स्वामीसूत हरिभाऊ तावडे | Swamisut Haribhau Tavade

स्वामी सूत ( Swamisut Haribhau Tavade ) म्हणजे स्वामींचे मानसपुत्र. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापुरी तालुक्यात विल्ले या गावी हरिभाऊ तावडे यांचा जन्म इस 1832 मध्ये श्रावण कृष्ण प्रतिपदेला झाला होता.त्यांची मोठी शेतीवाडी होती. हरिभाऊ यांना आठ बंधु आणि चार बहिणी होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांची अभ्यासातील आवड आणि हुशारी लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी मुंबईला पाठवले.

मुंबईमध्ये त्यांनी पुढील पंधरा-सोळा वर्षे शिक्षण घेतले. त्याचप्रमाणे हरिभाऊ तावडे यांनी मराठी भाषे खेरीज इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. पुढे त्यांना मुंबई नगरपालिका मध्ये नोकरी मिळाली. लक्ष्मण विनायक पंडित हा हरिभाऊचा खास मित्र होता. हा लक्ष्मण एका कंपनीच्या भागीदारीत बुडवून फार कर्जबाजारी झाला होता. तोही श्री स्वामी समर्थ यांचा भक्त होता. त्याचबरोबर लक्ष्मण पंडित यांचा मित्र गजानन श्रीधर खत्री हे मुंबई नगरपालिकेत नोकरी करत होते. त्यामुळे हरिभाऊ चा या दोघांशीही विशेष स्नेहबंध होता.

साधे सरळ जीवन जगणाऱ्या मुंबईच्या या तीनही चाकरमान्यांना कोणीतरी सट्टा खेळून पाहण्याचा सल्ला दिला. हरिभाऊ आणि खत्री यांनी आपल्या जवळील सर्व पैसे तसेच आणखी काही कर्ज घेऊन सगळेच पैसे अफूच्या सट्ट्यावर लावले. परंतु बाजारात नेमके उलटे घडले. अफूचे भाव कोसळले त्यामुळे दोघांचे खूप नुकसान झाले. मग दोघा मित्रांनी लक्ष्मण पंडित यांचा सल्ला घेतला. खरंतर ते आधीच कर्जाने व्याकुळ झाले होते. मग या तिघांनीही मिळून श्री स्वामी समर्थांना नवस केला की, पुढील आठ दिवसात जर आम्ही कर्जमुक्त झालो तर आम्ही तिघेही अक्कलकोटला तुमच्या दर्शनासाठी येऊ.

आश्चर्य म्हणजे पुढील आठ दिवसात खरोखरच चमत्कार होऊन अफूचे भाव फार वाढले. तिघांनीही कर्ज फेडून त्यांच्याकडे नफ्याचे दोन हजार रुपये उरले. स्वामी समर्थांना बोललेल्या नवसाची त्यांना आठवण झाली. तीनशे रुपये जवळ घेऊन तिघेही अक्कलकोटला निघाले. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर ते प्रथम गणपतराव जोशी यांच्या घरी गेले. त्यादिवशी श्री स्वामी समर्थांचा मुक्काम चोळप्पाच्या घरी होता.

तिथे हे तिघे दर्शनास येताच स्वामी म्हणाले व्यापार केला, तोटा झाला, मला नवस केला, दोन हजार रुपये नफा झाला! जाओ साले! तिघही मित्र स्वामींचे बोलणे ऐकून अचंबित झाले. त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन परत आले.त्या रात्री चोरांनी त्या तिघांचे कपडे चोरून नेले. मग दुसऱ्या दिवशी ते परत स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि स्वामींना त्यांनी आमचे कपडे चोरी गेल्याचे सांगितले. त्यावर स्वामी म्हणाले छान झाले! सुंठी वाचून खोकला गेला. त्या तिघांनाही स्वामींच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही.

मग श्री स्वामी समर्थ गजाननास बाजारात जाऊन डोकीस धोतर बांधण्याची आज्ञा केली. लक्ष्मणास डोक्यास रुमाल बांधण्यास सांगितले आणि हरिभाऊंना मात्र आपल्या जवळ घेतले आणि म्हणाले आपल्या कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो . हरिभाऊ मात्र गडबडून गेले होते त्यांना काही समजत नव्हते. हरिभाऊंनी स्वामींना नफ्याच्या तीनशे रुपयाचे काय करू असे विचारताच स्वामींनी स्वतःच्या पायाला हात लावून पादुका करून आणाव्यात असे हरिभाऊंना सुचवले.

दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. या तिघांनी गणपतरावांकडून स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवून घेतले त्याप्रमाणे नैवेद्यात बेसन लाडू,भजी, खीर इत्यादी बनवून श्री स्वामींना राजवाड्यात जाऊन नैवेद्य अर्पण केला.काही दिवसांनी तिघेही मुंबईस परत गेले आणि मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी आपआपले नफ्याचे पैसे विभागून घेतले. हरिभाऊंनी मात्र श्री स्वामींची चालती बोलती मूर्ती जेव्हा पाहिली होती तेव्हापासून त्यांचे संसारातील चित्त उडाले होते. त्यांना नोकरीही करावीशी वाटेना. प्रथम त्यांनी स्वामींच्या चांदीच्या पादुका खरेदी केल्या आणि परत दोन्ही मित्रांना घेऊन अक्कलकोटला पोहोचले.

स्वामींचे दर्शन घेऊन चांदीच्या पादुका स्वामी समोर ठेवता क्षणीच स्वामींनी त्या पायात घातल्या. पुढचे सलग 14 दिवस स्वामींनी त्या पादुका धारण केल्या होत्या. इतर सर्व शिष्य मंडळींचा त्यावर डोळा होता. परंतु स्वामी म्हणत हे माझे आत्मलिंग आहे. मी ते कोणासही देणार नाही. पुढे 14 व्या दिवशी हरिभाऊ स्वामींच्या दर्शनासाठी गेले असता स्वामींनी त्यांना आपल्याकडे ओढून घेतले आणि म्हणाले तू माझा सूत आहेस. सर्व सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून त्यावर ध्वजा उभी कर.

या माझ्या आत्मलिंग स्वरूप पादुका तेथे मांडण्याकरता तुला मी देत आहे. हरिभाऊंना आनंद गगनात मावत नव्हता. त्या आत्मलिंग पादुका त्यांनी मस्तकी धारण केल्या. त्याच रात्री स्वामींनी हरिभाऊंना आपली छाटी कफनी देऊन सांगितले की, आपला संसार सोडून पुढच्या कामाला लाग. मग हरिभाऊ पुन्हा मुंबईला आले. हरिभाऊंनी आता निर्णय घेतला होता, नोकरी सोडून घरावर तुळशीपत्र ठेऊन संसारत्याग करण्याचा मानस त्यांनी पत्नी ताराबाईस सांगितला. त्यांच्या जाण्याला ताराबाईने विरोध केला आणि समजूत काढूनही पाहिले. परंतु हरिभाऊ आता कोणाच्याही ऐकण्यापलीकडे गेले होते.

हरिभाऊंनी पत्नीचे सर्व दागिने आणि पैसे काढून घेतले. पत्नीच्या सुखी संसाराला त्यांनी सुरुंग लावला होता. त्यांच्या कामाठीपुराच्या राहत्या घरी पादुका स्थापन करून तेथेच त्यांनी मठाची स्थापना केली.पुढे तेथून तो मठ त्यांनी कांदेवाडी येथे हलवला वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी संसार त्याग करून बैरागी झाल्यामुळे आप्तेष्ट आणि जवळील सर्वच त्यांची निंदा करू लागले. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीत ते एवढे तल्लीन झाले होते की त्यांनी नातेवाईक, आई , मित्र ,शेजारी यांपैकी कोणाच्याही मताची पर्वा केली नाही.

हरिभाऊंची आई म्हणजे काकूबाई यांना भरल्या संसारातून आपला मुलगा साधू बुवा झालेला पाहवत नव्हता. आपल्या मुलावर कोणीतरी करणी ,चेटूक केलं असेल असे तिला वाटू लागले होते. काकूबाईना कोणीतरी सांगितले की सटाण्याचे देव मामलेदार भल्या भल्यांचे भूत उतरवतात. मग काकूबाईंनी थेट सटाणा गाठले. देव मामलेदार समोर हात जोडून काकूबाई त्यांना माझ्या मुलावर कोणीतरी चेटूक केलं आहे असे सांगू लागल्या. देव मामलेदार अंतर्ज्ञानी होते. ते हसू लागले आणि म्हणाले होय तुझ्या मुलाला जबरीभूत लागले आहे परंतु ते मलाही सोडवता येणार नाही.

काकूबाईंच्या प्रश्नाचे निरसन न झाल्यामुळे त्या निराश होऊन परत मुंबईला आल्या. स्वामी सुताकडे आता 18 पगड जातीतील लोकांची गर्दी होऊ लागली होती. स्वामींच्या पादुकांचे दर्शन देऊन अनेकांच्या समस्या सुटत तर काहींचे मनोरथ पूर्ण होत असत स्वामी सुतांच्या आज्ञेमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली होती. इस 1870 मध्ये श्री स्वामी सुतांनी अक्कलकोट (Akkalkot ) मध्ये श्री स्वामी समर्थ जयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती.

आपल्या मठातील स्वामींची भक्ती तळागाळात पोहोचावी अशी श्री स्वामी सुतांची इच्छा होती. हरिभाऊ श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये देहभान हरून राहत असत. अनेक सुंदर अभंगाची रचना त्यांच्या मुखातून आपोआप बाहेर पडू लागली. वेळोवेळी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटची वारी करून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत असत. तसेच तेथे राहून त्यांची सेवा करत असत. श्री स्वामी समर्थ आपल्या लाडक्या सुताला कधी हनुमान तर कधी चंदुलाल म्हणून संबोधित असत.

बऱ्याच वेळा स्वामी आपल्या मुंबईकडून येणाऱ्या भक्तांना मुंबईच्या स्वामी सुताच्या मठात जाण्यास सुचवत असायचे. एकदा स्वामी समर्थ खास बागेत बसले होते.त्यावेळी स्वामीसूत श्री स्वामींच्या भेटीसाठी आले होते. स्वामीसूत खडावा घालून स्वामींसमोर भजन करत होते हे तेथील काही सेवेकरी मंडळींना आवडले नाही .स्वामीसुतांचा अपमान करण्यासाठी त्यांनी स्वामींना विनंती करून बळजबरीने त्यांच्या खडावा काढून घेतल्या. सर्वांसमोर अपमान झाल्यामुळे स्वामीसुतांना ही गोष्ट खूप जिव्हारी लागली.


एकदा स्वामी त्यांना म्हणाले लवकरच मी अवतारकार्य संपवणार आहे तू आता ध्वजा उभारली आहे आता माझे कार्य तुला पुढे चालवायचे आहे. स्वामींचे बोलणे ऐकून स्वामी सुतांना धक्का बसला, काय बोलावे तेच सुचेना. आपले सद्गुरु सगुन रूपात दिसणार नाहीत या कल्पनेने त्यांना फार मोठे दुःख झाले होते. श्री स्वामींची आज्ञा घेऊन स्वामी सूत मुंबईस परत आले. झालेल्या अपमानाची सल मनात होतीच , गुरुरायांच्या अगोदर आपण आपला देह विसर्जित करावा असा दृढ निश्चय स्वामी सुतांनी केला होता. त्रिकाल ज्ञानी परमात्म्यास याची जाणीव होतीच.

श्री स्वामी समर्थांना त्यांचे मन बदलायचे होते. स्वामीसुतांना अक्कलकोटास येण्यास निरोप धाडला
परंतु हरिभाऊ आले नाहीत. श्री स्वामींनी शिऊबाईला, श्रीपाद भट आणि कृष्णा यांना स्वामी सुतांना घेऊन येण्यासाठी मुंबईला पाठवले. परंतु तरीही स्वामी सूत बदलले नाहीत. शेवटी श्री स्वामी समर्थांनी निरोप पाठवला की तोफ लावून तयार ठेवली आहे. आलास तर बरे. नाहीतर बत्ती लावून उडवून टाकीन. स्वामी सुतांना माहीत होते की जर आपण अक्कलकोटला गेलो तर श्री स्वामी आपले मरण टाळतील. स्वामींच्या मागे आपल्याला राहावे लागणार हा विचार त्यांच्या मनात भेडसावत होता.

त्यामुळे त्यांनी मुंबई सोडली नाही. इस 1874 मध्ये श्रावण वद्य नवमीस स्वामींच्या या सुपुत्राने देह ठेवला.
ज्या क्षणी स्वामी सुतानी मुंबईमध्ये श्री स्वामी समर्थ चरणी आपला देह सद्गुरु चरणी अर्पण केला त्या क्षणी श्री स्वामी समर्थ यांनी आपले अंग धरणीवर टाकले आणि माझा सुत गेला असे सर्वांना सांगू लागले. त्यादिवशी श्री स्वामी समर्थ कोणाबरोबरही बोलत नव्हते. वटवृक्षाखाली बसून सुताची आठवण करत होते. श्री स्वामींचे डोळे मिटलेले होते आणि तोंडातून भजन चालू होते. पुढे स्वामीसुतांच्या मुंबईतील मठाचा कारभार त्यांचे लहान बंधू दादा महाराज ( Dada maharaj ) यांनी सांभाळला तेही स्वामी समर्थांकडून अनुग्रहीत होते.

Leave a Comment