परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गावात इ.स.1265 मध्ये संत जनाबाईंचा ( Sant Janabai ) जन्म झाला होता. त्यांच्या आईचे नाव दमाबाई आणि वडिलांचे नाव करुंड होते. त्यांचे वडील पेशाने वैद्य असल्याचे कळते. त्यांच्या आई-वडिलांचे लवकरच निधन झाल्याने जनाबाई सहा वर्षाच्या असताना गावातील लोकांनी त्यांना पंढरपूरच्या वाळवंटात आणून सोडले असे सांगितले जाते. हे बाळ तेथे रडत असताना दामाशेटी यांनी त्यांना पाहिले व ते तिला स्वतःच्या घरी घेऊन गेले. जनाबाईंचा शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने दामाशेटी यांनी सांभाळ केला. दामाशेटी हे संत नामदेव महाराजांचे वडील होते.
त्यांच्या घरात एकूण 14 माणसं होती. आणि ही जनाबाई पंधरावी. दामाशेटी यांच्या घरात जनाबाई दाशी म्हणून काम करत होत्या. त्यांच्या घरी दळण दळणे, गवऱ्या थापने, भांडीकुंडी घासणे याबरोबरच सर्व दैनंदिन कामे त्या त्यांच्याकडे करत असे.जनाबाईंच्या या दैनंदिन कामामध्ये स्वतः विठ्ठल तिला गवऱ्या वेचू लागायचे, भांडे घासू लागायचे, कोणत्या ना कोणत्या रुपात जनाबाईंला विठ्ठल येऊन भेटायचे.एवढेच काय तर स्वतः पांडुरंगाने जनाबाईचे अभंग लिहिलेले आहेत असे सांगितले जाते. पुढे नामदेवांनीही जनाबाईचा संभाळ केला. संत नामदेवांच्या बरोबर राहूनच त्यांनी अध्यात्माचे अनेक धडे घेतले.
संत नामदेव हेच त्यांचे परमार्थिक गुरु समजले जातात. संत ज्ञानदेव -विसोबा खेचर- संत नामदेव- संत जनाबाई , अशी ही गुरु शिष्यांची परंपरा चालत आलेली आहे.संत ज्ञानदेव महाराजांच्या काळातील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. संत जनाबाई आषाढ कृष्ण त्रयोदशीला शके 1272 इ.स.1350 मध्ये समाधीस्थ होऊन पांडुरंगामध्ये विलीन झाल्या.शेवटी जनाबाई नामदेव पायरीच्या चिरासोबतच अंतराधीन पावल्या. शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग ऐकावयास मिळतात ते दोन संत म्हणजे संत तुकाराम महाराज आणि संत जनाबाई. “सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई”. सुखदुःख जाणून घेणारी माऊली.
असे अनेक अभंगातून विठ्ठलाचे आणि रखुमाईचे गोड वर्णन या अनाथ संत जनाबाईने केलेले आहे. विठ्ठलाच्या मंदिरासमोरच झोपडीत राहणाऱ्या जनाबाईवर ज्यावेळेस विठ्ठलाचे सोने-नाणे चोरल्याचा आरोप होतो. त्यावेळेस ती म्हणते मी सोन्यानाण्याची नव्हे तर विठ्ठलाची चोरी केली आहे. आणि त्याला माझ्या हृदयात बंदिस्त करून ठेवले आहे. अशी ती “धरीला पंढरीचा चोर” या अभंगातून सांगते. “ माझे अचडे बचडे छगुले ग राधे रुपडे “ अशा अभंगामधून विठ्ठलाच्या बाळ रूपाचे वात्संल्याचे अभंग तर तिचे अप्रतिम ठरलेले आहेतच .
विठू माझा लेकुरवाळा | संगे गोपाळांचा मेळा | हा अभंग संत जनाबाईंनी लिहिलेला आहे . ज्ञानेश्वरांविषयी त्या म्हणतात परलोकीचे तारूl म्हणे माझा ज्ञानेश्वरु llसंत जनाबाईंचे अभंग दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्रीआहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरपुरास आले. पंढरपुरास आल्यानंतर त्यांना कळाले की ती संत नामदेवांच्या घरी कामाला आहे. संत नामदेवांच्या घरी गेल्यानंतर त्यांना कळाले की जनाबाई गोपाळपुरास गवऱ्या थापायला गेली आहे. तिला परत घरी येण्यासाठी काही वेळ लागेल.
दुसऱ्याच्या घरी असे काम करणारी बाई असे अभंग लिहिते याचे त्यांना विशेष वाटले. आणि ते तिची वाट न बघता थेट गोपाळपुरास गेले.तेथे गेल्यानंतर तेथे त्यांना दोन स्त्रिया एकमेकांशी भांडताना आढळल्या. त्यांचे भांडण गवऱ्या वरून चालले होते हे त्यांना समजले. काही वेळाने कबीरांनी त्यांना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का? दुसरी स्त्री म्हणाली ही काय ही जनी. चोरटी कुठली. माझ्या गवऱ्या चोरून माझ्याशी भांडते. त्यांचे हे भांडण कबीरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेणाच्या एकसारख्या गोल असणाऱ्या गवऱ्या कुठल्या कुणाच्या कसे ठरवणार.याचे कोडे कबीरजींना पडले. कबीर विचारात पडलेले असताना जनाबाई म्हणाल्या त्यात काय विचार करायचा अगदी सोप आहे.
हे ऐकून संत कबीर हे कसं सोपं आहे हे ऐकण्यासाठी आतुर झाले कबीरांच्या चेहऱ्यावरील उत्सुकता पाहून जनाबाई हसून म्हणाल्या अहो महाराज सर्व गवऱ्या एका ठिकाणी जमा करा आणि त्या प्रत्येक गवरीला कान लावून बघा ज्या गवरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती प्रत्येक गवरी माझी.ज्या गवरीमधून आवाज येणार नाही त्या सर्व गवऱ्या हिच्या. जनाबाईंच्या या युक्तीने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. कबीर जी पुढे आले आणि एकेक गवरी कानाला लावू लागले .
आणि काय आश्चर्य त्या गवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठला असा आवाज येत होता. हे ऐकून आपण एका महान कवयित्रीला भेटायला आलो आहोत हे त्यांना समजले. की जीच्या विचारात साक्षात पांडुरंग आहे. त्यांनी सर्व गवऱ्या विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकून वेगवेगळ्या केल्या आणि गवऱ्यांची वाटणी झाली. परंतु कबीरांच्या मनात एक प्रश्नचिन्ह तसेच होते की या गवऱ्यातून विठ्ठललाच्या नामाचा आवाज कसा काय येतोय ?
जनाबाईने हे ओळखले आणि ती कबीरांना म्हणाली महाराज मी ह्या गवऱ्या थापताना सतत विठ्ठलाचे नामस्मरण करते आणि माझ्या ध्यानीमनी नेहमी पांडुरंग असतो म्हणून तो या गवऱ्यामध्ये सुद्धा असतो. कबीर चकित होऊन जनाबाई कडे पहातच राहीले . आणि मग त्यांनी तिला स्वतःची ओळख करून दिली.आणि मग त्या कबीरांना घरी घेऊन गेल्या. जरी ही आख्यायिका खरी नसली. तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन आहे. सगळेजण त्यांना जनी या शब्दाने ओळखत होते. जनी या शब्दाचा अर्थ पाहिला असता जनी म्हणजे स्त्रियांचा एक समूह असा होतो. लोकप्रिय संतांमध्ये जनाबाईंचे नाव घेतले जायचे.
आजही जनाबाईंच्या ओव्या लोकांना अतिशय प्रिय आहेत. खेड्यापाड्यांमध्ये जणाबाईंच्या ओव्या आजही आनंदाने गाईल्या जातात. विशेष करून कोकणामध्ये जनाबाईंच्या ओव्या फारच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ओव्यांची संख्या जवळपास 300 च्या आसपास असल्याचे समजते.जनाबाईंची काकड आरतीही फार प्रसिद्ध आहे. सर्व मंदिरांमध्ये जनाबाईंच्या काकड आरत्या म्हटल्या जातात. तसेच संत जनाबाईंचे अनेक अभंग नामदेव गाथेमध्ये आढळतात. कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हाद चरित्र, बाल क्रीडा या विषयावर तिचे अभंग आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक अख्खानरचनासुद्धा तिच्याच नावावर आहेत.
संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयावरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्वरांना ( संत एकनाथ महाराजांचे नातू ) स्फूर्ती मिळाली होती. संत जनाबाईंच्या अभंगांमधून संत नामदेवांवरील भक्ती प्रेम, संत ज्ञानदेवांवरील उत्कट भाव, संत चोखोबांच्या भाव सामर्थ्याचे अनुसरण तसेच विठ्ठल भक्तीभाव त्यांच्या काव्यांमधून दिसून येतो.
त्याचप्रमाणे वात्सल्य, कोमल,ऋतुजा, सहनशीलता,त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती व स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. असे ज्येष्ठ अभ्यासक रा.च.ढेरे हे जनाबाईंच्या काव्याचे रसग्रहण करताना सांगतात. तात्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार,संत चोखामेळा,संत सेना न्हावी या संत महापुरुषांच्या जीवनाचा व त्यांच्या सदगुणांचा आढावा घेणाऱ्या पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढीवर एक प्रकारचे उपकारच केलेले आहेत.