भीमरेच्या तीरी | Bhima River

भारताच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील भीमा नदी ( Bhima River ) ही मुख्य नदी असून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये भीमा नदीचा उगम होतो. भीमाशंकर हे एक प्रख्यात तीर्थक्षेत्र असून बारा ज्योतिर्लिंगापैकी ते एक आहे. भीमा नदी पूर्ववाहिनी असून सुरुवातीला काही अंतर ती आग्नेय दिशेला जाऊन पुढे ती प्रमुख कृष्णा नदीला मिळते.

भीमा नदीची एकूण लांबी 861 किलोमीटर असून कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणून भीमा नदीला ओळखले जाते. भीमा आणि कृष्णा नद्यांचा संगम कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील कुरगुडी या ठिकाणी होतो. कुरगुडी हे ठिकाण कर्नाटक आणि तेलंगाना या राज्यांच्या सीमेवर आहे. भीमा आणि कृष्णाच्या संगमाला निवृत्ती संगम असेही म्हणतात. भीमा नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि तेलंगणा या तीन तीन राज्यांमधून वाहत असून महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाते.

तसे भीमा नदीचे खोरे पुणे, सोलापूर, सातारा,अहिल्यानगर, आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. एखाद्या मुख्य नदीला अनेक उपनद्या येऊन मिळत असतात त्या उपनद्यांच्या ठिकाणापासून ते मुख्य नदीच्या ठिकाणापर्यंत असलेल्या भागाला त्या मुख्य नदीचे खोरे असे म्हणतात. म्हणजेच भीमा नदीला या पाच वेगवेगळ्या जिल्ह्यातून नद्या येऊन मिळतात. त्यामुळे भीमा नदीचे खोरे विस्तीर्ण आहे. तसेच तिच्या उगमस्थानी भीमाशंकर आणि पुढे अख्या महाराष्ट्राचे दैवत असणारे विठ्ठलाचे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे लाखो भक्तांना भीमेच्या पवित्र स्नानाचा लाभ मिळतो.

याच भीमा नदीवर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये चासकमान गावाजवळ चासकमान नावाचे मोठे धरण बांधलेले आहे. या धरणावर जलविद्युत प्रकल्प असून सिंचनासाठी धरणातून डावा आणि उजवा कालवा काढलेला आहे. चासकमान धरणाला पाच रेडियल गेट असून त्यातून खेड आणि शिरूर तालुक्यासाठी सिंचन केले जाते. तसेच भीमा नदी काठी सध्याचे राजगुरूनगर म्हणजेच पूर्वीचे खेड हे तालुक्याचे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी शहर वसलेले आहे.

राजगुरुनगर हे हुतात्मा राजगुरू यांचे जन्मगाव आहे. त्याचप्रमाणे पुढे भीमा नदी ( Bhima River ) खोऱ्यात अनेक गावांचे कुलदैवत असलेले खंडोबाचे मंदिर निमगाव गावाजवळ आहे व शेजारील दावडी गावात ऐतिहासिक सरदार श्रीमंत दामाजी गायकवाड यांचा वाडा आहे. पुढे भीमा नदी काठी धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेले भानोबा मंदिर कोयाळी गावात आहे. पुढे तुळापूर गावाजवळ भीमा भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमावर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे.

तसेच याच संगमा जवळ असलेल्या भीमा कोरेगाव शहरामध्ये सन 1818 मध्ये झालेल्या ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्याचे पेशवे यांच्यात झालेल्या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ उभारलेला विजयस्तंभ आहे. येथे वर्षातून एकदा फार मोठा कार्यक्रम होतो. त्याचप्रमाणे मुळा आणि मुठा नदीचा पुण्याजवळील संगमवाडी मध्ये संगम झाल्यानंतर या दोन्ही नद्या एकत्र भीमा नदीत सामील होतात आणि हाच भीमेचा मोठा प्रवाह पुढे सोलापूर जिल्ह्यात आडवून तेथे उजनी नावाचे मोठे धरण बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील जुने पळसदेव गाव भीमा नदीच्या काठी सोलापूर जिल्ह्यात नव्याने वसवले आहे. तेथे फार प्राचीन मानले जाणारे काशी विश्वेश्वर शिवमंदिर पळसदेव नावाने आहे.

हीच भीमा नदी पुढे पंढरपूर मध्ये गेल्यानंतर चंद्रकोर आकार घेते म्हणून तिला तेथे चंद्रभागा असे म्हणतात. या चंद्रभागा तीरावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विष्णूपाद मंदिर, पुंडलिक मंदिर आणि अनेक प्रख्यात मठ आहेत. महाराष्ट्रामध्ये नदी खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार भीमा नदीचा महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक येतो. भीमेच्या खोऱ्याचे भारतातील एकूण क्षेत्रफळ ७०,६१४ चौरस किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 28,695 चौरस किलोमीटर एवढे आहे.

भीमा नदीच्या उगमस्थान नंतर सर्वात प्रथम भीमा नदीला पिंपळगाव येथे उजवीकडून भामा नावाची नदी येऊन मिळते. या भामा नदीवर भामा आसखेड नावाचा धरण प्रकल्प आहे. पुढे भीमा नदी तुळापूर येथे पोहोचते. तुळापूर या ठिकाणी तिला इंद्रायणी नदी येऊन मिळते. पुढे गेल्यानंतर भीमा नदीला पुण्यातील तळेगाव येथे डावीकडून वेळ नावाची नदी येऊन मिळते. एकूणच भीमा नदीचा पुणे जिल्ह्यातील प्रवास जास्त असल्याने पुण्यातील बराच भाग या नदीमुळे समृद्ध झालेला आहे.

भीमा नदीला पुण्यातील मुळशी या ठिकाणाहून उगम पावणारी मुळा नदी आणि पुण्यातील वेग्रे या ठिकाणी उगम पावणारी मुठा या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह येऊन मिळतो.मुळा आणि मुठा यांच्या एकत्रित प्रवाहाला मुळा मुठा प्रवाह म्हणून ओळखले जाते. म्हणून भीमा नदीच्या मुळा मुठा ह्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. मुळा नदीला डावीकडून पवना नदी आणि उजवीकडून निळा आणि राम नदी येऊन मिळते. त्यामुळे मुळा मुठा प्रवाह मोठा होतो.

याच मुळा नदीवर पुण्यातील प्रसिद्ध मुळशी डॅम आहे. तसेच मुठा नदीला डावीकडून मोशी नावाची नदी येऊन मिळते. लवासा प्रकल्प याच मोशी नदीवर आहे. तसेच मुठा नदीवर टेमघर नावाचे धरण आहे. तसेच मोशी नदीवर वरसगाव नावाचे धरण आहे ज्याला वीर बाजी पासलकर धरण असे म्हणतात. मुठा नदीला पुढे काही अंतरावर आंबी नावाची नदी येऊन मिळते. याच आंबी नदीवर पानशेत नावाचे धरण आहे. याच मुठा नदीवर पुढे गेल्यावर खडकवासला धरण आहे.

भीमा नदीला पुढे गेल्यानंतर सांगवी दुमाला येथे डावीकडून घोडनदी येऊन मिळते. याच घोड नदीवर डिंभे धरण प्रकल्प आहे. घोड नदीच्या दोन उपनद्या मीना आणि कुकडी ह्या असून कुकडी नदीवर माणिक डोह केडगाव नावाचे दोन धरण प्रकल्प आहेत. भीमा नदी आणखी पुढे गेल्यानंतर अकलूज जवळ असलेल्या नीरा नरसिंगपूर या ठिकाणी उजवीकडून नीरा नदी मिळते. या नीरा नदीला वेळवंडी नदी आणि कऱ्हा नदी या दोन उपनद्या असून वेळवंडी नदीवर भाटघर नावाचे धरण आहे.

तसेच कऱ्हा नदीवर जेजुरी आणि मोरगाव ही दोन तीर्थक्षेत्रे आहेत. तसेच नीरा नदीवर देवदर धरण आणि वीर धरण अशी दोन धरणे देखील आहेत. नीरा नरसिंगपूर नंतर भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे उजनी धरण आहे.

या प्रकल्पाला भीमा प्रकल्प असे म्हणतात. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प आहे. उजनी धरणामुळे खूप मोठा जलाशय तयार झालेला आहे. या जलाशयाला यशवंत सागर जलाशय असे म्हणतात. तसेच सोलापूर मध्ये भीमा नदीवर पंढरपूर हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे.

पंढरपूर मध्ये या भीमा नदीचा आकार चंद्रकोर प्रमाणे झाला आहे म्हणून या नदीला पंढरपूर मध्ये गेल्यानंतर चंद्रभागा असे म्हणतात. अजून पुढे गेल्यानंतर भीमा नदीला मान नदी आणि बोर नदी या दोन नद्या येऊन मिळतात. आणखी पुढे गेल्यानंतर भीमा नदीला डावीकडून सीना नावाची मोठी नदी येऊन मिळते. तसेच सीना नदीला विंचरणा, भोगावती आणि मेहेकरी या तीन उपनद्या येऊन मिळतात. विंचरणा नदीवर सौताडा नावाचा प्रख्यात धबधबा आहे.

तसेच या नदीकाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चोंडी ( Chondi ) हे ठिकाण आहे. भोगावती नदी धाराशिव जिल्ह्यात येते आणि सीना नदीला जाऊन मिळते. सीना नदी भीमेला कुडाळ या ठिकाणी मिळते. भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या दोन पर्वतरांगे दरम्यान वाहते. शंभू महादेव पर्वतरांगेच्या उत्तरेकडून भीमा नदी वाहते व दक्षिणेकडून कृष्णा नदी वाहते आणि या दोन्ही नद्या पुढे कुरगुडी येथे म्हणजे निवृत्ती संगमावर एकमेकाला मिळतात .

महाराष्ट्रामध्ये भीमा नदीची लांबी कृष्णा नदीच्या लांबी पेक्षाही जास्त आहे. परंतु तरीही कृष्णा नदीची उपनदी म्हणून भीमा नदीला संबोधले जाते. या निवृत्ती संगमाच्या पुढे कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

Leave a Comment