंदे फारच तापला कालचं धनगराचं हे पोरग मला शिकवतंय असं म्हणून तो बापूंच्या अंगावर आला. परंतु बापूंनी त्यावेळी जरा नमतेच घेतले. आणि गोड बोलून त्याला गणपतीच्या पाठीमागे नेऊन घोंगडी अंथरून बसा आपण पान खाऊ असे म्हणाले.
त्या अगोदर रंग्याला एका मातंग समाजातील मुलीच्या खुणाबद्दल अटकही झाली होती. परंतु पुरावा आणि साक्षीदार मिळाला नसल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले होते. पहिलाच तो बापूंना राग आणि आज पुन्हा रंग्या शिंदे चा दंगा हे बापूंना सहनच झाले नाही. त्यावेळी बापूंच्या कमरेला चाकू आणि हातात कुऱ्हाड होती परंतु कुऱ्हाडीने वार करताना कोणी बापूंना पकडू शकते म्हणून रंग्याचा खून बापूंना चाकूने करायचा होता. परंतु बसल्या जागी चाकू उघडता येत नसल्यामुळे बापू उठले. बापू उठताच रंग्याला शंका आली आणि तो म्हणाला का रे काय झाले. बापू म्हटले की लघवीला जाऊन येतो, येतो काय? रंग्याने नको म्हणून मान हलवली. आणि बापू लघवीला म्हणून गेले आणि चाकू उघडून कमरेला खोसून आले.
आल्याबरोबर रंगाच्या पोटात चाकूने वार करून रंग्याचा कोथळा बापूंनी बाहेर काढला आणि तेथेच त्याला ठार केले. त्यादिवशी तेथील पंचक्रोशीत पुरणपोळीचे जेवण करून लोकांनी आनंद उत्सव साजरा केला होता. त्यानंतर रंगा शिंदेच्या मामानी बापूला मारण्यासाठी बंदुकीचे लायसन घेतले होते. त्याची माहिती मिळतात त्याला सुद्धा बापूंनी गोळ्या घालून ठार केले. तसेच ज्यांच्यापासून बापूंना भीती आहे त्यांनाही मारून बापूंनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट शेतात खड्डे खोदून लावली होती. या काळात त्यांनी बऱ्याच गावगुंडांना कंठस्थान दाखवले परंतु पुढे पोलिसात त्यांनी फक्त 12 खून केल्याची कबुली दिली होती.
त्यातच त्यांनी परस्त्री वर अन्याय करणारा आपला स्वतःचा मुलगा तानाजी वाटेगावकर यालाही गोळ्या झाडून मारले होते. तसेच आपल्या नावावर लोकांना दमदाटी करून पैसे उखळणाऱ्या बापूंच्या चार साथीदारावरही बापूंनी हल्ला केला होता. बायकोला न नांदवणारे, आया बहिणींची अब्रू लुटणारे असे बरेच जण बापूंनी इतिहास जमा केले होते. हे सगळं करत असताना त्यांच्यावर कित्येक खुणाचे गुन्हे दाखल झाले परंतु ते पोलिसांना सापडत नव्हते.
बापूंचा पत्ता माणसं कधीच सांगत नव्हते उलट त्यांनाच पोलीस आल्याच्या खबरा द्यायचे . ते तब्बल 25 वर्ष पोलिसांना सापडलेच नाहीत.अनेक वर्ष ते वेगवेगळ्या ठिकाणी उसामध्ये लपवून बसायचे. त्यांना मदत करणारी त्यांचीही 35 ते 40 जणांची एक टोळी तयार झाली होती. त्या टोळीतील दोन-तीन जण त्यांच्यासोबत थांबायचे. तेथील पंचक्रोशीतील लोक त्यांच्या जेवणाची बरोबर व्यवस्था करत होते. मिळेल ते खायचे आणि उसातच मुक्काम ठोकायचा अशी त्यांची दिनचर्या होती.
असंच एकदा बापू रात्रीच्या वेळी बारा वाजता दहेगावच्या राम लिंगाच्या मंदिरात गेले होते. तेथेच मंदिरात एक महाराज जप करीत बसले होते. दिवसा भाविकांमुळे जप होत नाही म्हणून रात्रीचा जप करायचा असा त्यांचा नियम होता. बापूंनी देवाचे दर्शन घेऊन बापू बाहेर पडत असताना ते महाराज त्यांना आडवे आले आणि म्हणाले इतक्या रात्रीच का आलात. बापू म्हणाले पोलिसांचे भ्या दुसरं काय. मग पुजाऱ्याने ओळखले आणि तुम्ही बोरगावकर का असे म्हणून तुमच्या कामाला आमच्याही शुभेच्छा असे म्हणाले. फक्त मटन खाऊ नका ,व्यसन आणि बाई यांपासून दूर राहा , बाकी वाईटांचा नाश करणे हे पुण्यच आहे असे म्हणाले. ते महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य जोगळेकर महाराज होते. म्हणूनच पुढे बाप्पू महाराजांच्या याच वाटेने वागू लागले.
एकदा महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी खास SRPF टीमला बोलावण्यात आले होते अशी सगळीकडे चर्चा होती. या टीमने उसाचे मळे पालथे घालण्यास सुरुवात केली. या टीम मधील पोलीस खास प्रशिक्षित होते. पाण्यात बुडी घेऊन दबा धरून बसायचे अशी गावात चर्चा सुरू झाली. मग बापूंनी कृष्णा नदीत उडी मारून नदी पार केली आणि ते थेट किर्लोस्करवाडीला पोहोचले. त्यानंतर ते तिथून रेल्वेत बसून थेट नाशिक पंचवटीला गेले. तेथे भगवी कपडे परिधान केले आणि बारा वर्ष केदारनाथ पासून ते गंगासागर पर्यंत सर्व तीर्थक्षेत्र करत त्यांनी भारत भ्रमण केले. बारा वर्षानंतर ते पुन्हा सांगली जिल्ह्यात आले होते.

त्यानंतर जुने खेडच्या परिसरात त्यांना शिताफीने अटक करण्यात आली. कळंबा जेल मधून सांगली कोर्टात सुनावणीसाठी आणत असताना एसटी बस आडवी लावून शीगावच्या त्यांच्या एका एसटी ड्रायव्हर जोडीदाराने तमदलगे येथून त्यांची सुटका केली.त्यानंतर 20 ऑगस्ट 1993 ला कोल्हापूर वरून दोन वयोवृद्ध पोलीस बापूला सांगली सत्र न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन येत होते. तमदलगे फाट्यावर आल्यानंतर रवी पाटील आणि शिवाजी वाटेगावकर यांनी ड्रायव्हरच्या काचेवर फायरिंग करून गाडी थांबवायला लावली आणि पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्या काढून घेऊन या दोघांनी तेथूनही बापूंची सुटका केली.
त्यानंतर काही काळातच जत तालुक्यातील वस्पेट येथे त्यांना पाहिल्यानंतर उमदी येथे बापू बिरूंना परत जेरबंद करण्यात आले आणि ही सगळी कामगिरी करणारा जिगरबाज पोलीस कर्मचारी होता दिलावर पटेल. एक दिवस सांगली पोलीस हेडकॉटर ला हजेरी चालू असताना तेथील आरपीआय ने सर्व पोलिसांसमोर इसमे कोई माय का लाल है क्या? जो बापू को पकडेगा! असे आव्हान केले होते. असा जर कोणी असेल तर त्याने लाईन तोडून पुढे यावे असे तो म्हणाला. त्यावेळी इतक्या वर्षे बापू सापडत नाहीत म्हणून पोलिसांसाठी हा विषय अब्रू घालणारा झाला होता. त्यावेळी 40-50 पोलिसांमधून एक दिलावर पटेल नावाचा पोलीस पुढे आला आणि मी प्रयत्न करतो असा म्हणाला.
त्यावेळी त्याची इतर पोलिसांनी फार टिंगल उडवली होती त्याला म्हणायचे तोंड बघ आरशात बापूला पकडायला निघाला. परंतु बापू पकडले जाईना म्हणून तेथील दोन वयोवृद्ध पोलिसांना निलंबित करण्यात आले होते आणि हाच राग धरून दिलावर पटेल बापूंच्या मागावर होते. पुढे 16 ऑक्टोबर 1993 रोजी दिलावर पटेल यांनी बापूंना आणि रवी पाटील यांना एका लाकडाच्या गाडीतून उतरून एसटी बसेस मध्ये चढताना पाहिले. परंतु दिलावर पटेल यांच्याकडे त्यावेळी काही हत्यार नव्हते आणि सोबत इतर पोलीसही नव्हते.
ते एका साप्ताहिक सुट्टीवर असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. परंतु त्यांनी त्याचवेळी विचार करून त्यांच्या भावाला आणि एका साथीदाराला त्याच एसटी बसेस मध्ये जाण्यास सांगितले. एसटी बस मध्ये दिलावर पटेल यांच्या भावाला पाहून रवी पाटील यांना शंका आली आणि तो एसटीतून मध्येच उतरला आणि पळून गेला. त्यादिवशी रविवार असल्यामुळे आणि त्यावेळी मोबाईलची सुविधा नसल्यामुळे दिलावर पटेल यांनी पोस्ट ऑफिस चा दरवाजा पहारीने तोडून पोस्ट ऑफिस मध्ये असलेल्या लँडलाईन फोनवरून पुढील उमदी पोलीस स्टेशनला बापू ज्या एसटी बस मध्ये बसले होते त्या एसटी बस चा नंबर आणि इतर माहिती सांगितली.
त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत येथे उमदी पोलीस स्टेशन कंट्रोल ने सापळा रचून बापूंना पकडले. तोपर्यंत दिलावर पटेल तेथे पोहोचले होते. त्यानंतर बापूंना जन्मठेपेची शिक्षा झाली. येरवडा जेल मध्ये असताना बापूची भेट अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीशी झाली होती. एकदा गवळीनी त्यांना विचारले होते की मी एवढा मोठा डॉन असून सुद्धा फक्त तुझीच चर्चा असे का? . त्यावेळी बापूंनी मी पैशासाठी नाही तर अन्यायाविरुद्ध लढतो असे उत्तर दिले होते. जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी आले आणि तिथून त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण लागले. त्यांनी भजन, कीर्तने करायला आणि अध्यात्मिक प्रवचने आणि भाषणे करायला सुरुवात केली. निर्व्यसनी राहा, गुन्हेगारीचे आयुष्य जगू नका, असे ते समाजाला सांगू लागले.
शिक्षा भोगून झाल्यानंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी वाटेगावकर यांनी भरपूर प्रयत्न केले. पुढे इस्लामपूर येथील हॉस्पिटल मध्ये वयाच्या 96 व्या वर्षी 16 जानेवारी 2018 मध्ये बापूंची प्राणज्योत मावळली आणि कृष्णा काठचे वादळ कायमचे शांत झाले सांगली,सातारा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकशाहिरांनी त्यांच्यावर पोवाडे आणि कविता रचल्या. जत्रांमध्ये होणाऱ्या तमाशातही त्यांच्या कथा सांगितल्या गेल्या.
बापूंच्या जीवनावर रामचंद्र बनसोडे यांनी लिहिलेले “कळंबा जेल चा कैदी “ हे वगनाट्य त्यावेळी फार गाजले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या आयुष्यावर तयार झालेला बापू बिरू वाटेगावकर हा चित्रपटही येऊन गेला. डोक्यावर पिवळा पटका, वाढलेली पांढरी दाढी मिश्या, कपाळावर भंडारा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी असा वेष असलेले बापू बिरू वाटेगावकर आणि त्यांनी केलेल्या पहिल्या खुणाची कथा गावागावात रंगून सांगायचे.

त्यांचे व्हिडिओ अनेक लोकांनी युट्युब आणि फेसबुक वर हजार वेळा पाहिले. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा खूप वेळा लोकांनी त्यांच्या ह्या कथा ऐकल्या. कोणी त्यांना प्रेमाने बापू म्हणून हाक मारायचे तर कोणी त्यांना ढाण्या वाघ बोलायचे. तर कोणी रॉबिन हूड म्हणायचे. सुमारे 93 वर्षे जगलेल्या या सांगलीतल्या लोकांच्या भल्यासाठी गुन्हेगारीत जाऊन चांगले काम करणाऱ्या बापूंच्या लोक पाया सुद्धा पडायची. तरुण त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायचे, गावोगावी त्यांना प्रवचनांसाठी बोलावले जायचे. अशी या आधुनिक संतांची कहाणी जितकी रंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे.
👌👌
खूप सुंदर लेख आहे 👌