भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात जास्त पाहिले जाणाऱ्या तिरुपती बालाजी ( Tirupati Balaji ) मंदिरातील तिरुपती बालाजी देवाला श्री वेंकटेश्वर असेही म्हणतात.आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये तिरूमला भागात भगवान श्री विष्णूचे रूप असलेले द्रविड वास्तुशैली मध्ये बांधलेले भगवान तिरुपती बालाजी मंदिर आहे. असे सांगितले जाते की तिसऱ्या शताब्दीतील हे मंदिर असून त्यानंतर पल्लव, चोल आणि विजयनगर च्या राजांनी या मंदिराला पुनर्निर्मित केले.
यामध्ये विजयनगरचे राजे कृष्णदेवराय यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते. तिरू म्हणजे लक्ष्मी,तिरुपती म्हणजे लक्ष्मीचे पती आणि बालाजी म्हणजे जेव्हा मथुरेला कारागृहात भगवंताचा जन्म झाला तेव्हा ते प्रथम चतुर्भुज रूपामध्ये देवकी आणि वसुदेव यांच्यासमोर प्रगट झाले. भगवंताचे हेच ते बाल स्वरूप म्हणून त्यांना बालाजी असे म्हटले आहे .भगवान श्रीहरी विठ्ठल आंध्र प्रदेशामध्ये तिरुपती बालाजी येथे कसे अवतारीत झाले. त्यांना केस का अर्पण करतात अशा काही गोष्टींचा इतिहास काही वेगळाच आहे. भृगु ऋषींनी भगवंताची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या छातीवर लाथेने प्रहार केला होता.

भक्तवत्सल भगवंत भृगु ऋषीची माफी मागून परत त्यांचे चरण दाबू लागले. भगवंताच्या या स्वभावामुळे लक्ष्मी देवीला फार वाईट वाटले व त्या रागवल्या. म्हणून त्या महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे येऊन तपस्या करू लागल्या होत्या. भगवंताच्या अवताराचा उद्देश धर्माची स्थापना करणे तर होताच तसेच भक्तांना भक्तीची संधी द्यायची होती म्हणून भगवंत पुन्हा अवतरीत झाले. लक्ष्मीदेवी वैकुंठ सोडून गेल्यानंतर देवी शिवाय त्या वैकुंठाला शोभा राहिली नाही म्हणून लक्ष्मी देवीला शोधत भगवंत वराह क्षेत्रातील शेषाचल पर्वतावर आले होते. भगवान शेष नागापासून या पर्वताची निर्मिती झाली आहे अशी आख्यायिका आहे.
या पर्वताला एकूण सात शिखरे आहेत. शेषाद्री, गरुडाद्री, नीलाद्री, अंजनद्री, ऋषभाद्री, नारायानाद्री, आणि वेंकटाद्री ही आदि शेषाची सात शिखरे आहेत म्हणून अशी त्यांची नावे आहेत. वायु देवांशी झालेल्या स्पर्धेमध्ये सुमेर पर्वताला भगवान शेषानी घट्ट पकडले होते. या स्पर्धेला थांबवण्यासाठी नारद मुनींनी भगवान श्रीहरीचे गुणगान सुरू केले होते. ज्यावेळी अनंत शेषांनी हे भगवंताचे गुणगान ऐकले त्यावेळी ते सुमेरा पर्वतासह या वराह क्षेत्रामध्ये अवतरले आणि तेथेच ते लक्ष्मीला शोधत होते.
भगवंत लक्ष्मीदेवीला शोधून शोधून थकले परंतु देवी काही सापडल्या नाहीत म्हणून ते याच ठिकाणी एका मुंग्यांच्या वारुळा जवळ बसले आणि ध्यान करू लागले. लक्ष्मीपती भगवंताची ही अवस्था पाहून लक्ष्मी देवीला, ब्रह्मदेवांना आणि शिवजींना फार चिंता वाटली. त्यासाठी भगवान शंकराने तिथे वासराचे रूप धारण केले आणी ब्रह्मदेवाने गायीचे रूप धारण केले. तसेच लक्ष्मी देवींनी एका गवळणीचे रूप घेतले. अशाप्रकारे तिरुमलचा राजा यांच्याकडे लक्ष्मी देवीने गाय आणि वासरू सुपूर्द केले.
त्यावेळी तिरुमल राजाचा सेवक गाई चारण्यासाठी रोज शेषाचलावर म्हणजे त्या पर्वतावर जात असे. त्यावेळी रोज ती ब्रह्मरूपी गाय त्या वारुळाजवळ उभी राहत असे व तिचे संपूर्ण दूध त्या वारुळावर भगवंताला अर्पण करत होती. तिरुमल राजाची पत्नी एक दिवस म्हणाली आपल्याला जी नवीन गाय मिळाली आहे त्या गाईचे दूध आपल्याला कधी प्यायला मिळाले नाही. आपल्या सेवकाने या गायीकडे लक्ष ठेवून तिचे दूध कोठे कोण घेऊन जात आहे ते पाहिले पाहिजे असे म्हणाली.
तिच्या आदेशामुळे गाई चारणाऱ्याने दिवसभर त्या दिवशी गायीकडे लक्ष ठेवले.त्यावेळी त्याच्या लक्षात आले की ही गाय एका वारुळावर जाऊन तिचे संपूर्ण दूध तेथे अर्पण करते. त्यावेळी त्याला राग आला आणि दुरूनच त्याने आपल्या हातातील कुऱ्हाड गाईला फेकून मारली. भगवंत बालाजी गाईवर फार प्रेम करत असल्यामुळे ते कुऱ्हाड आपल्याकडे येताच बाहेर आले. त्या कुऱ्हाडीचा घाव भगवंताच्या डोक्याला झाला म्हणून आजही तिरुपती बालाजीचे डोके झाकलेले असते आणि दर शुक्रवारी झालेल्या जखमेच्या जागेवर औषध लावले जाते. तसेच ज्यावेळी भगवंताच्या डोक्यावर हा वार झाला होता तेव्हा त्यांच्या डोक्यावरील जखमेच्या जागेवरील केस गेले होते.
पुढे शेकडो वर्षानंतर नीलाद्री नावाची एक भक्त स्त्री भगवंताच्या दर्शनासाठी आली आणि म्हणाली की देवा मी तुमचे असे स्वरूप पाहू शकत नाही म्हणून मी माझे केस तुम्हाला अर्पण करत आहे. म्हणून तेव्हापासून लक्ष्मीपती बालाजींना केस अर्पण करण्याची पद्धत सुरू झाली. गाई चालणाऱ्या सेवकाचा भगवंताला खूप राग आल्यामुळे भगवंतांनी त्याचा वध केला होता. त्याचबरोबर तेलूमलचा चोर राजा की ज्याने गाईची रक्षा करण्याचे संस्कार सेवकांना दिले पाहिजे परंतु तसे संस्कार राजाने दिलेले नव्हते म्हणून भगवंताने राजाला शाप दिला की, तू तिथे राक्षस म्हणून जन्म घेशील.
परंतु त्या राजाने भगवंताला माफ करण्याविषयी खूप विनंती केली मग भगवंतांनी त्याला उपशाप देऊन पुढील जन्मी तुझा जन्म या क्षेत्री आकाश राज म्हणून होईल असे सांगितले .तेव्हा तुझी पुत्री पद्मावती हिच्याशी मी विवाह करून लक्ष्मी देवीसह या ठिकाणी मी वास करेल. तसेच येथे येऊन नतमस्तक होणाऱ्या सर्व भक्तांचा मी उद्धार करेल. त्यानंतर भगवंत गोरक्षेसाठी डोक्याला झालेली जखम धारण करत फिरत फिरत वराह क्षेत्री आले. द्वापार युगामध्ये असताना यशोदा मातेची इच्छा होती की श्रीकृष्णाचा विवाह आपल्या डोळ्यांनी पहावा पण ती इच्छा अपूर्ण राहिली होती.
तसेच भगवंतावर पुत्रवत प्रेम करण्याची सुद्धा तिची इच्छा होती. कारण भगवंत अकरा वर्षाचे असताना अक्रव महाराज त्यांना मथुरेला घेऊन गेले होते. भगवंतांना यशोदामाईची इच्छा पूर्ण करायची होती म्हणून यशोदा माई बकुळा देवी नावाच्या स्त्री वेशात या पर्वतावर अवतारीत झाल्या. या बकुळा देवीने जेव्हा पाहिले की श्रीनिवास भगवान तिरुपती बालाजी यांच्या डोक्याला जखम झाली आहे तेव्हा त्यांचे हृदय हळहळले. म्हणून त्यांनी भगवंताच्या डोक्याला मलमपट्टी केली. यशोदामाई म्हणजेच बकुळा देवी आणि श्रीकृष्ण म्हणजेच श्रीनिवास आता या पर्वतावर राहु लागले.
इकडे तिरुमलचा चोर राजा म्हणजेच आकाश राज याची कन्या पद्मावती विवाहयोग्य झाली होती.
हे सर्व स्वतः सुखदेव गोस्वामी भगवंताच्या वर्णात पद्मावतीला सांगतात.पद्मावतीने भगवंतांना पाहताच क्षणी भगवंतांच्या प्रेमात पडली. परंतु पद्मावती ही त्रेता युगातील भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तपश्चर्या करणारी द्वेद होती. जेव्हा वेदवती तपचर्या करत होती तेव्हा रावणाने कामांद होऊन या वेदवतिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा वेदवतिने रावणाला शाप दिला होता की हे रावणा मी तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. तू माझी तपश्चर्या भंग केली आहे व भगवंत प्राप्तीमध्ये बाधा आणलेली आहे.
असे म्हणत वेदवती स्वतः अग्नीमध्ये विलीन झाल्या. जेव्हा प्रभू श्रीराम अगस्ती ऋषींना भेटले तेव्हा सीता देवीने अग्नीमध्ये प्रवेश केला होता. अग्नीमध्ये सीतादेवी सुरक्षित राहिल्या आणि अग्नी मधून छाया सीता म्हणजेच वेदवती भगवंता बरोबर पंचवटीला आल्या. त्यावेळी रावणाने छाया सीतेचे हरण केले त्यावेळी वेदवती मुळेच रावणाचा नाश झाला. जेव्हा सीतेची अग्निपरीक्षा करण्यात अली तेव्हा छायासीता म्हणजेच वेदवती यांनी अग्नी मध्ये प्रवेश केला आणि महाराणी सीता बाहेर आली.
तेव्हा सीतादेवी म्हणू लागल्या की हे भगवंता प्रभू श्रीरामा ही वेदवती हिने सुद्धा तुमच्या प्राप्तीसाठी फार मोठी तपचर्या केली आहे.तेव्हा तुम्ही हिच्याशी सुद्धा विवाह करा. पण भगवंत तेव्हा म्हणाले या अवतारात मी एक पत्नी व्रत धारण केलेले आहे. परंतु जेव्हा मी कलयुगात श्रीनिवास म्हणून अवतरीत होईल तेव्हा मी वेदवतीशी म्हणजेच पद्मावतीशी विवाह करेल. म्हणून भगवंतांनी पद्मावतीशी विवाह केला.
जेव्हा पद्मावतीचे आणि भगवान श्रीनिवास यांचे लग्न ठरले तेव्हा भगवंतांकडे लक्ष्मी नव्हती, धन नव्हते म्हणून भगवंतांनी कुबेराकडून कर्ज घेतले आणि पद्मावतीशी विवाह केला होता. या विवाहाला करवीर क्षेत्रावरून म्हणजे कोल्हापूर वरून लक्ष्मी देवी सुद्धा उपस्थित होत्या. सर्व देवी देवतांच्या साक्षीने हा विवाह पार पडला होता. भगवंतांनी विवाहासाठी कुबेरा करून घेतलेले कर्ज भगवंतावर प्रेम करणारे भक्त आजही फेडतात. अनेक भक्त तिरुपती बालाजीला जाऊन सोने अर्पण करतात आणि मोठ्या प्रमाणात देणगी देतात. पद्मावती आणि लक्ष्मीदेवी बरोबर असणारे तिरुपती बालाजी हे फार उदार आहेत. ते भक्तांच्या इच्छा तर पूर्ण करतात तसेच भक्तांचा उद्धार करतात.
भगवंत आधी विग्रह स्वरूपात नव्हते. ज्याप्रकारे स्वतः भगवान पांडुरंग उपस्थित आहेत त्याप्रमाणेच ते देखील होते. परंतु आकाश राज बंधू तोडमल आणि पुत्र वसुदेव यांच्या लक्षात आले की, लोक नकळत भगवंताप्रति अपराध करतील म्हणून या कलियुगाच्या प्रभावामुळे त्यांनी सांगितले की भगवंता तुम्ही विग्रह रुपामध्ये येथे स्थापन व्हा. म्हणून आजही आपल्याला विग्रह रूपामध्ये तिरुपती बालाजीचे दर्शन होते. आजही अनेक भक्त आणि श्रद्धावान लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि बालाजी नवसाला पावतो . येथे देशभरातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
या ठिकाणी जाण्यासाठी बस, ट्रेन, विमान, आणि प्रायव्हेट गाडीने जाता येते. येथे तिरुपती रेल्वे स्टेशन आणि रेनीगुंटा रेल्वे जंक्शन वर जाण्यासाठी अनेक शहरातून येथे रेल्वे जोडलेल्या आहेत. तसेच तिरुपती एअरपोर्ट आणि चेन्नई एअरपोर्ट वर विमानाने जाऊन बालाजी मंदिराकडे जाता येते. बसच्या माध्यमातून तिरुपती बालाजीला जाण्यासाठी साउथ इंडियाच्या बऱ्याच शहरामधून तिरुपती जाणाऱ्या बसेस असतात.
तिरुपती बालाजीला गेल्यानंतर भक्तांना राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. येथे तिरुपती बालाजी एअरपोर्टच्या जवळपास अनेक ठिकाणी 600 रुपये पासून ते 1500 रुपये पर्यंत हॉटेल्स आणि लॉजेस आहेत. तसेच तिरुपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वेबसाईटवर जाऊन देवस्थानाच्या भक्त निवास मध्ये राहण्यासाठी आपण ऑनलाइन बुकिंग करू शकता. परंतु ही बुकिंग करण्यासाठी आपल्याला जाण्या अगोदर कमीत कमी दोन महिने आधी बुकिंग करावे लागते.
तसेच तिरुपती मध्ये खाजगी हॉटेल घेऊन सुद्धा आपण मुक्काम करू शकतो. येथे दर्शन करण्यासाठी प्रथम पद्मावती मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. हे मंदिर तिरुपती पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. अशी मान्यता आहे की भगवान तिरुपतीचे दर्शन घेण्याअगोदर पद्मावती देवीचे दर्शन घेणे योग्य असते. यानंतर भक्त तिरुपती बालाजी दर्शनासाठी जातात. येथेही दर्शनासाठी अगोदर ऑनलाईन, ऑफलाइन दर्शन तिकीट घ्यावे लागते. तिरुपती मंदिरापासून तिरूमला शहर 22 किलोमीटर अंतरावर आहे.
तिरुपती दर्शन साठी मोफत दर्शन, 300 रुपये फी असणारे विशेष दर्शन आणि व्हीआयपी दर्शन असे तीन प्रकार आहेत. मोफत दर्शनासाठी 22 -24 तास लागतात. विशेष दर्शनासाठी दोन-तीन तास लागतात. तसेच तिरुपतीला जाणारे अनेक भक्त , मुख्य मंदिरापासून जवळपास अंतरावर असलेल्या पद्मावती आम्मावरी मंदिर, भगवान शिव शंकराचे श्री कपिलेश्वर स्वामी मंदिर, तिरूमला शहराच्या जवळच असलेला चंद्रगिरी किल्ला, वन्यजीव आणि निसर्ग रम्य दृश्य असलेले श्री वेंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान, निसर्ग रम्य सुंदर ताळकोना धबधबा, तसेच मंदिर परिसरात असलेले पुष्करणी जलकुंड त्याचप्रमाणे इतरही अनेक निसर्ग रम्य पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत ते पाहण्यासाठी जातात.