संत नामदेव | Sant Namdev

संत नामदेव (Sant Namdev ) महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये म्हणजेच तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता. परभणी जिल्ह्यातील नरसी या गावी त्यांचा जन्म सांगितला जातो परंतु काही जण त्यांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे सांगतात. त्यांचे आई-वडील व्यवसायानिमित्त पंढरपूरला राहात असल्याने त्यांच्या जन्माबाबत अशी मत-मतांतरे आहेत. आई गोनाई आणि वडील दामाशेटी पंढरपूरला आपले शिंप्याचे काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

त्यांच्या पत्नीचे नाव रजाई होते तसेच त्यांना एक मुलगी होती तिचे नाव लिंबाई होते त्याचबरोबर त्यांना एकूण चार मुले होती. त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी प्रेमाने मुलांचा उल्लेख विठा, गोंदा, महादा, नारा असा केलेला आढळतो. परंतु त्यांची संपूर्ण नावे विठोबा , गोविंद ,महादेव, नारायण अशी होती. त्यांच्या एका अभंगांमध्ये त्यांच्या जन्माविषयी त्यांनी असे म्हटले आहे की

शिंपीयाच्या कुळी जन्म माझा झाला I परी जीव गुंतला सदाशिवी ll
नामा म्हणे शिवी विठोबाच्या अंगी I तेने झालो जगी धन्य धन्य ll

म्हणजे माझा जन्म शिंप्याच्या कुळात झाला असून माझा जीव पांडुरंगा मध्ये गुंतला. आणि मी पांडुरंगाचे कपडे शिवत असल्यामुळे मी धन्य धन्य झालो. दामाशेटी आपला व्यवसाय चालावा म्हणून पंढरपूरला गेले असताना काही दिवसांनी त्यांनी विठ्ठल मंदिराच्या मागेच एक घर बांधले होते. त्यामुळे संत नामदेव लवकरच संत संगतीत विलीन झाले. लहानपणापासूनच त्यांना भक्ती मार्गाची आवड लागली. त्यामुळे त्यांचे घराकडे लक्ष लागत नसे. ते नेहमी घरच्या कामाला दुय्यम प्राधान्य द्यायचे. त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी काहीतरी काम धंदा करावा असे नेहमी वाटायचे.

नामदेवांची बायको नामदेव घराकडे लक्ष देत नाहीत म्हणून विठ्ठलाला नेहमी भांडायची असे काही अभंगांमधून समजते. ती रखुमाईला म्हणते-
अहो रखुमाई भ्रूतराशी कागा वेडे केले.

वस्त्रपात्र नाही खाया जेवनाशी l, हा नाचे अहरणीशी.ll
चौदा मनुष्य आहेत माझ्या घरी, हिंडत दारोदारी अन्नासाठीll
करा मार्ग तुम्ही समजूनीया सांगा l नाम्याची राजा अली नव्हे.ll

म्हणजेच अहो रखुमाई माझ्या नवऱ्याला तुम्ही का वेडे केले. अंगाला वस्त्र नाही खायला अन्न नाही. घरात 14 माणस आहेत.अन्नासाठी आम्ही दारोदारी हिंडतो. तुम्ही विठ्ठलाला समजून सांगा नाहीतर माझ्यासारखे कोणी नाही. असा जणू ती रखुमाईला दमच भरते. परंतु हळूहळू नामदेव महाराजांनी बायकोला,आईला आणि संपूर्ण कुटुंबाला भक्तिमार्गाकडे वळवले. काही दिवसांनी त्यांचे सर्व कुटुंब अध्यात्मिक झाले. काही दिवसांनी त्यांच्या घरातील दासीसह सगळेच कविता लिहू लागले. 

इ.स.1291 मध्ये ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज यांची भेट झाली. एकदा पंढरपूरला संत मेळा जमला असताना त्यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी नामदेव महाराज 21 वर्षांचे व ज्ञानदेव महाराज 20 वर्षांचे होते. निवृत्तीनाथ त्यांच्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठे होते. संत ज्ञानदेवांची भक्ती श्रेष्ठ होतीच म्हणून ज्ञानदेव हा विठ्ठलाचा फार लाडका होता.परंतु त्यांना त्यांच्या भक्तीचा थोडा अहंकार होता. त्यामुळे इतर संतांना त्यांनी असा हेवा ठेवू नये असे वाटायचे. तोपर्यंत नामदेव महाराजांनी कोणासही स्वतःचे गुरु करून घेतलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पद्धतीने भक्तीचा मार्ग विकसित केलेला होता.

परंतु इतर संत महापुरुष त्यांना गुरु करण्यासाठी आग्रह करायचे. नंतर ते पंढरपूरवरून आळंदी आणि आळंदीहून घरी परत आले. त्यानंतर नामदेव नरसी जवळच औंढा नागनाथ गाव आहे, त्या गावातच विसोबा खेचर राहत होते, त्यांना ते भेटले आणि त्यांनाच नामदेवांनी गुरू केले.गुरु केल्यानंतर नामदेवांना स्वतःचा अहंकार कमी झाल्याचे जाणवले आणि अद्वेतांचे अधिष्ठान त्यांच्या जगण्यास मिळाले. ते परत पंढरपूरला आल्यानंतर भूतळीची सर्व तीर्थस्थाने पहावीत असा आग्रह इतर संतांनी त्यांना केला. परंतु नामदेव महाराज म्हणाले मज सर्वांहुनी सुख आहे पांडुरंगे. परंतु नंतर सगळ्यांच्या आग्रहाखातर ती तीर्थयात्रा झाली. आणि ती सर्व संतांची मिळून झालेली तीर्थयात्रा ही प्रख्यात तीर्थयात्रा समजली जाते. त्या तीर्थयात्रेचे वर्णन संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेले आहे.

यात्रेवरून परत आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा नामदेव महाराजांचे वय 26 वर्ष होते. त्यानंतर 54 वर्षे नामदेव महाराज जगले आणि पुढे त्यांनी वारकरी संप्रदायाचे काम जोमाने केले. यादरम्यान ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस मुस्लिम सत्ता बळकट होती, सर्वत्र अंधाधुंदी सुरू होती. त्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुसलमानी सत्तेचा अंमल होता. आणि त्या दरम्यानच नामदेवांच्या सर्व सहकाऱ्यांचे निधन झाले होते. त्यामुळे उदास होऊन नामदेव महाराज उत्तर भारतात गेले. उत्तर भारतात पंजाब ही जागा अशी सापडली की त्यांना ती अनुकूल भूमी वाटली.

तेथे त्यांनी धर्माचा खूप प्रसार केला आणि जवळजवळ शीख धर्माचा पाया आणि शीख धर्माला पूरक पार्श्वभूमी तेथे त्यांनी तयार केली. नंतर पुन्हा महाराष्ट्रात येऊन त्यांनी भारतभर यात्रा केल्या. दीर्घकाळ जगून वयाच्या 80 व्या वर्षी 3जुलै १३५० या दिवशी नामदेव महाराजांचे निधन झाले.पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीशी आणि पंजाब मध्ये घुमान अशा दोन ठिकाणी नामदेव महाराजांच्या समाध्या आहेत. पंजाब मधील लोकांचे म्हणणे आहे की ते इथेच त्यांचे निधन झाले आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मते त्यांचे निधन महाराष्ट्रात पंढरपूर मध्ये  झाले अशी त्यांच्या निधनाबद्दल मतमतांतरे आढळतात. आणि म्हणूनच त्यांच्या दोन समाध्या आहेत विठ्ठलाच्या पायरीशी आणि दुसरी पंजाब मधील घुमान मध्ये. तसेच नरसी गावामध्ये त्यांचे मंदिर आहे.

संत नामदेव महाराजांचे कर्तृत्व सांगायचे झाले तर मराठीमध्ये अभंग या छंदाची निर्मिती संत नामदेवांनीच केली. अभंग रचनेचे शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी केले. अभंगाच्या रचनेवर त्यांनी एक अभंगही लिहिला.

अभंगाची कळा l नाही मी नेहनत ll
त्वरा केली l प्रीत केशी राजे ll

असे त्या अभंगाचे नाव असून त्यामध्ये ते सांगतात. मला केशवराजांनी अभंगाची रचना कशी असावी हे सुचवलं. सहा सहा अक्षरांचे तीन चरण आणि साडेतीनवा अर्धा चरण. आणि अभंग रचनेचे संपूर्ण गणितच त्यांना हरीने स्वप्नात सांगितले आणि विठोबा खेचर यांनी  त्याची आज्ञा दिली.आणि मग मी अभंग रचना तयार केली असे ते अभंगामधून सांगतात.

पुढे संपूर्ण वारकरी संप्रदाय अशा विविध संतांच्या अभंगांनी तोलून धरला आहे. आणि या अभंगांची निर्मिती हे नामदेव महाराजांचे सर्वात मोठे कर्तृत्व समजले जाते. नामदेव महाराजांनी बोबडी गवळण, बालगीते तसेच अनेक प्रकारच्या गवळणी लिहिल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी पाच भाषेतील एक गवळण लिहिली आहे. त्या गवळणीतील प्रत्येक कडवे वेगवेगळ्या भाषेत लिहिलेले आहे. कानडी, कोकणी, मराठी, उर्दू,गुजराती या भाषांमध्ये त्या गवळणीची रचना आहे. असे हे क्रांतिकारक नामदेव महाराज यांचा विचार हा समोपचाराचा होता. त्यांनी भारत भ्रमण केल्यामुळे या सर्व भाषा त्यांना येत होत्या.

असेच एक त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अस्पृश्य असल्याने त्यांना मंदिरात प्रवेश नसल्याने त्यांनीच सुरुवातीला कीर्तन मंदिरातून वाळवंटात आणले. सुरुवातीला लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी कीर्तन करत असताना पायात चाळ बांधले  आणि लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लोकांना मंदिरात येऊ देत नाहीत ना तर मीच लोकांपर्यंत धर्म घेऊन जातो असे ते म्हणायचे. त्याचप्रमाणे सर्व जातीतील संतांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रबाहेरील कबीर,नानक,मीरा,रोहिदास, रामानंद, तुलसीदास अशा वेगवेगळ्या प्रांतातील संतांना एकत्र आणून त्यांनी धर्माचा प्रसार केला.

ज्यावेळेस ते पंजाब मध्ये होते , त्यावेळी शीख धर्माच्या उदयाची पार्श्वभूमी तयार करून देताना त्यांनी तिथल्या जाट,तेली,खत्री,सुतार अशा जाती एकत्र आणून शीख पंथाला प्रेरणा दिली. शीख पंथाचे धर्मगुरु अर्जुन देव म्हणायचे नारायण आणि नामदेव यांच्यात भेद नाही. म्हणजेच संत नामदेव हे साक्षात ईश्वराचेच रूप  आहे.तसेच गुरु ग्रंथ साहेब मध्ये नामदेवांचे 61 पदे आपणास पहावयास मिळतात. संत नामदेवांच्या या कर्तुत्वामुळे  महाराष्ट्राबाहेर विठ्ठलापेक्षा संत नामदेव महाराजांची मंदिरे जास्त आहेत. राजस्थानमध्ये नामदेव महाराजांची 700 मंदिरे आहेत . तसेच पंजाब मध्ये गावोगावी नामदेव महाराजांची मंदिरे आहेत. तसेच गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश अशा अनेक प्रांतात त्यांची मंदिरे आहेत.

एवढं त्यांचं बाहेर महात्म्य समजलं जातं. अशा या संत नामदेव महाराजांनी आध्यात्मिक क्रांती  करून  ज्ञानाचा आणि धर्माचा प्रसार केला. त्यांना दीर्घायुष्य मिळाल्याने देशावर इतकी वर्षे इतका प्रभाव असणारे अन्य कोणीही नाही हे सर्वात मोठे वैशिष्ट्य संत नामदेव महाराजांचे आहे.आणखी असंच एक वैशिष्ट्य म्हणजे चोखोबांची पायरी. नामदेवांनी चोखोबांचे अंत्यसंस्कार विठ्ठल मंदिराच्या दारातच केले. आजही अस्पृश्यांना दारात काय तर स्पृशांच्या स्मशानात सुद्धा जागा दिली जात नाही. त्यांनी 800 वर्षांपूर्वी एवढ्या कर्मठ काळात साक्षात विठ्ठलाच्या दारात चोखोबांची समाधी बांधून दाखवली ही एक क्रांतीच म्हणावी लागेल.

संपूर्ण भारताची त्यांनी अनेकदा यात्रा केली. त्या काळात कुठल्या सुविधा नसताना एवढ्या यात्रा करून वेगवेगळ्या राज्यात कीर्तने केली. उत्तर भारत आणि दक्षिण भारत त्यांनी पिंजून काढला होता. उत्तर भारतात गुजरात,सौराष्ट्र,राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश इतक्या ठिकाणी ते गेले होते. आणि दक्षिण भारतात रामेश्वर, श्रीशैल्य,अरुणाचल,चिदंबरम आणि विष्णूकांचम इतक्या ठिकाणी नामदेव महाराज फिरले आणि त्यांनी भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार केला.

महाराष्ट्राबाहेर  महाराष्ट्रातले इतके लोकप्रिय त्यावेळी दुसरे कोणीही नव्हते. त्यांच्यामुळे दक्षिणेतील दर्जी म्हणजे शिंपी स्वतःला नामदेव म्हणून घेतात. जर त्यांना तुमची जात काय म्हणून विचारले तर ते नामदेव म्हणून सांगतात. तसेच भूसागर आणि मल्हार या उत्तर भारतातील जाती ही आपले पर्यायी नाव नामदेव म्हणून स्वीकारतात. तसेच संत नामदेव हे मराठी व हिंदी भाषेतील पहिले कवी समजले जातात. संत कबीरांवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता. संत नामदेवांकडून सर्वात मोठे जर काय घेतले असेल तर तो समतेचा विचार कबीरांनी घेतला. एक काळ असा होता की संत नामदेवांना संपूर्ण भारत आपला आधार समजायचा.

एवढे संत नामदेव महाराजांचे कर्तृत्व मोठे होते. शेवटी भालचंद्र नेमाडे असे म्हणतात की, ब्राह्मणी अरेरावेपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोघांनाही आव्हान देण्याची नामदेवांची पद्धती अतिशय सूक्ष्म आणि नम्र क्षमावाचक परंतु प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी होती.
 
       

Leave a Comment