होळी | Holi

वसंत ऋतू चे आगमन होऊन झाडांना नवीन पालवी फुटते, झाडांना बहर येतो, हिवाळा संपून उन्हाची तीव्रता हळू हळू वाढायला लागते, या वसंत ऋतू मधे आपण वसंतउत्सव साजरा करतो वसंत उत्सव म्हणजेच होळी ( Holi ). हिंदू पंचांगातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. या फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो. देशभरात विविधठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सन मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो .विशेषतः उत्तर भारतामध्ये होळी या सणाला खूपच महत्त्व आहे .

प्रत्येक ठिकाणी होळी साजरी करण्याची परंपरा जरी वेगळी असली तरी त्या मागील उद्देश हा एकच असून, राग, द्वेष, ईर्षा अहंकार, गर्व, वाईट विचार दृष्ट प्रवृत्ती याचे दहन करणारा हा सण आहे. प्रत्येक राज्यामधे या सणाला विविध नावाने संबोधले जाते, महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये या सणाला शिमगा किंवा होळी असे म्हटले जाते, या शिवाय इतर राज्यामध्ये फागून,होलिका दहन, कामदहन, डोला यात्रा, हुताषनी महोत्सव अश्या वेगवेगळ्या नावाने होळी या सणाची ओळख आहे. काही ठिकाणी हा सण दोन दिवस तर काही ठिकाणी रंग पंचमी पर्यंत पाच दिवस मोठया जल्लोषा मधे साजरा केला जातो.

महाराष्ट्रामधे विशेषतः उत्सवांची मंदियाळी असलेल्या कोकणामधे हा सण मोठया उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. कोकणातील शिमगोत्सव पाहण्यासारखा असून, या उत्सवामधून आपणास लोककलेचे दर्शन होते, गाण्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले जाते. होळी च्या दिवशी ढोल ताश्या च्या गजरात ठेका धरत ग्रामदेवतेच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. शंखासुर, नकटा, दशावतार, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, गोमूचा नाच, अशी विविध सोंगे, खेळे, नृत्य,येथे सादर केली जातात, कोकणातील लोकांनी आपली संस्कृती आणि परंपरा जोपासलेली आहे. होळी सणाविषयी अनेक अख्यायिका आहेत त्या पैकी काही अख्यायिका आपण पाहणार आहोत.

दैत्यराज हिरण्यकश्यपू या राजाला ब्रम्ह देवाकडून वरदान प्राप्त झाले होते. कोणताही प्राणी, मनुष्य कुठलेही अस्त्र शस्त्र, दिवसा किंवा रात्री, घरामध्ये किंवा घराबाहेर त्याचा वध कोणीही करू शकणार नाही. त्या मुळे त्याच्या मधे अहंकाराच्या निर्माण झाला होता,त्याच्या पेक्षा या जगात कोणीही श्रेष्ठ नाही, तो स्वतः ला देवापेक्षा हि श्रेष्ठ समजून लागला. हिरण्यकश्यपू चा मुलगा भक्तप्रल्हाद श्री हरी विष्णू चा खुप मोठा भक्त होता, श्री हरी चे नामस्मरण सदैव त्याच्या मुखात असे, याच गोष्टीचा राग हिरण्यकश्यपू ला येई. त्याने विविध प्रकारे भक्त प्रल्हाद ला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान विष्णू ने वेळोवेळी आपल्या प्रिय भक्ताचे संरक्षण केले.

शेवटी त्याने आपल्या मुलाला मारण्याची जबाबदारी आपली बहीण होलिका हिच्या कडे दिली. होलिकाला अग्नी भस्म करू शकत नाही असे वरदान प्राप्त होते. होलिका प्रल्हादास घेऊन अग्निकुंडामधे प्रवेश केला, भक्त प्रल्हादास मांडीवरती घेऊन अग्नी कुंडामध्ये होलिका बसली. परंतु श्री हरी विष्णू च्या कृपेमुळे प्रल्हाद त्या मधून सुखरूप बाहेर आले आणि होलिका माता भष्म झाली.

ही घटना फाल्गुण पौर्णिमेस घडली तेव्हापासून भारतभर होळी साजरी केली जाते. या दिवशी होलिका पूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. दक्षिण भारता मधे होळीस काम दहन असे म्हणतात. कामदहना संदर्भात एक पौराणिक कथा प्रचलित आहे. महादेव तपश्चर्या मधे लिन असताना त्यांना जागृत करण्यासाठी कामदेवाने त्यांच्या अंतरमनामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, भगवान शिवशंकरांची तपश्चर्या भंग झाली. भगवान महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला, तिसरा नेत्र उघडताच काम देव जळून भस्म झाले, अशी अख्यायिका आहे. भारत देश्यामध्ये प्रत्येक सणाचे पौराणिक माहात्म्य आहे.

होळी कशी साजरी करतात :
होळीच्या दिवशी संध्याकाळी ज्या ठिकाणी होळी पेटवणार आहोत ती जागा प्रथम स्वच्छ करून घ्यावी किंवा शेणाने ती जागा सारवून घ्यावी, एरंडाचे फांदी आणून त्या भोवती लाकडे, शेणाच्या गोवऱ्या रचून घ्याव्यात त्या वरती उसाचे वाढे गाईचे तूप, कपूर ठेवावे. हळदी कुंकू वाहून, अगरबत्ती लावून पूजा करावी पुरणपोळी चा नैवेद्य दाखवावा, होळी प्रज्वलीत करून पाणी घेऊन होळीस पाच प्रदिक्षणा घालाव्या.

धुलिवंदन (धूळवड }
होळी नंतर चा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन किंवा धुळवड असेही म्हणतात. धुलिवंदन म्हणजे धुळीस (होळीची राख) वंदन ( नमस्कार ) करण्याची प्रथा आहे. होलिका दहणाच्या दुसऱ्या दिवशी होळी ची राख हि मस्तकास लावून त्याला वंदन केले जाते या कृतीतून आपण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूता प्रति आदर व्यक्त केला जातो. होळीची राख पाण्यामधे मिसळून एकमेकांच्या अंगाला लावली जायची, परंतु सध्या सर्वत्र रंग खेळण्याची प्रथा सुरु झालेली आहे. असे असले तरी ग्रामीण भागामध्ये रंगपंचमी ला रंग खेळला जातो. आजची तरुण पिढी धुली वंदनाचे महत्व विसरत चालली आहे.महाराष्ट्रामध्ये धुलिवंदनाची सरकारी सुट्टी दिली जाते.

1 thought on “होळी | Holi”

Leave a Comment