गोवा राज्यात दक्षिण गोवा जिल्ह्यात पोंडा तालुक्यात पणजी पोंडा रोडवर असलेल्या मंगेशी गावी श्री मंगेश मंदिर ( Mangesh Temple Goa ) आहे. या देवाला पूर्वी मांगलीश देव असेही म्हणायचे आता श्री भगवान मंगेश असे म्हणतात. साक्षात महादेवाचा अवतार म्हणून मंगेश देवाची स्थापना झाली होती.
भारतीय गान कोकिळा लता मंगेशकर यांचे हे मूळ गाव आहे. त्यांच्या वडिलांचे आडनाव ठाकूर असे होते परंतु मंगेशी गावावरून त्यांनी त्यांचे आडनाव मंगेशकर ( Mangeshkar ) असे करून घेतले. मंगेश हे त्यांचे कुलदैवत आहे. भारतरत्न, सर्वोत्तम, ज्येष्ठ, आणि श्रेष्ठ रत्न लता दीदी आणि त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे हे प्रमुख श्रद्धास्थान होते. तसे संपूर्ण गोवा राज्य निसर्गरम्य, बघण्यासारखे आणि फिरण्यासारखे आहे. गोव्यामध्ये जितके सुंदर बीचेस आहेत, समुद्रकिनारे आहेत, तितकीच स्थापत्य कलेने समृद्ध असलेली देखणी मंदिरेही आहेत. या राज्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे तर आहेत.
तसेच हिंदू धर्मियांची अनेक धार्मिक प्रार्थना स्थळे आहेत. त्याचप्रमाणे इतिहास कालीन किल्ले आणि अनेक थोर,महान लोकांची जन्म ठिकाणे या राज्यात आहेत. त्यामुळे अनेक जण आपल्या आवडीनुसार गोव्याकडे पाहतात आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात. दक्षिण गोव्यामधल्या पोंडा तालुक्यातील मंगेश मंदिर हे ऐतिहासिक आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. सुबक बांधकाम आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर गोव्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे एक खास आकर्षण आहे.
मंगेशी मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. फार पूर्वी आत्ताच्या प्रियोल गावात श्री देव मंगेशाची ( God Mangesh ) स्थापना झाली होती. परंतु या देवाचे मूळ स्थान कुशा स्थळ हे होते. पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून देवाला वाचवण्यासाठी मंगेशीला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रियोलला आणण्यात आले. कारण त्याकाळी पोंडा शहर हिंदू राजांच्या ताब्यात होते. सन 1560 साली कुशा स्थळ येथून हे महादेव लिंग जेव्हा हलवले तेव्हा त्याचे वजन प्रियोलला आणल्यानंतर फारच वाटू लागले होते.
भक्तांना याची लीला कळाल्यानंतर या ठिकाणी या लिंगाची स्थापना करण्याचे ठरवले. त्यावेळी तुलसी विवाह म्हणजे कार्तिक शुद्ध द्वादशी हा दिवस होता. परंतु त्यावेळी येथे देऊळ नव्हते. पुढे मग शुद्ध पौर्णिमेला म्हणजे जवळजवळ चार महिन्यांनी येथे लिंगाभोवती छोटे देऊळ बांधण्यात आले. तसेच दरवर्षी कुशास्थळ येथून देवाला कार्तिक शुद्ध द्वादशीला देवाला सोन्याच्या पालखीत बसून प्रयोलला आणण्यात येते. देव येथे स्थानापन्न झाल्यानंतरच इकडे तुळशी विवाह लावला जातो.
मंदिराच्या सर्वात प्रथम असणाऱ्या बाहेरील पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आजूबाजूला फार सुंदर वातावरण दिसते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ गेल्यानंतर सुंदर देखण्या प्रवेशद्वारातून आत मध्ये गेल्यानंतर मुख्य मंदिराचे, सभामंडपाचे, दीपमाळेचे आणि इतर सर्वच बांधकामाची स्थापत्य कला आणि रंगरंगोटी पाहून फार विशेष वाटते. तसेच हे सर्व पाहून मन अगदी प्रसन्न होते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला गोपुरम असे म्हणतात.
आत मध्ये गेल्यानंतर समोरूनच आकर्षक आणि फार सुंदर मुख्य गर्भगृह दिसतो. गर्भगृहामध्ये मंगेशाची फार सुंदर मूर्ती बसवलेली आहे. त्याचप्रमाणे गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला आणखी दोन वेगवेगळ्या उभ्या द्वारपाल स्वरूपात श्री मंगेशाच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिराजवळच कायम स्वरूपी पाणी असलेला पुरातन कुंड आहे. येथे येणारे काही भक्तगण या कुंडामध्ये स्नान करूनच दर्शनाला जातात.श्री मंगेश मंदिराची स्थापत्य कला अद्वितीय आहे. गोव्याची पारंपारिक वास्तुकला आणि भारतीय शिल्पकलेचा संगम येथे आपणास पहावयास मिळतो.

मंदिराच्या आत मध्ये भगवान मंगेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे. येथे भगवान शिव शंकरांना केलेली प्रार्थना व्यर्थ जात नाही असा भक्तांचा विश्वास आहे.मंदिराच्या मागील बाजूस तीन गर्भगृह दिसतात त्यातील पहिल्या मंदिरात लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. येथे गरुड भगवान आणि लक्ष्मीनारायणाचे दिव्य दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या गर्भ गृहांमध्ये श्री वीरभद्र चे दर्शन घडते. पुढे तिसऱ्या गर्भ गृहामध्ये मुलकेशव मूर्ती आहे.
मुलकेशवचे दर्शन घेतल्यानंतर भक्तगण दीपस्तंभ चे दर्शन घेण्यासाठी जातात. येथील दीपस्तंभ फार मोठा भव्य दिव्य आणि रचनेने फार सुंदर आणि विशेष आहे. तसेच दीपस्तंभ च्या पायथ्याशी वेगवेगळे चित्र रेखाटलेले आहेत. तसेच येथील तुळशी वृंदावनाच्या चारही बाजूला देवांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
इथल्या शिव रूपाला मंगेशी नाव पडण्यामागे सुद्धा एक अख्यायिका आहे. असे म्हटले जाते की शंकर आणि पार्वती पूर्वीचा एक जुना खेळ खेळत असताना शंकर भगवान त्या खेळात हरले म्हणून देव रुसून निघून गेले. देव अज्ञात वासात गेल्यानंतर फिरत फिरत या ठिकाणी आले होते.
त्यांना हे ठिकाण समाधानकारक प्रसन्न आणि शांत वाटले. त्यामुळे देव इथेच थांबले. परंतु त्या पाठोपाठ देवाचा शोध घेत पार्वती देवी या ठिकाणी पोहोचली. पार्वती देवी येथे येत आहे हे कळताच देवाने तिची थोडी थट्टा करण्याचे ठरवले व वाघाचे रूप धारण करून पार्वतीसमोर आले. हे पाहून पार्वती देवी घाबरली आणि म्हणाली “त्राहि मम गिरिशा!” म्हणजे हे गिरीशा मला वाचवा.गिरीश हे शिवाचे दुसरे नाव आहे. म्हणून सुरुवातीला पूर्वी या देवाला मांगेरीस असे म्हटले जायचे. म्हणजे मंगेशीचा गिरीश.
पुढे मांगेरीस पासून मांगेरीस नाथ झाला आणि आता त्याच देवाला मंगेश असे संबोधतात. मंगेशी (Mangeshi ) देवस्थान वसलेल्या परिसराला मोकासा म्हणजे इनाम असे म्हणतात. साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी बाळाजी बाजीराव पेशव्यामार्फत इस 1739 मध्ये आत्ताची मंगेशी देवस्थानची जागा देवस्थानास इनाम म्हणून दिली होती. पुढे इस 1746 मध्ये लाकडी खांबा पासून येथे साधे मंदिर बांधण्यात आले.
पुढे या मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार इस 1973 मध्ये करून मंदिरावर सुवर्ण कलशाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी मंदिर फार आकर्षक बांधण्यात आले आहे. या निसर्ग संपन्न वातावरणात वसलेल्या मंगेशी मंदिराचे वर्षभरात साजरे होणारे खास सोहळे डोळ्यांचे पारणे फेडतात. मंगेशीची निघणारी पालखी आणि नौका विहाराचे दृश्य डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी इथे देशभरातल्या भक्तांची मांदियाळी दिसते. गोव्यातल्या सर्वात देखण्या मंदिरांपैकी एक असलेले हे मंगेशी चे मंदिर,इथली स्थापत्य कला, स्वच्छता, निसर्गरम्य वातावरण आणि प्रसन्नता यामुळे येथे येऊन मन अगदी हलके होते.
त्यामुळे गोव्यातील सर्वात जास्त पाहिले जाणारे आणि भक्तांची गर्दी असणारे हे ठिकाण आहे. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. या मंदिर परिसरात गजानन भगवती नंदिकेश्वर आणि ब्राह्मण वत्स गोत्रातील ग्राम पुरुष श्री देव शर्मा अशा देवांची छोटी मंदिरे आहेत. तसेच मुख्य मंदिराच्या मागील बाजूस मुलकेशव, वीरभद्र, लक्ष्मीनारायण, कालभैरवनाथ गरुड सूर्यनारायण आणि सांतेरी देवी अशा देवांच्या मूर्ती आहेत. मंगेशी मंदिरात दररोज सकाळी षोडशोपचार पूजा केली जाते.
तसेच लघुरुद्र व महारुद्र सारखे अभिषेक केले जातात. दुपारी महाआरती आणि रात्री देवाची पंचोपचार पूजा केली जाते. या ठिकाणी वर्षभरातून महाशिवरात्री, रामनवमी, अक्षय तृतीया, नवरात्र,दसरा, दिवाळी या सणांच्या दिवशी उत्सव साजरे केले जातात. याबरोबरच माघ पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. येथील माघ पौर्णिमेचा उत्सव माघ शुक्ल सप्तमीला सुरू होतो व माघ पौर्णिमेला संपवला जातो.येथे जाण्यासाठी जवळचे मडगाव रेल्वे स्टेशन आहे. येथून मंगेशी गाव 25 किलोमीटर अंतरावर आहे. गोव्याची राजधानी पणजी पासून हे मंदिर 25 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच नागोशी जवळ मर्दोल पासून एक किलोमीटर अंतरावर मंगेश मंदिर आहे.