( अभंग क्रमांक – 486, 1287, 1969, 1281,2335)
अभंग ( Abhang)
धांव घाली आई। आतां पाहातीस काई ।।१।।
धीर नाही माझे पोटी । झालो वियोग हिंपुटी ॥२॥
करावे शीतळ । बहु झाली हळहळ ।।३।।
तुका म्हणे डोई। कई ठेवीन हे पायी ।।४।। ४८६
अर्थ – हे विठाबाई, आई, माझ्या बालकाविषयी धांव घे. काय पहात बसली आहेस ?
माझ्या हृदयात किंचितही धीर नाही. तुझ्या वियोगाने मी फार कष्टी झालो आहे. मला अतिशय ताप होत आहे मला शीन झाला आहे.तो शांत कर. तुकाराम महाराज म्हणतात मी आपले डोके तुमच्या पायावर कधी ठेवीन असे झाले आहे.
चिंतन – या अभंगात तुकोबाराय देवीचा धावा करतात. देवाशी संबंध ठेवताना भक्तिशास्त्रात पाच भाव आहेत. १) शांत २) वास्य ३) सख्य ४) वात्सल्य ५) माधुर्य. शांत भावास परमार्थात विशेष महत्व नाही. शांतभाव म्हणजे- देव राजा,जीव प्रजा.राज्याचा व प्रजेचा संबंध फार कमी वेळा येत असतो. बाकी चारभावापैकी दोन गौण व दोन मुख्य आहेत. दास्यभाव म्हणजे देव मालक आपण नोकर, नोकर मालकांस सोडून जाऊ शकतो अथवा मालक नोकरास हाकलून देऊ शकतो.
तिसरा सख्यभाव म्हणजे देव मित्र आपण मित्र, पण काही कारणाने मित्रात वितुष्ठ येते. चौथा वात्सल्यभाव म्हणजे देव माता-पिता जीव लेकरू, पांचवा कांतभाव म्हणजे देव पती आपण पत्नी. हे दोन मुख्य भाव आहेत. आईवडिल वारले तर कायद्याने संपत्ती मुलाच्या नांवाने होते. यापेक्षा नवरा वारला तर संपत्ती बायकोच्याच नांवाने होते. सध्या नवराबायकोच्या संबंधात खटके उडायला लागले आहेत पण आई मात्र मुलांवर प्रेम करते जरी नालायक असला तरी.
अभंग
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंग ।।१।।
उपवास पारणी राखिला दारवंटा । केला भोगवटा आम्हालागी ।।२।।
वंशपरंपरा दास मी अंकिता । तुका मोकळिता लाज कोणा ।।३।। १२८७
अर्थ– हे देवा पांडुरंगा, तुझी चरणसेवा करणे ही माझ्या वडिलांची मिरास (वतनदारी) आहे. माझ्या वाडवडिलांनी उपास करणे आणि आदि व्रर्ते करून तुमचे द्वार रक्षण करुन हा वर सुचविलेला वाटा आम्हाला भोगण्याकरीता ठेविला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी वंश परंपरेने तुमचा आज्ञाधारक दास आहे. आता माझी जर आपण उपेक्षा केली तर ही लाज कोणाला बरे!
चिंतन – तुकोबाराय पांडुरंगासमोर उभा राहून देवास जाणीव करून देतात. थोडा हक्क सांगतात, अधिकार वाणीने बोलतात. महाराज म्हणतात माझ्या वाडवडिलांनी तुझी सेवा केली आहे. अर्थात ती त्यांची मिरासी म्हणजे वतनदारी आहे. तुकोबारांच्या घराण्यांत पांडुरंगाची वारी परंपरा होती. ती त्यांनी मेहनत करून अट्टाहास करुन सांभाळली होती.
यांचे मूळ पुरुष आहेत. विश्वंभर बाबा हे महिन्यांची वारी करीत होते. विश्वंभर बाबांचे दोन पुत्र हरि-मुकुंद, हरिपुत्र विठोबा, विठोबाचा पुत्र पदाजी, पदाजीचा शंकर, शंकराचे कान्होबा, कान्होबाचे बोल्होबा व बोल्होबाचे तीन पुत्र सावजी, तुकोबाराय व कान्होबा. महाराजांचे वडिल पंढरपूरची वारी निष्ठेने करीत होते. ही त्यांची मिरासी, वतनदारी होती.
अभंग
सिंचन करितां मूळ । वृक्ष ओलावे सकळ ।।१।। नको पृथकाचे भरी । पडों एक सार धरी ।।२।। धृ ॥ पाणचोऱ्याचे दार । वरील दाटावे ते थोर ।।३।।
वश झाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ।।४।।
एक आतुडे चिंतामणर्णी । फिटे सर्व सुख धर्णी ।।५।।
तुका म्हणे धांवा । आहे पंढरीं विसावा ।।६।। १९६९
अर्थ -झाडाचे वेगवेगळ्या फांदयास पाणी न घालता मुळास घातले तर ते सर्व झाडास पोहचते. त्याप्रमाणे वेगळाल्या देवांच्या भरी न पडता (सारभूत जो एक देव) आहे तो देव चित्ताने बळकट धरावा. गारूड्याजवळ एक पाणचोर म्हणून पात्र (भांडे) असते. त्यास पुष्कळ भोके असतात. त्यातील भरलेले पाणी राहाण्याकरीतां वेगवेगळ्या छीद्रास हात न लावता त्याचे वरील एक तोंड दाबून धरल्यास पाणी कायम रहाते.
एक राजा वश करुन घेतला म्हणजे सर्व प्रजा आपल्या स्वाधीन असल्यासारखी आहे. इच्छिलेले पदार्थ देणारा जो चिंतामणी तो सापडल्यास सर्व सुख मिळण्याची इच्छा पूर्ण होते. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे (सर्वांना मूलभूत जो सकळ ब्रह्मांडाचा स्वामी) तो पंढरीस आहे. याकरीता तुम्ही तेथे त्वरेने जा, म्हणजे तुम्हास विश्रांती मिळेल.
चिंतन – तुकोबारायांचा हा उपदेशपर अभंग आहे. तसेच हा अभंग अनन्यता दर्शवितो. पृथक म्हणजे वेगवेगळ्या देवतांची उपासना न करता एका पांडुरंगाची, पंढरी निवासी परमात्मा विठ्ठलाची उपासना केली तर सर्व देव खूष होतात, सर्वसुखाची प्राप्ति होते. हा सिध्दांत सांगण्याकरीता महाराज चार दृष्टान्त वापरतात. एकापेक्षा एक सरस ! सिध्दान्ताकरीता दृष्टान्त महत्वाचा असतो.
पहिला दृष्टान्त झाडाचा, दुसरा यंत्राचा, तिसरा माणसातील राजाचा व चौथा दृष्टान्त दिव्य स्वर्गातील वस्तूंचा आहे.
महाराज सांगतात जर झाडाच्या मुळास पाणी घातले तर फांद्यांना, खोडाला, पानांना, फुलांना वेगळे पाणी घालण्याची गरज नाही. भागवतात या अर्थाचा सुंदर श्लोक सुद्धा आहे.
अभंग
शेवट तो भला । माझा बहु गोड झाला ।।१।। आलो निजाच्या माहेरा । भेटी रखुमाईच्या वरा ।।२।।
परिहार झाला । अवघ्या दुःखाचा मागिला ।।३।। तुका म्हणे वाणी । गेली आता घेऊ धणीं ।।४।। १२८१
अर्थ– माझा अखेर (शेवट) परिणाम फार चांगला झाला. रखुमाईचा पती जो माझा आई बाप त्याच्याकडे मी आलो. आता मागील सर्व दुःखांचा नाश झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाचा ही हरीकडे गेल्यामुळे आता त्याचेच चिंतन तृप्त होईपर्यंत करू.
चिंतन – या अभंगात महाराज स्वतःचा अनुभव प्रगट करतात. एक कोटी व्यक्ति, शक्ति, युक्ति, संपत्ती, निती, भक्ति, विरक्ति, अनुभूती. संतांच्या अनुभवाचा जगास फायदा होतो. संसारी लोकांचा काय अनुभव, जन्माला आलो, शिकलो, नोकरी धरली, लग्न झाले, २-३ मुले झाली त्यांना शिकविताना आयुष्य संपत चालले.
त्यांची लग्ने झाली. नातु झाले. नात-नातवांना खेळवता खेळवता आयुष्य संपले. एक दिवस यम न्यायला आला व घेऊन गेला. संपला आपला अनुभव ! पण संतांनी, संसार करता करता साधना केली. देव मिळविला. जन्म-मरण संपविले. परमानंद प्राप्त केला व जगास अनुभव लिहून ठेवला.
अभंग
भावें गावें गीत । शुध्द करूनिया चित्त ।।१।।
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाय ।।२।।
आणिकांचे कानीं । गुणदोष मना नाणी ।।३।।
मस्तक ठेंगणा । करी संताच्या चरणां ।।४।।
वॅची ते वचन । जेणे राहे समाधान ।।५।।
तुका म्हणे फार । थोडा तरी परउपकार ।।६।।२३३५
अर्थ – अहो जन हो, तुम्ही आपले चित्त शुध्द करून भावाने हरिनामाचे गीत गा. तुम्हाला जर देवाची प्राप्ति करुन घेणे आहे, तर हा उपाय सोपा आहे. दुसऱ्याचे गुणदोष कानांनी ऐकू नये व मनात देखिल येऊ नयेत. संतांच्या चरणांवर लीन होऊन मस्तक ठेवावे. ज्या योगाने चित्तास समाधान होईल, असे शब्द बोलावे (नाही पेक्षा मौन असावे) तुकाराम महाराज म्हणतात लोकांवर पुष्कळ उपकार करावे अगर थोडे तरी करावे.
चिंतन– जगात अनेक जीव आहेत. ८४ लक्षयोनी, ४ खाणी, ३ गुणी जीव आहेत. या सर्व जीवात माणसांस विशेष महत्व आहे. माणसांत पण सात्विक, राजस, तामस गुणांची माणसे आहेत. सगळ्यात भिन्नता आहे. प्रत्येकाचे भाग्य, वाणी, प्रकृति, आकृती, वचन, विवेक, अक्षर वेगळे आहे. अंगठ्यास ठसे वेगळे आहेत. उंची, वजन, स्वभाव, चाल, टोपी सर्व वेगळे आहे.