पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात लोणी धामणी हे गाव आहे. लोणी धामणी गावाचे ग्रामदैवत,अनेकांचे श्रद्धास्थान, अनेकांचे कुलदैवत असे हे प्रसिद्ध पुरातन कुलस्वामी माळसाकांत खंडोबा मंदिर (Khandoba Temple Loni Dhamani ) आहे. लोणी धामणी येथे खंडोबाचे मुख्य मंदीर पुरातन दगडी बांधकामात बांधलेले आहे. तसेच नवीनही काही बांधकाम झालेले आहे पायऱ्या चढून मंदिराकडे जाताना समोरच मोठी एक दीपमाळ दिसते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चार सिंहांच्या प्रतिमा स्थापन केलेल्या आहेत. मंदिरात शिरताना पुढे लगेच पुरातन काळातील दीपमाळ दिसते. मंदिराच्या कडेने तटबंदीच्या भिंतीवर पुरातन काळातील खंडोबा देवाच्या इतिहासातील काही चित्रे अभंगासहित व त्या अभंगाच्या अर्थासहित रेखाटलेली आहेत. याच तटबंदीच्या पडवीला जागरण गोंधळाचे कार्यक्रम केले जातात. यात्रेच्या दिवशी देवाला मुखवटा स्नान घालण्यासाठी भाविकांची येथे अलोट गर्दी पहावयास मिळते.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी ही एक यात्रा समजली जाते. तेथे एक नंदीची मूर्ती आहे ती मंदिराच्या समोरच आहे.मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर एका बाजूला श्री खंडोबा घोड्यावर स्वार झालेले दिसतात. तसेच समोरील बाजूस खंडोबा महाराज आपल्या दोन पत्नी म्हाळसा आणि बानू यांच्या सोबत पूर्वाभिमुख मूर्ती स्वरूपात दिसतात.
तसेच मूर्तींच्या समोरच त्यांची स्वयंभू लिंगे आणि समोरच त्यांच्या पादुकाही आहेत. त्याचप्रमाणे गाभाऱ्यात दक्षिण भिंतीच्या कोपऱ्यात हेडिंबा देवीची मूर्ती आहे. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आल्यानंतर दक्षिणेकडील बाजूस खंडोबाचे जुने देवस्थान आहे. हे खंडोबा देवाचे मूळ स्थान मानले जाते.
मंदिराच्या बाहेरील बाजूला एका बाजूला संत तुकाराम महाराजांचे छोटे मंदिर आहे. तसेच मंदिर परिसरात गाय आणि वासरू मूर्ती, शिवलिंग मंदिर, मयुरेश्वर गणेश मंदिर अशी काही छोटी छोटी मंदिरे आहेत. तसेच मंदिराच्या पाठीमागे तीन दीपमाळ आहेत.
या ठिकाणी माघ पौर्णिमा निमित्त दोन दिवस यात्रा उत्सव भरते. यात्रेच्या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यात बैलगाडा शर्यत, कुस्ती आखाडा याबरोबरच धार्मिक कार्यक्रम असतात.
या यात्रेसाठी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर,जुन्नर,पारनेर इत्यादी ठिकाणाहून भावीक येतात. तसेच पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातूनही अनेक भाविक या यात्रेला येतात. पाबळ पासूनही हे गाव जवळ आहे ,पाबळला प्रसिद्ध जैन मंदिर आणि मस्तानीची ऐतिहासिक कबर पाहण्यासारखी आहे.
पुणे नाशिक महामार्ग पासून अवसरी मार्गे 23 किलोमीटर अंतरावर धामणी हे गाव आहे. तसेच खेड ( राजगुरुनगर ) या तालुक्याच्या शहरापासून गुळवणी व वाफगाव मार्गाने 24 किलोमीटर अंतरावर धामणी हे गाव आहे. तसेच खंडोबा मंदिर हे धामणी गावापासून सर्वसाधारण दीड किलोमीटर अंतरावर आहे.
