मळगंगा देवी- निघोज | Malganga Devi

अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील निघोज या गावी मळगंगा मातेचे ( Malganga devi ) मंदिर आहे . निघोज आणि शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या दोन गावाच्या सीमेवरती कुकडी नदी वाहते. या नदी च्या पात्रा मधे आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध असे रांजण खळगे ( पाण्याच्या प्रवाहामुळे नदीपात्रात खडकाला पडलेले मोठे खड्डे ) असून नदी च्या दोन्ही तिरावरती कुंडमाऊली म्हणजेच मळगंगेची मंदिरे आहेत, त्या मुळे या ठिकाणाला धार्मिक, भौगोलिक आणि शास्त्रीय महत्व प्राप्त झालेले आहे. राज्य शासनाने या तीर्थ क्षेत्राला “ब ” वर्गाचा दर्जा दिलेला आहे. या तीर्थ क्षेत्राला भाविक,भूगोलअभ्यासक,इतिहास संशोधक,पक्षी प्रेमी पर्यटक, विद्यार्थी भेट देत असतात.

मळगंगा देवी मंदिर
नवसाला पावणारी देवी म्हणून मळगंगा मातेची ( Malganga mata ) ख्याती संपूर्ण महाराष्ट्र भर आहेत. देवीचे हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. मळगंगा मातेची मंदिरे, निघोज, दरेवाडी, बेलापूर, करंदी, उंब्रज, घोलवड, चिंचोली या सात ठिकाणी असून निघोज हे देवीचे मुख्य ठिकाण आहे. निघोज गावामध्ये मळगंगा मातेचे संगमरावरामधील अतिशय सूंदर आणि मोहक मंदिर आहे. जवळच एक हेमाडपंथी बारव (विहीर ) असून चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता या बारवे मधून मातीची घागर दर्शन देते. आजच्या युगातला हा एक दैवी चमत्कारच आहे. पूर्वी येथे चांदीची घागर निघायची,आता येथे प्रति वर्षी मातीची घागर निघते. ही घागर पाहण्यासाठी तेथे भाविकांची तुडुंब गर्दी असते. या घागरी ची मिरवणूक काढून परत कुंडा मधे विसर्जीत केली जाते.

येथूनच साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर कुकडी नदी तिरावरती कुंड माउलीचे मळगंगामातेचे मंदिर आहे. पैल तीरावरती पण कुंडमाऊली म्हणजेच मळगंगामातेचे मंदिर आहे. चैत्र महिन्यामधे येथे मोठी यात्रा असते. मळगंगा मातेच्या यात्रेची सुरवात आधी हळद दळण्या पासून होते मातेची हळद चोळी पातळ घेऊन मिरवणूक निघते. देवीला हळद लावली जाते. विशेष म्हणजे हळद लागल्या नंतर देवीच्या पूजेचा मान हा महिलांचा असतो. त्या नंतर मुख्य यात्रेची सुरवात होऊन हा उत्सव साधारण तीन दिवसाचा असतो.

1) पहिल्या दिवशी देवीला अंबील वर्तवणे, त्या नंतर बगाडगाडा मिरवणूक निघते, नंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते रात्री काठ्या व पालख्यांची मिरवणूक निघते
2)दुसऱ्या दिवशी सकाळी मळगंगा देवीच्या घागर मिरवणूक निघते. दुपारी काठ्या पालखीची मिरवणूक काढून कुंडाकडे प्रस्थान केले जाते
3) मळगंगा देवींची कुंडावरील यात्रा होते आणि कुस्त्यांचा जंगी आखाडा असतो. या सोबत पैल तिरावरती टाकळी हाजी हद्दीतील मंदिराची याच दिवशी यात्रा असते.

मळगंगा माता माहात्म्य
धूमराक्ष नावाच्या राक्षसाने घोर तापश्चर्या करून देवाकडून वरदान प्राप्त केले की कोणी हि वीर पुरुष त्याचा वध करू शकत नाही. वर मिळाल्या नंतर त्याने देवी देवताना त्रास देण्यास सुरवात केली. सर्व देव शेवटी महादेवास शरण गेले त्याचा वध करण्यासाठी प्रार्थना करू लागले. भगवान शंकराने पार्वती मातेस विनंती केली की तुम्ही त्या राक्षसचा अंत करावा, परंतु पार्वती मातेने आधीच नऊ अवतार घेऊन अनेक दैत्यांना यम सदनी पाठवले होते. पार्वती मातेने सांगितले मी थकले आहे मी त्या सोबत युद्ध नाही करू शकत. मग महादेवांनी आपल्या जटेमधील गंगा मातेस आव्हान केले आणि धुरापासून तयार झालेल्या धूमराक्ष दैत्याचा वध करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपवले. त्यांना युद्धात मदत करण्यासाठी साती आसरा (अप्सरा )या सात बहिणींना त्यांच्या सोबत पाठवले.

गंगा मातेने त्या राक्षसचा वध केला. गंगा माता युद्धामुळे थकल्या होत्या त्या मुळे विश्रांती साठी निघोज या ठिकाणची निसर्गरम्य वातावरण पाहून तेथेच सात आसरा सोबत थांबल्या. देवीला विश्रांती साठी मंदिर बांधण्याची इच्छा निर्माण झाली. या सात आसरा एका भक्ताच्या स्वप्नात गेल्या आणि त्याला मंदिर बांधण्यास सांगितले. भक्त गरिब असल्यामुळे तो मंदिर बांधण्यास असमर्थ होता. या सात असरांनी त्याला सोने देऊन मंदिर बांधण्यास सांगितले. भगवान महादेवास हि गोष्ट समजली त्यांनी आपल्या गणांना मंदिर बांधण्यासाठी मदतीला पाठवले. मंदिराचे काम पूर्ण झाले आणि माळगंगा माता तेथेच वास्तव्यास राहिल्या. तेथे बांधलेली हेमाडपंथी बारव हि मातेच्या नित्य स्नानासाठी बनवलेली आहे ,अशी अख्यायिका आहे. भगवान शंकरास मळेश्वर असेही संबोधले जाते. मळगंगा देवी हि स्थानिक नागरिकांची कुलदेवी तसेच ग्रामदैवत आहे.

रांजण खळगे (Pot holes )
निघोज या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध रांजण खळगे आहेत. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. निघोज येथील कुकडी नदीच्या पात्रात अनेक लहान, मोठे, उंच,खोल, अशी कुंड (खळगे )तयार झालेले आहे. येथे बेसॉल्ट नावाचा खडक असून या कठीण आणि मृदू खडकाच्या थरा मधून पाण्याच्या प्रवाहासोबत दगड गोटे वाहत असतात या मधे मृदू खडकाची झीज होऊन तेथे रांजण खळगे तयार होतात, पाण्याचा भवरा आणि दगड गोटे यांच्या घर्षणाने हे रांजण खळगे तयार झाले आहेत. हे रांजण खळगे तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड लागतो. हजारो वर्ष लोटल्या नंतर आपल्याला निसर्गाचा असा चमत्कार आपणास पाहावयास मिळतो. निघोज येथील रांजण खळग्यांची दुनिया पाहून पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ शिल्पकार हा निसर्गच आहे याची प्रचिती या मधून आपणास येते. या नदी पत्रातील रांजण खळग्यांची ची सुंदर अशी शिल्प पाहताना आपले मन मंत्रमुग्ध होऊन जाते. नदीच्या दोन्ही बाजूस रांजण खळग्याच्या भिंती तयार झाल्या आहेत. या खळग्या मधील पाणी हे कधीच अटत नाही.

तीनहि ऋतू मधे आपणास निसर्गाचे वेगवेगळे रूप येथे पाहावयास मिळते. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपणास येथे पाहावयास मिळतो. येथे रांजण खळग्या मधे सतत पाणी साठवून राहते त्या मुळे येथे आपणास हायड्रीला हि जलीय वनस्पती पाहायला मिळते. तसेच येथे Cliff Swallow नावाचे पक्षी असून खडका मध्ये त्याची मातीची घरटी बनवलेली आहेत साधारण सप्टेंबर महिन्यामधे हे पक्षी घरटे बनवत असतात. नदीच्या दोन्ही तिराला जोडणारा झुलता पूल येथे बनवलेला असून, या पुलावरून निसर्गाची अद्भुत किमया आपण पाहू शकतो. हा परिसर निसर्गरम्य असून नदीच्या दोन्ही बाजूस मळगंगा मातेची मंदिरे असून कुंड माऊली या नावाने प्रसिद्ध आहे. कुकडी नदी आणि कुकडी पाटबंधारे प्रकल्पामुळे येथील परिसर अतिशय सुजलाम सुफलाम झाला आहे.

1 thought on “मळगंगा देवी- निघोज | Malganga Devi”

  1. The best natural beauty means, it is the natures own Canvas, which attract many pilgrimages.
    The voice of water day and night is the best natural music.
    As John Keats said in his poem that,
    ” Natures music never die “.Nature has its own music, own song, if only we have time to listen and a heart to understand..

    Reply

Leave a Comment