संत नरहरी सोनार | Sant Narhari Sonar

वारकरी संप्रदायातील प्रथम शैव  उपासक संत नरहरी सोनार ( Sant Narhari Sonar ) यांचा  जन्म इ.स.११९३ ( शके १११५ ) पंढरपूर येथे झाला. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते. शैव आणि वैष्णव यांच्यातील भेद मिटवण्यासाठी त्यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या सोनार कुळात वडिलोपार्जित शिव ऊपासना पूर्वापार चालत आलेली होती. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा होते.

त्या मंगळवेढ्या जवळील ब्रह्मपूरी गावच्या श्रीपती पोतदार यांची मुलगी व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. त्यांचा विवाह गंगाबाईंशी वयाच्या 18 ते 20 व्या वर्षाच्या दरम्यान झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते.परंपरेने त्यांचा सोनारी कलात्मक व्यवसाय होता. दीर्घायुष्य महान योगी चांगदेव महाराज यांनी नरहरी सोनार महाराज यांना आशीर्वाद दिला होता की त्यांच्याकडून हरी आणि हराचा म्हणजेच विठ्ठल आणि शंकर यांचा समन्वय होईल. लहानपणापासूनच घरात नरहरी यांच्यावर शिवभक्तीचे संस्कार  होते. तसेच त्यांची बुद्धी कुशाग्र होती.

बालपणात त्यांनी अनेक शिवस्रोते तोंडपाठ केली होती. नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महाराज हे नरहरींना गुरु म्हणून लाभले होते. त्यांच्याकडून नरहरींना गुरुपदेश, नाथ  संप्रदायाचे दीक्षा, आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला होता. त्याकाळी भारतात राजकीय शांतता होती परंतु धार्मिक आतंक माजलेला होता. त्याकाळी शिवाचे भक्त आणि विष्णूचे भक्त यांचे सतत संघर्ष व्हायचे. नेहमीच  अतितटीचे संघर्ष होत असे. साधूंचे एकमेकांवर हल्ले देखील व्हायचे. याला शैव – वैष्णवांचे झगडे म्हटले जायचे.

शैव – वैष्णवांमध्ये सगळ्या गोष्टी एकमेकांविरुद्ध व्हायच्या. वैष्णवांनी उभा गंध लावला तर सर्व शैव आडवा गंध लावायचे. वैष्णवांच्या स्त्रियांनी डावीकडून पदर घेतला तर शैवांच्या स्रिया उजवीकडून पदर घेत असत. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधाभास आढाळायचा. शैव आणि वैष्णव फेटा बांधण्याच्या पद्धतीमध्येही एकमेकांविरुद्ध पद्धती वापरायचे. या संघर्षामुळे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे हे त्यांना लवकर समजलेच नाही. परंतु पुढे देशावर परकीय आक्रमणे व्हायला लागली. त्यावेळी  लोकांना समजायला लागले की आपण एकमेकांमध्ये संघर्ष करण्याऐवजी एकत्र यायला हवे .

अनेक थोर पुरुषांनी शैव आणि वैष्णव यांच्यातील संबंध मधुर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकत्र आणण्याचाही प्रयत्न केला. त्याकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांनी शैव असूनही वैष्णवांची भक्ती केली. नाथ असूनही विठ्ठलाची भक्ती केली. आणि तात्विक दृष्ट्या हे सर्व एकच आहे हे दाखवून दिले. तसेच संत नामदेवांनीही अनेकांना सोबत घेऊन प्रात्यक्षिक दाखवून शैव आणि वैष्णव प्रत्यक्षात एकच आहेत असे  दाखवले . पुढे  ज्ञानेश्वरांचे तत्त्व आणि नामदेवांचे प्रात्यक्षिक यांपासून एकीला सुरुवात झाली आणि नरहरी सोनार त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे.

तसेच शैव आणि वैष्णव यांमधील वादाची परिमिती आपल्याला संत तुकाराम महाराजांमध्ये झालेली पाहावयास मिळते. शिव आणि विष्णू एकच कसे आहेत ते सांगणारा एक अभंग ही संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे. त्यांच्या त्या अभंगामधून ते पुढे लोकांना समजण्यासारखे  सांगतात की “तुका म्हणे हरि हरा, एका वेलांटीचा फेरा “ म्हणजे हरी म्हणजे शिव आणि हरा म्हणजे वैष्णव यांच्यामध्ये  म्हणजेच  हरी आणि हरा या दोन शब्दांमध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. ते दोन्ही एकच आहेत. हे  त्यांनी त्यांच्या अभंगामधून सांगितले .

 संत नरहरी सोनार यांचे पूर्वज मूळचे पंढरपूरचे होते. त्यांच्याच पूर्वजनांनी पंढरपूर गाव वसवले असेही म्हटले जाते. त्यांना एकूण 92 वर्षांचे आयुष्य मिळाले हेही सांगितले जाते. त्यांचे संपूर्ण नाव नरहरी अच्युतराव उदावंत असे होते. सोनार समाजामध्ये पांचाळ आणि लाड अशा दोन उपजाती मानल्या जातात. त्यामधील ते पांचाळ कि लाड हे अजूनपर्यंत सिद्ध झाले नाही. त्यामुळे पंढरपूर मध्ये संत नरहरी सोनार यांची पांचाळ आणि लाड समाजाची दोन वेगवेगळी मंदिरे आहेत.

 त्याकाळी कोळ्यांच्या  साह्याने संत नरहरी सोनार यांच्या पूर्वजांनी पंढरपूरच्या परिसरात दरोडेखोरांचा बंदोबस्त केला होता म्हणून शालिवाहन राजाने नरहरी महाराजांच्या पूर्वजनांना पंढरपूर परिसर दान केला होता असे सांगितले जाते. म्हणून त्यांच्या पूर्वजांनी कोळ्यांना शिव मंदिराचे हक्क दिले होते.कारण कोळ्यांनी त्यांच्या कामात दरोडेखोरांना हाकलण्यासाठी फार मोठी मदत केली होती.आजही पंढरपूर मध्ये ते हक्क कोळ्यांकडेच आहेत. आणि कोर्टाने ते मान्यही केलेले आहे कारण त्यांच्याकडे तशी शालीवाहन राजाची सनद आहे. मालूकवी नावाच्या संत नरहरींच्या दहाव्या वंशजानी मालूतरंग नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे.

त्या ग्रंथांमध्ये ही सर्व माहिती टिपण केलेली आहे. हा ग्रंथ त्यांनी सन 1842 मध्ये लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये संत नरहरींच्या आधीच्या 58 पिढ्यांची माहिती सांगितलेली आहे. संत नरहरी सोनार यांनी हरी आणि हाराचा विकोपाला गेलेला, संपूर्ण देशातला अत्यंत मोठा वाद मिटवला परंतु अजूनही ते सोनार समाजातील पांचाळ कि लाड समाजाचे हे समजले नाही.एकनिष्ठ शिवभक्त असलेल्या संत नरहरी यांना एका विठ्ठल भक्ताने बनवलेल्या सोनसाखळी मुळे विठ्ठलाचे दर्शन झाले होते.

तसेच परब्रम्ह विठ्ठल आणि परमात्मा महादेव एकच कसे आहेत याची प्रचिती त्यावेळी नरहरींना कशी आली याची एक आख्यायिका सांगितली जाते. एका सावकाराने  पांडुरंगाला नवस केल्यामुळे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. तो नवस सावकारानी पूर्ण करण्यासाठी पांडुरंगाच्या कमरेला घालण्यासाठी सोनसाखळी बनवण्याचे ठरवले. त्याकाळी पंढरपूरमध्ये नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने सोन्याची साखळी तयार करण्यासाठी सावकार त्यांच्याकडे गेले.

परंतु नरहरी सोनार यांनी त्यांना पांडुरंगाची सोनसाखळी तयार करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. कारण नरहरींनी पण केला होता की, शंकरा शिवाय मी कोणत्याही देवतांचे मूखही बघणार नाही . त्यावर पर्याय म्हणून सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे कबूल केले.मग मात्र नरहरी सोनार सोनसाखळी तयार करण्यास तयार झाले. मग सावकारांनी त्यांना विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले व नरहरींनी सोनसाखळी तयारी केली. सावकाराला नरहरींनी तयार केलेली सोन्याची साखळी फार आवडली परंतु ती विठ्ठलाच्या कमरेला घालवण्यास गेले तेव्हा ती फार मोठी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

परत सावकाराने त्यांच्या सेवकाला साखळी घेऊन नरहरींकडे पाठवले व माप बरोबर करण्याचे सांगितले. दोन-तीन वेळा नरहरींनी सावकाराच्या मापाप्रमाणे पांडुरंगाच्या कमरेची सोन्याची साखळी तयार केली परंतु प्रत्येक वेळी माप हे जास्तच व्हायचे. मग मात्र नरहरी सोनार गोंधळून गेले.आणि मग ते डोळ्यावर पट्टी बांधून स्वतः विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्यासाठी गेले. विठ्ठलाच्या कमरेचे माप घेत असताना त्यांना शिवलिंगाला स्पर्श केल्याचे जाणवायचे. मग त्यांनी पांडुरंगाच्या गळ्याकडे हात फिरवला तर त्यांना शेष नागाला स्पर्श केल्याचे जाणवले. गोंधळून त्यांनी आपल्या डोळ्यावरील पट्टी काढताच  त्यांना पांडुरंग दिसले.

असे एक दोन वेळा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग शिवशंकर भगवान आहेत.त्यानंतर ते पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन. विठ्ठल भक्तीत विलीन झाले. आणि त्यांनी तसे अभंगही लिहिले. देवा तुझा मी सोनार l तुझ्या नामाचा व्यवहार ll असे अनेक अभंग त्यांनी पांडुरंग भक्तित लिहिले.

Leave a Comment